• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ३५,डॉ. मनोहर पिंगळे,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
October 17, 2025
in Uncategorized
0
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नव्याने सखोल चौकशी व्हावी.,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ३५,डॉ. मनोहर पिंगळे,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

आज पासून बरोबर दहा दिवसांपूर्वी म्हणजेच ६ ऑक्टोबरच्या सकाळी मी मोना मल्याशी फोनवर बोललो. ती माझ्या फोनची वाटच बघत होती. मी फोन करताच ती म्हणाली “अविनाश मी तुझ्या फोनची वाटच बघत होते, कारण दरवर्षी ६ ऑक्टोबरला मला फोन करायचा ही वाईट सवय तू आम्हाला लावून ठेवली आहेस. त्यामुळे ६ ऑक्टोबर आला की आधी “बाबांची” आणि मग तुझी आठवण येते.

आता वरच्या परिच्छेदातले “बाबा” म्हणजे मुंबई दूरदर्शनचे निवृत्त सहाय्यक केंद्र निर्देशक डॉ. मनोहर पिंगळे आणि मोना मल्ल्या म्हणजे त्यांची एकुलती एक मुलगी. माझे आणि मनोहर पिंगळे यांचे पर्यायाने पिंगळे कुटुंबाचेच जे स्नेहबंध निर्माण झाले होते, ते लक्षात घेत दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनाला म्हणजेच ६ ऑक्टोबरला मी मोनाला फोन करायचा असे ठरवून ठेवले आहे. काही कारणाने मला उशीर झाला तर मोनालाच काळजी वाटू लागते “अविनाश चा फोन आला नाही, म्हणजे त्याची काही अडचण तर नसेल ना” असे तिला वाटू लागते.

डॉ. मनोहर पिंगळे हे माझ्यापेक्षा वयाने खूपच ज्येष्ठ होते. तसेच सर्वच बाबतीत ते श्रेष्ठ देखील होते. तरीही त्यांचे माझे स्नेहबंध जुळले होते. ते आधी नागपूरलाच राहायचे. मी राहत असलेल्या लक्ष्मी नगर मध्येच पण दुसऱ्या टोकाला ते राहायचे. मात्र त्यांचा माझा परिचय झाला तो मी कॉलेजमध्ये गेल्यावर. झाले असे की दहावी पास झाल्यावर मी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. माझ्यासोबत लक्ष्मी नगरलाच राहणारा चंदू श्रीखंडे नावाचा मित्र देखील होता. तो पिंगळे सरांच्या घरासमोर राहायचा. मनोहर पिंगळे हे देखील हिस्लॉप कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, आणि कॉलेजच्या व्यवस्थापन समितीवर ते प्राध्यापकांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत देखील होते.

जुलै महिन्यात कॉलेज सुरू झाले. मी आणि चंदू प्रि युनिव्हर्सिटी डी सेक्शन मध्ये होतो. आमचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला होता. तो बघून आम्ही दोघांनी देखील एनसीसी मध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले. आमचा प्रवेश झाला आणि एनसीसीची परेड सुरू झाली. अचानक एक दिवस नोटीस आली की काही विद्यार्थ्यांचे सेक्शन बदलले आहेत. त्यात मी आणि चंदू आम्हा दोघांचेही नाव होते. डी ऐवजी ई सेक्शनमध्ये आम्हाला हलवण्यात आले होते. ई सेक्शनचा टाईम टेबल बघितला तर आम्हा दोघांनाही एनसीसी सोडावी लागणार होती. मग काय करायचे या चिंतेत आम्ही घरी आलो. मी घरी वडिलांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी चंदू घरी आला आणि मला म्हणाला की माझ्या घरासमोर पिंगळे सर राहतात. ते आपल्या कॉलेजमध्येच आहेत. त्यांनी आपल्याला मूळ सेक्शनमध्ये ट्रान्सफर करून देण्याचे मान्य केले आहे. मग ठरल्याप्रमाणे आम्ही दोघेही साडेदहा वाजता पिंगळे सरांना कॉलेजमध्ये भेटलो. लगेच ते आम्हाला संबंधित प्राध्यापकांकडे घेऊन गेले आणि त्यांना तत्काळ आमचे सेक्शन बदलायला सांगितले. त्यानुसार बदल देखील झाला आणि आमचे क्लासेस आणि एनसीसीची परेड दोन्ही आम्हाला अटेंड करता येऊ लागली.

