सणासुदीमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताय, सतर्क राहा-अॅड चैतन्य भंडारी*
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
धुळे:- गेल्या काही वर्षांमध्ये सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. अगदी कपड्यांपासून ते कॉस्मेटिक, भेटवस्तू व गृहोपयोगी वस्तूंची मोठ्चा प्रमाणावर ऑनलाईन खरेदी केली जाते.
ग्राहकांच्या पसंतीमुळे प्रतिष्ठित कंपन्यांच्या ई-कॉमर्स वेबसाइट्सने देखील मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर खोट्या ऑफर्स, नकली वेबसाइट्स आणि बनावट डिलिव्हरी कॉल्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सुरक्षितपणे ऑनलाईन शॉपिंग करा, अन्यथा फसवले जाऊ शकता, असा इशारा सायबर तज्ज्ञा अॅड चैतन्य भंडारी दिला आहे.
सणासुदीच्या काळात ज्या वस्तू मार्केटमध्ये चढ्या दराने विकल्या जातात, त्याच वस्तूंवर ऑनलाईन सवलत मिळत असल्याने ग्राहक ऑनलाईन शॉपिंगला पसंती दर्शवितात. याच संधीचा फायदा सायबर चोरटे घेत आहेत. कंपन्यांच्या हुबेहूब वेबसाइट्स तयार करून, सोशल मीडियावर बनावट ऑफर्स शेअर करून ग्राहकांकडून पैसे उकळले जात असल्याच्या काही तक्रारी सायबर तज्ज्ञांकडे आल्या आहेत.काही प्रकरणांमध्ये ग्राहकाने पेमेंट केल्यानंतर वस्तू आली नाही, वेबसाइटच गायब झाली किंवा त्यांचे कार्ड किंवा बैंक माहिती चोरली गेली असे प्रकारही घडले आहेत. काही सायबर चोरटे कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली ओटीपी मागून फोन हॅक करण्याचा प्रयत्नही करत आहेत.
सणासुदीचा काळ हा सायबर फसवणुकीसाठी अनुकूल असल्यामुळे ग्राहकांनी आकर्षक ऑफर्सच्या भूलथापांना बळी न पडता प्रत्येक व्यवहार करताना काळजी घ्यावी,ऑनलाईन खरेदी करताना अधिकृत वेबसाइट्स किंवा अॅप्सचा वापर करावा. सोशल मीडियावरील ‘अतिशय स्वस्त ऑफर्स’वर लगेच विश्वास ठेवू नका. पेमेंट करताना ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ किंवा विश्वासार्ह पेमेंट गेटवेचा वापर करा,कोणत्याही कुरिअर एजंटला ओटीपी, बँक डिटेल्स, यूपीआय पिन सांगू नका असे सायबर तज्ञ अॅड भंडारी यानी सांगितले. सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या काही प्रतिष्ठित ई-कॉमर्स कंपन्यांचे दिवाळीनिमित्त सेल चालू आहेत.
सायबर चोरटे त्यांच्या बनावट वेबसाईट बनवत आहेत. या कंपन्यांनी जर एखाद्या वस्तूवर ३० टक्के सवलत दिली असेल तर सायबर चोरटे त्या बनावट वेबसाइटवर ८९ टक्के सवलत दाखवत आहेत. मात्र, यात ती वस्तू पैसे भरूनही आपल्याला मिळेल याची शाश्वती नाही. सध्या हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. डिस्काऊंट व्हाउचरची लिंक पाठविली जाते. त्यात या लिंकवर क्लिक करून अप्लाय करा असे सांगितले जाते. त्यातून फसवणूक होऊ शकते. मोबाईल अथवा लॅपटॉपमध्ये पेड अँटी व्हायरस घ्यावा. ज्याने तुमचे डिव्हाईस सुरक्षित राहतील. अधिकृत साईटवरच ऑनलाईन शॉपिंग करावी.
शॉपिंगची ऑर्डर दिल्यानंतर जर मेल आला की तुमचे पार्सल अमुक तारखेला न येता दुसऱ्या तारखेला येणार आहे, त्यासाठी या लिंकवर क्लिक करा तर कृपया ती लिंक ओपन करू नका. ऑफलाईन शॉपिंग करतानाही ‘लकी ड्रॉ’ साठीचे माहितीपत्रके भरू नका. हा डेटा संकलित करून सायबर गुन्हा घड्डू शकतो.म्हणून या दिवाळीत ऑनलाइन सुरक्षित रहा असे अॅड. चैतन्य भंडारी आणि डॉ. रोहन न्यायाधीश यांनी सांगितले.


