आयुष्यातले सांगाती ३८,
अभिनंदन थोरात,
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार म्हटले की अनेक व्यक्तिमत्त्वांची आवर्जून आठवण येत असते. त्यात एक नाव असते ते अभिनंदन थोरात यांचे. अभिनंदन थोरात हे दर अधिवेशनात नागपूरला यायचे आणि अनेकांसोबत सत्संग करायचे. त्यामुळे नागपुरात देखील त्यांचे असंख्य मित्र होते.
अभिनंदन थोरात हे एक पत्रकार आणि माध्यम समन्वयक म्हणून ओळखले गेले होते. जनसंपर्क आणि प्रतिमा संवर्धन या क्षेत्रातही त्यांचे नाव होते. कुशल संपादक आणि रसिक साहित्यिक देखील होते. मात्र त्याच बरोबर ते एक उत्तम जनसंपर्क असणारे आणि सगळ्यांशी मैत्री ठेवणारे आणि आपला म्हटल्यावर कोणालाही झोकून देऊन मदत करणारे आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते.
सगळ्यांशी मैत्री ठेवायची आणि माणसे जोडायचे याच त्यांच्या छंदामुळे माझी आणि त्यांची मैत्री झाली होती. आम्ही दोघेही समवयस्क, आमचे क्षेत्र देखील एकच, दोघेही एकमेकांबाबत बरीच वर्ष ऐकून होतो. मात्र आमची दोघांची प्रत्यक्ष भेट आणि ओळख व्हायला बराच काळ लोटला. आमची प्रत्यक्ष भेट झाली ती २००८ मध्ये.
त्या काळात मी रामटेक च्या गडावरून या नावाने एक दिवाळी अंक संपादित आणि प्रकाशित करत असे. २००२ पासून सुरू केलेला हा उपक्रम चांगलाच गाजला होता. दरवर्षीचा अंक दोन किंवा तीन पुरस्कार घेऊन जात असे. २००७ च्या दिवाळी अंकाला देखील वेगवेगळे पुरस्कार मिळाले होते. त्यात एक पुरस्कार बुलढाण्याचे भगवान ठक नामक साहित्यिक चालवत असलेल्या तुका म्हणे वांङमयीन चळवळीतर्फे आयोजित दिवाळी अंक आणि उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार स्पर्धेत मिळाला होता. हा पुरस्कार वितळण सोहळा फेब्रुवारी २००८ मध्ये बुलढाणा येथेच व्हायचा होता. पुरस्कार सोहळ्याला मी स्वतः येऊन पुरस्कार स्वीकारावा असा भगवान ठग यांचा आग्रहाचा फोन आल्यामुळे मी त्या कार्यक्रमासाठी बुलढाण्याला पोहोचलो होतो.
संध्याकाळी कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावर आयोजकांनी मान्यवर पाहुणे बसले असलेल्या एका दालनात मला नेले. तिथे मान्यवरांसह माझ्यासारखे काही पुरस्कारार्थी सुद्धा बसले होते. त्यातच एक अभिनंदन थोरात होते. योगायोगाने आम्ही दोघेही आजूबाजूच्याच खुर्चीवर बसलो. मग कार्यक्रमाला थोडा वेळ होता म्हणून एकमेकांशी बोलणं सुरू केले. आधी ओळख करून घ्यायची म्हणून “मी अविनाश पाठक” अशी माझी ओळख करून दिली. तेव्हा थोरात लगेच म्हणाले “अरे मी तुमचं नाव खूप ऐकून होतो. एक पत्रकार म्हणून आणि लेखक म्हणून सुद्धा. मी माझी ओळख करून देतो. मी अभिनंदन थोरात” हे नाव ऐकताच मी देखील लगेच उत्तरलो.” मी देखील तुमचे नाव अनेक पत्रकार मित्रांकडून आणि राजकीय नेत्यांकडून ऐकलेले आहे” मग त्यांनी आपल्याबद्दल अजून थोडी माहिती दिली. मी देखील माझी माहिती शेअर केली आणि मग गप्पा सुरू झाल्या.