ऑगस्ट महिन्यात कॉलेजमध्ये निवडणूका झाल्या. नव्या वर्षाचे पदाधिकारी निवडून आले. आता कॉलेज सुरळी सुरू होणार असे वाटत असतानाच एक दिवस सकाळी कॉलेजमध्ये पोहोचलो, तर कॉलेजमध्ये धिंगाणा सुरू होता. काही निवडक विद्यार्थ्यांनी सर्व क्लासेस बंद पडले होते आणि स्टाफ रूमला त्यांनी घेराव घातला होता. जोरदार घोषणाबाजी सुरू होती. जेव्हा चौकशी केली तेव्हा कळले की निवडणुकीच्या दरम्यान काही महिला प्राध्यापकांच्या वर्गात काही टवाळ मुलांनी गोंधळ घातला. त्या महिला प्राध्यापकांनी मनोहर पिंगळेंकडे तक्रार केली. त्यांनी प्राचार्यांकडे ते प्रकरण नेले आणि त्या चारही विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकावे असा आग्रह धरला. त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकले गेले. त्यामुळे ते चार विद्यार्थी आणि त्यांचे सर्व समर्थक त्यांनी गोंधळ घातला होता. पिंगळे सर आणि संबंधित महिला प्राध्यापिकांच्या नावाने शिमगा सुरू होता. एव्हाना कॉलेजमध्ये पोलीस देखील आले होते. मग प्राचार्य डॉ. भगत यांनी हस्तक्षेप करून त्या मुलांचे निलंबन मागे घेतल्याचे जाहीर केले आणि मगच आंदोलन थांबले होते.

प्राचार्यांनी निलंबन मागे घेतल्याने मग प्राध्यापक नाराज झाले. दोन दिवसानंतर प्राध्यापकांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. याच दरम्यान कळले की मनोहर पिंगळे संघाचे स्वयंसेवक आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकले होते ते सर्व डाव्या चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांनी जेव्हा प्राध्यापकांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू झाले, तेव्हा मनोहर पिंगळे यांना घरी येऊन मारहाण करण्याच्या धमक्याही दिल्या. त्यावेळी मी देखील संघाच्या लक्ष्मी नगर सायं शाखेचा स्वयंसेवक होतो. हे कळताच आमच्या शाखेतील आम्ही तरुण मंडळी आळीपाळीने मनोहर पिंगळे यांच्या घरी जाऊन बसू लागलो. काहीजण रात्री देखील चक्कर मारायचे. त्या दरम्यान त्यांच्या घरी माझे नियमित जाणे होऊ लागले, आणि संपर्क देखील वाढला. त्यांच्या पत्नी पिंगळे वहिनी आणि मुलगी मोना यांच्याशी देखील चांगला परिचय झाला.

नंतर हळूहळू पिंगळे सर नियमित सायं शाखेत देखील येऊ लागले. मग कॉलेजमध्ये काही समस्या असल्या तर मी हक्काने त्यांच्याकडे जायचो. त्यावर्षी नागपूर जवळ खापरी येथे संघाचा तीन दिवसांचा कॅम्प झाला होता. पहिल्यांदाच इथे दहा हजार स्वयंसेवक आले होते. तिथे पिंगळे सर देखील आमच्यासोबत होते.

त्यावर्षी म्हणजेच १९७१ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या होत्या. त्यात पिंगळे सर तत्कालीन भारतीय जनसंघाचा प्रचार करण्यात अगदी सक्रिय होते. आम्ही तरुण मुले देखील तेव्हा प्रचारात व्यस्त झालो होतो. पिंगळे सर तेव्हा आमचे मार्गदर्शक होते. त्यावर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत देखील मी सक्रिय होतो. तिथे ते देखील सर होतेच. त्यावर्षी विद्यापीठाच्या सिनेटवर देखील ते निवडून आले होते.

बघता बघता वर्ष संपले. कॉलेजचे नव्या वर्षाचे सत्र सुरू झाले. तेव्हा सर कॉलेजमध्ये दिसले नाहीत, म्हणून सहज चौकशी केली तर पिंगळे सर कुटुंबासह वर्षभरासाठी मुंबईला गेले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यामुळे वर्षभर काहीच संपर्क नव्हता. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आठ दिवस सर नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांची दोनदा भेट झाली होती.

नंतर मधली काही वर्षे आमचा काहीच संपर्क नव्हता. मात्र अधून मधून इतर मित्रांकडून किंवा संघातील सहकाऱ्यांकडून त्यांच्याबद्दल माहिती कळायची त्यांनी हिस्लॉप कॉलेजमधली नोकरी सोडली असून ते मुंबई दूरदर्शन ला निर्माता म्हणून रुजू झाले आहेत अशी माहिती चर्चेतूनच कानावर आली होती.

