आयुष्यातले सांगाती ३२,
कै. वसंतराव उपाख्य बापुसाहेब साठे…..,
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
आज २१ सप्टेंबर २०२५, आज पासून दोन दिवसांनी म्हणजेच २३ सप्टेंबर २०२५ रोजी भारताच्या राजकीय क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाने दीर्घकाळ चमकत राहणारे नागपूरकर व्यक्तिमत्व वसंत पुरुषोत्तम उपाख्य बापूसाहेब साठे यांचा चौदावा स्मृती दिवस येतो आहे. त्यानिमित्ताने आज वाचकांना बापूसाहेबांच्या आठवणी मी सांगणार आहे.
बापूसाहेबांवर आजवर मी किमान दहा ते बारा वेळा विविध नियतकालिकांमध्ये लेख लिहिलेले आहेत. दरवेळी त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यातील काही लेख माझ्या आधी प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांमध्ये समाविष्ट देखील झालेले आहेत. त्यामुळे नवीन काय लिहायचे हा देखील प्रश्नच आहे.तरीही आज मी या लेखमालिकेत त्यांच्यावर पुन्हा एकदा लिहून सर्वच आठवणींना उजाळा द्यायचे ठरवले आहे.
बापूसाहेब कामगार नेते होते. एक आघाडीचे विधीज्ञ देखील होते. एक लोकप्रतिनिधी होते. उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी असणारे मंत्री देखील होते. एक फर्डे वक्ते होते. राजकीय विचारवंत देखील होते. एक रसिक व्यक्तिमत्व होते. असे विविध गुणांनी संपन्न असलेले हे व्यक्तिमत्व माझ्यासाठी माझ्या मित्राचे वडील आणि माझे एक सुहृद होते. बापू म्हणूनच मी शेवटपर्यंत त्यांना ओळखत होतो.
बापूंचा माझा परिचय झाला तो मी सातव्या वर्गात शिकत असताना. सातवीची परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या शाळेच्या म्हणजेच नागपुरातील हडस हायस्कूलच्या स्विमिंग पूलवर मी पोहणे शिकायला जायचो. त्यावेळी माझ्याच बरोबर शिकत असलेला सुभाष साठे देखील पोहणे शिकायला येत होता. तिथे बरेचदा सुभाषचे वडील देखील पोहायला येत असत. ते पट्टीचे पोहणारे होते. मात्र ते आम्ही मुले पोहणे शिकायचो, त्या बाजूला येऊन आम्हा सर्वांना पोहणे शिकवायचे. कधीतरी सुभाषला विचारले, तेव्हा त्याने हे माझे वडील आहेत म्हणून सांगितले. मग तिथे शाळेच्या स्विमिंग पूलचे प्रमुख असलेल्या लाडकर सरांनी एक दिवस हे वसंतराव साठे नागपुरातले प्रख्यात वकील आहेत अशी माहिती दिली होती.
शिकवायला आले की बापू थोडा वेळ सुभाषला शिकवायचे. नंतर आम्हा इतर मुलांनाही ते शिकवायला यायचे. बरेचदा मग सुभाषशी गप्पा मारत असलेल्या मला सुद्धा पकडायचे. मग माझ्या पोटाखाली हात देऊन मला पाण्यात न्यायचे आणि मला हातपाय मारायला सांगायचे. हळूच केव्हातरी ते हात काढून घ्यायचे. काही वेळाने लक्षात आले की मी अस्वस्थ व्हायचो, तर ते लगेचच अरे घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत, म्हणून पोहण्यासाठी घातलेल्या अंडरपॅन्टमध्ये मागच्या बाजूने बोट अडकवायचे आणि हं चल पुढे मार हात म्हणून सांगायचे. बरेचदा तो हात देखील ते काढून घ्यायचे आणि मिश्किल पणे बघत राहायचे. असे करून हळूहळू सुभाषबरोबर त्यांनी मला देखील पोहणे शिकवले होते.