त्यावेळी थोरात चिंतन वृत्तसेवा नावाची सेवा चालवत होते. त्यात देशभरात घडलेल्या घटनांचा मोबाईलवर ते लगेचच चार ओळीचा फ्लॅश द्यायचे. त्यांची ही सेवा राजकीय वर्तुळात तसेच पत्रकारांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये देखील खूपच प्रसिद्ध झाली होती. त्याच दिवशी त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला आणि दुसऱ्या दिवशी पासून तुम्हाला आमचे न्यूज फ्लॅश येणे सुरू होईल असे सांगितले.
त्या दिवशी माझ्याच बरोबर त्यांच्या चिंतन आदेश या दिवाळी अंकाला देखील पुरस्कार होता. व्यासपीठावरून बोलताना त्यांनी त्यांच्या विविध उपक्रमांची देखील माहिती दिली. कार्यक्रम संपल्यावर देखील चहापाण्याच्या वेळी आमच्या दोघांच्या छान गप्पा झाल्या. पुन्हा भेटण्याचे ठरवूनच आम्ही तिथून निघालो.
त्यानंतर आमचा नियमित संपर्क सुरू राहिला. अधून मधून नागपूरच्या काही बातम्या असल्या तर ते मला विचारायचे. त्याच वर्षी मी महिन्यात माझ्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला, त्याचे निमंत्रण थोरातांना मी पाठवले होते. त्यांनी लगेचच चिंतन सेवे मार्फत त्या सोहळ्या बाबत संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पाठवली. मला नागपूर बाहेरच्या देखील अनेक पत्रकार मित्रांचे अभिनंदन करणारे फोन आले. कार्यक्रम झाल्याचीही बातमी पाठवायला त्यांनी सांगितले. त्यानुसार दिलेल्या बातमीतून मोजक्या चार ओळीची बातमी त्यांनी चिंतनवर लोकांना पाठवली होती.
२१ मे ला माझा वाढदिवस असतो. मुंबईच्या एका वृत्तपत्रात साधारणतः वृत्तपत्राच्या दृष्टीने मान्यवर असलेल्या मंडळींचे वाढदिवस फोटोसकट छापण्याची पद्धत असते. त्या वृत्तपत्रात माझे काही मित्र असल्यामुळे त्यांनी सहज म्हणून माझा फोटो मागून घेतला आणि त्या दिवशी अविनाश पाठक पत्रकार आणि स्तंभलेखक म्हणून माझा फोटो आजच्या वाढदिवसात छापला होता. योगायोगाने अभिनंदन थोरात यांच्या पाहण्यात ते वृत्तपत्र आले. त्यांचा लगेचच फोन आला, आणि चिंतन वर देखील त्यांनी तो न्यूज फ्लॅश टाकला. तेव्हापासून दरवर्षी चिंतन मध्ये दररोज मान्यवरांच्या वाढदिवसाची यादी प्रसिद्ध होत असते, त्यात माझ्याही वाढदिवसाचा उल्लेख येऊ लागला.
२००८ च्या जुलै महिन्यात मारपकवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ते नागपुरात आले होते. आल्यावर त्यांचा फोन आला. कार्यक्रमाला मी गेलेलो होतोच. तिथेच आमची भेट झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण भेटूया असे त्यांनी सुचवले. त्यानुसार ते उतरले असलेल्या हॉटेल प्राइड मध्ये आमची दोघांची भेट झाली. तिथे जवळजवळ दीड तास आमच्या गप्पा झाल्या. त्यात चालू राजकारणावर बऱ्यापैकी माहितीची देवाणघेवाण देखील झाली.
