• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ४०,दत्ताजी डिडोळकर,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
November 23, 2025
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो,डॉ संपदा मुंढे प्रकरणातून घ्यायचा धडा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ४०,

दत्ताजी डिडोळकर,

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व निवेश-गुंतवणुक/कामगार समस्या/कायदा सलाहगार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

दत्तात्रेय देविदास डिडोळकर हे नाव कागदपत्री नोंदले गेलेले व्यक्तिमत्व संपूर्ण भारतभर मात्र दत्ताजी डिडोळकर या नावानेच प्रसिद्ध होते. दत्ताजी हे एक संघ स्वयंसेवक होते. केरळ सारख्या भागात संघाचे प्रचारक देखील राहिले होते. नंतर शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी खूप कार्य केले. त्याचवेळी संघ परिवाराने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेचे ते संस्थापक होते. त्यांनी या संघटनेचे दीर्घकाळ नेतृत्व देखील केले. स्वतःचा संसार नसला तरी दत्ताजी अनेक गरजू विद्यार्थ्यांचे पालक झाले होते. त्यांनी प्रेम करणारी असंख्य माणसे जोडली होती. त्यासाठी आधी ते समोरच्यावर प्रेम करायचे आणि त्याला आपलेसे करून घ्यायचे. अशाच अनेकांपैकी मी देखील एक होतो.

दत्ताजी डिडोळकर हे नाव मी अगदी शालेय जीवनापासूनच ऐकून होतो. मला आठवते त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून देशाच्या उत्तरेकडे असलेल्या नेफा प्रदेशातून काही विद्यार्थी नागपुरात आणले होते. त्यांना दत्ताजींनी नागपुरातल्या वेगवेगळ्या परिवारात राहून शिक्षणासाठी ठेवले होते. मी नवव्या वर्गात शिकत असताना या विद्यार्थ्यांना घेऊन दत्ताजी आमच्या शाळेत आले होते. मात्र त्यावेळी त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख झाली नव्हती.

माझ्या माहितीप्रमाणे १९६० पर्यंत दत्ताजी केरळमध्येच संघ प्रचारक म्हणून कार्यरत होते. नंतर काहीतरी १९६० च्या दरम्यान काही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या म्हणून दत्ताजी नागपुरात आले. संघकार्य तर होतेच पण चरितार्थासाठी काहीतरी करायला हवे म्हणून दत्ताजींनी कोचिंग क्लासेस चालवायला सुरुवात केली. दत्ताजी स्वतः फिजिक्स हा विषय घेऊन एम एस सी झालेले होते. प्रचारक म्हणून जाण्यापूर्वी ते नागपूरच्या मोहता सायन्स कॉलेजमध्ये फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून काही काळ कार्यरतही होते. नागपूरला आल्यावर त्यांना संघ परिवाराशी संबंधित कोणत्याही महाविद्यालयात सहज नोकरी मिळाली असती. मात्र दत्ताजींनी कोचिंग क्लास चा विचार केला मग धरमपेठेतल्या धरमपेठ शाळेच्या इमारतीत संध्याकाळचे विज्ञान विषयाचे कोचिंग क्लासेस त्यांनी सुरू केले. त्यावेळी दहावी मॅट्रिक होते. मग आजच्या बारावीच्या समक्ष प्री युनिव्हर्सिटी आणि मग पदवीची तीन वर्ष असा अभ्यासक्रम असायचा. दत्ताजींनी तिथे प्री यूनिवर्सिटी ते बी एस सी असे कोचिंग क्लासेस सुरू केले. त्याशिवाय संघाचे आणि विद्यार्थी परिषदेचे काम तर ते करायचेच. जयंत ट्युटोरियल कॉलेज नावाने चालणारे हे कोचिंग क्लासेस त्यावेळी चांगलेच गाजलेले होते. तिथून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. सोबत अनेक गरजूंना रोजगार देखील त्यांनी दिला.