१९७५ मध्ये माझे शिक्षण संपले आणि मी छायाचित्रणाच्या व्यवसायात आलो. धरमपेठेत जागा घेऊन स्टुडिओ सुरू केला आणि व्यवसायात रमू लागलो.

१९७६ मध्ये अचानक मला मुंबई दूरदर्शन साठी एक चलत्छायाचित्रण करण्याची संधी मिळाली. तोवर मूव्ही कॅमेरा मी कधीच हाताळला नव्हता. मात्र तरीही मी जे चित्रीकरण केले ते दूरदर्शन ला पसंत आले, आणि त्यांनी हे प्रसारित देखील केले. मग माझी हिंमत वाढली. त्यावेळी मुंबई दूरदर्शनसाठी नागपूरातून काम करण्यासाठी त्यांना कंत्राटी पद्धतीवर कोणीतरी हवेच होते. मग मी अर्ज करायचा ठरवले आणि रीतसर अर्ज देखील पाठवला. त्यावेळी सांगण्यात आले की फक्त अर्ज पाठवून चालणार नाही तर तिथे जाऊन प्रयत्न करावे लागतील. पण मुंबई दूरदर्शन मध्ये कोणीच परिचयाचे नव्हते. अशावेळी काय करायचे हा प्रश्नच होता. अचानक मला आठवले की तिथे पिंगळे सर असावेत. मग त्यांचे दुसरे एक सहकारी मनोहर गोलपेलवार यांचा माझा संपर्क होता. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हो पिंगळे सर तिथेच आहेत. मग गोलपेलवार सरांचे पत्र घेऊन मी मुंबईला गेलो होतो. दूरदर्शन केंद्रावर गेल्यावर तिथे चौकशी करून त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यावेळी त्यांच्यासमोर चार पाच सहकारी बसले होते. माझ्याकडे बघून त्यांनी मला विचारले “बोला काय काम आहे?” मी त्यांना गोलपेलवार सरांचे पत्र दाखवले आणि कामासंबंधी थोडक्यात बोललो. त्यांनी मला कोणत्या सेक्शन मध्ये जायचे ते सांगितले आणि मग ते आपल्या कामात लागले. मी देखील त्या सर्व संबंधितांना भेटून पुन्हा यांच्या केबिनमध्ये आलो. त्यावेळी योगायोगाने ते एकटे होते. मग मी त्यांना काय झाले ते सांगितले. थोडा वेळ गेल्यावर मग मी त्यांना विचारले.” सर तुम्ही मला ओळखले नाही का?” त्यावेळी ते पटकन म्हणाले “नाही मी तुम्हाला ओळखलं नाही.” मग मी त्यांना नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, चंदू श्रीखंडे, संघाची लक्ष्मी नगर शाखा असे सगळे संदर्भ सांगितले. लगेच त्यांना आठवले “अरे बापरे, तो अविनाश पाठक आहेस तू, आता बराच मोठा झालास. मधल्या चार वर्षात आपली भेटच नाही. त्यामुळे एकदम तुला ओळखलेच नाही” मग थोडा वेळ आमच्या निवांत गप्पा झाल्या. माझ्या घरची, त्यांच्या घरची चौकशी झाली आणि उद्या पुन्हा तू ये तुझी डायरेक्टर सोबत गाठ घालून देतो असे सांगून त्यांनी मला रवाना केले.

त्या दोन दिवसात मी त्यांना दोन-तीनदा भेटलो. काम पुढे सरकवण्याच्या दृष्टीने त्यांनी योग्य ते मार्गदर्शनही केले, आणि मी नागपूरला परत आलो. परत आल्यावर दूरदर्शनला पुन्हा पत्रव्यवहार सुरू केला.

