• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ४५,डॉ. प्रफुल्ल मोकद्दम,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
January 2, 2026
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती ४५,डॉ. प्रफुल्ल मोकद्दम,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ४५,डॉ. प्रफुल्ल मोकद्दम,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.रोटरी इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून जगभरात ही एक सामाजिक चळवळ म्हणून सक्रिय आहे.

यात जगभरातील मान्यवर सहभागी झालेले दिसतात. आयुष्यातल्या एका टप्प्यावर काही काळ मी रोटरी चळवळीत देखील सक्रिय राहिलेलो आहे. नंतर काही कारणांनी मी या चळवळीत भलेही रमलेलो नाही, तरीही या चळवळीने मला अनेक चांगले स्नेही दिलेले आहेत. हे स्नेही समाजातल्या सर्वच स्तरातील आणि विविध व्यवसाय क्षेत्रातील आणि विविध वयोगटातील असे राहिलेले आहेत.

त्यातीलच एक स्नेही म्हणजे डॉक्टर प्रफुल्ल मोकद्दम.डॉक्टर प्रफुल्ल मोकद्दम हे मध्य भारतातील एक आघाडीचे निष्णात नेत्र शल्य चिकित्सक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही सर्वश्रुत आहेत. माझ्यापेक्षा वयाने ते किमान दहा वर्षांनी तरी ज्येष्ठ आहेत. तरीही रोटरी चळवळीतूनच त्यांचा माझा परिचय झाला आणि आमचे मैत्र जमले. आजही ते मैत्र टिकून आहे. मध्य भारतातील आघाडीचे नेत्रशल्यचिकित्सक म्हणून डॉक्टर मोकदमांचे नाव मी ऐकून होतो. रामदास पेठेच्या सेंट्रल बाजार रोडवरून लोकमत चौकाकडे जाताना डाव्या हाताला त्यांचे मोठे अंजनी नेत्रचिकित्सालय येता-जाता बघायचो. मात्र प्रत्यक्ष परिचय नव्हता.

हा परिचयाचा योग आला जुलै २०१० मध्ये. एक दिवस अचानक माझे दुसरे एक स्नेही डॉ. अशोक पाठक माझ्याकडे आले आणि दोन दिवसांनी नागपूरात एका नव्या रोटरी क्लबचे उद्घाटन आणि पदग्रहण समारंभ होत असून तिथे माझा पाहुणा म्हणून मी तुला निमंत्रित करीत आहे, तेव्हा तू अवश्य ये असा त्यांनी मला आग्रह केला. त्यांच्या आग्रहाला मान देऊन मी हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये झालेल्या त्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो. कार्यक्रमाचे प्रमुख तिथे अतिथी त्यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल म्हणजेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. प्रफुल्ल मोकद्दम हे होते.

ज्यावेळी रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रो नामक त्या नव्या क्लब मध्ये काही नवे सदस्य घेण्याची घोषणा झाली आणि एकेका सदस्याला व्यासपीठावर बोलावले जाऊ लागले. त्यावेळी अचानक माझे नाव पुकारले गेले. मी एकदमच आश्चर्यचकित झालो. मी माझ्या जागेवर उभा राहून तेथूनच डॉ. अशोक पाठक यांना खुणेनेच हा काय प्रकार आहे असे विचारले. तेव्हा त्यांनी खुणेनेच मला तू लगेच व्यासपीठावर ये असे सुचवले. नाइलाजाने मी व्यासपीठावर गेलो. तेव्हा डॉ. मोकद्दमांनी मला रोटरीची पिन लावून देत माझ्या हातात रोटरीचा मानच सदस्य झाल्याचे प्रमाणपत्र दिले आणि विचारले “मेंबर व्हायला मागेपुढे बघत होतास का?” तेव्हा मी लगेच उत्तर दिले “मला काहीही कल्पना नसताना माझे नाव पुकारले गेल्यामुळे मी काय करावे या संभ्रमात होतो”. त्यावर ते चांगलेच हसले आणि माझ्याशी हात मिळवत “आता रोटरीत आला आहेस तेव्हा इथे चांगला सक्रिय हो “असे त्यांनी सांगितले होते. पदग्रहण समारंभ संपल्यावर स्नेहभोजनाच्या वेळेस देखील मग डॉ. मोकद्दमांशी माझा चांगला परिचय करून दिला गेला.

त्यावेळी मी पत्रकार आहे हे कळल्यावर त्यांनी अधिक आस्थेने मी कुठल्या वृत्तपत्रासाठी लेखन करतो इत्यादी माहिती देखील विचारली होती. आता आपण नियमित भेटूया असे सांगून त्या दिवशी आम्ही निरोप घेतला होता. त्यानंतर अधून मधून रोटरीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची माझी भेट होऊ लागली. त्या काळात दिवाळीच्या दरम्यान मी माझी दिवंगत आई सुमतीबाई पाठक हिच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीताचे कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करीत असे.

