अमोघ वक्ते डॉ पी सी अलेक्झांडर आणि कुलपती पी सी अलेक्झांडर आंतर विद्यापीठ समयस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा
ऊमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
महाराष्ट्राचे १३ वे राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर (१२ जानेवारी १९९३ – १३ जुलै २००२) यांचे नाव आजही लोक आदराने घेतात.
सन १९४८ साली स्वातंत्र्यानंतर पहिल्या आयएएस बॅचचे अधिकारी (त्या पूर्वी आयसीएस होती) असलेले डॉ अलेक्झांडर यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात व पेहरावात एक शिस्त होती. दरारा ही होताच.
केंद्र सरकारचे वाणिज्य सचिव, भारताचे लंडन येथे उच्चायुक्त, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव व काही काळ राजीव गांधी यांचेही प्रधान सचिव म्हणून कार्य केलेले डॉ अलेक्झांडर हे उत्कृष्ट वक्ते होते. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असायची.
दहा मिनिटे बोलायचे असले तरी ते किमान दहा तास त्या विषयाचे चिंतन मनन करीत, संदर्भ ग्रंथ प्राप्त करून वाचत व नोट्स काढत.
भाषणाला जाताना मात्र एक चिटोरा व त्यावर लिहिलेले दोन चार मुद्दे पुरत असे. एवढ्या सामग्रीवर ते किमान अर्धा तास बोलू शकत.
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद यांच्याबद्दल डॉ अलेक्झांडर यांना नितांत आदर होता. रंगनाथानंद यांच्या ‘युनिवर्सल मेसेज ऑफ भगवद गीता’ या पुस्तकाच्या एका खंडाचे प्रकाशन डॉ अलेक्झांडर यांच्या हस्ते २००१ साली राजभवनाच्या दरबार हॉल येथे झाले होते.
केरळच्या ऑर्थोडॉक्स चर्चचे ख्रिश्चन असलेल्या डॉ अलेक्झांडर यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ‘भगवद गीता’ या विषयावर श्रोत्यांना खिळवून ठेवणारे तब्बल ४० मिनिटांचे अभ्यासपूर्ण भाषण केले होते.
या कार्यक्रमाला माजी शिक्षण मंत्री डॉ रफिक झकारिया देखील उपस्थित होते. वेळ जास्त लागतोय म्हणून अलेक्झांडर यांनी रंगनाथानंद यांना ‘थांबू का?’ म्हणून विचारले. त्यावर रंगनाथानंद त्यांना आपल्या व्यासपीठावरील जागेवरूनच ‘आज माझा बोलण्याचा वेळही तुम्ही घ्या !’ असे सांगितले. ज्यांनी डॉ अलेक्झांडर यांची भाषणे ऐकली ते भाग्यवान होत !
महाराष्ट्रातला कार्यकाळ संपताना अलेक्झांडर यांनी विद्यापीठांना देणगी देऊन ‘स्वयंस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यास सांगितले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे आजही विद्यापीठांमध्ये त्यांच्या नावाने ही वक्तृत्व स्पर्धा होते.
गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन येथे या वक्तृत्व स्पर्धेच्या इंग्रजी विभागाची अंतिम फेरी झाली. अंतिम फेरीत राज्यातील १२ विद्यापीठांचे विद्यार्थी पोहोचले होते. या स्पर्धेत तीनपैकी एक ‘जज’ म्हणून जाण्याचा बहुमान मिळाला.
विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी पाच विषय देण्यात आले. बारा विद्यार्थ्यांमध्ये ९ मुली व ३ मुले होती. सर्वांनी उत्तम भाषणे केली. नव्या पिढीचा आत्मविश्वास आश्वासक आहे.
‘जेन झी’ मधूनही डॉ अलेक्झांडर व आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्या भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या उंचीची व्यासंगी माणसे निर्माण होतील अशी अपेक्षा आजच्या ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ करण्यास हरकत नाही.