त्यावर्षी ऑक्टोबर मध्ये दिवाळी होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अचानक अभिनंदन थोरात यांचा फोन आला. यंदा दिवाळी अंक काढणार आहे ना अशी विचारणा त्यांनी केली. त्या वर्षी मी दोन दिवाळी अंक प्रसिद्ध करणार होतो. रामटेक च्या गडावरून सोबत गाभारा या नावाने एक अध्यात्मिक विषयाला वाहिलेला अंकही काढायचे ठरवले होते. मला तुमच्या दोन्ही दिवाळी अंकांच्या जाहिरातींची दरपत्रके फॅक्स करा असे त्यांनी सुचवले. लगेचच मी दोन्ही दिवाळी अंकांची दरपत्रके त्यांना फॅक्स केली. दोनच दिवसांनी त्यांच्या ऑफिस मधून मला फोन आला आणि माझा पत्ता विचारला गेला. तिसऱ्याच दिवशी माझ्या पत्त्यावर एक कुरियर आले. त्यात एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या जाहिरातींचे दोन कलर डिझाइन्स आणि दोन रिलीज ऑर्डर्स सोबत दोन्ही अंकांच्या जाहिरातींच्या दराचा मिळून ४० हजार रुपयांचा चेक असा त्यांनी पाठवला होता. त्यावर्षी मी चौकशी केली तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात त्यांचे जे जे पत्रकार मित्र असे हौस म्हणून दिवाळी अंक काढतात त्यांना त्यांचा मित्र असलेल्या या बांधकाम व्यावसायिकाकडून मदत म्हणून जाहिराती देवविल्या होत्या आणि दिवाळीच्या तोंडावर जाहिराती आणि सोबत चेक हा मला चांगलाच आधार ठरला होता. यथावकाश मी त्यांना अंक पाठवला. त्यांनी मला चिंतन आदेश चा अंक पाठवला होता.
अभिनंदन थोरात दरवर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला मुक्कामी असायचे. त्यांचे काही मोजके राजकीय मित्र असायचे. त्यांची प्रसिद्धी यंत्रणा ते हाताळून द्यायचे. मग काही मोजक्या प्रमुख पत्रकारांसोबत ते त्या राजकीय नेत्यांचा वार्तालाप कार्यक्रम एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये आयोजित करायचे. कधी सकाळी नाश्त्याच्या वेळी तर कधी रात्री काम आटपून जेवणाच्या वेळी अशी मैफिल ते जमवायचे. त्या वर्षीपासून मला देखील ते निमंत्रित करू लागले. एरवी राजकीय नेत्यांच्या किंवा मंत्र्यांच्या अशा स्नेहभोजनाला भरपूर गर्दी असते. मात्र थोरात आयोजित करत असलेल्या कार्यक्रमात मोजकेच दहा-पंधरा पत्रकार बोलावलेले असायचे. त्यामुळे त्या राजकीय नेत्याशी अगदी व्यक्तिशः ओळख होउन चांगल्या गप्पा व्हायच्या. माहितीची देवाणघेवाण व्हायची. थोरात यांच्या या स्नेह भेटीच्या आयोजनातला आणखी एक वेगळेपणा असा की निघताना प्रत्येक पत्रकाराला भेट म्हणून ते एक चांगलेसे मराठी पुस्तक द्यायचे. त्यांच्या या भेटीमुळे माझ्या संग्रही अनेक चांगली चांगली पुस्तके गोळा झाली आहेत.
मला वाचनाची आवड आहे हे कळल्यावर दर भेटीत ते माझ्यासाठी नवीन पुस्तक घेऊन येत. याचे एकदा त्यांनी एक लहान मुलांच्या गोष्टींचे पुस्तक आणले होते. हे कोणासाठी असे विचारतात तुम्हीच बोलला होतात तुमची लहान मुलगी आहे तिच्यासाठी हे वेगळे आणले असे त्यांनी सांगितले. मात्र माझी मुलगी इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असल्यामुळे तिला मराठी श्यामची आई फास्टर फेणे पेक्षा इंग्रजी हॅरी पॉटर सारखी पुस्तके जास्त आवडतात असे मी त्यांना सांगितले. तेव्हापासून ते आठवणीने चांगले इंग्रजी पुस्तक आणायला लागले होते. त्यांच्या या स्नेह भेटीमुळे आर आर पाटील नारायण राणे प्रणोती शिंदे शेकापचे जयंत पाटील बाळा नांदगावकर अविनाश भोसले अशा अनेक दिग्गजांशी माझी मैत्री झाली. त्यातून चांगल्या बातम्या देखील मिळत गेल्या आणि चांगले संबंध देखील प्रस्थापित झाले होते.