१९७० साली मी मॅट्रिक पास झालो आणि नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्री युनिव्हर्सिटी ला प्रवेश घेतला. त्यावेळी संघात जात असल्यामुळे तिथेच मी आता विद्यार्थी परिषदेचा सदस्य व्हावे असे सुचवले गेले. त्यावेळी दत्ताजींनी नेफा मधून आणलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना निवासासाठी म्हणून लक्ष्मी नगरलाच आमच्या घराजवळ एक जागा भाड्याने घेतली होती. विद्यापीठ परिषदेचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता विजय सावंनकर तिथे प्रमुख म्हणून होता. तो देखील दररोज शाखेत यायचा. त्यानेच मग मला विद्यार्थी परिषदेचे सदस्य करून घेतले. पुढल्या पंधरा दिवसातच विद्यार्थी परिषदेची एक बैठक या नेफा निवास मध्येच आयोजित केली गेली होती. तिथे मी गेलो असता दत्ताजी देखील तिथे आले होते. तिथेच दत्ताजींची माझी पहिली ओळख झाली. मध्यम बंध गोरा वर्ण वऱ्हाडी पद्धतीने नेसलेले पांढरे स्वच्छ धोतर आणि त्यावर क्रीम कलरचा कुर्ता, डोक्यावर पांढरे केस, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि तोंडात रंगलेले पान अशा रूपात भेटलेले हे व्यक्तिमत्व पहिल्याच दिवशी मला भावले होते. त्या दिवशी त्यांनी अत्यंत आपुलकीने माझी चौकशी केली आणि अधून मधून भेटत रहा असेही त्यांनी सांगितले. त्यावेळी दत्ताजी जवळच अभ्यंकर नगरला राहायचे. मग एक दोनदा त्यांची अशीच ओझरती भेट झाली होती.

त्यावर्षी दिवाळी आटोपली आणि मग उन्हाळी परीक्षांची तयारी सुरू झाली. त्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये पहिल्या सत्रात बरेच गोंधळ झाले होते. त्यामुळे अभ्यास पुरेसा झाला नव्हता. म्हणून घरच्यांनी मला दत्ताजींच्या जयंत ट्युटोरियल कॉलेजमध्ये टाकायचे ठरवले. तिथे पहिल्याच दिवशी मी वडिलांसोबत ऍडमिशन घ्यायला गेलो तेव्हा समोरच दत्ताजी बसलेले होते. त्यावेळी आमच्या शेजारचे सरपोतदार काका तिथे व्यवस्थापक होते. लगेचच त्यांनी फॉर्म दिला. एव्हाना दत्ताजींनी माझा ताबा घेत चौकशी करायला सुरुवात केली होती. माझ्या वडिलांशी देखील त्यांनी गप्पा सुरू केल्या. दत्ताजी हे एकूणच अघळ पघळ वऱ्हाडी व्यक्तिमत्व होते. त्यांनी वडिलांना विश्वास दिला आणि “तुम्ही काळजी करू नका, हे पोट्टे कसे अभ्यास करत नाही ते मी बघतो” असे सांगून त्यांनी मला रवाना केले. त्यानंतर दररोज क्लासमध्ये आमची भेट व्हायची. दत्ताजी तेव्हा आम्हाला फिजिक्स शिकवायचे. कठीण विषय सोपा करून सांगण्याची त्यांची वेगळीच हातोटी होती. क्लास संपला की ते विद्यार्थ्यांची एक एक करून चौकशी करायचे. प्रत्येकाच्या घरची माहिती देखील ते काढायचे. प्रत्येकाशी कौटुंबिक संबंध कसे प्रस्थापित करता येतील याची त्यांची वेगळीच शैली होती.

त्यावर्षी परीक्षा तर आटोपल्या, पण आमच्या सेंटरवर बऱ्याच भानगडी झाल्या होत्या. त्यामुळे नेमके काय होईल ते सांगता येत नव्हते. शेवटी तसेच झाले. त्यावर्षी मला दोन विषयात क्रॉस आला. मग पुन्हा वडील दत्ताजीकडे घेऊन गेले. मग त्यांनी सांगितले “आता तू पुन्हा क्लास लावू नकोस, त्या बदल्यात तू आठवड्यातून एक दिवस माझ्या घरी येत चल, तिथे मी तुला गणित आणि फिजिक्सचे काही प्रश्न देत जाईल.. तू आठवडाभर अभ्यास करून ते प्रश्न सोडवायचे काही अडचण आली तर माझ्या घरी यायचं ,आणि आठवडा झाला की माझ्याकडे येऊन ते सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरे तपासून घ्यायची, असे आपण करूया.” मग त्यानुसार दर आठवड्यातून एक दिवस दत्ताजींच्या घरी दुपारचे जाणे सुरू केले.