बापूंच्या पोहणे शिकवण्याचा हा किस्सा मी त्यांच्यावर लिहिलेल्या एका लेखात नमूद केला होता. तो लेख एका वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावर त्या वृत्तपत्राच्या अंकाची एक प्रत मी बापूंच्या दिल्लीच्या पत्त्यावर पाठवली. प्रत मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी बापूंचा मला फोन आला आणि मी पोहणे कसे शिकवायचो हे तू इतकं चांगलं लक्षात कसे ठेवलं आहेस? म्हणून त्यांनी माझे कौतुक देखील केले होते.
नंतर नवव्या वर्गात असताना नागपुरात विदर्भात कृषी विद्यापीठ व्हायला हवे म्हणून आंदोलन झाले होते. आंदोलनाच्या दिवशी सकाळीच आंदोलनातल्या काही प्रमुख नेत्यांना अटक करून तुरुंगात मिळण्यात आले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात जी नावे आली, त्यात वसंतराव साठे यांचेही नाव होते. आम्ही सर्व मित्रांनी त्यादिवशी शाळेत पोहोचल्यावर सुभाषला विचारले. तेव्हा त्याने तेव्हा त्याने लगेचच हो बापूंना काल अटक केली आहे आणि ते सध्या तुरुंगातच आहेत असे अभिमानाने सांगितले. त्या वयात अशी अटक केली जाणे म्हणजे एखाद्या गुन्ह्यासाठीच, असे समजण्याचे दिवस होते. मात्र सुभाषनेच आम्हाला समजावले. अशाप्रकारे राजकीय कैदी म्हणून अटक होणे केव्हाही चांगले असते. त्यानिमित्ताने आमच्या ज्ञानातही थोडी भर पडली.
अभी दहाव्या वर्गात असताना नागपुरात भारत विरुद्ध न्यूझीलंड ची टेस्ट क्रिकेट मॅच झाली होती. नागपूरत होणारी ती पहिलीच टेस्ट मॅच होती. त्यामुळे सर्वांनाच फार औत्सुक्य होते. बापू त्यावेळी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे एक पदाधिकारी होते. त्यामुळे मॅच सुरू असताना ते ग्राउंडवर फेरफटका मारून व्यवस्था नीट आहेत की नाही ते बघायचे. मग मैदानात आम्ही मित्र भेटलो की बापू आवर्जून चौकशी करायचे.
.
दहावी पास झाल्यावर आम्ही कॉलेजमध्ये गेलो. सुरुवातीला एक वर्ष मी आणि सुभाष सोबतच हिस्लॉप कॉलेजमध्ये होतो. नंतर मी धरमपेठ कॉलेजमध्ये आलो आणि आमचे संबंध कमी झाले. त्याच काळात बापूंना अचानक लोकसभेची उमेदवारी मिळाली. ते अकोल्यातून निवडून लोकसभेत गेले. तेव्हापासून मग त्यांचे नाव फक्त वृत्तपत्रातच वाचायला मिळत होते.
१९७४ ला कॉलेज शिक्षण आटोपल्यावर १९७५ पासून मी व्यवसाय सुरू केला. १९७६ मध्ये मुंबई दूरदर्शनचा छायाचित्रकार म्हणून मान्यता मिळावी, यासाठी मी प्रयत्नात होतो. त्यावेळी बापूसाहेब साठे मदत करू शकतील असे मला काहींनी सांगितले. शाळा सोडून बरीच वर्षे झाली होती. त्यामुळे बापू मला ओळखतील किंवा नाही ही शंका होती. मग माजी राज्यसभा सदस्य टी. जी. देशमुखांकडे मी गेलो. ते माझ्या वडिलांचे मित्रच होते. त्यांनी वसंतराव साठे यांच्यासाठी पत्र दिले आणि ते पत्र घेऊन बापूंना त्यांच्या धंतोलीतल्या घरी भेटायला गेलो. मी भेटल्यावर बापूंनी अत्यंत आपुलकीने माझी चौकशी केली. त्यावेळी मी त्यांना मी सुभाषचा वर्गमित्र आहे हे सांगितले. त्यावेळी त्यांनी जवळ बसवून घेतले सर्व विषय समजावून घेतला आणि मी दिल्लीत संबंधितांशी बोलतो असेही सांगितले. त्या संदर्भात नंतर मी एक दोनदा नागपुरातच त्यांना भेटलो देखील होतो. त्यावेळी त्यांनी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले होते.