सुरुवातीला ते नागपुरात आले की कधी हॉटेल प्राइड कधी तुली इम्पेरियल तर कधी सन इंटरनॅशनल अशा हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असायचा. नंतर त्यांनी आपला मुक्काम हॉटेल अशोका मध्ये हलवला. हॉटेल अशोका माझ्या घरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. मग ते आले की आवर्जून मला फोन यायचा आणि सकाळीच ब्रेकफास्टला मला बोलावून घ्यायचे. तिथे त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता मग आमचा नाश्ता व्हायचा. तिथे अधिवेशन काळात हॉटेल अशोकावर अनेक मान्यवर मुक्कामी असायचे. मग त्या सर्व मंडळींची बहुतेक वेळा थोरात यांची ओळख असायचीच. मग ते देखील सोबत नाश्त्याला यायचे आणि आमच्या गप्पा रंगायच्या. त्यांच्यामुळे माझी अनेकांशी मैत्री झाली त्यात मंदार फणसे अनिल बोंडे असे अनेक मान्यवर होते. याच दरम्यान त्यांचा मुलगा यंदाचे लग्न झाले. त्याला देखील त्यांचे आग्रहाचे निमंत्रण होते. मात्र त्या लग्नासाठी पुण्यात मी जाऊ शकलो नव्हतो.
या काळात माझी वेगवेगळी पुस्तके प्रकाशित होत होती. दरवेळी त्याबाबत कळले की थोरातांचा आवर्जून फोन येत असे. माझ्या पुस्तकाच्या काही प्रति देखील ते मागून घ्यायचे आणि इतर ठिकाणी अशाच पत्रकारांच्या भेटीत त्याचे वाटप देखील करायचे. मला मग अनेक पत्रकार मित्रांकडून त्याबाबत कळायचे. एकूणच आपल्या मित्रमंडळींचे साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल हाच त्यांचा प्रयत्न असायचा.
२०१४-१५ मध्ये एका रोटरी क्लबचा मी अध्यक्ष होतो. त्या क्लबला त्यावर्षीची डिस्ट्रिक्ट पब्लिक रिलेशन्स कॉन्फरन्स होस्ट करायची होती. त्या दिवसभराच्या कार्यक्रमात वेगवेगळे कार्यक्रम ठरवायचे होते. मी त्यात एखाद्या बाहेरच्या माध्यम तज्ञाचा उपस्थितांशी संवाद ठेवावा असा विचार केला. कुणाला बोलवावे याबाबत अभिनंदन थोरातांना विचारले. तेव्हा त्यांनी त्यांच्या पुण्यातल्याच एका मित्राचे नाव सुचवले. त्यानुसार कार्यक्रम देखील ठरला. मात्र कॉन्फरन्सच्या एक आठवड्याभरापूर्वीच काही अडचणी आल्यामुळे थोरातांनी सुचवलेले ते माध्यम तज्ञ येऊ शकणार नव्हते. मग काय करायचे अशा विचारात मी होतो. अचानक थोरातांचा फोन आला. दुसरा कोणी ठरला नसेल तर मीच तुमच्या कार्यक्रमात येतो असे त्यांनी सांगितले.सुदैवाने त्यांच्या मित्राने तयार केलेले पावर पॉइंट प्रेझेंटेशन तयारच होते. तेच पावर पॉइंट प्रेझेंटेशन घेऊन थोरात नागपूरला आले. ते त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. ठरल्याप्रमाणे रोटरीचे प्रतिमा संवर्धन कशा वेगवेगळ्या प्रकाराने करता येईल याबाबत त्यांनी जवळजवळ तासभराचे चांगलेच प्रेझेंटेशन दिले. रोटरीच्या खर्चातून मी थोरातांना येण्या-जाण्याचे विमानाचे भाडे आणि हॉटेलचा खर्च ऑफर केला होता. मात्र त्यांनी ते सर्व काही नाकारले. आपल्या मैत्रीसाठी आणि तुमची वेळ सांभाळून देण्यासाठी मी आलो आहे. तुमच्या कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंटेशन चांगले झाले आणि सर्व डेलिगेट्स खुश होते, यातच मला आनंद आहे. मला काहीही पैसे नकोत असे सांगून ते संध्याकाळच्याच विमानाने पुण्याला रवाना झाले होते.