योगायोगाने अवघ्या महिनाभरातच मुंबई दूरदर्शन मध्ये खांदेपालक झाले, आणि अशा पद्धतीने कंत्राटी छायाचित्रकारांना नियुक्त करण्याचा जो सेक्शन होता त्याचे प्रमुख म्हणून पिंगळे सरांच्या हातात सूत्रे आली. त्यांनी लगेचच मला प्रायोगिक स्तरावर काम देणे सुरू केले आणि माझे काम बघून फोनवर सुधारणा सुचवणे देखील सुरू केले. हळूहळू थोड्याच दिवसात त्यांनी मला कंत्राटी पद्धतीवरील छायाचित्रकार म्हणून रितसर मान्यता देखील दिली. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी माझ्या आयुष्यात एक नवे दालन त्यांच्यामुळे उघडले गेले होते. आधी शिक्षणात काही अडथळे आल्यामुळे सर्व मंडळींचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा तुच्छतेचा झाला होता हे नवे दालन उघडले गेल्यामुळे एकदमच माझी समाजातली पोझिशन बदलून गेले त्याला पिंगळे सरांचेच सहकार्य कारणीभूत झाले होते.

दूरदर्शनचे काम नियमित सुरू झाले. त्यामुळे मुंबईच्या भेटी देखील वाढल्या. मग दर खेपेला पिंगळे सरांची भेट होऊ लागली. सुरुवातीला फक्त दूरदर्शनच्या ऑफिसमध्येच त्यांना भेटायचो. मग ते घरी देखील बोलावू लागले. त्यावेळी ते वांद्रे रिक्लेमेशनला राहत होते. त्यांच्या घरी माझ्या नियमित चकरा होऊ लागल्या. घरी गेलो की ते जेवल्याशिवाय सोडायचे नाहीत.

पिंगळे सरांनी नोकरीच्या निमित्ताने नागपूर सोडले असले तरी नागपुरात त्यांचे घर होते. ते हाऊसिंग बोर्डाचे होते. त्यामुळे ते विकणार नव्हते. मात्र मुंबईत नवीन घर घ्यायचंय म्हणून त्यांनी ते विकायचे ठरवले. त्या सगळ्या भानगडी मग त्यांनी माझ्यावरच सोपवल्या. योगायोगाने त्याच दरम्यान नागपूरच्या रियल इस्टेटच्या बाजारात खूप उलथापालत झाली. त्यामुळे योगायोगाने त्यांना भाव देखील चांगला मिळवून देऊ शकलो. त्या दरम्यान त्यांचे माझ्याकडे फोनवर सतत बोलणे होत होते, आणि ते घरी देखील येऊन गेले होते. नंतर थोडेच दिवसात माझ्या थोरल्या बहिणीच्या लग्नासाठी देखील ते आवर्जून आले होते. घर घरी १९८१ मध्ये विकले गेले तरी त्याच्या तांत्रिक भानगडी १९८८ पर्यंत पुरल्या होत्या.

१९८२ मध्ये नागपुरात दूरदर्शन केंद्र सुरू झाले. त्याच दरम्यान मुंबई दूरदर्शन मध्ये काही खांदेपालट देखील झाले. मनोहर पिंगळे यांच्याकडे आरोग्य संपदा या त्यांच्या नेहमीच्या कार्यक्रमासोबत वऱ्हाडी माणसं आणि मुलखावेगळी माणसं असे दोन कार्यक्रम सोपवण्यात आले होते. त्यावेळी नागपूर दूरदर्शन ला मुंबई दूरदर्शन कडूनच कार्यक्रम पाठवले जायचे. मनोहर पिंगळे यांनी त्यामुळे आपले बरेचसे कार्यक्रम नागपुरातून तयार करायचे असे ठरवले. ती जबाबदारी त्यांनी माझ्यावरच सोपवली. मग मी माझ्या संपर्कातल्या अनेक गुणी व्यक्तींना त्यांच्यामुळे मुंबई आणि नागपूर दूरदर्शनवर स्थान देऊ शकलो होतो.

या काळात आमचे स्नेहबंध इतके घट्ट झाले होते की माझ्याकरता ते फ्रेंड, फिलोसॉफर, गाईड या भूमिकाच वटवत होते, म्हटले तरी वावगे ठरू नये. १९८४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी मला दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती करणारी यंत्रणा उभारावी अशी एका पत्र परिषदेतच ऑफर दिली होती. काय करावे हे सुचत नव्हते. मग मी निर्णय घेतला आणि मुंबईची तिकिटे काढून सरळ मुंबईला पिंगळे सरांकडेच पोहोचलो. तीन दिवस थांबून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याच सूचनेनुसार त्या क्षेत्रातील इतर मंडळींना देखील भेटलो आणि कार्यक्रम निर्मिती केंद्र उभारायचे हा निर्णय घेऊनच नागपूरला परतलो होतो.