योगायोगाने फेब्रुवारी १९७७ मध्ये मुंबई दूरदर्शनने मला त्यांचा वृत्तसंकलनासाठीचा छायाचित्रकार म्हणून मान्यता दिली, आणि माझे काम सुरू झाले. नेमक्या त्याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुका आल्या होत्या. त्यामुळे बापू अकोल्यात निवडणूक प्रचारात व्यस्त होते. मात्र निवडणुका आटोपल्यावर मी त्यांना जाऊन भेटलो होतो. तेव्हा त्यांनी माझे अभिनंदन करत मला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
नंतरची दोन-तीन वर्षे खूप धावपळीची गेली होती. देशाच्या राजकारणातही खूप उलथापालथी चालू होत्या. त्यावेळी काँग्रेस पक्ष विरोधात होता त्यामुळे बापूही विरोधी पक्षाचे खासदार होते. मात्र १९८० मध्ये ज्या मध्यावधी निवडणुका झाल्या, त्यात काँग्रेस पक्षाला दणदणीत यश मिळाले. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात वसंतराव उपाख्य बापूसाहेब साठे यांना माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून कार्यभार देण्यात आला होता.
सुमारे एक महिन्याने बापू नागपूरला आले. यावेळी ते वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी ते वर्ध्याला रवाना झाले. साधारणपणे कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायचे असले तर दूरदर्शन कडून आधी निरोप येत असे. मात्र यावेळी काहीही निरोप आला नव्हता. शेवटी मी निर्णय घेतला आणि स्वतःहून वर्ध्याला जाऊन बापूंच्या पावणारा आश्रमातील भेटीचे चित्रीकरण करण्याचा ठरवले. वर्धैला जाण्यासाठी मी सकाळी दहा वाजताची महाराष्ट्र एक्सप्रेस पकडली, आणि अकरा वाजता वर्ध्याला उतरलो. तिथून रिक्षाने पवनारला निघालो. पवनारला मी पोहोचलो तर बापूंची आणि विनोबांची भेट संपत आली होती. मी धावतपळत गेलो, आणि त्यांच्या भेटीचे काही शॉट्स घेतले. विनोबांच्या कुटीतून भेटून बाहेर आल्यावर पवनारच्याच काही मंडळींनी एका कार्यक्रमासाठी दूरदर्शनचे चित्रीकरण हवे म्हणून बापूंना विनंती केली. त्यावेळी बापूंनी सांगितले की त्यासाठी मला मुंबई किंवा दिल्लीहूनच टीम पाठवावी लागेल. नागपूरला कोणीही नाही. तेव्हा लगेचच तिथे असलेले नागपूरचे पत्रकार अप्पा पाडळकर, केशवराव पोद्दार, मधुकर दामले, प्रभृतींनी लगेचच बापूंना सांगितले की नागपुरात अविनाश पाठक आहे. मग बापूंनी लगेच विचारले, मग आज तो आला कसा नाही? तेव्हा आप्पा पाडळकरांनीच उत्तर दिले अविनाश आला आहे. आत्ताच तर त्यांनी तुमचे काही शॉट्स घेतले. लगेच अप्पांनी मला बोलावले. मग बापूंनी जवळ बोलावत माझी चौकशी केली. तेव्हाही मी त्यांना सुभाषचा वर्गमित्र असल्याची आणि नागपूरच्या घरी दोन-तीनदा भेटल्याची आठवण दिली. मग त्यांना लगेच आठवले. त्यावेळी तिथे बापूंच्या सौभाग्यवती जयश्री काकू सुद्धा होत्या. त्यांनी मात्र लगेच ओळखले आणि सांगितले की हो हा सुभाषचा मित्र आहे आणि हा घरी यायचा. मग बापूंनी त्यांचे खाजगी सचिव प्रभाकर पाठक यांना बोलावून सांगितले की आता हा आपलाच मुलगा आहे. याचे काय प्रॉब्लेम्स असतील ते बघा आणि माझ्या प्रत्येक दौऱ्यात हा चित्रीकरणासाठी सोबत राहील हे बघा. मग तिथून आम्ही वर्धैत आलो. तिथे झालेल्या सभेचे देखील मी चित्रीकरण केले, आणि संध्याकाळी नागपूरला आलो. लगेचच ती फिल्म मी मुंबईला पाठवली आणि ती दुसऱ्याच दिवशी प्रसारितही झाली होती.
