• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ४१,कवी अनिल…,

माणगंगा by माणगंगा
November 29, 2025
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो,डॉ संपदा मुंढे प्रकरणातून घ्यायचा धडा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ४१,

कवी अनिल…,

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

आत्माराम रावजी देशपांडे उपाख्य कवी अनिल हे महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील एक गाजलेले नाव होते. ते फक्त कवी म्हणूनच नव्हे तर चांगले वक्ते म्हणून आणि लेखक म्हणूनही विख्यात होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थानही त्यांनी भूषविले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष म्हणून देखील काही काळ कार्यरत होते. इतकेच नव्हे तर साहित्य अकादमीने त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले देखील होते.

नागपूरकर असलेले कवी अनिल हे साहित्य विश्वात जरी कवी अनिल म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांच्या मित्रमंडळींमध्ये ते अप्पा या नावानेच प्रसिद्ध होते. कवी म्हणून ते कितीही मोठे असले तरी सर्वांशी स्नेहबंध जपणारे ते एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते. योगायोगानेच त्यांचा माझा परिचय झाला आणि त्यानंतर जवळजवळ सहा वर्ष त्यांचा माझा नियमित संपर्क राहीला. त्यामुळे आज त्यांच्याच आठवणी लिहायच्या असे ठरवले आहे.

कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे ही दोन्ही नावे अगदी शालेय जीवनापासूनच ओळखीची होती. शाळेत असताना कुसुमावती देशपांडे यांनी लिहिलेले ललित बंध मराठीच्या धड्यात होते. तर कवी अनिलांच्या कविता देखील अभ्यासाला होत्या.

मला आठवते मी कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकत असताना आमच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला कवी अनिल प्रमुख अतिथी म्हणून आले होते. त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष बघितले. बघता क्षणीच त्या व्यक्तिमत्त्वाच्या मी प्रेमात पडलो होतो. मात्र त्या दिवशी त्यांची माझी समोरासमोर ओळख होऊ शकली नव्हती.

१९७६ मध्ये मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत झालो होतो. एक दिवस यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे होणार असलेल्या महिला लेखिका साहित्य संमेलनाला उपस्थित राहून त्याचे वृत्तचित्रण करावे असे मला दूरदर्शन कडून कळवण्यात आले. वणी येथे होणाऱ्या या कवी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष त्यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या डॉ. गोहोकर यांच्या पत्नी विमलताई गोहकर या होत्या. त्यामुळे वणीला जाण्याची वाहन व्यवस्था डॉ. गोहोकर करणार असे सांगण्यात आले होते. या संमेलनाचे आयोजन नागपूरच्याच विदर्भ साहित्या संघाने केले होते.

त्यानुसार डॉक्टर गोहोकर यांच्याशी संपर्क करून ठरल्याप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी मी माझे सामान घेऊन पोहोचलो. त्या नागपूर विद्यापीठाच्या मोठ्या मेटाडोर गाडीत कुलगुरू गोहकर, विदर्भ साहित्य संघाचे तत्कालीन अध्यक्ष कवी अनिल, सरचिटणीस बाबुराव देहाडराय, विदर्भ साहित्य संघाच्या तत्कालीन युगवाणी नियतकालिकाचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुकर आष्टिकर, सौभाग्यवती आष्टीकर, विभागीय समाज कल्याण अधिकारी चंद्रकांत ठवकर, आकाशवाणीचे वृत्त संपादक हरीश कांबळे आणि मी असे सर्व सहप्रवासी होतो.

त्यावेळी माझे वय जेमतेम २२ वर्षे इतकेच होते. मी या क्षेत्रात अगदी नवीन होतो. बाकी सर्वच मंडळी एकमेकांना ओळखत होती. गाडी सुरू झाल्यावर कुणीतरी माझ्याबद्दल चौकशी केली. तेव्हा डॉ. गोहोकरांनीच सर्वांना माझी ओळख करून दिली, आणि मलाही सर्वांची ओळख करून दिली. मग कवी अनिलांनी माझी चौकशी सुरू केली. “पाठक तुम्ही कुठले? मग कधीपासून दूरदर्शनसाठी काम करता? घरी कोण कोण असते? अशा सर्व चौकश्या त्यांनी केल्या. हळूहळू मी सगळ्यांशीच बोलू लागलो. माझी भीड ही हळूहळू चेपू लागली होती. अर्थात काहीही असले तरी सोबतची सर्वच मंडळी माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने आणि अनुभवाने ज्येष्ठच होती. समाजात त्या सर्वांच्या नावाला एक प्रतिष्ठा होती. त्यांच्या भोवती प्रसिद्धीचे वलय देखील होते. त्यामुळे मी जरा दबकुनच बोलत होतो.