दरवेळी ते नागपूरला आले की हॉटेल अशोका मध्ये आमची गप्पांची बैठक जमायची. एकदा गप्पांमध्ये त्यांनी तुम्ही देखील ब्लॉक लिहिणे सुरू करा असे सुचवले. माझ्या डोक्यात देखील तो विचार चालू होताच. मात्र काहीतरी हटके नावाने तो ब्लॉग प्रसिद्ध व्हावा अशी माझी इच्छा होती. त्यावर काय नाव असावे यावर आमचा बराच वेळ खाल झाला. तेव्हा सहज गप्पागप्पांमध्ये तुम्ही “घ्या समजून राजेहो” असे शीर्षक देऊन लिहायला सुरुवात करा असे त्यांनी सुचवले. मग मी घ्या समजून राजेहो या शीर्षकाखालीच चालू विषयावर लिहायला सुरुवात केली. सोशल मीडियावर हा ब्लॉग खूप गाजला. अजूनही दर आठवड्याला एक तरी लेख मी याच शीर्षकाखाली लिहितो आहे. हा ब्लॉग गाजण्याचे सर्वच श्रेय अभिनंदन थोरात यांनाच द्यावे लागेल.
एकदा ट्विटरप्रमाणे चालू घटनेवर अगदी मोजक्या शब्दात काहीतरी कॉमेंट करावी आणि ती समाज माध्यमावर व्हायरल करावी असे माझ्या डोक्यात चालू होते. हा विषय एक दिवस बोलताना थोरात यांच्याशी मी बोललो. त्याला काय नाव द्यावे हे सुचत नाही असेही मी त्यांना बोललो. तर त्यांनी लगेचच लई भारी या शीर्षकाखाली तुम्ही लिहा असे सुचवले. हा माझा प्रयोग देखील खूप गाजला. इतका की व्हाट्सअप वर मी वेगवेगळ्या ग्रुप वर तो व्हायरल करायचो आणि खूप जण तो इतरांना पाठवायचे. मग फिरुन तो माझ्याकडे परत यायचा.एकदा विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या पात्रपरिषदेपूर्वी पेंडॉलमध्ये काही पत्रकारांशी मी गप्पा मारत होतो. तिथे माहिती खात्याशीच संबंधित एक सचिव स्तरावरील अधिकारी आले. मुंबईच्या काही पत्रकारांनी त्यांना माझी ओळख करून दिली. जेव्हा मी अविनाश पाठक असे त्यांना कळताच ते लगेच उद्गारले मी तुम्हाला ओळखतो, म्हणजे आपण जरी आज पहिल्यांदाच भेटत असलो तरी तुमचे लय भारी रोज मी वाचतो आणि मला फार आवडते. हे ऐकून मी चांगलाच सुखावलो होतो.
थोरातांचा धाकटा मुलगा चिंतनचा नागपुरात विवाह सोहळा होता. त्यात मुलीचे वडील मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील बरेच कुलगुरू आले होते. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ देखील तिथे उपस्थित होते. सपकाळांची आणि माझी भेट झाली तेव्हा त्यांच्यासोबत आणखी तिघे चौघे कुलगुरू उपस्थित होते.मी भेटताच सपकाळांनी माझी आणि त्या कुलगुरूंची ओळख करून दिली आणि त्यांना आवर्जून लय भारी बद्दल सांगितले. त्या सर्वांनाही मला नंबर द्यायला लावला आणि त्यांना देखील मी दररोज लय भारी पाठवावे असेही त्यांनी सुचवले. ज्यावेळी मी त्यांना सांगितले की आजच्या मंडपात असलेले एक व्याही अभिनंदन थोरात हेच या संकल्पनेचे जनक आहेत तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
एक दिवस तुम्ही चिंतन आदेश मध्ये एखादा स्तंभ सुरू करा असा त्यांनी आग्रह धरला. मी देखील लगेच होकार दिला. त्याला शीर्षक काय द्यावे हा आमचा विचार चालू होता. मग मी त्याला थोडे पुणेरी थोडे नागपुरी असे शीर्षक गेले दिले. ते थोरातांना फारच आवडले. मग आम्ही तो स्तंभ सुरू केला. दर पंधरा दिवसांनी मी त्यांना लेख पाठवत असे आणि तो ते प्रकाशित करत असत. चिंतन आदेश हे पाक्षिक अनेक मान्यवरांकडे जात असे. त्यातले माझे लेख वाचून मला खूप मान्यवरांचे फोन आले, इतका तो स्तंभ गाजला होता.
