• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!आयुष्यातले सांगाती ४३,डॉ मधुकर आष्टीकर….. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 21, 2025
in Uncategorized
0
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!आयुष्यातले सांगाती ४३,डॉ मधुकर आष्टीकर….. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!आयुष्यातले सांगाती ४३,

डॉ मधुकर आष्टीकर,

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

डॉ. मधुकर आष्टीकर हे संस्कृतचे प्राध्यापक होते, तसेच एक उत्कृष्ट साहित्यिक आणि नाट्यलेखक देखील होते. एक चांगले प्रशासक म्हणूनही ते विख्यात होते. एक फर्डे वक्ते म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्याचबरोबर ते जगन्मित्र देखील होते. त्यांच्या अनेक मित्रांपैकी मी देखील एक होतो.

विशेष म्हणजे मी त्यांच्या तुलनेत वयाने आणि इतर सर्वच बाबीत खूपच लहान होतो. मात्र तरीही त्यांचे माझे स्नेहबंध जुळले. ते फक्त त्यांच्यापुरतेच राहिले नाही, तर त्यांच्या कुटुंबाशी देखील माझे स्नेहबंध जुळले होते.

डॉ. मधुकर आष्टीकर हे नाव मी नेहमीच ऐकून होतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सुरू केले होते. त्यावेळी विविध कार्यक्रमांमध्ये डॉ. आष्टीकर प्रमुख अतिथी किंवा मग सन्माननीय वक्ते म्हणून आलेले दिसायचे. त्यांचे मी फोटो देखील काढले होते. मात्र प्रत्यक्ष बोलण्याचा आणि ओळख होण्याचा योग आला नव्हता. विद्यापीठाच्या राजकारणात देखील ते सक्रिय होते. त्यामुळे विद्यापीठ दीक्षांत समारोहाचे फोटो काढायला गेलो की व्यासपीठावर कार्यकारणी सदस्य किंवा मग अधिष्ठाता म्हणून ते हमखास दिसायचे. मात्र प्रत्यक्ष भेट, परिचय व्हायला तब्बल चार वर्षांचा कालखंड लोटला होता.

महाविद्यालयीन शिक्षण आटोपल्यावर मी नागपूरच्या धरमपेठेत फोटो स्टुडिओ सुरू केला होता. १९७६ पासून मला मुंबई दूरदर्शन ने कंत्राटी पद्धतीवर त्यांचा वृत्त छायाचित्रकार म्हणून नियुक्त केले होते. तेव्हा त्या क्षेत्रातही मी अगदी नवखा होतो. त्याच दरम्यान १९७६ च्या नोव्हेंबर महिन्यात एक दिवस यवतमाळ जिल्ह्यात वणी येथे विदर्भ साहित्य संघातर्फे महिला वैदर्भीय लेखिका संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे वृत्त संकलन करण्यासाठी तुला जायचे आहे असा मुंबई दूरदर्शन कडून मला निरोप मिळाला. कार्यक्रमाला जाण्यासाठी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोहोकर हे वाहनाची सोय करणार असल्याचेही मला कळवण्यात आले. त्यानुसार मग मी डॉ. गोहोकर यांच्याशी संपर्क केला आणि ठरल्यानुसार त्यांच्या निवासस्थानी माझे सामान घेऊन पोहोचलो.