हळूहळू नागपूर शहरातील गर्दी आटोपून आमची गाडी वर्धा रोडवर लागली होती. गाडीत या सर्व मान्यवरांच्या आपापसात गप्पा सुरूच होत्या. मी शांतपणे ऐकण्याचे काम करत होतो. या गप्पांमध्ये मग कवी अनिल हे अप्पा म्हणून ओळखले जातात, तर डॉ.आष्टीकर हे भाऊसाहेब म्हणून प्रसिद्ध आहेत, तर देहाडराय हे बाबुराव म्हणून ओळखले जातात, ही माहिती मला मिळाली. सुमारे दीड तासांनी गाडी जांबला थांबली. तिथे एक धाबावजा हॉटेल होते. तिथे त्यावेळी जेवण, नाश्ता, चहा, शीतपेय, असे सर्वच काही मिळायचे. त्यामुळे तिथे प्रवाशांची गर्दी असायची. तिथे आम्ही सर्वजण चहा घेण्यासाठी थांबलो. सर्वजण कारमधून उतरून पाय मोकळे करायला बाहेर निघालो आणि मग त्या ओपन एअर हॉटेलमध्ये एका टेबल भोवती सर्वजण जाऊन बसलो. तितक्यात तिथे एक सीताफळवाला ताजी सीताफळे घेऊन विकायला आला होता. सिताफळे पाहून सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटले होते. मग अप्पांनीच त्याच्याशी भाव केला, आणि सगळ्यांसाठीच सीताफळ विकत घेतली. त्यांनी लगेचच एक सीताफळ फोडले आणि चवीने खायला सुरुवात केली. मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो. सीताफळ खाताना ते दरवेळी मान वळवून तोंडातल्या सीताफळाचे बिया खाली फेकत होते. मग माझ्याकडे बघून ते मला म्हणाले “पाठक याला सीताफळ का म्हणतात? त्यांच्या या प्रश्नावर मी देखील प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. मग त्यांनी उत्तर दिले.” याची चव लागते सफरचंदासारखी. मात्र दरवेळी याच्या बिया बाहेर थुंकाव्या लागतात. इंग्रजीत थुंकणे याला स्पीट असे म्हणतात. म्हणून हे स्पीट ॲपल आणि त्याचा अपभ्रंश म्हणजे सीताफळ”. त्यांची ही माहिती ऐकून विचारा मी विचारात पडलो. तेव्हा पलीकडेच बसलेल्या डॉ. आष्टीकरांनी मिश्किल पणे त्यांना सुनावले “अप्पा तो आपल्यासमोर अजून पोरगा आहे, त्याला भरतं सलतं काही सांगू नका.” आणि त्यावरच सगळ्यांमध्येच हशा पिकला.

चहापान आटोपल्यावर डॉ. गोहोकर काउंटरवर पैसे देण्यासाठी गेले. तेव्हा त्या हॉटेल मालकाने पैसे घ्यायला नकार दिला. तो हॉटेल मालक देखील साहित्यप्रेमीच होता. त्याने सांगितले “साहेब या सगळ्यांना मी ओळखतो. सगळे मोठे साहित्यिक आहेत. त्यांना ते इथे आले याचाच मला आनंद आहे. त्यामुळे मी पैसे घेणार नाही. डॉ. गोहोकरांनी येऊन सांगितले तेव्हा अप्पा म्हणाले आता आपण सगळे मिळून या मालकांच्या आभाराचा ठराव पारित करू या” आम्ही चहापान करायला गेलो होतो. त्या वेळात गाडीचा ड्रायव्हर बाजूच्याच पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी गेला होता. गाडी दिसली नाही तेव्हा अप्पा म्हणाले “अरे आपली नागपूर विद्यापीठाची मोठ्याढोर कुठे गेली?” मेटाडोरचा त्यांनी केलेला अपभ्रंश सगळ्यांनाच खूप आवडला होता.