मात्र ती माझी मनीषा कधीच फलद्रूप झाली नाही. त्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी सतत माझ्या मुंबईला चकरा व्हायच्या. दरवेळी सरांची भेट व्हायची. मुंबई दूरदर्शनमध्ये मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांचे सर्वच क्षेत्रात संपर्क होते. त्यांचे संपर्क वापरून देखील मी बरेच प्रयत्न केले. माझ्यासाठी त्यांनी देखील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शब्द टाकला होता.

१९८५ मध्ये मोनाचे लग्न नितीन मल्ल्याशी ठरले. मला सरांचे लगेच पत्र आणि समारंभाला मी अवश्य यावे असे आग्रहाचे निमंत्रणही आले. त्यावेळी मी या प्रकल्पाच्याच धावपळीत फसलो होतो. मात्र त्यातही वेळ ऍड्जस्ट करून मी लग्नाच्या दिवशी सकाळी दादरच्या वनिता समाजात पोहोचलो. धावत पळत का होईना पण मी पोहोचल्याचे पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. मग मी दिवसभर तिथे थांबलो. दुसऱ्या दिवशी माझी काही इतर कामे केली. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना घरी भेटायलाही गेलो होतो.

१९९० मध्ये माझेही लग्न झाले. त्यावेळी पिंगळे सर आवर्जून लग्नाला उपस्थित राहणार होते. मात्र निघायच्या आदल्याच दिवशी मुंबई दूरदर्शन मधील त्यांच्या एका सहका-याचा अपघात झाला. त्यामुळे त्यांना तिथेच थांबावे लागले होते. मात्र त्यांचा मला फोन आला आणि आता तुम्ही दोघेही मुंबईत माझ्याकडे या असे आग्रहाचे आमंत्रण त्यांनी दिले. त्यानुसार आम्ही त्यांच्या घरी गेलो देखील होतो. त्यावेळी मोना सांताक्रुजला राहायला गेली होती. तिच्याकडे देखील त्यांनी आम्हाला आवर्जून पाठवले होते.

१९९२ मध्ये पिंगळे सर मुंबई दूरदर्शनमधून निवृत्त झाले. त्यावेळी मुंबईतील डॉक्टर मंडळींनी त्यांचा सत्कार केला होता. ते सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच प्रसिद्ध झाले होते. त्यांचा जनसंपर्क खूपच दांडगा होता.

मुंबई दूरदर्शन मध्ये आरोग्य संपदा हा कार्यक्रम संचालित करतानाच सरांनी आयुर्वेदाचा तसेच योगाचा अभ्यास केला होता त्यासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी नाही गौरवण्यात आले होते. निवृत्तीनंतर मग त्यांनी आयुर्वेद आणि योगासाठीच काम करायचं ठरवले. त्याचबरोबर त्यांनी ईशान्य भारतातील धर्मांतरण विरोधात विवेकानंद केंद्र जे कार्यक्रम आयोजित करत होते त्यात सहभाग घ्यायचे ठरवले. त्यासाठी ते नागपूरला देखील आले होते.

या दरम्यान मी फोटोग्राफी बंद करून पूर्णवेळ पत्रकारितेत शिरलो होतो. मग कोणत्या विषयावर लेखन केले असे मुद्दे घेत सरांची माझी चर्चा होत असे. एकदा नागपूरहून मी मुंबईला निघालो, तर स्टेशनवर अचानक सर भेटले. ते देखील मुंबईला निघाले होते. त्यावेळी विधिमंडळ अधिवेशन सुरू होते. त्याचे वृत्त संकलन करायलाच मी मुंबईला निघालो होतो. योगायोगाने आमच्याच कोच मध्ये समोरचीच बर्थ विधान परिषदेतील आमदार बी. टी. देशमुख यांची होती. पिंगळे सर नागपुरात असताना विद्यापीठ प्राध्यापकांची संघटना असलेल्या नूटा मध्ये सक्रिय होते. नंतरच्या काळात बी. टी. देशमुख या संघटनेत सक्रिय झाले होते. बडनेऱ्याला बी.टी. देशमुख चढल्यावर मी त्यांची आणि पिंगळे सरांची ओळख करून दिली. मग दोघांनीही नूटाच्या आणि प्राध्यापक चळवळीच्या आठवणी गप्पांमध्ये जागवल्या होत्या. त्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले होते.