गोहोकर सरांनी वणीला जाण्यासाठी एका मेटाडोर गाडीची सोय केली होती. त्या गाडीत ते आणि मी वगळता साहित्य संघाचे इतर मान्यवर देखील होते. त्यात साहित्य संघाचे त्या वेळेचे अध्यक्ष कवी अनिल, सरचिटणीस बाबुराव देहाडराय, डॉ. मधुकर आष्टीकर, सौभाग्यवती आष्टीकर, विभागीय समाज कल्याण अधिकारी चंद्रकांत ठवकर, आकाशवाणीचे वृत्तसंपादक हरीश कांबळे या सर्वांचा समावेश होता. या सर्वच मंडळींच्या तुलनेत मी वयाने आणि पद प्रतिष्ठेनेही खूपच लहान होतो‌ माझी कुणाशी व्यक्तिगत ओळखही नव्हती. कुलगुरूंच्या बंगल्यावरून गाडी वर्धा मार्गाने वणीच्या दिशेला निघाली, तशा या खाशा मंडळींच्या गप्पा सुरू झाल्या. मी मागे बसून शांतपणे गप्पा ऐकत होतो. मधुकर आष्टीकर विनोदी लेखक म्हणून चांगलेच प्रसिद्ध होते. गप्पांमध्ये सुद्धा त्यांचा विनोदी स्वभाव सहज लक्षात येत होता. रस्त्याने गाडी पुढे जात असताना एका ठिकाणी गाडी थोडी संथ झाली. तेवढ्यात रस्त्याच्या काठाला बसलेल्या काही ग्रामीण मंडळींनी हात दाखवला‌. त्यांना जवळपासच कुठेतरी जायचे असावे आणि एसटी न आल्यामुळे त्यांनी आमच्या गाडीला हात दाखवला असावा. लगेचच डॉ. आष्टीकरांचा विनोदी स्वभाव जागा झाला. बाजूलाच बसलेल्या चंद्रकांत ठावकरांना ते हसत हसत म्हणाले, “घ्यायच्या का शिटा, बगीच्यात बसवून घेऊ, आपल्या चहा पाण्याची सोय होऊन जाईल.” त्यावर ठवकर देखील तितक्याच विनोदाने म्हणाले “घेऊन टाकू, चहापाणीच काय नाश्ता पण निघेल” आणि दोघेही कळाळून हसले होते. (विदर्भात जीप मेटाडोर किंवा तत्सम वाहनांमध्ये मागच्या बाजूची जी मोकळी जागा असते तिथे खाली बसणाऱ्यांना बगीच्यात बसणारे असे म्हटले जाते)

इतक्यात कोणाचे तरी माझ्याकडे लक्ष गेले. मग त्यांनी चौकशी केली की हे कोण तेव्हा डॉ. गोहोकरांनीच माझी ओळख करून दिली, आणि त्याचबरोबर मला देखील सर्वांची ओळख करून दिली. त्यावेळी मला डॉ. आष्टीकरांचे टोपण नाव भाऊसाहेब हे आहे असे कळले.

वर्धा मार्गाने पुढे जाताना जांब येथे आम्ही सर्वजण चहा घेण्यासाठी थांबलो. तिथे खाली उतरल्यावर भाऊसाहेबांनी माझी अजून सविस्तर चौकशी केली. त्यावेळी आमचेच एक कौटुंबिक स्नेही मांडवगणे भाऊ साहेबांच्याच घरासमोर राहायचे. तिथे मी बरेचदा जात असे. बोलण्याच्या ओघात आधी कोणकोणत्या कार्यक्रमात मी भाऊसाहेबांना बघितले होते, तो संदर्भ दिला, आणि मांडवगणेंकडे मी नेहमीच येतो असे सांगितले. तेव्हा आता मग आमच्याकडे येत चला असा आग्रह त्यांनी केला. वणीला जाताना रस्त्यात काही भाग कच्चा रस्ता होता. त्यामुळे आमची गाडी खूप संथ चालू होती. तेव्हा बाबुराव देहाडराय यांनी शंका काढली. “आपण कार्यक्रम सुरू होईपर्यंत पोहोचू ना”. त्यावेळी लगेच डॉ. गोहोकर लगेच म्हणाले, “काळजी नको, कार्यक्रमासाठी लागणारे हार आपल्याच गाडीत आहेत, त्यामुळे आपण पोहोचेपर्यंत कार्यक्रम सुरू होणार नाही.” लगेचच भाऊसाहेब म्हणाले, ” आता हार आपल्याजवळ आहे, म्हणजे त्यांची हार आहे आणि आपली जीत आहे.” त्यावर गाडीत चांगलाच हशा पिकला होता.

नंतरचे दोन दिवस आम्ही सोबतच होतो. अधून मधून कार्यक्रमाच्या धावपळीतून भेट झाली की भाऊसाहेब आवर्जून चौकशी करायचे. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तोवर सगळ्यांशीच चांगला परिचय झाला होता. नागपूरला पोहोचल्यावर निरोप घेताना भाऊसाहेबांनी पुन्हा आमच्याकडे येत चला असा आग्रह देखील केला होता.