जांबवरुन आम्ही वणीकडे निघालो. रस्त्यात अप्पांचे सगळ्यांना विनोद ऐकवणे सुरूच होते. त्यात भाऊसाहेब आष्टीकरांची फोडणीदेखील असायची. त्यामुळे या गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलेच नाही. एव्हाना आम्ही वणीला येऊन पोहोचलो होतो. आयोजक राम शेवाळकर आमची वाटच बघत होते. तिथे चहापान आटोपून लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष या नात्याने आप्पांचे साहित्यप्रचुर भाषण देखील ऐकायला मिळाले होते.

संमेलनासाठी बाहेरगावाहून आलेल्या मान्यवर पाहुण्यांची वणीकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवासाची सोय केली होती. तिथे असलेल्या शासकीय विश्रामगृहात माझी सोय झाली आहे असे सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही शासकीय विश्रामगृहात पोहोचलो. तिथे एका कक्षात मी, आकाशवाणीचे हरीश कांबळे आणि विभागीय समाज कल्याण अधिकारी चंद्रकांत ठवकर असे तिघे होतो. दुसऱ्या कक्षात कवी अनिल उर्फ अप्पा देशपांडे आणि बाबुराव देहाडराय तर तिसऱ्या कक्षात संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आलेल्या विख्यात महिला साहित्यिक गिरिजा कीर आणि नागपूरच्या साहित्यिक तसेच विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारणी सदस्य डॉ. शकुंतला खोत या होत्या. विश्रामगृह संमेलन स्थळापासून अगदी जवळच होते. मग सामान टाकून आम्ही सगळे पायीच गप्पा मारत जेवायला गेलो, आणि तिथून परत देखील गप्पा मारतच विश्रामगृहात परतलो.. मग विश्रामगृहाच्या लॉन वर रात्री तासभर आम्हा सगळ्यांची गप्पांची मैफिल रंगली होती.

दुसऱ्या दिवशी संमेलनात दिवसभर एकापाठोपाठ एक कार्यक्रमाच लागले होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष या नात्याने अप्पांना अधून मधून व्यासपीठावर बसावे लागतच होते. मी देखील समोर कॅमेरा लावून चित्रीकरण करत होतो. दुपारी दुसऱ्या सत्रानंतर अप्पा व्यासपीठावरून उतरून खाली आले आणि बाजूलाच असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षात जाऊन बसले. मी देखील बराच वेळ चित्रीकरण केल्यामुळे थकलो, म्हणून तिथे जाऊन बसलो होतो. अप्पा आल्यावर तिथे आयोजकांनी त्यांच्यासाठी चहा बोलावला. मग माझ्या आणि अप्पांच्या गप्पा सुरू झाल्या. कप्पांनी सहज चौकशी केली, “पाठक तुम्ही लिहिता की नाही?” त्यावेळी मी अगदी फुटकळ लिहीत असे. तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे एक किंवा दोन कथा मी लिहिल्या होत्या. अर्थात त्या प्रकाशित झालेल्या नव्हत्याच, आणि काही फुटकळ लेख देखील लिहिले होते. मग अप्पांनी मला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. “पाठक तुम्ही या क्षेत्रात आहात. इथे तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव येणार आहेत. ते डोक्यात ठेवा आणि कधीमधी लिहीत चला. तुम्हाला ते चांगलं जमेल. त्यावेळी मी ते काही फारसे मनावर घेतले नव्हते. मात्र नंतर कधीतरी राजकीय पत्रकारिता करता करता राजकीय कथा लिहायला लागलो तेव्हा अप्पांनी दिलेल्या सूचनेची आठवण झाली होती.

त्यादिवशी रात्रीच संमेलनाचे सुख वाचले सुप वाजले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्व मेटाडोरने परत यायला निघालो. आधी येताना सोबत असलेली सर्व मंडळी सोबत होतीच. मग गप्पा मारत मारतच आम्ही नागपूरला परतलो. रस्त्यातच आप्पांना घरी सोडले तेव्हा निघताना अप्पांनी मला आवर्जून भेटत राहण्याचे सांगितले होते.

मग अधून मधून कार्यक्रमाच्या निमित्ताने अप्पांची भेट होऊ लागली. भेटल्यावर ते आवर्जून चौकशी करायचे. त्या वयात कवी अनिलांसारखा मान्यवर साहित्यिक आवर्जून आपली चौकशी करतो याचे मला खूप अप्रूफ वाटायचे.