तेव्हापासून बापूंच्या प्रत्येक दौऱ्यात मी त्यांच्यासोबत जाऊ लागलो. दरवेळी मी दिसलो की ते आवर्जून बोलावून घेत आणि चौकशी करायचे. दौऱ्यात कुठेही मी जर दिसलो नाही तर ते पुन्हा तो अविनाश पाठक कुठे आहे अशी चौकशी देखील करायचे. एकदा अमरावतीहून परत येताना एका शासकीय विश्रामगृहात सर्व लोक जेवणासाठी थांबले. बापू जेवायला बसले. त्यावेळी मी मागेच थांबलो होतो. अचानक मी दिसत नाही असे बापूंच्या लक्षात आले, आणि त्यांनी लगेचच अरे आपला अविनाश पाठक दिसत नाही, त्याला जेवायला बोलावून घ्या, म्हणून निरोप दिला. लगेचच मी कुठे आहे याची शोधाशोध सुरू झाली आणि मी टेबलपाशी जाऊन पोहोचल्यावरच बापूंनी जेवायला सुरुवात केली होती.
बापू मला अतिशय आपुलकीची वागणूक देत असल्यामुळे मी सुद्धा त्यांच्याशी तितकाच मोकळेपणे वागत होतो. बरेचदा मग कार्यक्रमात आपल्या सोयीचा एखादा शॉट हवा असला तर बापूंना जाऊन मी निर्धारस्तपणे सांगत असे. एकदा नागपुरात तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचा नागरी सत्कार होता. सत्काराला बापू प्रमुख पाहुणे म्हणून यायचे होते. आधी बापूंचे गावात बरेच कार्यक्रम होते त्याचे चित्रीकरण करत करत मी पोहोचलो. तोवर अंतुलेंचा कार्यक्रम सुरू झाला होता. त्यांचा सत्कार आटोपून गेला होता, आणि अंतुलेंचे भाषण सुरू झाले होते. बापू मात्र पोहोचायचे होते. आता सत्काराचे शॉट चुकले. आता काय करायचे या चिंतेत मी असताना तितक्यात बापू तिथे पोहोचले. मग मी स्टेजवरील नेत्यांना आता बापू अंतुलेंचा सत्कार करणार का असे विचारले. कृष्णराव पांडवांनी बापूंना विचारले. तर आधी बापू नाही म्हणाले. तितक्यात त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले आणि मी विचारतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिथूनच मला तुला माझ्या सत्काराचा शॉट हवा आहे का? असे विचारले. मी हो म्हणताच त्यांनी लगेच पांडवांना मी सत्कार करतो हार आणा असे सांगितले. त्यानंतर अतुल यांचे भाषण संपताच बापूंनी आपले भाषण सुरू करण्यापूर्वी अंतुलेंना शाल पांघरली. हातात श्रीफळ दिले, हार घातला आणि मगच भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे मी सुद्धा बापूंमुळे आज आपले कव्हरेज पूर्ण झाले या समाधानात घरी परतलो होतो.
एकदा बापू अमरावतीत एका कार्यक्रमासाठी जाण्यास करिता नागपुरात आले होते. विमानतळावरून तेथे अमरावतीला गेले. तिथेच विमानतळावर मी त्यांना भेटलो आणि उद्या संध्याकाळी सप्तक तर्फे भीमसेन जोशींचा भक्ती संगीताचा कार्यक्रम असून तुम्ही तिथे थोडा वेळ साठी यावे असा आग्रह धरला. त्यांचा कार्यक्रम फार टाईट होता. तरीही माझा शब्द मानून बापू यायला तयार झाले.
