• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ४२,चैनसुख संचेती,.ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 19, 2025
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो,डॉ संपदा मुंढे प्रकरणातून घ्यायचा धडा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ४२,चैनसुख संचेती,.ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच नागपुरात पार पडले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत एक प्रस्ताव मांडण्यात आला. मधल्या काळात विधानसभेतील विधिमंडळातील विविध सदस्यांच्या कथित गैरवर्तनाबाबत काही तक्रारी आल्या आहेत. हे बघता सदस्यांचे वर्तन कसे असावे याचे नियम बनवण्यासाठी आणि सदस्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी एक नीतिमूल्य समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीचे अध्यक्ष विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य चैनसुख संचेती असतील हा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. ज्या सदस्याने आयुष्यभर नीतीमूल्य जपत राजकारण केले असा सदस्य समितीच्या अध्यक्षपदी नेमला गेला याबद्दल सभागृहातील सर्वात सदस्य नंतर समाधान व्यक्त करताना दिसत होते.

लगेचच दोन दिवसांनी म्हणजे १६ डिसेंबर २०२५ला चैनसुख संचेतींचा ७२ वा वाढदिवस होता. चैनसुख संचेती सहाव्यांदा मलकापूर विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला त्यांचे अभिष्टचिंतन करणारे लेख आणि जाहिराती यांची समाजमाध्यमांवर रेलचेल होती. खरे तर आजचा हा “आयुष्यातले सांगाती” मला १६ डिसेंबरलाच लिहायचा होता. मात्र त्यादिवशी ही रेलचेल पाहून दोन दिवसांनी म्हणजे आज लिहायचे ठरवले आहे.

चैनसुख संचेती माझ्या आयुष्यातले सांगाती झाले ते १९९५ मध्ये. त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय नसला तरी अगदी कॉलेजच्या जीवनापासूनच मी त्यांच्याबद्दल ऐकून होतो. कॉलेजच्या जीवनात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक कार्यकर्ता होतो, आणि चैनसुख संचेती देखील परिषदेचे एक पदाधिकारी होते. मात्र आमचा प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता, तर तो योग आला तब्बल वीस वर्षांनी त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षणातून आटोपून वेगवेगळ्या उलाढाली करत मी मार्गक्रमण करत होतो. १९९० ते ९४ या काळात मला व्यावसायिक स्तरावर असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. त्या काळात नागपूरच्या संचेती परिवाराने म्हणजेच चैनसुख संचेती यांचे मोठे बंधू आणि मध्य भारतातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शक्तीकुमार संचेती यांनी मला आधार दिला होता. १९९५ मध्ये विधानसभा निवडणुका आल्या. त्यावेळी त्या निवडणुकीत व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या मदतीने काही प्रचार यंत्रणा राबवावी अशी माझी योजना होती. चैनसुख संचेती बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार होते. त्यांनी आधी भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मलकापूरला जाऊन व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या मदतीने चैनसुख संचेतींचा प्रचार करता येईल का हे बघण्यासाठी मला शक्तीभाऊंनी मलकापूरला पाठवले. त्यावेळी माझी चैनसुख संचेतींची पहिली भेट झाली होती. त्या निवडणुकीत टी. एन. सेशन नामक निवडणूक आयुक्तांचा प्रचंड दरारा होता. म्हणून व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रचार करणे अडचणीचे ठरणार होते. मग मी नागपूरला परत यायचे ठरवले. मात्र त्याचवेळी वृत्तपत्रांच्या माध्यमातून काही नवे प्रयोग करता येतील का? याबाबत चर्चा सुरू होती. मी बसल्या बसल्या काही वेगळ्या सूचना केल्या. त्या सगळ्यांनाच पटल्या आणि मग मी मलकापूरातच थांबून चैनसुख संचेतींची वृत्तपत्रीय प्रचार यंत्रणा राबवावी असे ठरले. मी लगेच नागपूरला आलो सर्व बाबींचे नियोजन केले आणि मलकापूर मुक्कामी गेलो. तिथे एका हॉटेलवर मुक्काम करून यांच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवत त्यानुसार वृत्तपत्रीय प्रसिद्धी हाताळत होतो. त्यादरम्यान चैनसुख संचेतींची जवळपास दररोज भेट होत असे. चैनसुख संचेती त्या परिसरात चैनूभाऊ म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे मग मी सुद्धा त्यांना चैनुभाऊच म्हणू लागलो. त्या पंधरा दिवसात मी माझ्या बुद्धीचा वापर करत वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यांची भरपूर प्रसिद्ध केली. तिथल्या काही स्थानिक पत्रकारांची देखील मी मदत घेतली. परिणामी प्रस्थापितांचा विरोध असताना देखील चैनु भाऊ दणदणीत १३००० च्या फरकाने विजयी झाले होते.