त्यानंतर अधून मधून कार्यक्रमात माझी आणि भाऊसाहेबांची भेट होऊ लागली. या कार्यक्रमानंतर सुमारे तीन महिन्यांनी भंडारा येथे महाराष्ट्र ग्रंथालय परिषदेचे अधिवेशन होते. या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री येणार होते. मात्र नेमक्या त्याच वेळी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे या सर्व खाशा मंडळींचे दौरे रद्द झाले. ऐनवेळी ज्येष्ठ साहित्यिक म्हणून भाऊसाहेबांना उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वृत्तसंकलनासाठी मी भंडार्याला गेलो होतो. तिथे दिवसभर मी भाऊसाहेबांसोबत होतो. त्या दिवशी भाऊसाहेबांनी सर्व ग्रंथालयीन कार्यकर्त्यांसमोर जे भाषण दिले ते अप्रतिम होते. उद्घाटन समारंभ संपल्यावर मी आवर्जून भाऊसाहेबांना भेटलो आणि भाषण आवडल्याबद्दल माझी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी मग थोडा वेळ आमच्या चांगल्या गप्पा देखील रंगल्या होत्या.

एप्रिल १९७७ मध्ये विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुका झाल्या. त्यात यावेळी भाऊसाहेब आष्टीकर हे विदर्भ संघाचे अध्यक्ष म्हणून विजयी झाले. त्या काळात विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष हे एक मानाचेच पद होते. तिथे साधारणपणे मोठा साहित्यिकच अध्यक्ष म्हणून विराजमान होत असे. त्या पदावर भाऊसाहेब अध्यक्ष म्हणून विराजमान झाले. त्याच वेळी मी दूरदर्शनसाठी शिवाजी जयंतीचे वृत्त चित्रण करायचे म्हणून विदर्भ साहित्य संघात गेलो होतो. तेव्हा नुकतेच अध्यक्ष झालेल्या भाऊसाहेबांचा माझी पुन्हा एकदा भेट झाली होती. अध्यक्ष झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले, तेव्हा आता मला तुझे वारंवार सहकार्य हवे आहे, असे सांगून तू देखील साहित्य संघात सदस्य म्हणून सक्रिय हो असा त्यांनी आग्रह देखील धरला होता.

नंतर एक दिवस भाऊसाहेब अचानक माझ्या धरमपेठ येथील स्टुडिओत येऊन पोहोचले. इकडून चाललो होतो. म्हणून सहज तुला भेटायला आलो, असे सांगून थोडावेळ गप्पा मारत ते बसले. त्यावेळी आता तू तुझ्या छायाचित्रांचे विदर्भ साहित्य संघात प्रदर्शन आयोजित कर, मी तुला कलादालन उपलब्ध करून देतो, तसेच विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर मी आहे, विद्यापीठात सुद्धा तुला नवा व्यवसाय हवा असेल तर तिथे ये मी तुला मदत करतो, अशी ऑफर सुद्धा त्यांनी मला दिली होती. त्यानंतर दरवर्षी दुकानातील लक्ष्मीपूजनाच्या पूजेला ते आवर्जून येत असत.

सुमारे वर्षभरानंतर एक दिवस त्यांचा मला घरी फोन आला. त्यांच्या मुलीचे डोहाळजेवण आयोजित करण्यात आले होते. त्याचे फोटो काढायला तू ये असे त्यांनी मला सांगितले. मी जाऊन फोटो देखील काढून दिले. नंतर फोटो त्यांच्याकडे पोहोचवून दिल्यावर त्यांनी लगेचच याचे बिल किती झाले असे विचार तत्काळ चेक देखील दिला होता. मग त्यांनी पुढे काही दिवसांनी त्यांच्या नातीचे फोटो काढायला देखील मला आवर्जून बोलावले होते.