मग त्यादिवशी संध्याकाळी मी रविभवननला जाऊन थांबलो. बापू जसे अमरावतीहून येऊन पोहोचले तसा त्यांच्याशी बोललो. थोड्याच वेळात ते पुढल्या कार्यक्रमाला निघाले. त्यांच्यासोबत मी नागपूर टाइम्स ला गेलो. तिथे बापू थांबले असतानाच मी पुढे भीमसेन जोशींचा कार्यक्रम सुरू होता तिथे पोहोचलो.
कबूल केल्याप्रमाणे बापू तिथे आले. येताच बापू पेंडॉलमध्ये पोहोचले. भीमसेन जोशींचे गाणे सुरू होते. त्यांना नमस्कार करत बापू खाली प्रेक्षकांमध्ये बसले. मग गाणे संपल्यावर बापू व्यासपीठावर गेले आणि भीमसेनजींचा सत्कार केला. थोडा वेळ गाणे ऐकायला बसून मग मध्यंतरात भीमसेनजींबरोबर बापूंनी चहा घेतला आणि लगेचच विमानतळाकडे रवाना झाले. माझा शब्द राखून बापू तेथे आले त्यामुळे सप्तकमधल्या मित्रमंडळींमध्ये माझा भाव देखील खूपच वाढून गेला होता.
बापू माहिती आणि प्रसारण मंत्री झाल्यापासूनच नागपूरचे लोक नागपूरला लवकरात लवकर दूरदर्शन केंद्र आणा म्हणून त्यांच्याकडे आग्रह धरत होते. प्रत्येक पत्र परिषदेत त्यांना प्रश्न विचारला जायचा. ज्यावेळी त्यांनी नागपूरला दूरदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांचा जवळजवळ तीन दिवसांचा नागपूर विदर्भाचा दौरा होता. आधी वर्धा यवतमाळ मग दुसऱ्या दिवशी अमरावती, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी नागपूरला, परत चौथ्या दिवशी दूरदर्शनच्या जागेची पाहणी करणे आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी एका पत्र परिषदेत त्यांनी १५ ऑगस्ट १९८२ पासून नागपूरला दूरदर्शनच्या प्रक्षेपण सुरू होणार अशी घोषणा केली होती. त्या पत्र परिषदेत जेव्हा नागपूरच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण कसे होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा निर्धास्तपणे बापू बोलले, इथे आपला अविनाश पाठक आहे ना त्याच्या मदतीने आम्ही कार्यक्रम तयार करू. शिवाय लवकरच मी मुंबई आणि दिल्लीहून स्वतंत्र युनिट देखील पाठवीन. त्यावेळी मी जेमतेम २६-२७ वर्षाचा होतो. एका केंद्रीय मंत्र्याने भरगच्च पत्रपरिषदेत माझा असा उल्लेख करावा याचे मला खूप अप्रूप वाटून गेले होते.
ठरल्यानुसार दूरदर्शन केंद्र सुरू झाले. त्याच्या शिलान्यास समारंभाला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी स्वतः आल्या होत्या. त्यावेळी बापू उपस्थित होते. त्या कार्यक्रमातही बापूंची भेट होताच “का रे बेटा तुझा कॅमेरा सज्ज आहे ना” अशी विचारणा करून ते कार्यक्रमासाठी व्यासपीठावर चढले होते. दुसऱ्या दिवशी नागपुरात अखिल भारतीय आट्यापाट्या सामना होता. त्या अंतिम सामन्याला बापू प्रमुख अतिथी आले होते. त्या कार्यक्रमाचे मी चित्रीकरण करत होतो. सामना सुरू होण्यापूर्वी बापू मैदानात आले आणि सर्व खेळाडूंची परिचय करून घेतला. मैदानाच्या एका बाजूला उभा राहून त्याचे चित्रीकरण करत होतो. परिचय आटोपून व्यासपीठाकडे जाण्याऐवजी बापू चालत माझ्याकडे आले आणि मला विचारले आता हा खेळ हळूहळू नामशेष होतो आहे, त्यामुळे या सामन्याचेही चित्रीकरण करायला हवे. त्यावेळी मी त्यांना मला फक्त पुरस्कार वितरण समारंभाचे चित्रीकरण करायला सांगितले असल्याचे बोललो. तर बापू मला म्हणाले मी स्वतः दूरदर्शनच्या डायरेक्टरशी बोलतो, तू चित्रीकरण करून घे आणि त्यांना पाठव. मग ठरल्याप्रमाणे मी संपूर्ण सामन्याचे चित्रीकरण केले. त्यावेळी एक केंद्रीय मंत्री मैदानातून सरळ माझ्याकडे चालत येतो आणि मला सूचना देतो हे बघून मैदानातील इतर माझे परिचित मात्र चांगलेच हबकले होते.