१९७८ चे विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन भंडारा येथे झाले होते. त्या संमेलनाला देखील मी चित्रीकरणासाठी गेलो होतो. तिथेही अप्पा आलेले होतेच. मी दिसल्याबरोबर त्यांनीच मला आवाज दिला “काय पाठक आजही आम्हाला टीव्हीवर दाखवणार का?” मग थोडीफार चौकशी करून ते व्यासपीठावर चालले होते. नंतर जेवायच्या वेळी देखील ते माझ्या बाजूलाच बसले आणि पुन्हा गप्पांना सुरुवात झाली होती. अप्पा साधे जरी बोलायचे तरी ते कुठेतरी मनाला आनंद देऊन जाणारे असायचे.

१९७९ मध्ये चंद्रपूरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. मुंबई दूरदर्शन विशेष कार्यक्रम दाखवणार असल्यामुळे तीनही दिवस थांबून मला चित्रीकरण करायचे होते. तिथे पोहोचल्यावर सम्मेलनस्थळीच सकाळी अप्पांची भेट झाली. त्यावेळी माझ्यासोबत मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ निर्माते डॉ. गोविंद गुंठे हे देखील होते. त्यांची आणि अप्पांची मी ओळख करून दिली. दोघांच्याही छान गप्पा रंगल्या होत्या. त्या तीन दिवसात अनेकदा अप्पांची भेट झाली. दरवेळी ते आवर्जून चौकशी करायचे.

१९७९ मध्ये मी टायफाईडने बराच आजारी झालो होतो. त्यावेळी अप्पांच्या कानावर ते गेले. त्यांनी फोन करून घरी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी मला पत्र देखील पाठवले होते, आणि अधून मधून फोन करून चौकशी करत होते. सुमारे दोन महिन्यांनी प्रकृती सुधारून एका कार्यक्रमाचे चित्रीकरण करायला गेलो असताना तिथे अप्पांची भेट झाली. तिथे मला बघताच ते जागेवरून उठून माझ्याकडे आले आणि “काय पाठक प्रकृती कशी आहे?” म्हणून आवर्जून चौकशी केली होती.

१९८० च्या जानेवारी महिन्यात अप्पांना साहित्य अकादमीचा विशेष पुरस्कार जाहीर झाला होता. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे साहित्य अकादमीचे वरिष्ठ अधिकारी आणि काही पदाधिकारी नागपूरला आले त्यांनी धनवटे रंगमंदिरात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले, आणि तिथे अप्पांना हा पुरस्कार प्रदान केला होता. त्या दिवशी अप्पांची निवांत भेट झाली होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल आप्पांना समाधान निश्चित होते. मात्र त्यांचे वागणे पूर्वीसारखेच होते. त्या दिवशी भेटल्यावर देखील त्यांनी आवर्जून माझी चौकशी केली. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील आले होते. त्या सर्वांशी त्यांनी माझी ओळख करून दिली होती.

त्याच वर्षी विधानसभा निवडणुका होत्या. दूरदर्शनवर वृत्त संकलन पाठवताना काही मान्यवर मतदान करताना दाखवावे लागायचे. मग त्यावर्षी मी काही नामवंत साहित्यिकांना दाखवायचे ठरवले. त्यासाठी मग अप्पांना मी फोन केला. तेव्हा ते सकाळी नऊ वाजता सुळे हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदान करायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठरल्यानुसार मी सकाळी नऊ वाजता त्यांच्या तंतोलीतील घरी पोहोचलो. ते मतदानाला जायला निघतच होते. आपल्या घरापासून तर मतदान केंद्रापर्यंत अप्पा पायी चालत गेले. तिथे ते मतदान करायला येणार म्हटल्यावर मी त्यांचे चित्रीकरण करायला कॅमेरा लावून सज्ज झालो. त्यावेळी त्यांना काही शंका आल्यामुळे ते माझ्याकडे येऊन चौकशी करू लागले. तिथे त्यांच्या कोणत्याही चौकशीला मी उत्तर देणे चुकीचे ठरणार होते. त्यामुळे अप्पांना मी निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलायला सांगितले. निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलून आपले समाधान करून घेतल्यावरच अप्पांनी मतदान केले होते. त्याच दिवशी रात्री दूरदर्शनवर मुंबईत अप्पा मतदान करताना दाखवले गेले. त्यांच्या नातलगांचे त्यांना फोन देखील आले. दुसऱ्याच दिवशी अप्पांनी मला फोन करून कळवले देखील होते.