सुमारे वर्षभराने काही कामाने मी दिल्लीला जाणार होतो. त्यावेळी भाऊसाहेबांची भेट झाली तू जातोच आहेस तर तिथे माझी मुलगी श्यामा हिला जाऊन भेट असे त्यांनी सुचवले. त्यानुसार मग मी दिल्लीत त्यांची मुलगी श्यामला खोत हिच्या घरी जाऊन भेटूनही आलो‌. परत आल्यावर भाऊसाहेबांच्या घरी जाऊन तिथला सर्व वृत्तांत देखील कळवला होता.

१९८० च्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुका खूप अटीतटीच्या झाल्या होत्या. त्यात भाऊसाहेबांची लढत शिरीष गोपाळ देशपांडे नामक तरुण साहित्यिकाशी झाली होती. त्या निवडणुकीत साहित्य संघाचा सदस्य या नात्याने मी भाऊसाहेबांच्या प्रचारात देखील उतरलो होतो. त्या काळात त्यांचे आणि माझे खूपच चांगले संबंध आले होते.

१९८० च्या सुरुवातीला भाऊसाहेब विदर्भ साहित्य संघासोबतच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष देखील झाले होते. लगेचच विधानसभेच्या निवडणुका आल्या होत्या. त्यावेळी काही मान्यवर साहित्यिकांचे मतदान करतानाचे चित्रीकरण दूरदर्शन ला पाठवावे असे कळवण्यात आले होते. मग मी भाऊसाहेबांना फोन केला आणि नागपूरच्या शंकर नगर शाळेत मतदान करताना त्यांचे चित्रीकरण दूरदर्शन ला पाठवले होते.

१९८३ मध्ये विदर्भ साहित्य संघाच्या झालेल्या निवडणुकीत काही हितसंबंधीयांनी भाऊसाहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी साहित्य संघात निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला. याच काळात ते नागपूरच्या समाजविज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाले होते. तिथे ते व्यस्त झाल्यामुळे आमच्या भेटीगाठी बऱ्याच कमी झाल्या. मग कधीमधी एखाद्या कार्यक्रमात त्यांची भेट होत असे. त्यावेळी आवर्जून ते चौकशी करायचे.

१९८८-८९ च्या दरम्यान भाऊसाहेब आपल्या पदावरून निवृत्त झाले. दरम्यान त्यांनी अंबाझरी लेआउट मध्ये स्वतःचे घर बांधले होते. नव्या घरातच ते निवृत्तीनंतर राहायला आले. त्याच दरम्यान मी दूरदर्शनसाठी वृत्त कार्यक्रम निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी धडपडत होतो. दूरदर्शनला विविध कार्यक्रमांचे प्रस्ताव देण्यासाठी सुद्धा माझी धावपळ सुरू होती. निवृत्तीनंतर एक दिवस अचानक भाऊसाहेब घरी आले आणि माझ्या नव्या प्रकल्पाबद्दल त्यांनी पूर्ण चौकशी केली. मग विविध कार्यक्रम कसे करता येतील या विषयावर त्यांची माझी चर्चा देखील झाली. तुला लागेल ती मदत मी देतो, तू प्रयत्न करत रहा असे त्यांनी मला आश्वस्त केले होते.

याच प्रकल्पांतर्गत मी नागपूर विदर्भात नवे कलावंत शोधून त्यांना दूरदर्शन निर्मितीच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याची छोटी छोटी शिबिरे मी आयोजित करीत असे. भाऊसाहेबांनी या प्रकल्पाला खूप उत्तेजन दिले. प्रत्येक शिबिरात ते आवर्जून हजेरी लावत असत. अशा प्रकारे छोटी शिबिरे घेण्यापेक्षा तीन-तीन महिन्यांचे छोटे अभ्यासक्रम तयार करून त्यांचे आयोजन करावे असे त्यांनी सुचवले. त्यासाठी राज्य शासनाचे तांत्रिक शिक्षण मंडळ आणि नागपूर विद्यापीठ इथे देखील त्यांनी माझ्यासाठी पाठपुरावा केला होता. यातल्याच एका शिबिराला आम्ही नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. पी एल भांडारकर यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी भाऊसाहेब स्वतः आले आणि त्यांनी भांडारकरांशी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांना विद्यापीठ कशाप्रकारे मान्यता देऊ शकेल या विषयावर चर्चाही केली होती. तसेच विद्यापीठाचा तत्कालीन कार्यकारणी सदस्य असलेल्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्यासोबत देखील भाऊसाहेबांनी चर्चा केली होती.

