जेआरडी टाटा, बी. के. करंजियांसारख्या दिग्गजांना मागे टाकत मिठा लाम झाल्या मुंबईच्या पहिल्या पारशी महिला शेरीफ !!
उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबईच्या पहिल्या महिला वकील म्हणून लौकिक असलेल्या मिठा लाम (Mithan Lam) या सन १९४६- १९४७ साली मुंबईच्या पहिल्या पारशी महिला शेरीफ (नगरपाल) देखील झाल्या होत्या.
महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावर्षी मुंबईच्या शेरीफ पदासाठी ज्यांच्या नावांची शिफारस झाली होती त्यांमध्ये होते जे. आर. डी. टाटा, सर रुस्तम मसानी, सर बेहराम करंजिया, एम. आर. मसानी आणि ए. पी. साबावाला यांसारखे दिग्गज !
या सर्वांचे नाव मागे पडले आणि १९४७ या देशासाठी ऐतिहासिक वर्षी मिठा लाम या मुंबईच्या पहिल्या पारशी महिला शेरीफ झाल्या !!
*नियुक्तीची पार्श्वभूमी”
अभिलेखीय नोंदींनुसार, स्वातंत्र्यापूर्वी अखेरच्या वर्षात — डिसेंबर १९४६ मध्ये, तत्कालीन नगरपाल ए. ए. जसदनवाला यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपणार होता. त्या अगोदरच मुंबईच्या नव्या शेरिफच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली.
या कार्यात तत्कालीन मुंबई सरकारच्या राजकीय आणि सेवा विभागाने पुढाकार घेतला. एक गोष्ट मात्र ठरविण्यात आले की बोहरा समाजातील व्यक्तीनंतर शेरीफ पदाची जबाबदारी पारशी समाजातील व्यक्तीला देण्यात येतील.
मुंबईतील तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांकडून पारशी समाजातील सुयोग्य व्यक्तीच्या नावांच्या शिफारशी मागवण्यात आल्या.
हे तीन अधिकारी होते: मुंबईचे महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी !
महापालिका आयुक्तांनी जे. आर. डी. टाटा, सर रुस्तम मसानी, सर बेहराम करंजिया आणि एम. आर. मसानी ही चार नावे सुचविली.
पोलीस आयुक्तांनी सर बेहराम करंजिया यांचे नाव सुचविले, तर मुंबई कलेक्टर यांनी जे. आर. डी. टाटा, ए. पी. साबावाला आणि सर बेहराम करंजिया यांच्या नावांची शिफारस केली.
सर बेहराम करंजिया यांचे तिन्ही अधिकाऱ्यांनी सुचवल्याने मुख्य सचिवांनी त्यांच्याच नावाची शिफारस केली.
*… आणि असे आले मिठा लाम यांचे नाव !”
या संपूर्ण निवड प्रक्रियेला नवी कलाटणी दिली तत्कालीन मुंबई प्रांताच्या गृहमंत्र्यांनी !
गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी आपल्या टिप्पणीत लिहिले की “यंदा शेरीफ पदाची जबाबदारी महिलेला दिल्यास जनतेकडून त्याचे खचितच स्वागत होईल !”
त्यांनीच मिठा लाम, बार ॲट लॉ यांचे नाव मुंबईच्या शेरीफ पदासाठी सुचविले आणि श्रीमती लाम सदर जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचा अभिप्राय दिला.
मोरारजी देसाई यांच्या शिफारसीला मुंबईचे मुख्यमंत्री बी. जी. खेर यांनी मान्यता दिली आणि अशा प्रकारे मिठा लाम यांची मुंबईच्या पहिल्या पारशी महिला शेरीफ म्हणून निवड झाली.
डिसेंबर १९४६ मध्ये मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर होते जॉन कॉलव्हिल. त्यांनी मुख्यमंत्र्यांची शिफारस स्वीकारून मिठा लाम यांना शेरीफ पदाची शपथ घेण्यासाठी पाचारण केले.
मिठा लाम यांचा परिचय
मिठा लाम (पूर्वाश्रमीच्या मिठा अर्देशर टाटा) या एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या इतिहास आणि अर्थशास्त्र विषयामध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केलेल्या हॉनर्स पदवीधर होत्या. त्यांनी राजकीय अर्थशास्त्रात सर्वाधिक गुण मिळवले होते. त्यानंतर त्या इंग्लंडला गेल्या आणि बार ॲट लॉ झाल्या.
मुंबईला परत आल्यावर त्यांनी प्रसिद्ध वकील भूलाभाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
सॉलिसिटर जमशेद सोहराबजी लाम यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस बंद केली, परंतु सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्या.
ऑस्ट्रेलियात झालेल्या ‘वूमन्स सेकंड चार्टर कॉन्फरन्स’मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
शपथविधी
दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी गव्हर्नर जॉन कॉलव्हिल यांनी मिठा लाम यांना ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे मुंबईच्या शेरिफ पदाची शपथ दिली. यामुळे भारत स्वतंत्र झाला त्या वर्षी त्या मुंबईच्या शेरिफ होत्या.
नव्या शपथेचा आग्रह
भारत स्वतंत्र झाल्यावर स्वाभिमानी मिठा लाम यांनी गव्हर्नर कॉलव्हिल यांना पत्र लिहून आपल्याला स्वतंत्र भारतातील मुंबईच्या शेरिफ म्हणून नव्याने शपथ द्यावी, अशी विनंती केली. (कॉलव्हिल हे ५ जानेवारी १९४८ पर्यंत मुंबईचे गव्हर्नर होते !)
मिठा लाम यांनी आग्रह तर केला परंतु नव्या शपथेचे ठराविक प्रारूप तयार नसल्याने, गव्हर्मेंट हाऊस (राजभवन) आणि मंत्रालय यांच्यात पत्रापत्री झाली.
शेवटी कसेबसे शपथेचे प्रारूप तयार करुन दिनांक ३ सप्टेंबर १९४७ रोजी गव्हर्नर कॉलव्हिल यांनी मिठा लाम यांना स्वतंत्र भारतातील मुंबईच्या शेरीफ म्हणून नव्याने शपथ दिली.
नवी दिशा देणारा क्षण
सन १९४७ या ऐतिहासिक वर्षी पारशी महिला मुंबईच्या शेरिफ पदावर नेमली जाणे ही केवळ मिठा लाम यांच्यासाठी वैयक्तिक अभिमानाची गोष्ट नव्हती; तर भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीमध्ये त्यांची नियुक्ती हे महत्वाचे प्रतिकात्मक पाऊल होते. मिठा लाम यांची नियुक्ती आधुनिक भारताच्या नागरी आणि स्त्री-सशक्तीकरणाच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय ठरते.