नंतर थोड्याच दिवसात चैनुभाउंचा नागपूरला निरोप आला‌. मला लगेच बोलावले गेले आणि चैनुभाऊंची सर्व प्रसिद्धी यंत्रणा आणि विधानसभेचे कामकाज यासाठी त्यांना मदत करावी म्हणून माझी नेमणूक करण्यात आली. मग सतत कधी मुंबई आणि कधी मलकापूर अशा माझ्या चकरा सुरू झाल्या.

या चकरांदरम्यान चेनू भाऊ या व्यक्तिमत्त्वाचा हळूहळू अगदी जवळून परिचय होऊ लागला. एक दिलदार, मैत्री जपणारे कोणालाही झोकून देत मदत करणारे, कोणाचीही पर्वा न करता धडाकेबाज पद्धतीने काम करत जाणारे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना प्रस्थापित नीतीमूल्य जपत आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे असे हे कोणत्याही गैरप्रकाराला आणि भ्रष्टाचाराला थारा न देणारे व्यक्तिमत्व आहे हे मला थोड्याच दिवसात लक्षात आले. हळूहळू प्रत्येक भेटीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलग अलग पैलू मला लक्षात येऊ लागले. पुढल्या काही दिवसातच मी त्यांच्या घरचाच एक होऊन गेलो, इतके त्यांचे माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. आज तीस वर्षानंतरही ते संबंध तसेच जपले गेलेले आहेत.

लोकप्रतिनिधी हा लोकसेवक असावा हे अपेक्षित असते. चैनुभाऊ मात्र खऱ्या अर्थाने लोकसेवक आहेत. मलकापूरला अशोक पंत नामक एक पत्रकार होते. चैनुभाऊंच्या राजकारणात अशोक पंत यांची नेहमीच मदत होत असे. अशोक पंत हृदयविकाराच्या समस्येने त्रस्त झाले होते. भाऊंनी त्यांना मुंबईला नेले. आधी सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले. तरीही पंतांना पुरेसा आराम पडला नव्हता. मग भाऊंनी सरळ त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे करवले आणि तिथे त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करून घेतली. जसलोक मध्ये शस्त्रक्रिया करायची म्हणजे एक महागडे काम होते. अशोक पंत यांची आर्थिक ताकद तेवढी नव्हती. मात्र त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च चैनुभाऊंनी केला होता. एकावेळी मलकापूरहून त्यांची तब्येत बरीच बिघडली असल्यामुळे रेल्वेने त्यांना मुंबईला आणायचे तर चेनुभाऊ स्वतः आपल्या हातावर उचलून त्यांना गाडीत चढवताना मी बघितले. अशोक पंत यांची पूर्ण काळजी घेऊन त्यांना पूर्ण दुरुस्त करूनच मलकापुरात परत आणले होते. अशी मदत त्यांनी अनेकांना केली होती.

१९९५ ते २००१ या काळात मी चैनुभाऊंसोबत राहुन त्यांची प्रसिद्धी यंत्रणा तर हाताळलीच, पण विधानसभेचे देखील कामकाज सांभाळून देत होतो. त्यांच्यामुळे विधिमंडळात काम कसे चालते याबाबत बरीच माहिती मला देखील मिळवता आली. बरेच काही शिकून सुद्धा घेता आले.