मग दरवर्षी चिंतन आदेशच्या दिवाळी अंकासाठी देखील ते मला लेख किंवा कथा मागू लागले. पहिल्या वर्षी त्यांनी छंद या विषयावर दिवाळी अंक काढला होता. मी त्यांना छंद माणसं जोडण्याचा या शीर्षकाचा लेख पाठवला होता. त्यांनी तो प्रकाशित देखील केला. त्यावर्षी दिवाळी अंकासोबत त्यांनी दोन हजार रुपयांचा चेक देखील पाठवला. मग मी त्यांना फोन केला. मी आपल्या मैत्रीच्या संबंधात लेख पाठवतो आहे. मला मानधनाची काहीच अपेक्षा नव्हती. तर ते म्हणाले दरवर्षी तुमच्याकडून काहीही मानधन न घेता मी लेख मागतो. मला कल्पना आहे तुमच्या लेखाला बाहेर काय मानधन मिळते. तरीही मैत्री खातर तुम्ही मला विनामूल्य लेख देता. मग वर्षातून एकदा काहीतरी तुम्हाला द्यायला हवे. म्हणून हा चेक पाठवला आहे. त्यामुळे नाकारू नका. मग मी देखील तो नाकारला नाही. तेव्हापासून दरवर्षी ते दिवाळीला मला असा चेक पाठवत असत. थोडे पुढे नागपुरी हा माझा स्तंभ जवळजवळ चार वर्ष चालला.
एका वर्षी थोरातांनी महाराष्ट्रातील त्यांच्या जवळजवळ ५२ पत्रकार मित्रांचे मुलाखती घेऊन त्या समाजमाध्यमांवर प्रकाशित करायच्या असे त्यांनी ठरवले. त्यात त्यांनी माझ्या नावाचा देखील समावेश केला. नागपूरला असताना एक दिवस सकाळी त्यांनी हॉटेल अशोका मध्ये मला बोलावले. तिथे त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी माझी सविस्तर मुलाखत घेतली. मग त्यावर्षी जानेवारी महिन्यापासून त्यांनी दर आठवड्याला एक या पद्धतीने सोशल मीडियावर त्या मुलाखती प्रसारित करणे सुरू केले. माझ्या आठवणीनुसार ऑगस्टमध्ये त्यांनी माझी मुलाखत देखील प्रसारित केली. त्याच वर्षी आमच्या शाळेतल्या सर्व वर्गमित्र मैत्रिणींनी एक व्हाट्सअप ग्रुप बनवला होता. त्यावर प्रत्येक जण १९७० साली मॅट्रिक पास झाल्यावर नंतर कोणी कोणी काय काय केले आणि आज काय करत आहात याची माहिती टाकायची असे ठरले होते. ज्यावेळी माझी ही मुलाखत व्हायरल झाली, त्यावेळी तीच मुलाखत मी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकली. सगळ्यांना ती मुलाखत तर आवडलीच, पण त्याचबरोबर सर्व मित्र-मैत्रिणींमध्ये माझा रुबाब देखील खूप वाढला. विशेष म्हणजे त्यातले अनेक जण अभिनंदन थोरात यांना ओळखत होते. त्यामुळे त्यांनी घेतलेली मुलाखत बघितल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि इतक्या मोठ्या माध्यम समन्वयक आणि पत्रकारांशी माझी मैत्री आहे हे कळल्यावर सगळेच चक्रावले होते.