याच दरम्यान भाऊसाहेबांचा नागपूर जवळ कुठेतरी मुलीसाठी शेती विकत घेण्याचा विचार होता. एक दिवस ते माझ्याकडे आले आणि तुझ्या संपर्कात कोणी असे असेल तर सांग, असे त्यांनी सुचवले. योगायोगाने माझे वडील निवृत्तीनंतर जमिनीच्या व्यवहारातच सक्रिय होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असे अनेक जण होते. त्यातूनच भाऊसाहेबांनी मग नागपूरनजीक असलेल्या शिवणगाव येथे तीन एकर शेती घेतली होती. त्या व्यवहारात आमच्या नियमित भेटी होत होत्या.

शेती घेतली खरी, पण तिथे समस्या बऱ्याच होत्या. मग बरेचदा भाऊसाहेब माझ्याकडे यायचे आणि मला शिवणगावला घेऊन जायचे. मी देखील त्यांच्या समस्या जितक्या जास्तीत जास्त सोडवता येतील तितक्या सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या शेतीत त्यांनी काही पिके घ्यायला देखील सुरुवात केली. मात्र त्यांचे वय आणि त्यांच्या मागच्या व्यस्तता लक्षात घेता त्यांना तिथे लक्ष घालणे फारसे जमत नव्हते.

निवृत्त झाल्यावरही महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर भाऊसाहेब अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. त्यामुळे त्यांना सतत मुंबई आणि पुण्याला प्रवास करावा लागत असे. आठवड्यातले चार ते पाच दिवस तरी ते बाहेरच असायचे. त्यामुळे शेतीकडे लक्ष देणे जमत नव्हते. शेवटी तिथलाच एक काळजी वाहणारा माणूस त्यांना गाठून दिला आणि तो शेतीचे व्यवहार बघू लागला. अर्थात त्यातून उत्पन्न फारसे होत नव्हते. मात्र शेती करण्याची हौस पूर्ण होत होती. वस्तूतः भाऊसाहेबांच्या मुलीचा शामला खोत यांचा पुढे जाऊन तिथे फार्म हाऊस बांधण्याचा विचार होता. मात्र त्यांचे दिल्लीतील व्याप आणि इकडे भाऊसाहेबांचे सर्व व्याप हे बघता या सर्व गोष्टी शक्य होत नव्हते तरीही अधून मधून ते माझ्याकडे यायचे आणि आम्ही शिवणगावला जाऊन शेतीचा हालचाल पाहून येत असू.

हे सर्व व्याप सांभाळतानाच त्यांचे नाट्यलेखन आणि साहित्य लेखन हे सुरूच होते. त्यांनी लिहिलेल्या एका ग्रंथाचे प्रकाशन दिल्लीत राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांचे हस्ते व्हायचे होते. त्यावेळी मी देखील त्या कार्यक्रमाला चालावे असा भाऊसाहेबांचा आग्रह होता. मात्र माझ्या व्यावसायिक अडचणीमुळे ते मला शक्य झाले नव्हते.

याच काळात नागपुरातून मी एखादा दिवाळी अंक काढावा असेही त्यांनी मला सुचवले होते. त्यानुसार दिवाळी अंकाचे नाव आम्ही रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स कडून रजिस्टर देखील करून घेतले होते. मग भाऊसाहेबांच्याच मार्गदर्शनात आम्ही त्याचे नियोजन देखील केले. मात्र तो प्रकल्प त्यावेळी पुढे गेला नाही. मात्र भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी मी तो प्रकल्प पुढे नेला आणि तब्बल आठ वर्ष दिवाळी अंक प्रकाशित केला.हा दिवाळी अंक दरवर्षी पुरस्कार विजेता ठरत होता.