चैनूभाऊ एक फर्डे वक्ते आहेत. संचेती मंडळी मुळची मारवाडी, मात्र चैनुभाऊंचे मराठीवर चांगलेच प्रभुत्व आहे. त्याचबरोबर उर्दू शेरोशायरी हा देखील त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणात शेरोशायरी खूप असते. एकदा मुंबईत असताना त्यांच्यासोबत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. तिथे त्यांनी बाळासाहेबांना त्यांच्या सन्मानार्थ एक शेर ऐकवला. तो शेर बाळासाहेबांना इतका आवडला की बाळासाहेबांनी त्यांच्याकडून तो शेर लिहून घेतला होता.

भाषण देताना विनोदी वाक्प्रचार ऐकवणे ही जणू भाऊंची आणखी एक खासियत आहे. मलकापूर मतदार संघात पिण्याच्या पाण्याचा काही गावांमध्ये तुटवडा होता. त्यावेळी या समस्येवर चैनुभाऊंनी बरेच प्रयत्न केले होते. मात्र निष्कर्ष निघत नव्हता. एकदा पुरवणी मागण्या वर चर्चा सुरू असताना चैनुभाऊंनी आपल्या भाषणात “माझ्या मतदारसंघात पिण्याची सोय झाली, पण पाण्याची सोय झाली नाही” असे वाक्य ऐकवले. कोणीतरी विचारले “याचा अर्थ काय?” तेव्हा चैनुभाऊ म्हणाले “अध्यक्ष महाराज मलकापुरात प्रत्येक गावात देशी दारूची दुकाने उघडली आहेत, म्हणजेच पिण्याची सोय झाली आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची सोय सरकारने कुठे केली? पिण्याच्या पाण्याची सोय करा, मग ही पिण्याची सोय सुद्धा बंद करायला आम्ही मागे लागू.” यावर सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये “पिण्याची सोय झाली पण पाण्याची नाही” हीच हेडलाईन होती.

भाषण देताना आणि कोणाशी बोलताना देखील हजरजबाबीपणा ठेबत बाजू सांभाळून घेणे हा चैनुभाऊंचा एक आगळावेगळा गुण मला या काळात लक्षात आला. विधिमंडळात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी साधारणपणे दोन अधिवेशनांच्या मध्ये मृत पावलेले विधिमंडळ सदस्य तसेच देशातील मान्यवर यांच्या श्रद्धांजलीची भाषणे होऊन आणि शोक प्रस्ताव संमत केले जातात. त्यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे विविध शोक प्रस्ताव होते त्यात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचाही शोक प्रस्ताव होता. तसेच चैनुभाऊंच्या मतदारसंघातील माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचाही शोक प्रस्ताव होता. त्या प्रस्तावावर बोलायला भाऊ उभे राहिले. सहाजिकच सर्वच दिवंगतांवर त्यांनी बोलणे आवश्यक होते. त्यामुळे भाऊ कुसुमाग्रजांवरदेखील पाच-सहा वाक्य बोलले. त्यांच्या वाङमयीन योगदानाची त्यांनी आपल्या भाषणात दखल घेतली. एकूणच भाऊ त्या दिवशी छान बोलले होते. त्या दिवशी विधिमंडळातून घरी जाताना कारमध्ये मी भाऊंना बोललो “भाऊ तुम्ही कुसुमाग्रजांवर छान बोललात” त्यावर भाऊंनी देखील हसून प्रतिसाद दिला. थोड्या वेळाने भाऊ हळूच मला म्हणाले “अविनाशभाऊ, मला एक सांगा, खरंच हे कुसुमाग्रज कोण होते?” त्यांच्या या प्रश्नावर मला जोरदार हसू फुटले होते.