त्यावेळी दत्ताजी सकाळी सहा वाजता संघाच्या शाखेत जायचे. तिथून साडेसात वाजता निघाले की विद्यार्थी परिषदेच्या आणि संघाच्या निमित्ताने वेगवेगळ्या मंडळींना भेटायला त्यांच्या घरी स्कूटरने जात असत. हा कार्यक्रम साडेअकरा बारा पर्यंत चालत असे. त्यानंतर घरी आले की आंघोळ आणि जेवण असा कार्यक्रम असायचा. त्यामुळे दुपारी एक वाजता ते मला बोलवायचे.

दुपारी एक वाजता त्यांच्या घरी पोहोचलो की तिथे आधीच काही मंडळींची मैफिल जमलेलीच असायची. कधी ते विद्यार्थी असायचे, तर कधी शिक्षक तर कधी इतर कोणी संघ कार्यकर्ते प्रत्येकाशी दत्ताजी तितक्याच मोकळेपणाने बोलायचे. सगळ्यांच्या समस्या समजावून घ्यायचे. त्यात मार्ग सुचवायचे. त्यावेळी खेड्यातून हॉस्टेलवर राहायला आलेली मुले आर्थिक दृष्ट्या सक्षम नसायचे. मग त्यांना फी माफी हवी असायची. अशावेळी दत्ताजी त्यातल्या काहींना जयंत ट्युटोरियल कॉलेजमध्ये तर काहींना संघाच्याच मंडळींच्या इतर व्यवसायांमध्ये पार्ट टाईम काम करत आहेत असे दाखवून ही माफीची सवलत मिळवून द्यायचे.
त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे त्यांनी भले केले आणि त्यांची शिक्षणे पूर्ण केली. मला आठवते दत्ताजींची गेल्या वर्षी जन्मशताब्दी झाली त्यावेळी त्यांनी भले केलेले असे कितीतरी विद्यार्थी तिथे उपस्थित होते. ते विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत.

त्यांची ही सर्व कामे करत करतच ते मग मला प्रश्न सांगायचे. ते लिहून घेतले की पुढच्या रविवारी त्याची उत्तरे घेऊन मी त्यांच्याकडे जात असे. त्यावेळी मला तिथेच बसवून ते ती उत्तरे तपासायचे. त्यातल्या चुका दाखवायचे आणि मग नवीन प्रश्न देखील द्यायचे. सुमारे चार महिने माझा असा अभ्यास घेऊन त्यांनी मला परीक्षेसाठी तयार केले होते.

त्यावर्षी पुरवणी परीक्षा आटोपल्यावर वेळ होता. त्यामुळे मी फोटोग्राफी शिकायचे ठरवले. मग हळूहळू फोटोग्राफी करत त्या उन्हाळ्यात काही लग्नांमध्ये फोटो काढण्याची कामे देखील घेतली. अशाच एका लग्नात अचानक दत्ताजी भेटले. मला बघून ते म्हणाले “का बे तू आता हे उद्योग हे सुरू केले का?” मी “हो” असे उत्तर देतच “एकदा घरी ये, मग बोलू” असे म्हणून त्यांनी घरी बोलावले. त्याचवेळी त्यांनी सांगितले “आता मी जुन्या घरी राहत नाही, माझे सिमेंट रोडवर नवीन घर तयार झाले, तिथे मी राहतो आहे.” मग इतर गप्पा होऊन आम्ही निघालो.

दुसऱ्याच दिवशी मी दुपारी दत्ताजीकडे पोहोचलो. मग त्यांनी चौकशी केली. मी वेगवेगळ्या ठिकाणी काढलेले फोटो देखील त्यांनी बघितले. आता आमच्याही काही कार्यक्रमांमध्ये तुला बोलवत जाऊ असे त्यांनी सांगितले. दोनच दिवसांनी विद्यार्थी परिषदेचा एक कार्यक्रम होता. तिथे त्यांनी मला बोलवा असे आग्रहाने कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानुसार मी गेलो देखील होतो.

