मोराळे येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
शाळेला मदत करण्याचे माजी विद्यार्थ्यांनी दिले आश्वासन**
जिल्हा परिषद शाळा मोराळे ता. पलूस येथे आज माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास अनेक माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
मेळाव्यात आपले मत मांडताना शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत गावच्या मराठी शाळेनेच आम्हाला घडवले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून गावच्या शाळेसाठी आवश्यक ती यथाशक्ती मदत करण्याचे अभिवचन दिले.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी मोराळेच्या सरपंच सौ प्रियांका शिरतोडे होत्या.ौ तर सभा मंचावर उपसरपंच बबन आबा पाटील ,तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष कृष्णात कदम, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील ,ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक अमोल कदम, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील ,भारती विद्यापीठ पुणे येथील प्रा.सदाशिव पाटील, मुख्याध्यापक मारुती शिरतोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण मानाजी पाटील होते..
प्रारंभी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर माजी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक विजय जाधव यांनी केले तर मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी आपल्या मनोगतातून मोराळे गावच्या प्राथमिक शाळेने अनेक पिढ्या घडवल्या असून जरा मागे वळून बघावे’हा हेतूडोळ्यासमोर ठेवून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत यावं, आपण शिकलेली शाळा पहावी ,पुन्हा एकदा शाळा, शाळेचा परिसर अनुभवावा,नव्या पिढीला काय देता आले तर द्यावे या भावनेने माजी विद्यार्थी मेळावा संघटित केला असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर सध्या राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपल्या मोराळे गावात यशस्वी होण्यासाठी स्वच्छ गाव समृद्ध गाव हरित गाव करण्यासाठी गावपातळीवरील सर्व संस्था सक्षम कशा होतील याबाबत विचारविनीमय होऊन शाळा विकासाची सुद्धा एक लोक चळवळ उभी राहावी म्हणून आपणास निमंत्रित केले असल्याचे सांगितले. या माजी विद्यार्थी मेळाव्यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी बोलताना प्रा. डॉ.सदाशिव पाटील यांनी गावची मराठी शाळा ही आपली मूळची प्रेरणास्थान असल्याचे सांगून या शाळेला हवी ती मदत करण्याचे सुचित केले तर माजी उपसरपंच श्रीरंग शिंदे यांनी गावच्या जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही बसवून देणार असल्याचे सांगितले.प्रा. डॉ.आप्पासाहेब पाटील आणि आरोग्य सेवक रवींद्र कदम यांनी शाळेत स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका सुरू करण्यात यावी अशी आपली इच्छा असून त्याकरिता आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील यांनी सर्वांनी मिळून सहकार्य केल्यास शाळेचा पट ही वाढू शकतो हे सांगून शाळेला विकासाच्या बाबतीत नेहमीच प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तर अनिल पाटील यांनी आपला जेसीबी शाळेने कुठल्याही कामाकरिता बोलावल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष कृष्णात कदम यांनी शाळेवर सौर ऊर्जा प्रकल्प होण्याकरता आवश्यक तो पाठपुरावा ग्रामपंचायतला सोबत घेऊन करणार असल्याचे सांगितले. तर धनाजी तुकाराम पाटील यांनी पुन्हा एकदा सवडीने माजी विद्यार्थी मेळावा संघटित करून सर्वच विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्याची मागणी केली.
निशांत उद्धव पाटील यांनी गावकऱ्यांनी इंग्लिश मीडियम शाळेला प्राधान्य देण्यापेक्षा गावच्या शाळेतच आपली मुले घालावीत आणि आपली शाळाच अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न करावा अशी भावना व्यक्त करून शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.प्रशांत पाटील यांनी शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी केली तर मेजर उत्तम शामराव पाटील यांनी गावात सुमारे 25 माजी सैनिक असून त्या सर्वांची शाळेला कशी मदत होईल याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या मेळाव्याला आरती पाटील, अंगणवाडी सेविका रागिनी गाडे, शाळेतील शिक्षिका अश्विनी पोतदार, अश्विनी घोरपडे तसेच बबन पाटील, विशाल सदाशिव जाधव ,राजाराम यशवंत पाटील यांचे सह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिक्षक सुशांत पवार यांनी मानले. नाश्ता चहापानानंतर मेळाव्याची सांगता झाली.