एकदा मुंबईत एका पत्रकार मित्राच्या विवाहाच्या स्वागत समारंभ प्रसंगी निमंत्रण असल्यामुळे मी आणि भाऊ दोघेही गेलो होतो. तिथे अचानक ज्येष्ठ पत्रकार नीलाताई उपाध्ये भेटल्या. नीलाताईंचा माझा जुनाच परिचय होता ताईंशी मी बोलत असतानाच अचानक भाऊ तिथे पोहोचले. मी भाऊंचा परिचय करून दिला.” भाऊ या निलाताई उपाध्ये, महाराष्ट्र टाइम्सच्या वरिष्ठ संपादक आहेत. यांचे चित्रपश्चिमा हे सदर एका काळात खूप गाजले होते.” त्यावर भाऊ हसत हसत म्हणाले “ताईंचे सगळेच कॉलम्स मी वाचतो. मला खूप आवडतात. तेवढ्यासाठी मी रोजचा महाराष्ट्र टाइम्स वाचतो” त्यांच्या या बोलण्यावर नीलाताई देखील चांगल्या सुखावल्या. तिथून निघाल्यावर कार मध्ये भाऊंनी मला पुन्हा प्रश्न विचारला “अविनाश भाऊ या ताई कोण होत्या, तुम्ही ओळख करून दिली. मी सुद्धा बोलून मोकळा झालो.” त्यांच्या या प्रश्नावर मला काय उत्तर द्यावे ते क्षणभर सुचलेच नव्हते.

या अशा प्रसंग्रातूनच भाऊंचे वाक्चातुर्य आणि हजरजबाबीपणा दिसून येत होता. हे दोनच प्रसंग नाहीत तर असे अनेक प्रसंग माझ्या लक्षात आहेत. मला आठवते भाऊ विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष झाल्यावर काही कारणाने त्यांना पदभार स्वीकारायला उशीर झाला होता. त्याबाबत माध्यमांनी वेगवेगळ्या चर्चा रंगवल्या होत्या. भाऊंनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिली पत्रपरिषद घेतली. त्यात पत्रकारांनी यांना या मुद्द्यावरून छेडले. तेव्हा भाऊंनी तत्काळ उत्तर दिले.” रात गई बात गई, आता तर मी पदभार स्वीकारला आहे. आता पुढे विदर्भाचा विकास कसा करायचा त्यावर बोलूया ना,” आणि प्रश्न विचारणारे पत्रकार निरुत्तर झाले होते.

चैनुभाऊंची प्रसिद्धी सांभाळता सांभाळतात मुंबईतल्या पत्रकारांशी माझी चांगलीच मैत्री झाली होती. त्यातून मग आम्ही कोल्हापूरला गेलो असताना तिथे दैनिक पुढारीचा नागपूर प्रतिनिधी म्हणून मी माझी नियुक्ती करून घेतली. हे कळतच चैना भाऊंना खूपच आनंद झाला होता. चला “अविनाशभाऊ आता तुम्ही खरेखुरे पत्रकार झाले” अशी त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. त्या निमित्ताने माझे नियमित लेखन सुरू झाले. त्यावर भाऊ म्हणायचे “तुम्ही कलम कसाई आहात”. हळूहळू मग दैनिक पुढारी, दैनिक गावकरी, दैनिक नवशक्ती, दैनिक एकमत, दैनिक कृषीवल अशा विविध वृत्तपत्रातून माझे लेखन सुरू झाले होते.

याच दरम्यान तत्कालीन युती सरकारमधल्या एका मंत्र्याविरोधात नागपुरातून मी दोन-तीन बातम्या लावल्या होत्या. त्या मुंबई नवशक्तीत माझ्या बायलाईनने प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या मंत्र्यांचे भाऊंचे खूप चांगले संबंध होते, आणि माझे आणि भाऊंचे संबंध आहेत हे त्या मंत्र्यांना माहीत होते. माझ्या त्या बातम्या आल्यामुळे ते मंत्री खूपच संतापले आणि भाऊंना फोन करून “तू अविनाशशी संबंध तोडून टाक” असे धमकावले. मात्र त्यांच्या धमकीला भीक न घालता चैनुभाऊंनी माझ्याशी संबंध कायम ठेवले. नंतर हळूहळू त्या मंत्र्याचाही राग गेला आणि त्यांचे माझेही संबंध पूर्ववत झाले होते. त्यालाही चैनुभाऊच कारण ठरले होते.

