पोलीस पाटलाचा प्रामाणिकपणा..रस्त्यावर सापडलेली पर्स केली परत
प्रविण अहिरेवाघडू ता. चाळीसगाव रोकडे येथे दुचाकीने घरी जाणार्या पोलीस पाटलाला रस्त्यावर पर्स पडलेली दिसली. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून रस्त्यात सापडलेली ५ हजार रुपये रोख आणि पॅनकार्ड असलेली पर्स महिलेला परत केली आहे. या घटनेमुळे समाजात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दिसून येते.
रोकडे येथील पोलीस पाटील अमोल भाऊसाहेब पाटील हे काम आटोपून चाळीसगाव येथून दुचाकीने रोकडे येथे घराकडे जात होते. वाकडी गावाजवळ त्यांना रस्त्यावर पडलेली पर्स दिसली. त्यांनी ती पर्स उचलून ज्यांची असेल त्यांच्या पर्यंत पोहोच करण्याच्या भावनेतून पर्स पाहीली असता त्यात महिलेच्या नावे असलेले पॅनकार्ड, पाच हजार रूपयांची रोकड व मोबाईल घेतल्याची पावती मिळून आली.
अमोल पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता मोबाईल घेतलेल्या पावतीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता रस्त्यावर पर्स सापडल्याची माहिती दिली. ही पर्स सपना जाधव या महिलेचीच असल्याची खात्री केल्यानंतर ओळख पटवून पोलीस पाटील यांनी ऐवजासह ही पर्स संंबंधीत महिलेच्या ताब्यात दिली. महिलेने पोलीस पाटील अमोल पाटील यांना बक्षिस देवू केले.
मात्र त्यांनी विन्रमतेने नकार देत प्रामाणिकपणाचे कर्तव्य निभावले.पोलीस पाटील अमोल पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