१९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी साहित्यिकांसाठी इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान स्थापन करण्याचे घोषणा केली होती. त्या निमित्ताने साहित्यिकांच्या वतीने त्यांचा धनवटे रंगमंदिरात सत्कार करण्यात आला होता. या सत्कारात आप्पांनी जोरदार भाषण दिले होते. ते अजूनही माझ्या लक्षात राहिले आहे. कार्यक्रमानंतर अप्पा, मी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात छान संवाद रंगला होता.

१९८१ च्या जानेवारी महिन्यात अमरावतीला राज्य शासनातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या वृत्त संकलनासाठी मी गेलो होतो. तिथे अप्पांचा नातू उन्मेष देशपांडे याने सादर केलेल्या प्रयोगाला उत्कृष्ट ठरवून विशेष पुरस्कार जाहीर झाला होत उन्मेष पुरस्कार घेत असताना मी चित्रीकरण केले. रात्री परतताना उन्मेष आणि त्याचे आई वडील माझ्यासोबतच एकाच बसमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी अप्पांचा मला फोन आला होता. आणि उन्मेषचे पुरस्कार घेतानाचे चित्रीकरण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला होता.

यानंतर अप्पा थकत चालले होते. त्यामुळे फारसे कार्यक्रमांमध्ये ते दिसत नव्हते. मात्र अधून मधून फोनवर बोलणे व्हायचे. जानेवारी १९८२ ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री वसंतराव साठे यांनी १५ ऑगस्ट १९८२ पासून नागपुरात दूरदर्शन केंद्र सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. ही बातमी कळल्यावर अनेक लोक सुखावले होते. अप्पा देखील त्यातलेच एक होते. नंतर एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि जमल्यास एकदा भेट म्हणून त्यांनी सांगितले. मी त्यांना भेटायला देखील गेलो होतो. दूरदर्शनवर कसे कार्यक्रम व्हावे याबाबत त्यांनी मला बऱ्याच सूचना केल्या होत्या. दूरदर्शनवर कार्यक्रम निर्मितीसाठी नागपूरचे मुख्य कोण आहेत असे त्यांनी विचारल्यावर मी आकाशानंदांचे नाव सांगितले होते. तेव्हा आकाशानंद माझा चांगल्या परिचयाचा आहे त्याला मी एखादे पत्र टाकून या सर्व सूचना देतो असे त्यांनी मला सांगितले होते. त्यानुसार त्यांनी पत्र टाकले देखील होते. मला फोन करून त्यांनी तसे कळवले देखील.

ती अप्पांची भाजी शेवटची भेट ठरली. त्यानंतर पुढचे दोन-तीन महिने मी बराच व्यस्त राहिलो. मे महिन्यात मी ऊन लागून आजारी पडलो होतो. संध्याकाळी रेडिओवर बातम्या लावल्या. तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक कवी अनिल यांचे निधन ही बातमी कानावर पडली. मी लगेच अप्पांच्या घरी फोन करून बातमी कन्फर्म केली होती. अर्थात आजारी असल्यामुळे मी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊ शकलो नव्हतो.

अप्पा एक नामावंत कवी होते, साहित्यिक होते, निवृत्त शासकीय अधिकारी देखील होते. समाजात त्यांना खूप मान होता. त्यांची प्रतिष्ठा देखील खूप होती. उभा महाराष्ट्रच नाही तर जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला होता तिथे अप्पांची ओळख त्यांच्या काव्यरचनांनी झाली होती. तरीही त्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य छायाचित्रकाराशी संबंध जपले हे माझ्यासाठी खूप मोठे संचित होते. पहिल्याच भेटीत त्यांनी मला “तुम्ही लिहीत चला” अशी सूचना केली होती कालांतराने मी लिहायला लागलो. विविध वृत्तपत्रांमध्ये माझे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. आज माझ्या खात्यावर १५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तर अजून चार प्रकाशाच्या वाटेवर आहेत. अशावेळी अप्पांची आठवण होणे सहाजिकच ठरते.

Views: 60
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडीचां पहिला नगराध्यक्ष भाजपचाच होणार… यू.टी .जाधव यांनाच संधी मिळणार…… दादासाहेब हूबाले

आटपाडीचां पहिला नगराध्यक्ष भाजपचाच होणार… यू.टी .जाधव यांनाच संधी मिळणार…… दादासाहेब हूबाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)