फोटोग्राफी करत असतानाच शिक्षण बंद करू नको असे त्यांनी मला सांगितले होते. मी सायन्स जमत नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घेतली होती. दरवेळी भेटले की माझ्या प्रगतीची ते चौकशी करायचे. कधीमधी काही अडचण आली तर त्यांना मी भेटायचो देखील. एक दोनदा असेच अडचणीत परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. तत्काळ त्यांनी पैसे देऊ केले आणि सावकाश परत कर म्हणून सांगितले होते. अशा प्रकारे ते अनेक गरजूंना मदत करायचे. जयंत ट्युटोरियल कॉलेजमध्ये काही कार्यक्रम असले की फोटो काढायला ते मला आवर्जून बोलवायचे आणि बरोबर बाजारभावाने पैसे द्यायचे. अनेक परिचित कुटुंबात देखील “आपलं पोरगं आहे त्याला मदत करायला हवी, त्याला फोटो काढायला बोलवत चला” असे दत्ताजी आवर्जून सांगायचे.

१९७५ च्या जून महिन्यात देशात आणीबाणी लागली.
हळूहळू संघाच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांना मिसाखाली अटक केली गेली. त्यात दत्ताजी डिडोळकर देखील होते. त्यांना अटक झाल्याचे कळताच आम्ही सर्वच तरुण मंडळी त्यांच्या घरी पोहोचलो होतो. त्यांच्या वहिनी आणि पुतणे त्यावेळी घरी भेटले होते.

त्या काळात कोणाला अटक झाली, कोणाला नाही, याबाबत वर्तमानपत्रात नावे दिली जात नसत. तसेच कोणाला पॅरोल मिळाला आहे किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणाला इस्पितळात आणले गेले आहे, याबाबत देखील वर्तमानपत्रात काही येत नसे. अर्थात तरीही बातम्या बाहेर पसरायच्याच. त्या काळातच मी शिक्षण पूर्ण करून धरमपेठेत एक जागा घेऊन फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला होता. एक दिवस अचानक एका समावेश समवयस्क कार्यकर्त्याने येऊन माहिती दिली, दत्ताजींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मेडिकल कॉलेजच्या एका वार्डात आणण्यात आलेले आहे. तिथे चार-पाच दिवस तरी ते राहतील. त्याच दिवशी चार वाजता मी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलो. दत्ताजी जनरल वार्डातच होते. त्यांच्या कॉटच्या बाजूला दोन पोलीस देखील उभे होते. तिथे दत्ताजींना भेटायला माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते गोळा झाले होते. प्रत्येकाशी नेहमीच्या मिष्कील शैलीत हास्यविनोद करत दत्ताजी बोलत होते. बाजूचे पोलीस देखील त्यात सहभागी होत होते. मग दत्ताजींनी सांगितले तेही आपलेच पोरं आहेत. पोलिसात येण्यापूर्वी माझे विद्यार्थी होते. तितक्यात दोन शिकाऊ डॉक्टर्स तिथे भेटायला आले. ते देखील आधी शिकत असताना दत्ताजींचे विद्यार्थीच होते. तिथे मेडिकल मध्ये आपले पोटे्टे खूप भेटतात, अगदी विद्यार्थ्यांपासून तर लेक्चरर पर्यंत सगळेच आपले आहेत” असे दत्ताजींनी सांगितले. त्या तुरुंगवासात देखील ते अगदी प्रसन्नचित्त होते.

आणीबाणीच्या काळात असेच दोन तीनदा दत्ताजींना मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. दरवेळी मी त्यांना भेटायला जात असे. मग दुकानदारी काय म्हणते, म्हणून ते चौकशी करायचे. त्यावेळी दूरदर्शनचा छायाचित्रकार म्हणून संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दत्ताजींच्या कानावर घातले होते. मी बाहेर असतो तर तुझ्यासाठी काही करू शकलो असतो. सध्या फक्त आशीर्वाद देतो, इतकेच त्यांनी सांगितले होते.