आपल्या सहकाऱ्यांची पूर्ण काळजी घ्यायची हे भाऊंचे एक वैशिष्ट्य आहे. एकदा काही कामाने आम्ही उभयता मलकापुरात मुक्कामी होतो. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत होते. माझी पत्नी अनुरुपा हिला शेगावला दर्शनाला जाण्याची इच्छा होती. शेगावला जाण्यासाठी गाडी उपलब्ध नव्हती. मग मी तिथेच एका पत्रकाराची स्कूटर घेतली आणि आम्ही दोघेही स्कूटरनेच निघालो. मलकापूरहून निघून आमची स्कूटर नांदुऱ्यापर्यंत पोहोचली होती. अचानक बाजूने जाणारी एक जीप थोडी पुढे जाऊन वळली आणि ती आमच्या बाजूला येऊन थांबली. स्कूटर थांबवून बघितले तर त्या जीपमधून भाऊ उतरले, आणि तुम्ही दोघेही स्कूटरने कुठे निघालात अशी विचारणा केली. आम्ही शेगावला निघालो आहोत, असे सांगताच मग वहिनींना घेऊन स्कूटरने का निघालात? आपल्याकडे इतक्या तर गाड्या आहेत. कोणत्यातरी जीपने जायचे. तेव्हा निवडणुकांमुळे सगळ्या गाड्या व्यस्त आहेत असे मी उत्तर दिले. तर भाऊ लगेच म्हणाले मग मलकापूरहून बसने जायचे. स्कुटरने जायची कसरत कशाला करता? असे रागावत ,आता निघालाच आहात तर सांभाळून जा आणि कुठेही अडचण आली तर लगेच फोन करा, असे सांगूनच ते पुढे निघाले होते. आपल्या सहका-याची काळजी घेण्याचा त्यांचा हा स्वभाव दिसून येत होता.

याच काळात आम्हा उभयतांच्या प्रकृतीच्या काही अडचणी देखील होत्या. चैनुभाऊंना ते कळताच त्यांनी स्वतः मुंबईतील पोतदार आयुर्वेदिक कॉलेजच्या डॉक्टर मंडळींशी संपर्क केला आणि आमच्या उपचाराची सोय करून दिली. त्याचाही सर्व खर्च त्यांनीच उचलला होता. इतके सर्व करून देखील ते आपण काहीही केले नाही असे ते नामानिराळेच असायचे. १९९९ मध्ये मला मुलगी झाली, हे कळतच त्यांना खूप आनंद झाला होता. थोडे दिवसात ते नागपूरला आले, तेव्हा आवर्जून घरी भेटून माझ्या मुलीला बघायला आले होते. नंतर तिच्या बारशाला देखील ते धावत पळत का होईना पण येऊन गेले होते.

त्यांच्या माझ्या संबंधांमध्ये त्यांनी माझी तर अनेक कामे केलीच पण माझे नातेवाईक मित्रमंडळी यांची देखील कामे मी त्यांच्याकडून करवून घेत होतो. माझ्या मराठी लेखनावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्या काळात सर्व पत्रे ते मलाच ड्राफ्ट करायला सांगायचे. मला मराठी लिहिताना अक्षरांवर रेघा न देता तसेच लिहिण्याची सवय आहे. मग मी लिहिलेल्या मजकूरात सर्व अक्षरांवर रेषा देण्याचे काम भाऊ करायचे. तुम्ही लिहिलेल्या शब्दांना मी टोप्या घालतो असे ते विनोदाने म्हणायचे.

२००१ नंतर आई-वडिलांची प्रकृती ठीक राहत नसल्यामुळे मी चैनूभाऊंचे काम थांबवले. अर्थात तरीही आमचे संबंध कायम होते. अधून मधून काहीही अडचण आली की ते फोन करायचे. तसे ते आजही करतातच.