दूरदर्शन साठी नव्या मालिका तयार करायच्या म्हणून दूरदर्शनने काही प्रस्ताव मागवले होते. ते कळताच भाऊसाहेबांनी मला तू देखील काही प्रस्ताव पाठव असे सुचवले. मग धडपड करून भाऊसाहेबांच्याच मार्गदर्शनात मी तब्बल सात मालिकांचे प्रस्ताव पाठवले होते. त्यात एका मालिकेचे लेखन स्वतः भाऊसाहेबांनी देखील केले होते. त्या मालिका दूरदर्शनमध्ये स्तिकृत देखील झाल्या. मात्र प्रसारणासाठी लावून घेण्याकरिता तिथे त्या काळात जे काही भ्रष्टाचार चालत होते, तिथे आम्ही दोघेही कमी पडलो. परिणामी ते प्रस्ताव देखील बारगळले होते. भाऊसाहेबांनी लिहिलेल्या कथानकांवर चित्रपट काढण्याचा काही निर्मात्यांचा विचार होता. त्या दृष्टीने त्या काळात माझ्या दूरदर्शनच्या संबंधातून परिचित असलेल्या स्मिता तळवलकर आणि सविता प्रभुणे या अभिनेत्रींना सुद्धा आम्ही एक दोनदा भेटल्याचे मला आठवते.

माझे हे विविध प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकले नाहीत‌ परिणामी आता काय करायचे या विवंचनेत मी होतो. अचानक बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या एका राजकीय मित्राच्या निवडणुकीचे प्रसिद्धी संचालन करण्याची मला संधी मिळाली. मग त्याच कामात मी व्यस्त झालो. त्यादरम्यान भाऊसाहेब अधून मधून काय चाललंय ते चौकशी करायचे. गमतीत ते म्हणायचे की माझ्या करिता तूच निवडणुकीला उभा आहेस, इतका तू या कामात व्यस्त झाला आहेस. मी देखील हसून प्रतिसाद देत असे.

१९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेशी जवळीक असणारे विद्याधर गोखले यांची नियुक्ती झाली. मात्र थोड्याच दिवसात विद्याधर गोखलेंचे निधन झाले. त्यामुळे मग रिक्त झालेल्या जागी भाऊसाहेबांची नियुक्ती झाली. माझ्या ज्या राजकीय मित्राच्या निवडणुकीचे प्रसिद्धी संचालन मी केले होते, त्याच मित्राने निवडणुका आटोपल्यावर विजयी झाल्यामुळे मला त्याच्यासोबत विधानसभेचे कामकाज आणि प्रसिद्धी यंत्रणा सांभाळणे यासाठी सोबत ठेवून घेतले होते. मग माझे वारंवार मुंबईला जाणे होत असे. साहित्य संस्कृती मंडळाचे मुख्य कार्यालय देखील मुंबईतच होते. मग मुंबईत वारंवार भाऊसाहेबांच्या भेटी होऊ लागल्या.

साहित्य संस्कृती मंडळातर्फे फार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील प्राचीन देवळांवर डॉक्युमेंटरी बनवण्याचा एक प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र तो नंतर थंड्या बसत्यात पडला होता, याची मला कल्पना होती. माझ्या आमदार मित्राकडून तो प्रकल्प पुन्हा पुनरुज्जीवीत करता आला तर करावा आणि त्यातून आपल्याला चांगले अर्थार्जन करता आले तर करावे, या हेतूने मी एक प्रस्ताव तयार केला आणि आमदार मित्राच्या सहीनेच तो तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांना दिला. नवलकरांना देखील ती कल्पना खूप आवडली. त्यांनी लगेचच पत्रावर शेरा लिहिला योजना अतिशय चांगली यावर कार्यवाही व्हावी आणि ते पत्र भाऊसाहेबांकडे रवाना केले.