निवृत्तीनंतरही ते अधून मधून नागपुरात येत होते. त्यांचे बरेच नातेवाईक नागपुरातच होते. त्यामुळे वर्षाला किमान एक तरी चक्कर त्यांची असायचीच. १९९९ मध्ये माझ्या मुलीचा जन्म झाला. तिचे बारसे आणि माझ्या वडिलांची पंचाहत्तरी असा संयुक्त कार्यक्रम आम्ही घेतला होता. त्यावेळी त्यांना निमंत्रित केले होते. मात्र त्यावेळी दुसरे काही कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते. पण महिनाभरानेच ते नागपुरात आले तेव्हा आवर्जून घरी आले आणि सर्वांची भेट घेतली होती.

नंतरही नागपूरला आल्यावर त्यांची भेट व्हायचीच. २००५ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर नागपूरला आल्यावर पिंगळे सर आवर्जून घरी भेटायला आले होते. नंतर वर्षभरात त्यांच्या प्रकृतीच्या काही ना काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या. मग ते जास्त आजारी झाल्याने त्यांना मोनाने दादरच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचे कळले. त्या दरम्यान मी मुंबईला कामाने गेलो होतो. गेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी मोनाला फोन केला आणि बाबांना मी भेटायला जातो असे सांगितले. दादरला मी ज्या हॉटेलवर उतरायचो तिथून ते हॉस्पिटल अगदी जवळच होते. मात्र मोनाने सांगितले की तिथे भेटण्याची वेळ चार ते सात अशीच आहे. त्यामुळे मग मी माझी इतर कामे आटोपून संध्याकाळी पाच वाजता तिथे सरांना भेटायला जायचे ठरवले.

दिवसभराची कामे आटोपून मी संध्याकाळी पाच वाजता शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि खाली रिसेप्शनला त्यांचा खोली नंबर विचारून दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो आणि यांच्या खोलीकडे जात असताना लॉबीतच सरांची भाची मंगल नाईक भेटली, आणि तिने तिथेच मला सांगितलं “अविनाश तुला थोडा उशीर झाला रे, थोड्या वेळापूर्वीच बाबा गेलेत” माझ्यासाठी तो खूपच मोठा धक्का होता. एका काळात माझ्या भरकटलेल्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे आणि मला नवी प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम पिंगळे सरांनी माझ्या आयुष्यात केले होते. तसे करताना आपण काहीतरी वेगळे करतो आहे आणि अविनाशवर उपकार करतो आहोत अशी भावना त्यांनी कधीही ठेवली नव्हती. कायम स्नेहपूर्ण संबंधच त्यांनी जपले होते. त्यामुळे त्यांचे अकस्मात जाणे हे माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण करणारेच ठरले होते.

त्यावेळी मी रामटेकच्या गडावरून हा दिवाळी अंक प्रकाशित करत असे. थोड्याच दिवसात दिवाळी अगदी तोंडावर आली होती. त्यामुळे त्यावर्षीच्या अंकात मी सरांवर एक लेखही दिला होता .त्यानंतर माझे ‘दाहक वास्तव’ हे पहिले पुस्तक मी त्यांनाच अर्पण केले होते. नंतर २०११ मध्ये नांदेडच्या दैनिक श्रमिक एकजूट मध्ये माझा गाभाऱ्यातला कवडसा हा स्तंभ चालू होता. त्यातही मी पिंगळे सरांवर लिहिले होते. माझ्या तो लेख माझ्या “माझ्या खिडकीतले आकाश” या पुस्तकात समाविष्ट केला आहे.

आज पिंगळे सर जाऊन १९ वर्ष झालेली आहेत. मात्र त्यांची मुलगी मोना तिचे पती नितीन मल्ल्या आणि त्यांचे इतर स्नेहिसंबंधी यांनी माझ्याशी अजूनही स्नेहबंध जपले आहेत. ते तसेच कायम राहतील याची मला खात्री आहे.

पिंगळे सर जाऊन १९ वर्ष लोटलेली आहेत. अजूनही त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे ते सर्वच दृष्टीने माझ्यापेक्षा श्रेष्ठ होते. तरी त्यांनी माझ्याशी स्नेहबंध जपले आणि माझ्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मला मार्गदर्शन केले, तसेच मदतही केली हे माझ्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे.

Views: 97
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथील खरे वसुली सम्राट वाझे कोण? सदर पोलीस ठाण्याचा खरा कारभारी नक्की कोणत्या पदावरील आहे चला तर घेऊ मागोवा

अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथील खरे वसुली सम्राट वाझे कोण? सदर पोलीस ठाण्याचा खरा कारभारी नक्की कोणत्या पदावरील आहे चला तर घेऊ मागोवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)