‘शिरपुर तालुक्यातील वांगे पिकाला भावाची झळाळी.’
‘अंतुली परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला लागतोय हातभार.’
‘मोठ्या शहरात मागणी वाढली. प्रती किलोला ४० रुपयाचे दर.’
त-हाडी : तालुक्यातील अंतुली परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक जरी कपाशी असले तरी कपाशी या पिकावर वाढता रोगाचा प्रादुर्भाव सोबतच उत्पादन खर्चाच्या मानाने मिळत नसलेले भाव यामुळे या परिसरातील भरपूर शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात झटपट नका मिळवून देणाऱ्या हिरवे वांगे या पिकाला खरीप हंगामात पसंती दिली परंतु सुरुवातीला योग्य दर मिळत नव्हते, परंतु आता पिकाच्या उत्तरार्धात भावाची किनार लाभल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीला त्याचा हातभार लागत आहे. सद्या या पिकाला प्रती पन्नी ६०० रुपये म्हणजेच जवळपास प्रती किलोला ४० रुपयाचे दर मिळत असल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.
अंतुली परिसरातील वरुळ ,लोढरे, जवखेडा व त-हाडी ,भटाणे या गावातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या उत्तरार्धात या पिकाची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आपल्या आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर केला आहे.आजरोजी या भागातील बऱ्यापैकी वांगे(भरिताचे) वेगवेगळ्या मार्केटमध्ये रोज ते पण जागेवरून खरेदी करून रवाना होत आहेत..यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून बाजारभाव व इतर वेगवेगळ्या माहितीसाठी संवादाचे दालन उभे केले आहे.
एकप्रकारे वांगे पिकाचा हब येथे गेल्या दोन वर्षांपासून तयार झाल्याने त्यातून शेतकरी प्रगती साधत असतांनाच नंदुरबार व जळगाव सारख्या महानगरात हे वांगे विकल्या जात असल्यामुळे तेथील ग्राहकांना न्यारीच चव त्यातून मिळत आहे.
मध्ये प्रदेश आणि खान्देशच्या सीमेवर मोडणाऱ्या शिरपूर तालुक्याच्या अंतुली परिसरातील या गावांना कॉटनबेल्टची किनार लाभली आहे.परंतु ते पीक सद्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे आपला कल ओढविला आहे.गेल्या २/३ वर्षांपासून येथील काही शेतकऱ्यांनी वांगे पिकाला प्राधान्य दिले आहे.
अंकुर सिड्सचे विनायक या वाणाची यासाठी निवड केली जात असून एका एकरात लाखो रुपयांचे उत्पादन यातून घेतले जात आहे.वांगे(हिरवे)या पिकाची लागवड १५ मे नंतर हे शेतकरी करत असून ठिबकसिंचनवर ४ बाय २ च्या ओळीवर याची लागवड करून योग्य वेळी फवारणी व खताची मात्रा देऊन एका एकरात लाखोंचे उत्पादन यातून घेतले जात आहे.अंतुली येथील जवळपास शेतकऱ्यांच्या शेतात भरिताचे हिरवे वांगे पेरलेले असून हे वांगे इतर राज्यातील भिलाई, हैद्राबाद,कलकत्ता तसेच जवळपासच्या नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात विक्रीला जात आहेत.हा माल जास्त राहत असल्यामुळे दुरदूरचे व्यापारी जागेवरूनच वांग्याची खरेदी करतात.या पिकाला काही दिवसापूर्वी नगण्य भाव मिळत असल्याने रब्बीसाठी काही शेतकऱ्यांनी हे पीक उपटून टाकले खरे पण ज्यांचे पीक अजूनही शेतात कायम आहे. त्यांना आजरोजी ४० रु प्रति किलो प्रमाणे भाव मिळत असल्याने त्यांची चांदी होत आहे.
;
प्रतिक्रिया ;
‘मी गेल्या तीन चार वर्षांपासून या पिकाची लागवड करत असून यावर्षी नेहमीप्रमाणे दोन एकर क्षेत्रात हे पीक घेतले आहे.सुरुवातीला या पिकाला अतिशय कमी भाव होते.त्यामुळे लावलेला खर्च निघणार की नाही असे वाटत असतांना आजरोजी भावाला किनार लाभल्याने या पिकाचा बऱ्यापैकी पैसा होत आहे.’
- रोहीत कोळी शेतकरी, अंतुली