नागपूरच्या एका राजकीय मित्राला त्याच्या प्रतिमा संवर्धनासाठी काही योजना करून हवी होती, आणि तिचे योग्य नियोजन देखील व्हावे असे वाटत होते. मग मी त्या मित्राला थोरात यांचे नाव सुचवले नागपूर अधिवेशन काळात थोरात आणि त्या मित्राची भेट घडवून आणली. त्यांनी प्रेझेंटेशन मी तयार करतो आणि तुमच्याकडे पाठवायची व्यवस्था करतो असे सुचवले. तर माझ्या त्या मित्राने थोरातांना असे सांगितले की प्रेझेंटेशन तयार झाले की अविनाश पाठक पुण्यात येतील आणि ते प्रेझेंटेशन बघतील आणि मग ते आणि मी नागपुरात बघून त्याच्यावर अंतिम निर्णय घेऊ. त्यानुसार थोरात यांचा प्रेझेंटेशन तयार झाल्याचा फोन आला. मग मी पुण्याला जायचा कार्यक्रम निश्चित केला. नागपुरातून पुण्याला जायचे रेल्वेचे आरक्षण तर मिळाले, पण परतीचे आरक्षण उपलब्ध नव्हते. मग थोरात यांनाच फोन केला आणि त्यांचा संपर्क वापरून पुण्याहून मला रेल्वेचे एसी थ्री टायरचे किंवा टू टायरचे रिझर्वेशन मिळवून द्यावे अशी विनंती केली. तसेच जमलेच नाही तर प्रसन्नाचे करा असेही मी त्यांना सांगितले. मात्र मी निघण्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी माझे परतीचे विमानाचे तिकीट काढले आहे असे कळले. मी त्यांना विमानाचे तिकीट कशाला काढले म्हणून विचारले, तर त्याची तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पुण्याला या मग बोलू असे त्यांनी सांगितले. पुण्याला मी पोहोचल्यावर सकाळी रेस्ट हाऊसला पोहोचलो आणि तयार झालो. तोवर थोरात यांची गाडी आली होती. मग दुपार भर त्यांच्या घरी बसून प्रेझेंटेशन पाहिले आणि सविस्तर चर्चाही झाली. दुपारी तिथेच आमचे भोजन झाले. संध्याकाळी सहा चे परतीचे विमान होते. चार वाजताच त्यांच्या घरून निघणार होतो. मी सहजच बोललो की जाताना रस्त्यात जिथे कुठे चितळेंचे आऊटलेट असेल तिथे थोडे थांबून मला घरच्यासाठी बाकरवडी आणि आंबा बर्फी घ्यायची आहे. त्या दिवशी मी निघण्यापूर्वी अभिनंदनजींनी आधीच माणसाला पाठवून अंबा बर्फी आणि बाकरवडी मागवून ठेवली होती. निघताना त्यांनी त्या पिशव्या हातात दिल्या तेव्हा मी थक्कच झालो. तुम्ही कशाला त्रास घेतला असे मी म्हणताच मित्रांसाठी इतके तर करायलाच हवे असे सांगून त्यांनी मला चूप केले होते. निघताना त्यांनी मला सोबत दोन-तीन पुस्तके देखील भेट दिली होती.
त्या दिवशी गप्पांच्या ओघात माझ्या मुलीबद्दल त्यांनी चौकशी केली. ती त्यावर्षी बारावीची परीक्षा पास होणार होती. नंतर पुढल्या शिक्षणासाठी नागपुरातच ठेवायचे की कुठे बाहेर पाठवायचे यावर विचार चालू आहे असे त्यांना सांगताच पुण्यात अनेक चांगल्या शिक्षण संस्था आहेत इथे तिला पाठवा असे त्यांनी सुचवले. इथे ती राहणार कुठे असे सांगताच अभिनंदनजी म्हणाले इथे एखाद्या चांगल्या होस्टेलमध्ये आपण सोय करू आणि तिचे लोकल गार्डियन आम्ही राहू. तुम्ही काळजी करू नका. माझ्या घरी माझी सून आहेच नातंही आहे मिसेस देखील आहे. इथे येत जात राहील आणि मी पूर्ण लक्ष ठेवीन. मी थोडा विचारात पडलो आहे असे पाहून त्यांनी नागपूरच्याच काही पत्रकार मित्रांची मुले इथे शिकायला असताना त्यांचा लोकल गार्डीयन मीच होतो असे त्यांनी सांगून मला आश्चर्याचा धक्का दिला होता.