जानेवारी १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी शिथिल केली आणि देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. याच दरम्यान दूरदर्शनचा मान्यताप्राप्त वृत्त छायाचित्रकार म्हणून मला मान्यता मिळाली आणि माझे कामही सुरू झाले. लोकसभेच्या निवडणुकांचे देखील मी चित्रीकरण केले होते. अपेक्षेप्रमाणे मतदान पार पडले आणि निकालही जाहीर होऊ लागले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचा , दारुण पराभव झाला. दस्तूरखुद्द इंदिरा गांधी देखील पराभूत झाल्या होत्या. त्यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि संघावरील बंदी रद्द केल्याची घोषणा केली. लगेचच मिसाबंदी असलेले सर्व संघाचे कार्यकर्ते सुटू लागले. मला दूरदर्शन कडून फोन आल्यामुळे मी देखील कॅमेरा घेऊन चित्रीकरण करण्यासाठी नागपूरच्या सेंट्रल जेल कडे धावलो. तिथे हजारो संघ कार्यकर्ते गोळा झाले होते. एक एक करून मिसाबंदी सुटत होता आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष होत होता. दत्ताजी सुटून बाहेर आले तेव्हा तर तिथे असलेली सगळी तरुणाई धावली. मग जल्लोषात दत्ताजींना घरी आणले गेले. त्या दिवशी रात्री तर कोणाशी बोलणे शक्यच नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी दत्ताजींच्या घरी पोहोचलो. तिथे माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या गराड्यात दत्ताजी बसले होते. प्रत्येकाची ते आवर्जून चौकशी करत होते. मी दूरदर्शनसाठी मान्यता प्राप्त छायाचित्रकार झालो हे सांगताच त्यांना खूपच आनंद झाला. थोड्याच वेळात त्यांनी आम्हा सर्वांना हाकलले. उद्या सकाळी नाशिक जेलमधून सुटलेले बाळासाहेब देवरस येऊन पोहोचत आहेत. संध्याकाळी त्यांचा नागरी सत्कार होणार आहे. त्याच्या नियोजनाची जबाबदारी माझ्यावर आहे. तेव्हा ती धावपळा आटोपली की आपण सर्व पुन्हा भेटू असे सांगून त्यांनी आम्हाला निरोप दिला. लगेच दुपारी घरी त्यांचा फोन आला. उद्या दिवसभराचे बाळासाहेबांचे कार्यक्रम तुला दूरदर्शनसाठी चित्रित करायचे आहेत असे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांचे रेल्वे स्थानकापासून भव्य स्वागत झाले. दुपारी घटाटे बंगल्यावर शहरातील मान्यवरांची त्यांची भेट झाली. तर संध्याकाळी त्यांचा कस्तुरचंद पार्कवर नागरी सत्कारही झाला. सर्व कार्यक्रमाचे संयोजन दत्ताजींनीच केले होते.

नंतर दत्ताजींचे रुटीन सुरू झाले. पुन्हा जयंत ट्युटोरियल कॉलेज सांभाळणे त्यांनी सुरू केले. अधून मधून कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची माझी भेट होत असे. आता त्यांनी विद्यार्थी परिषदेतून हळूहळू लक्ष कमी केले होते. एव्हाना ते विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय झाले होते. आधी विद्यापीठ सिनेटवर आणि मग विद्यापीठ कार्यकारी समितीवर ते निवडून आले होते. विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमध्ये दत्ताजींची हमखास भेट होत असे. याच दरम्यान एकदा माझा स्कूटर अपघात झाला होता. मी एक दिवस नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिटही होतो. दत्ताजींना हे कळतच ते लगेच मला भेटायला देखील आले होते. हा स्कूटर वरून धडपडला असे माझ्या वडिलांनी सांगताच दत्ताजींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या मिश्किल शैलीत शेवटी धडपडलाच, धड पडला सुद्धा नाही, अशी मल्लिनाथी देखील केली होती.

१९८२ मध्ये नागपुरात दूरदर्शन केंद्र सुरू झाले. त्यामुळे माझी व्यस्तता वाढली. मग क्वचितच दत्ताजींची भेट व्हायची. १९८४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंतराव साठे यांच्या सूचनेवरून मी दूरदर्शन कार्यक्रम निर्मिती प्रकल्प हाती घेतला होता. त्याचे काम सुरू होते. त्यावेळी मी दत्ताजींना भेटायला गेलो होतो. त्यांनी आता मी थकलो आहे, त्यामुळे तुला फारशी मदत करू शकणार नाही, तरीही जिथे कुठे अडेल तिथे सांग, मी मदत करण्याचा प्रयत्न करीन असे सांगून आश्वस्त केले होते.

