दोन बलाढ्य व धनाढ्य दिग्गज – वाळेकर व करंजुलेत रंगतदार झुंज !!
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
अंबरनाथ नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. नगर पालिकेत बहुमत मिळो न मिळो पण नगराध्यक्ष आपलाच असावा, यासाठी शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष व शहर प्रमुख अरविंद वाळेकर व भाजपचे माजी नगराध्यक्ष जे २००५ साली थेट जनतेतून निवडून आले होते यांच्यातच चूरस आहे. वाळेकर यांनी त्यांची पत्नी सौ. मनिषा वाळेकर ज्या माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांना उमेदवारी मिळवली आहे. मनिषा वाळेकर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे सेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सर्व शक्ती पणाला लावली परंतू त्यांच्या हाती अपयशच आले. किणीकर हे जरी आमदार असले तरी वाळेकर हेच किंगमेकर आहेत, त्यांना डावलून अंबरनाथचे राजकारण होऊ शकत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. यापूर्वी नाट्यगृहाच्या नामकरणा वरूनही किणीकर तोंडघशी पडले होते.
भाजपा हा युतीचा घटक असूनही त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी येथील बडे प्रस्थ असलेले गुलाबराव करंजुले पाटील यांची सून सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी दोन दिग्गज, बलाढ्य व धनाढ्य राजकारणी उघडपणे आमने- सामने आले आहेत. अरविंद वाळेकर हे जसे बांधकाम व्यावसायिक आहेत तसेच किंवा त्याहून मोठे बांधकाम व्यावसायिक हे करंजुले आहेत. वाळेकर हे उपमुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेचे तर करंजुले हे देखील सत्ताधारी भाजपाचे आहेत. त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे यांची तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदे व चव्हाण या दोघांचे ठाणे जिल्हा हे होमग्राऊंड असल्याने मैदान कोण मारणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अरविंद वाळेकर यांनी दोन वेळा नगराध्यक्ष पद भूषवले असून त्यांच्या सौ. मनिषा वाळेकर या देखील नगराध्यक्ष होत्या. तर गुलाबराव करंजुले हे देखील २००५ मध्ये थेट निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार, यात दुमत असू नये. अंबरनाथ नगरपालिकेच्या जडणघाडणीत वाळेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. अंबरनाथचा विकास करणे व अनेक योजनांना मूर्तस्वरूप दिले आहे.
त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यामुळेच तिन वेळचा आमदार हाताशी असूनही एकनाथ शिंदे यांना अरविंद वाळेकर यांना पक्षात घ्यावे लागले. आमदार चार वेळा निवडून आले तरी शिंदे दरवेळी वाळेकर यांनाच झुकते माप का देतात, यावरून वाळेकर यांचे महत्व अधोरेखित होते. आमदार किणीकर यांना प्रथम आमदारकीची उमेदवारी मिळवून देणारे व नंतर दोन्ही वेळी निवडून आणण्यात महत्वाची भूमिका वाळेकर यांचीच होती, हे आमदार किणीकर सह कोणीही नाकारू शकत नाही.
किणीकरांची कपट नीती व घातकी राजकारण व उद्धव ठाकरे शिवसेनेच्या घरभेद्यावर उद्या पुढील भागात लिहिणार आहे.


