मर्दहो उठा, विरांनो पेटून उठा,
दिबांच्या नावाचा डंका वाजवा! – कांतीलाल कडू
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
दिबांच्या नावासाठी विमानतळाच्या भोवती आंदोलनाचे सुरुंग पेरले गेले ते आमच्याच शब्दगोळ्यांनी. दुधारी शब्दांनीच राजकीय, सत्तापिपासू आणि मतलबी नेत्यांचा शाब्दिक शिरच्छेद केला आणि मग गिधाडांच्या घिरट्या वाढल्या…!
राजे नावाचा शिलेदार हातात माईक घेऊन अनाहुतपणे आमच्यासमोर ठाकला. :प्रभात पर्वा’तून सागराच्या लाटा उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नांतून दिबांच्या संग्राममय कर्तृत्वातून आदळू लागल्या. एक एक लाट विंचारत स्वार होऊन त्यांचे प्रश्न हवेतल्या हवेत झेलत त्याच गतीने सीमापार केले.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव दिले जावे, अशी स्थानिक नेत्यांची मानसिकताच नाही, स्पष्ट शब्दात त्यांच्या वर्मावर घाव घातल्याने अनेक नेते घायाळ झाले. एक घाव दोन तुकडे करणारी आमची मुलाखत नेहमीप्रमाणे गाजली. सागर राजेंना अनेकांनी फोन लावून बोल लावले असतीलच..! इतकी पारदर्शक आणि रोखठोक मुलाखत दिली आणि अनेकांच्या कमरेवरची पॅन्ट सैल होत, कुल्यावर उतरली.
दोनच दिवसात आगरी, कोळी, कराडी, बारा बलुतेदारांनी मुलाखतीला पसंती दिली. तिथेच आंदोलनाची ठिणगी पडली. अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे कार्याध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी कळवा, ठाणे येथे अमित गार्डनमध्ये बैठक घेतली. आमच्या मुलाखतीचा रोख उपस्थितांना पटवून देवून आंदोलनाचे रणशिंग फुंकले. विशेषत: दशरथदादा, आजही मोठ्या मनाने कबुली देत श्रेय आमच्या पारड्यात टाकत आहेत. त्यांच्यानंतर दोन दिवसात भाजपा नेत्यांनी जासईत बैठक बोलाविली. उद्धव ठाकरे सरकार, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात सुप्त कावेबाजपणाने लढे भाजपाने उभारून सरकार अस्थिर आणि राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, दिबा समर्थकांना भाजपाने उलटे टाकलेले फासे तेव्हा खरे भासले होते. आता त्यांचा खरा चेहरा समोर येवू लागला आहे. गेल्या दोन आंदोलनातून भाडोत्र्यांची सपशेल माघार स्पष्ट दिसून आली. तर बाळ्या मामा नावाचा नवा सेनापती आगरी समाजाच्या लढ्याची चौसष्ट घरं व्यापून उरला आहे. राष्ट्रवादीचे खासदार ही त्यांची खरी ओळख. त्यांनीही राजकीय सदरा उतरवून अंगावर समाजाची गोधडी ओढून घेत थेट सरकारपुढे आव्हान उभे केले आहे.
लढ्याचा प्रारंभ महत्वाचा असतो, तितकीच त्यातील बदलत्या डावपेचांसह रणनीती आणि सातत्य महत्वाचे ठरते. आंदोलनाची दिशा आम्ही दाखवून दिली; नव्हे तर एक समिधा टाकून यज्ञकुंड प्रज्वलीत केला. पुढे त्या लढ्यातून आमचा कायमचा काटा काढण्याचा कुटील डाव आखत छाती फुगवून दुर्योधनवृत्तीने जासईच्या सभेत, आंदोलनावर संशय निर्माण करणाऱ्यांवर आणि सरकारवर टीका करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा कुटनितीने, मुजोरीने उपस्थितांना भावनिक हाक दिली. तेव्हाच्या त्यांच्या एका कट्टर समर्थकाने आपण त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करू, असा मार्ग सुचवला. परंतु, दुर्योधन, अधिकच चेकाटला होता. म्हणाला, ‘कायमचा बंदोबस्त: केलाच पाहिजे! सभा स्तब्ध झाली. आंदोलन पेटवायचे आहे की, व्यक्तिगत सूड उगारून कुणाचा मुडदा पाडायचा आहे, याचे अनेकांना कोडे पडले. परंतु, मालकांच्या काही श्वानांना त्यातही आनंद मिळाला आणि त्यांनी टाळ्या पिटून मालकांना खुश केले.