१९९० मध्ये माझे लग्न झाले. लग्नाची निमंत्रण पत्रिका दत्ताजींना देण्यासाठी मी स्वतः गेलो होतो. ते स्वतः लग्नाला उपस्थित राहिले होते.

लग्नानंतर दोन महिन्यांनी सिमेंट रोड वरून दत्ताजींच्याच घरासमोरून मी आणि माझी पत्नी स्कूटरवर डबलसीट जात होतो. दत्ताजी आपल्या बंगल्याच्या फाटकाशी उभे होते दत्ताजींना पाहून मी स्कूटर वळवली आणि त्यांच्यासमोर थांबवली. मग खाली उतरून आम्ही दोघेही त्यांच्याशी बोलू लागलो. बोलता बोलता सहज दत्ताजींनी माझी पत्नी अनुरूपाशी बोलायला सुरुवात केली. “तुझ्या माहेरच्या वाड्यावर पूर्वी मोर होता, तो अजून तसाच आहे का?” अशी त्यांनी चौकशी केली. मी थोडा चमकलो. माझ्या पत्नीच्या माहेरची इतकी खडा न खडा माहिती दत्ताजींना कशी काय हा मला प्रश्न पडला. तर दत्ताजींनीच त्याला उत्तर दिले. “माझे मोठे बंधू संघाचे प्रचारक म्हणून हिच्या वाड्यावर काही महिने राहिले होते. त्यावेळी मी स्वतः गेलो होतो. त्यामुळे तिथली सगळी मला माहिती आहे, आणि हिचे वडील काका तसेच इतर मंडळींची देखील माझी चांगली ओळख आहे. तुमच्या लग्नाच्या दिवशी ती सर्व मंडळी मला भेटली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या असेही त्यांनी सांगितले. मग थोडा वेळ इतर गप्पा झाल्या आणि दत्ताजी नेहमीच्या मिश्किलपणे मला म्हणाले लवकर निघ, तिला फिरायला घेऊन निघाला आहेस तू, माझ्याशी गप्पा मारायला आला नाहीस.
नंतर कधीतरी निवांत गप्पा मारायला ये आणि हिला सुद्धा घेऊन ये, मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.

नंतर सुमारे दोन महिन्यांनीच दत्ताजी बरेच आजारी झाल्याचे कळले. त्यांना भेटायला देखील जाऊन आलो. मात्र त्यावेळी तब्येत इतकी खालावलेली असेल असे वाटले नव्हते. पण ऑक्टोबर महिन्यात अचानक एक दिवस एका मित्राचा फोन आला अरे दत्ताजी गेले. ते ऐकून मला धक्काच बसला. मी लगेच त्यांच्या घरी गेलो. सर्वच जण धक्क्यात होते. दुसऱ्या दिवशी दत्ताजींच्या अंत्यसंस्काराला हजारो स्नेही मंडळी उपस्थित झाली होती. दत्ताजींनी स्वतः लग्न केले नाही. मात्र त्यांनी हे जे आप्त जोडले होते ते असंख्य होते. त्यातलाच मी देखील एक होतो.

२०२३-२४ हे दत्ताजींचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्ताने काही मोठमोठे कार्यक्रम देखील झाले. त्यांना शक्य तिथे मी उपस्थित देखील राहिलो होतो. त्यांच्या नावाने नागपुरात एक स्मारक उभारण्याची देखील त्यांचेच एक विद्यार्थी नितीन गडकरी यांची योजना आहे. त्यांच्या इतर काही चाहत्यांनी देखील पुढाकार घेऊन पांडे लेआउटमध्ये दत्ताजी डिडोळकर भवन उभारले आहे. तिथे वेगवेगळ्या संस्थांची कार्यालये आहेत. दत्ताजींचे स्मारक होवो न होवो त्यांच्या स्मृती कायम चिरंतनच राहणार आहेत.

Views: 59
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दोन बलाढ्य व धनाढ्य दिग्गज – वाळेकर व करंजुलेत रंगतदार झुंज !!

आमदारच ठरणार शिंदेचा कर्दनकाळ - अंबरनाथ नगराध्यक्ष निवडणूक रणसंग्राम.....ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)