शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा ! १९९७ शेतकऱ्यांचे १५०५ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान कापूस, मका, बाजरी, खरीप ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान — ३४ गावे बाधित; प्रशासनाकडून पंचनामे सुरू
त-हाडी प्रतिनिधी:
दि. २६ ते २८ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत शिरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचे सर्व गणितच कोलमडून पडले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार सरी आणि अवकाळी पावसामुळे कापूस, मका, बाजरी, खरीप ज्वारीसह विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप हंगामासाठी शेती केली होती.
परंतु हंगामाच्या अखेरीस आलेल्या अवकाळी पावसाने पिकांची अवस्था बिकट केली आहे. काही भागांत पिके पूर्णतः उध्वस्त झाली असून काही ठिकाणी अर्धवट नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासन तत्परतेने कार्यरत झाले असून तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. प्राथमिक अहवालानुसार शिरपूर तालुक्यात एकूण १९९७ शेतकऱ्यांचे सुमारे १५०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील तब्बल ३४ गावे या अवकाळी पावसाने बाधित झाली आहेत.
बहुतांश गावांमध्ये कापूस आणि मक्याच्या पिकांवर गंभीर परिणाम झाला असून काही ठिकाणी बाजरी व खरीप ज्वारीचेही मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांवर दुहेरी संकट:गत काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना अनियमित पावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती, तर आता अवकाळी पावसाने शेवटचा आघात केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकांच्या कापणीस सुरुवात केली होती; परंतु अचानक झालेल्या पावसामुळे कापलेले पीक शेतातच भिजले, तर काही ठिकाणी दाणे अंकुरले. त्यामुळे आर्थिक फटका अधिकच बसला आहे.प्रशासनाकडून तत्परता:या घटनेनंतर तहसीलदार कार्यालयाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती गोळा करून राज्य शासनाला अहवाल पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत आणि अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.शेतकऱ्यांची मागणी:-अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. “आमच्या मेहनतीचे पीक पावसाने नष्ट केले. आता शेतीसाठी बियाणे, खते आणि मजुरी यासाठी पैसे उरलेले नाहीत. शासनाने तात्काळ मदत करावी, विशाल कंरके शेतकरी त-हाडी तहसीलदारांचे प्रतिपादन:-“शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येत आहे. शासन स्तरावरून शक्य तितकी मदत मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, तहसीलदार, शिरपूर महेंद्र माळी चौकट अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंतेची रेषा उमटली आहे. अनेकांचे पीक हातातून निसटल्याने दिवाळीचा सणही बेरंग झाला आहे. आता सर्वांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.