नागपूर दूरदर्शन केंद्र सुरू झाले आणि अवघ्या पंधरा दिवसातच केंद्रात खांदेपालट झाला. आधी माहिती आणि प्रसारण मंत्री असणारे बापू आता रसायन व उर्वरक मंत्री झाले. नंतर लगेचच राजीव गांधींचा नागपूर दौरा होता. त्यासाठी बापू आले होते. त्यावेळी रामगिरी शासकीय निवासस्थानी थोडा वेळ त्यांचे आणि माझे अगदी एकट्यात बोलणे झाले होते. पुढल्या विविध योजनांबद्दल त्यांनी मला माहिती देखील दिली होती.
१९८४ मध्ये बापू नागपूरला एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथे त्यांनी दुपारी हॉटेल राधिका मध्ये एक पत्रपरिषद घेतली. त्या पत्र परिषदेत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स जे घेतलेले काही नवीन उपकरण बापूंनी दाखवले. त्यात एक नवा कॅमेरा सुद्धा होता. सर्व पत्रकारांसमोर बापू बोलताना बोलले आपला मित्र अविनाश पाठकने सुद्धा हा कॅमेरा घ्यावा. त्याने तसा निर्णय घेतला तर आम्ही त्याला सर्व मदत करू.
यात बापूंना नेमके काय सुचवायचे ते मला लक्षात आले नव्हते. मग दुसऱ्या दिवशी वर्धेत नोबल एक्सप्लोकेमच्या भूमिपूजनानंतर भोजनाच्या वेळी बापूंची भेट झाली. तेव्हा मी त्यांना स्पष्टच विचारले. तेव्हा बापूंनी मला कल्पना दिली. सरकारची नवी योजना येते आहे. तू हालचाली कर. तुला मी मदत करेन.
मग मी देखील कामाला लागलो. बापूंनी प्रयत्न करून आणि आपले वजन वापरून मला केंद्रातून त्यातील एक प्रकल्प मंजूरही करून दिला. बँकेच्या कर्जासाठी देखील बापूंनी मदत केली. मात्र राज्य सरकारने केंद्र सरकार यांच्यात समन्वय नसल्याने तो प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. त्यात मला फटका देखील खूप बसला. परिणामी दूरदर्शनचे काम सोडून मी काही काळ बेकारीत घालवला आणि मग मुद्रित माध्यमात पत्रकारिता सुरू केली.
एव्हाना बापूंचे केंद्रातील मंत्रिपद गेले होते. तरीही दिल्लीला गेलो की त्यांना दोन कृष्णमेनन मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेटायचो. भेटले की चांगल्या गप्पा व्हायच्या. मग ते कृष्णमेनन मार्ग सोडून गुडगावला राहायला गेले. त्यामुळे मग दिल्लीत गेल्यावरही भेटी कमी झाल्या होत्या. मात्र नागपूरला आले की आमची हमखास भेट व्हायची. मग बापूंची झालेल्या चर्चेवर एखादी छान बातमी तयार व्हायची. बापूंनी टॅक्स विदाऊट इयर्स ही संकल्पना मांडली होती. त्याबाबत पहिली मुलाखत त्यांनी मलाच दिली होती.
विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे ही बापूंची अखेरपर्यंत धडपड होती. मग दरवेळी भेटलो की त्या विषयावर आमची चर्चा होत असे. मी जेव्हा काही समविचारी मंडळी गोळा करून स्वतंत्र विदर्भ राज्य अभ्यास परिषद स्थापन केली, तेव्हा बापूंनी भेटल्याबरोबर माझे अभिनंदन केले. एकदा त्यातल्या काही विदर्भवाद्यांना बापू एकत्र भेटलेही होते.
मी रामटेकच्या गडावरून हे नियतकालिक सुरू केले. त्याचा अखंड महाराष्ट्र की स्वतंत्र विदर्भ हा विशेषांक काढायचा होता. त्यासाठी बापूंची मुलाखत हवी होती. मग एक दिवस नागपूरच्याच घरी त्यांच्या स्टडी रूम मध्ये मी आणि माझा सहकारी अरुण फणशीकर आणि बापू असे एकत्र बसलो. जवळजवळ अडीच तास बापू आम्हाला जुना इतिहास सांगत होते. त्यांच्याजवळ माहितीचा खजिनाच होता म्हटले असते तरी वावगे ठरले नसते.
रामटेकच्या गडावरून च्या एका दिवाळी अंकासाठी मलमली तारुण्य माझे या विषयावर बापूंचा लेख हवा होता. दिल्लीत मराठी स्टेनोग्राफर मिळत नाही म्हणून अडचण होते, असे बापू म्हणाले तेव्हा मी दिल्लीला गेलो असताना स्वतःच त्यांच्या घरी गेलो. तब्बल अडीच तास त्यांनी मला लेख डिक्टेट केला. त्यावेळी आपल्या तरुणातल्या जुन्या आठवणीत बापू हरवून गेले होते.
२००९ च्या जानेवारी महिन्यात बापू नागपूरला आले होते. त्यांचा फोन आल्यामुळे मी त्यांच्या घरी भेटायला गेलो. सोबत माझी मुलगी दिव्येशा सुद्धा होती. तेव्हा नुकतीच मारुती कार घ्यायचे ठरले होते. बापूंनी दिव्येशाला जवळ घेत तिचा लाड केला. बोलताना आम्ही मारुती घेत आहोत असे सांगितले. तेव्हा बापू दिव्येशाला म्हणाले बाबांना सांग फक्त मारुतीच घ्यायची, आणि नाही ऐकले तर मला सांग,मी त्याला चांगला रागावतो.त्यावर उपस्थित सर्वच चांगलेच हसले होते.
नंतर वयापरत्वे बापूंचे नागपूरला येणे कमीच झाले होते. माझ्या आठवणीनुसार २०१० मध्ये त्यांचा नातू ( सुनिती आणि उदय बोधनकरचा मुलगा निखिलच्या लग्नाला ते आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार भवनात पत्रपरिषद घेतली, आणि सर्व पत्रकारांना स्नेहभोजनाला घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी सर्व विदर्भवाद्यांनाही घरी जेवायला बोलावले होते. ती बापूंची बहुदा शेवटचीच नागपूर भेट ठरली. त्यानंतर २३ सप्टेंबर २०११ ला रात्री टीव्ही बघत असताना अचानक माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे निधन अशी बातमी पाहिली. मी लगेच नागपूरला त्यांची मुलगी सुनीती बोधनकरला फोन केला आणि खात्री करून घेतली. बातमी खरी होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी लिहून ठेवल्यानुसार त्यांचे पार्थिव दिल्लीत एम्स ला दान करण्यात आले होते.
बापू जाऊन आता १४ वर्षे होतील. मात्र त्यांच्या आठवणी आजही जाग्या आहेत. ते देशातील एक विख्यात राजकीय विचारवंत होते. माजी केंद्रीय मंत्री होते. जर नशिबाने साथ दिली असती तर ते राष्ट्रपती देखील व्हायचे होते. त्यांच्या तुलनेत मी कुठेच आणि काहीच नव्हतो. तरीही त्यांनी माझ्याशी प्रेमसंबंध जपले हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.


