आमदारच ठरणार शिंदेचा कर्दनकाळ – अंबरनाथ नगराध्यक्ष निवडणूक रणसंग्राम
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत भाग – २ रा
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
अंबरनाथ नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक पाच वर्षानंतर होत आहे.
त्यामुळे सर्वपक्षीयांत औत्सुक्य आहे व ही निवडणूक चूरशीची होईल यात शंका नाही. या निमित्त अंबरनाथ पालिकेच्या इतिहासावर एक नजर.
या नगर पालिकेची स्थापना १९७४ साली झाली होती. प्रभाकर नलावडे हे पहिले नगराध्यक्ष होते. मात्र १९७६ साली त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले व अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याने अंबरनाथ नगर पालिकेवर प्रशासक राज होते. १९७७ ते १९९४ पर्यन्त लोकप्रतिनिधी विनाही नगरपालिका होती. या कालावधीत श्री दाजी बनकर (आजचे वय वर्षे ९१) हे १९७४ ते २००७ दरम्यान २० वर्षे शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व १० वर्षे अध्यक्ष होते. अश्याप्रकारे दाजी बनकर हे एकमेव लोकप्रतिनिधी ३० वर्षे अंबरनाथ नगर पालिकेत ठाण मांडून बसले होते.
मधल्या काळात अंबरनाथ नगर पालिका कल्याण महापालिकेत सामाविष्ट करण्यात आली होती. तत्कालीन शिवसेना आमदार व कामगार मंत्री साबीरभाई शेख यांनी लढा उभारून अंबरनाथ व बदलापूर नगर पालिका कल्याण महापालिकेच्या जोखडातून मुक्त केली होती. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेवर लोकप्रतिनिधिंची राजवट सुरू झाली. सन १९९५ ते २०२० पर्यंतचे नगराध्यक्ष खालील प्रमाणे होते:-
नगराध्यक्ष:-
१९९५ दादासाहेब कांबळे
१९९६ कीर्तीताई अंदाडे
१९९७ विजय पवार
१९९८ पूर्णिमा कबरे
२००० अरविंद वाळेकर
२००१- २००५ अरविंद वाळेकर
या ५ वर्षात नरेश गायकवाड प्रकरणात काही काळ प्रशासक अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
२००५ ते २००९ थेट नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले
२००९- २०१० संपदा गडकरी
२०१० – २०१५ सुनील चौधरी
२०१५ – २०१७ प्रज्ञा बनसोडे
२०१७- २०२० मनीषा वाळेकर
मधल्या ५ वर्षात २०२० ते २५ निवडणूकच झाली नसल्याने प्रशासक काम पाहत होते. त्यामुळे दीर्घ काळाच्या प्रतीक्षे नंतर ही निवडणूक होत असून नगराध्यक्ष थेट निवडणुकीने होत आहे.
यंदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या वतीने सौ. मनिषा अरविंद वाळेकर, उबाठा शिवसेनेच्या अंजली बाळा राऊत, भाजपच्या तेजश्री करंजुले, काँग्रेसच्या नूतन प्रदीप पाटील तर अजित पवार राष्ट्रवादीच्या अश्विनी पाटील या पाच उमेदवारात लढत आहे. उबाठा शिवसेनेची शरद पवार राष्ट्रवादी व मनसेशी युती असल्याने अंजली राऊत यांना बळ प्राप्त झाले आहे. असे असले तरी सौ. मनिषा अरविंद वाळेकर व तेजश्री विश्वजीत करंजुले हे अंबरनाथच्या राजकारणात बलाढ्य व धनाढ्य तुल्याबळ उमेदवार असल्याने या दोघातच खरी लढत रंगणार आहे. अंजली राऊत व बाळा राऊत हे दोघेही ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली हे योग्यच झाले. परंतू उबाठा शिवसेनेत दुहेरी निष्ठा बाळगणारे अनेक आहेत, तसेच अंबरनाथ शिवसेना ही पक्षांतरामुळे खिळखिळी झाली आहे. त्याचा फटका अंजली राऊत यांना बसणार आहे. वरील दोन बलाढ्य व धनाढ्य शक्तिपुढे त्यांचा निभाव लागणे शक्य नाही.
अंबरनाथ व उल्हासनगर उबाठा शिवसेनेत अनेक घरभेदी पदे अडवून बसले आहेत, हे मी वेळोवेळी जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीत एकाने १५ लाख तर दुसर्याने ५० हजार घेऊन किणीकरांचे काम केले होते. एका पत्रकाराने तर ५ लाख वसुल केले होते. असे अजूनही आहेत. हे मी जबाबदारीने व खात्रीपूर्वक सांगत आहे.
अंजली राऊत यांच्या उमेदवारीने नाराज झालेले शहर प्रमुख अजित काळे व संदीप पगारे यांनी आपण अंजली राऊत यांचे काम करणार नाही, असे जाहीर करून बंडाचा झेंडा उभारला आहे. त्यांच्या नाराजीचा फायदा भाजपाला होईल हे वेगळे सांगायला नको. आत्ता पक्ष कारवाई करतो की डोळेझाक करतो ? हे पहावे लागेल.
एकीकडे उभाठाच्या स्थानिक नेतृत्वाने आपल्याच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना विरोधात असहकारची घोषणा केली असताना शिंदे सेनेत ही आलबेल नाही. एकनाथ शिंदेच्या बंडातील पहिले गद्दार आमदार म्हणून बालाजी किणीकर हे ओळखले जातात.
या बालाजी किणीकरांचे राजकीय “गॉड फादर” असलेल्या अरविंद वाळेकरांशी त्यांचा छत्तीसचा आकडा आहे. वाळेकर यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आमदारकीच्या वेळी त्यांनी नमते घेत वाळेकरांशी जुळवून घेतले होते. परंतू ती तात्पुरती मलमपट्टी होती. त्यावेळी आमदार जाहीरपणे बोलले होते की, नगरपालिका निवडणुका या अरविंद वाळेकरांच्या नेतृत्वा खाली लढवेन. परंतु आमदार चवथ्यांदा निवडून येताच त्यांचे तेवर बदलले व त्यांनी वाळेकर विरोधात फणा बाहेर काढला. म्हणजे ते ज्या पक्षात गद्दारी करून गेले त्या पक्षाशीही इमान राखू शकलेले नाहीत.
आमदार किणीकर व माझ्यात सख्य होते कारण ते शिवसेनेचे आमदार होते. परंतू ते शिंदे सेनेत गेल्याने दुरावा निर्माण झाला. आज ते जी पक्षविरोधी भूमिका वाळेकर द्वेषातून घेत आहेत त्यामुळे त्यांचीच प्रतिमा मलीन होत आहे.आधी त्यांनी शिंदे परिवारात दुफळी निर्माण करून आपल्या गटात घेतले, येथपर्यंत ठिक होते, परंतू आत्ता आपल्या समर्थकांना भाजपात सामील करून घेऊन वाळेकर यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ते गनिमी कावा करून भाजपाला मदत करीत आहेत, हे लपून राहिलेले नाही. हा घातकीपणा डॉ.बालाजी किणीकर यांना भोवणार आहे. जर वाळेकर निवडून आले तर त्यांची अवस्था “धोबीका कुत्ता” सारखी होईल. आणि जर तेजश्री करंजुले निवडून आल्या तर त्यांची गय एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे करणार नाहीत. जो भाजपा शिंदे सेना संपवू पाहत आहे, त्या भाजपला जीवदान दिल्यास त्यांचे राजकीय जीवनच संपून जाईल. याचा सर्वाधिक आनंद उबाठा शिवसेनेस होईल, त्यात मीही आलो.