आम्ही याबाबतचे व्हिडीओ आणि तक्रार अर्ज उरण पोलिसात दिले. परंतु, भिक्कारचोट पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याऐवजी शेण खाल्लेच.
जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरही विमानतळ आंदोलनाबाबत सरकारविरोधी सर्वात जास्त अग्रलेख आणि एकुण एक घटनेच्या इत्यंभूत बातम्या प्रकाशित केल्या. मृत्यूच्या भुताने समोर कितीही थयथयाट मांडला तरी त्यांच्यासमोर न झुकण्याचा वारसा आमचा आहे. मृत्यूला असे अनेकदा परतावून लावत विरोधकांनाच कबर खोदलेली आहे.
अखेर अलीकडे नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून भाजपात कमालीचा सन्नाटा पसरलेला आहे. कुणीही सरकारविरोधात ‘ब्र’ काढायला तयार नाहीत, भाजपावासी. अखेर इतना सन्नाटा क्यू है भाई, असा प्रश्न घेऊन बाळ्यामामाच धावून आले आहेत. ते मावळचे खासदार श्रीरंग बारणे अजून खोके मोजण्यात दंग दिसतात. त्यांनी तोंडाला कुलूप लावून घेतले आहे. रायगडचे खा. सुनील तटकरे तर बेपत्ता असावेत. बहुतेक नेपाळमध्ये गेलेत की काय, असे चित्र असल्याने त्यांनीही दिबांच्या बाबतीत रितसर मौन बाळगले असल्याने, बाळ्यमामा ‘गेमचेंजर’ ठरत आहेत.
बाळ्या मामा नावाच्या वादळाने काल, पनवेल, उरणच्या स्वाभिमानाला नवा आयाम देण्याचे कसोसीने प्रयास केले. त्यांच्या सोबतीला राजेंद्र पाटील, सुधाकर पाटील यांच्या खास आग्रहास्तव आम्हीही खांद्याला खांदा लावून उतरलो. संयोजकांनी आमच्या कर्तृत्वाचे माप आमच्या पदरात टाकल्याचे हजारो दिबा प्रेमी, समर्थकांनी ‘याचि देही, याचि डोळा” अनुभवले. खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार राजूदादा पाटील यांनीही जातीसाठी राजकारणविरहित आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली. ते प्रत्यक्ष उतरले. त्यांनी बाळ्या मामांसोबत एकतेचे, समतेचे, ममतेचे आणि रयतेचे राज्य, दिबांच्या विचारसरणीचे असावे, नवी मुंबई विमानतळाला त्याच जहाल विचारसरणीतून नाव दिले जावे, यासाठी काळजाची उधळण करत रॅली काढली. तिला हजार तोफांची सलामी दिली पाहिजे. कुठे हे आजी, माजी खासदार, आजी, माजी आमदार? दिबांच्या नावाचा शिडीसारखा वापर करुन यशाच्या अर्धवट शिखरावर पोहचलेले ‘अधर्मआत्मा’? समाज आता ती शिडी काढेल, तेव्हा यांचा स्वार्थाचा रथ कर्णासारखाच दलदलीत रुतून पडणार आहे. सगळेच मार्ग आता त्यांच्यासाठी बंद होण्याची बिजे आंदोलनातून पेरली जातील.
असे ऐकायला येते की, मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन करण्याची भाजपाची युक्ती आहे. ज्येष्ठ दिवंगत मराठी उद्योगपती रतन टाटा नावाच्या अजातशत्रूचेही नाव पुढे केले जाते. मात्र, या सगळ्या घडामोडीआडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही अचानक नवी मुंबई विमानतळाला दिले जावू शकते…!
रात्र वैऱ्याची आहे. काळरात्र दरवाजा ठोठावत आहे. आयुष्याच्या मशाली येत्या १३ दिवसात पेटल्या गेल्या नाहीत तर…. तर आगरी, कोळी, कराडी, पाचकळशी, बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाच्या तेरावाच्या पंक्ती घालायला सरकार मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा उठा मर्दहो, विरांहो तुम्हीही खांद्याला खांदा लावून दिबा नावाच्या राष्ट्रीय नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याच्या अखेरच्या लढ्यात साम, दाम, दंडभेद विसरून लढायला तयार व्हा…. एखादं काळवीट दिसताच भुकेने व्याकुळ झालेल्या सिंहासारखे, सिंहीणी सारखे सरकारवर तुटून पडा. लढा इतका तीव्र करा की, सरकारला जळी, स्थळी, काष्टी पाषाणी दिबा आणि त्यांचे सैराटलेले सैन्य दिसले पाहिजे…!