२००१ मध्ये चैनुभाऊंचे काम सोडल्यावर मी २००२ मध्ये रामटेकच्या गडावरून हे नियतकालिक सुरू केले. पहिल्याच अंकात काहीही न विचारताच मी भाऊंची जाहिरात टाकून दिली होती. मात्र भाऊ त्यावर काहीही रागावले नाहीत. ज्यावेळी नागपूरला आल्यावर त्यांनी पहिला अंक बघितला आणि त्यात ती जाहिरात बघितली. त्यावेळी त्यांनी “अविनाशभाऊ याचे किती पैसे द्यायचे?” असे विचारून लगेच पैसे दिले होते. नंतर प्रत्येक अंकात त्यांची जाहिरात असायचीच. म्हणजेच मी जाहिरात टाकून देत असे, आणि नंतर कधीतरी ते एकदम मला सगळ्या जाहिरातींचे पैसे देऊन टाकत असत. हे नियतकालिक मी २०११ पर्यंत चालवले. नंतर ते बंद केले. शेवटपर्यंत त्यांचा जाहिरातींचा पाठिंबा मला होताच. त्याच काळात बरेचदा ते मला नागपुरातून करता येण्याजोगी अनेक छोटी-मोठी कामे सोपवायचेच. मी देखील ती कामे त्यांना करून देत असे.

आपल्या मित्रमंडळींच्या सुखदुःखात धावून जाणे हा भाऊंचा आणखी एक लक्षात ठेवण्याजोगा स्वभाव आहे. २००५ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. नंतर २००६ मध्ये आई केली. दोन्ही वेळा कळल्यावर भाऊ ताबडतोब भेटायला आले होते. दोन्ही वेळी त्यांनी मला शक्य ती आर्थिक मदत देखील देऊ केली होती.

२०१४ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यावेळी देखील भाऊ भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणूनच निवडून आले होते. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटले होते. मात्र ते न मिळाल्यामुळे आम्ही सर्वच मित्र नाराज झालो होतो. मात्र भाऊ काहीही मनात न ठेवता पक्षकार्य आणि विधानसभेतील काम यात व्यस्त झाले होते. २०१८ मध्ये त्यांना विदर्भ वैधानिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करून कॅबिनेट दर्जा देण्यात आला. काही दिवस भाऊ नाराज होते. मात्र थोड्याच दिवसात त्यांनी पदभार स्वीकारायचे ठरवले. ज्यावेळी त्यांनी पदभार स्वीकाराचे ठरवले, त्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री मला फोन आला. “अविनाश भाऊ आज संध्याकाळी साडेपाच पर्यंत महाराष्ट्र एक्सप्रेस ने मी नागपुरात येऊन वैधानिक विकास मंडळात पदभार स्वीकारणार आहे, तुम्ही तिथे जाऊन सर्व संबंधितांना कळवून द्या”. मग दुसऱ्या दिवशी मी लगेच वैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयात गेलो आणि तिथल्या सर्व अधिकाऱ्यांना भेटून भाऊंच्या पदग्रहणाची तयारी केली. त्या दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास भाऊंनी पदभार स्वीकारला. नंतर ते जोवर त्या पदावर होते, तोवर दरवेळी बैठकीसाठी मला बोलावून घेत असत. याच काळात भारत विकास परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी एका कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून त्यांना निमंत्रित केले ते तत्काळ त्या कार्यक्रमात उपस्थित झाले होते. परिणामी तिथले सर्व अधिकारी माझ्याशी देखील सन्मानाने वागायला लागले होते. अर्थात त्यांचे हे पद जेमतेम वर्षभरच टिकले. नंतर सत्ताबदल झाला. विकास मंडळांची मुदत संपत होती. नंतरच्या सरकारने मुदतवाढीसाठी काहीच केले नाही. याच काळात विधानसभेच्या निवडणुका आल्या. दुर्दैवाने यावेळी भाऊ पराभूत झाले. मात्र पराभवाने खचून न जाता ते पक्षकार्यात सक्रिय झाले. दरवेळी नागपूरला आले की आवर्जून फोन करायचे. याच काळात ते अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेवरही गंडांतर आले. तेव्हा देखील अनेक बाबतीत त्यांचा मला हक्काने फोन येत असे आणि मी देखील शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत असे. दरवेळी आले की भाऊ माझी आणि माझ्या कुटुंबीयांची आवर्जून चौकशी करायचे आणि काही अडचण असली तर लगेच मदत करायला ते तयार असायचे.

गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये मी गंभीररित्या आजारी झालो. मला पंधरा दिवस नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ठेवले होते. त्याचवेळी भाऊंना ही बातमी कळवली गेली होती मात्र त्यावेळी ते येऊ शकले नव्हते. घरी आल्यावर देखील मी बेडरिडनच होतो. सप्टेंबर मध्ये एक दिवस त्यांचा फोन आला. राजकीय धावपळीमुळे मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही, मात्र आज मी नागपूरला आलो आहे. मी तुमच्याकडे येतो आहे असे म्हणून ते संध्याकाळी पाचच्या सुमारास आले. जवळजवळ तासभर बसून त्यांनी सर्व चौकशी केली. घरच्यांना धीर दिला. कोणतीही काळजी करू नका, काहीही जरूर लागली तर मला कळवा, मी लगेच व्यवस्था करीन, असे आश्वस्त देखील केले. मला सुद्धा हिम्मत देत तुम्हाला लवकर उभे राहायचे आहे, अजून बरीच कामे तुम्हाला करायची आहेत, तुमची सर्वांनाच गरज आहे, असे ते सांगून गेले. जाताना काही आर्थिक मदत देखील ते देऊन गेले‌ त्यानंतर ते नियमित संपर्कात होते.

नंतर थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका आल्या. या निवडणुकांमध्ये भाऊ मलकापुरातून भाजपचे उमेदवार होतेच. कॉटवर पडल्या पडल्यास मी रोज फोन करून तिथली माहिती घेत होतो आणि तिथल्या मंडळींना काही सूचना देखील देत होतो. सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले आणि भाऊ दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. याचवेळी महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.

भाऊ आता पुन्हा विधिमंडळाच्या कामात सक्रिय झाले आहेत. अधून मधून ते नागपूरला आले की न चुकता भेटतात. माझ्याकडे काही ना काही कामे ते सोपवून जातात. मी या आजारपणामुळे विस्कटलेली आर्थिक घडी बघता त्यांना घरात बसून काही कामे करता आली तर सांगा असे बोललो होतो. त्याचीही नोंद घेत त्यांनी मला कामे कशी मिळतील याचीही व्यवस्था केली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात दररोज आमची भेट होत होती. आताही पुन्हा ते नागपुरात येऊन काही कामांसाठी एकत्र बसू असे सांगून गेले आहेत. ते पुन्हा येतील आणि भेटतील. पुन्हा आमचा सुखद संवाद होईल हे नक्की.

चैनुभाऊ आणि मी तसे समवयस्कच, मात्र ते माझ्यापेक्षा सर्वच दृष्टीने मान्यवर आहेत. मात्र ते म्हणतात “तुम्ही बुद्धिजीवी आहात आणि मला अशी बुद्धीजीवी माणसे जपायची आहेत” त्यामुळेच आमचे मित्र टिकून आहे. हे मैत्री जपण्यासाठी भाऊंचा प्रतिसाद हाच खरा महत्त्वाचा ठरला आहे.

नुकताच त्यांचा बहात्तरावा वाढदिवस झाला. आयुष्यभर त्यांनी नीतीमूल्य जपतच राजकारण केले. म्हणूनच त्यांना नीती मूल्य समितीचे अध्यक्ष केले असावे. त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त भाऊंना खूप खूप शुभेच्छा. त्यांचे लोकसेवेचे काम असेच अविरत सुरू राहील हा मला विश्वास आहे.

Views: 42
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
‘हे’ ब्रिटिश गव्हर्नर होते मराठीचे उत्तम जाणकार…..उमेश काशीकर यांचे मनोगत !!

'हे' ब्रिटिश गव्हर्नर होते मराठीचे उत्तम जाणकार.....उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)