२०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात अभिनंदन जींच्या धाकट्या मुलाचे चिंतनचे नागपुरात लग्न झाले. त्या समारंभाला मी उपस्थित होतो तिथे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा माझा त्यांनी परिचय करून दिला. एरवी सगळ्यांशी फक्त फोनवरच बोलणे होत होते. त्या दिवशी सगळ्यांशी प्रत्यक्ष बोलणे झाले. त्यांच्या पत्नी कांचनवहिनींना देखील त्यादिवशी मी प्रथमच भेटलो होतो.
२०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. देवेंद्र .फडणवीसांचे सरकार जाऊन उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत आले होते ते देखील अस्थिरच होते. त्यामुळे एकच आठवड्याचे हिवाळी अधिवेशन झाले. अधिवेशन संपले त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी मला हॉटेल अशोका मध्ये भेटायला बोलावले होते. त्या दिवशी मी तिथे बसलो असतानाच त्यांना नितीन गडकरींचा फोन आला होता. मगा महाराष्ट्राच्या सत्तेच्या उलाढालीमध्ये काय काय गमती झाल्या ते त्यांनी मला ऐकवले. निघताना आणखी एक नवीन पुस्तक घेऊन मी तिथून निघालो. ती माझी त्यांची शेवटलीच भेट ठरली.
२०२० च्या जानेवारी महिन्यात अचानक एक दिवस बातमी कळली की अभिनंदन थोरात यांना ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला असून ते कोमात गेले आहेत. माझ्यासारख्या अनेक मित्रांना तो धक्काच होता. मग अधून मधून त्यांच्या घरी फोन करून मी प्रकृतीची माहिती घेत असे. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या आठवड्यात आमच्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींचे पुण्याजवळ एका रिसॉर्ट मध्ये दोन दिवसांचे गेट-टुगेदर ठरले होते. त्यासाठी जायचे म्हणून मग मी एक दिवस आधीच पुण्यात पोहोचलो आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे कोमा मध्ये अंथरुणावर झोपलेले थोरात दुरूनच पाहिलेत. एरवी सतत हसतमुख आणि सक्रिय असलेल्या अभिनंदन थोरात यांना तशा अवस्थेत पाहून अगदी भडभडून आले. मग बाजूच्या खोलीत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना भेटलो. सर्व माहिती देखील घेतली. कुणी जवळच्या व्यक्तीने केलेल्या गैरप्रकारांचा धक्का बसल्याने त्यांना हा त्रास झाला आणि त्याचे पर्याय या अटॅक येण्यात झाले असे कळले. काही वेळ थांबून मी तिथून निघालो मात्र मन विषण्णच होते.
आणि आठवडाभरातच अभिनंदन थोरात गेल्याचाच फोन आला. मी लगेचच चौकशी केली तर बातमी खरी होती. त्यांचे असे जाणे हा खरोखरीच धक्का होता.
आज थोरात गेले तरी अजूनही माझे त्या परिवाराशी संबंध आहेत. २०२२ ते २०२४ माझी मुलगी पुण्यात होती. तेव्हा देखील थोरात परिवाराचे तिला सहकार्य होते. अजूनही आमचे बोलणे होते. थोरातांची मुले मंदार आणि चिंतन या दोघांनीही अजूनही संबंध कायम ठेवले आहेत. चिंतन दोनदा घरी देखील येऊन गेला. अजूनही ते स्नेहबंध पुढल्या पिढीने जपले आहेत.
थोरात हे आपल्या कर्तृत्वाने मोठे झालेले एक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी माझ्याशी मैत्र जपले. त्यामुळे आमचे कौटुंबिक स्नेहबंध निर्माण झाले. त्याचा मला आजही आनंदच आहे.