आठवडाभरानेच मुंबईला मंत्रालयासमोरच भाऊसाहेबांची भेट झाली. त्यांनी कधी आलास कधीपर्यंत मुक्काम आहे अशी चौकशी करत करतच मग हळूच काय म्हणतात तुझे आमदार मित्र अशी असा मिश्किल प्रश्न विचारला. माझ्या लक्षात आले, मजेत आहेत असे मी उत्तर दिले. मग भाऊसाहेब सांगू लागले. त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्यात तुझी बरीच तारीफ केली आहे, तुझ्याकडून काही डॉक्युमेंटरी फिल्म्स करून घ्याव्या असे मला सुचवले आहे. माझ्या सर्व प्रकार लक्षात आला. मग भाऊसाहेबच मला म्हणाले एकदा आमदार साहेबांशी आपण बोलू आणि मग प्रकल्प पुढे कसा नेता येईल ते बघू.

त्यानुसार मग दुसऱ्याच दिवशी भाऊसाहेबांची आणि माझ्या आमदार मित्रांची मी भेट घालून दिली. थोडीफार चर्चा झाली नंतर एक दोन दिवसातच आम्ही दुपारी एका ठिकाणी भोजनाला सोबत गेलो. तिथे पुन्हा सविस्तर चर्चा झाली. भाऊसाहेबांनी प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे पाठवावा त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी असे आमदार मित्राने सांगितल्यामुळे भाऊसाहेब देखील कामाला लागले.

मग मी देखील अधून मधून भाऊसाहेबांना भेटत होतो. कधी त्यांच्या कार्यालयात, तर कधी मनोरा या शासकीय विश्रामगृहात असलेल्या त्यांच्या सदनिकेत. असाच एक दिवस रात्री त्यांच्या निवासस्थानी गेलो असताना भाऊसाहेबांनी चौकशी केली. तू परत कधी जातोयस, मी दुसऱ्याच दिवशी निघणार होतो. तसे त्यांना सांगताच ते म्हणाले तू घरी जाऊन आमच्या सौभाग्यवतींना सांगशील, इथे सर्व ठीक आहे. नाहीतर त्या काळजी करत बसतील. मी होकार दिला आणि तिथून निघालो.

नागपुरात आल्यावर आष्टीकरांच्या घरी जायचे असे ठरवले. मात्र कामाच्या व्यापात ते राहून गेले. एक चार-पाच दिवस असेच गेले आणि एक दिवस रात्री घरी गेलो असता मला दिनकरराव देशपांडे यांचा फोन आल्याचा निरोप मिळाला. मी लगेच दिनकररावांना फोन केला, तेव्हा त्यांनी विचारले आष्टीकरांबद्दल कळले का? का, काय झाले असा प्रश्न मी विचारताच मला उत्तर मिळाले ते आज दुपारी मुंबईत अचानक वारले. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव नागपुरात येत आहे, आणि मग अंत्यसंस्कार होतील. माझ्यासाठी हा धक्काच होता. साहित्य संस्कृती मंडळाच्या कार्यालयातून निघून दुपारी जेवायला जात असताना अचानक रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली होती.

दुसऱ्या दिवशी त्यांचे पार्थिव नागपुरात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले नागपुरातील आणि नागपुराबाहेरीलही त्यांचे असंख्य चाहते बघता हा माणूस किती मोठा होता हे लक्षात येत होते. एक साहित्यिक आणि नाटककार म्हणून त्यांची ख्याती होतीच, पण ते जगनमित्र देखील होते. त्यामुळेच त्यांच्या अंत्यसंस्काराला जवळजवळ सगळे शहरच लोटले होते.

भाऊसाहेबांना जाऊन आज २६ वर्ष लोटलेली आहेत. मात्र त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. आता त्यांच्या नागपूरच्या घरात कोणीही नाही. आष्टीकर काकू मुंबईला दिल्लीला मुलीकडेच रहायला गेल्याचे काही वर्षांपूर्वीच कळले. त्यामुळे आता इथे त्यांच्या संपर्कातले कोणीही नाही. मात्र त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ते माझ्या तुलनेत सर्वार्थाने मान्यवरच होते. तरीही त्यांनी माझ्यासोबत आलेले संबंध जपले आणि ते वृद्धिंगत देखील केले, हे मी माझे भाग्यच समजतो.

Views: 30
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

साहित्यिक, समाजसेवक, माजी नसरसेवक व सेवा निवृत्त शिक्षक व कवी असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले शांताराम निकम यांचे मनोगत.... सॅल्युट दिलीप मालवणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)