त्यावर्षी आम्ही तीन दिवसांचा संगीत महोत्सव आयोजित केला होता. त्याच्या उद्घाटनाला कोणाला बोलवावे असा विचार आला तेव्हा डॉ. मोकद्दम असे नाव आठवले. मग त्यांना फोन करून मी त्यांच्या रामदास पेठेतल्या घरी त्यांना भेटायला गेलो, आणि त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी ते आनंदाने स्वीकारले. ठरल्यानुसार उद्घाटनाच्या दिवशी सकाळी सहा वाजता ते कार्यक्रम स्थळी हजर होते. त्यांच्याच हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. पंडित भीमसेन जोशींचे शिष्य पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाचा त्यादिवशी कार्यक्रमा आयोजित केला होता. डॉ. मोकदम संपूर्ण कार्यक्रमात शेवटपर्यंत बसले आणि कार्यक्रमाचा आनंद घेतला. उरले दोन दिवस देखील ते आवर्जून कार्यक्रमाला येत राहिले होते. नंतर दोनच महिन्यांनी सुराबर्डी येथे रोटरीची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. तिथे डॉ. मोकद्दम आणि माझी भेट झाली. तेव्हा भेटल्याबरोबर आता नवीन संगीताचे कार्यक्रम कधी आयोजित करणार म्हणून त्यांनी मला विचारले होते.

त्यावेळेसच संगीत हा माझा वीक पॉईंट आहे, त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित करणारे माझे चांगले मित्र होतात, असेही त्यांनी मला आवर्जून सांगितले होते. नंतर चारच महिन्यांनी एप्रिल २०११ मध्ये माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यांचा प्रकाशन समारंभ आमच्या रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रोनेच आयोजित केला होता. त्याचे निमंत्रण देण्यासाठी मी डॉ. मोकद्दमांकडे गेलो असता आपण हैदराबादला असल्यामुळे येऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले. मात्र मी पुस्तके लिहिली आहेत हे कळल्यावर त्यांना विशेष आनंद झालेला दिसला. त्यावेळेसच त्यांनी माझी कोण कोणती आणि किती पुस्तके प्रकाशित झाली आहेत याची आवर्जून चौकशी केली होती. जून २०११ मध्ये डॉ. मोकद्दमांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून टर्म संपली. मात्र आमच्या रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रोच्या २०११-१२ च्या पदग्रहण समारंभाला ते आवर्जून आले होते. त्यानंतर अधून मधून भेटी होतच राहिल्या. भेट झाली की मी रोटरीत कितपत सक्रिय झालो आहे याची ते आवर्जून चौकशी करायचे. त्या वर्षी आमच्या क्लबच्या माध्यमातून मी एका शाळेत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी इंटरॅक्ट क्लब सुरू केला आणि त्या क्लब साठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले.

विशेषतः त्या शाळकरी विद्यार्थ्यांना विधानसभेचे कामकाज दाखवले. हे कळल्यावर मोकद्दम सरांनी माझे विशेष अभिनंदनही केले होते. २०१२-१३ मध्ये मला अचानकच आमच्या नागपूर मेट्रो क्लबचा सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझ्या उचापतखोर स्वभावानुसार मी त्या वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रमा आयोजित केले आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर मेट्रोचे नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचेल ही धडपड केली. माझी धडपड मोकद्दम सर बघत होते. एकदा आमच्या क्लब मध्ये मी त्यांचे भाषण देखील ठेवले होते. त्याचवेळी “तू आता इथेच थांबू नकोस, रोटरीत अजून बरंच काही कर” असं त्यांनी मला आवर्जून सांगितले होते. तेव्हाच “जेव्हा रोटरीत तुला मेंबर म्हणून इंडक्ट केलं तेव्हा तू रोटरीचे यावं की नाही या कशमकशमध्ये होतास, पण आता चांगलाच रुळला आहेस” म्हणून मला प्रोत्साहन सुद्धा दिले होते.२०१३ मध्ये सेक्रेटरी म्हणून माझा कार्यकाळ संपता संपता क्लबमधील अंतर्गत राजकारणामुळे माझे तिथल्या काही पदाधिकाऱ्यांशी वाजले. परिणामी मी रोटरी क्लब सोडण्याचा विचार केला. हे डॉ. मोकद्दमांच्या कानावर जाताच त्यांचा मला फोन आला आणि “तुझ्यात निश्चित क्षमता आहे,

तू खूप काही करू शकतोस, त्यामुळे तू रोटरी सोडू नको, तू दुसऱ्या एखाद्या क्लब मध्ये ये” असा त्यांनी आग्रह धरला. मात्र मी त्या मानसिकतेत नव्हतो. त्यावेळी मग “तू ठरवलेस तर एखादा नवीन क्लबच तू उभा करू शकतोस” असे सांगून त्यांनी मला नवीन क्लब उभारण्याचीच प्रेरणा दिली. मी देखील जिद्दीला पेटलो आणि कामाला लागलो. प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यासाठी मोकद्दम सर होतेच. मग मागे भिडून अवघ्या चार महिन्यात नवीन क्लब गठीत केला आणि रोटरी इंटरनॅशनल कडे नोंदणीसाठी पाठवला. सरांच्या मदतीने महिनाभरातच क्लब ची नोंदणी होऊन आली. मग धडाक्यात पदग्रहण समारंभ आयोजित केला. विशेष म्हणजे पदग्रह समारंभ होण्याआधीच आम्ही त्या क्लबतर्फे नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त मातृसेवा संघातील वृद्ध नागरिकांना गरम कपडे देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला मोकद्दम सर प्रमुख अतिथी म्हणून आले होते. नंतरही आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करीत होतो. परिणामी २०१३-१४ या वर्षात आमच्या नव्यानेच गठीत झालेल्या रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटने सर्वोत्कृष्ट नवीन क्लब चा पुरस्कार तर घेतलाच, पण इतरही विविध पुरस्कार घेतले होते. मला सुद्धा बेस्ट न्यू क्लब प्रेसिडेंट अवॉर्ड त्यावर्षी मिळाला होता. याचे सर्व श्रेय डॉ मोकद्दम यांनी दिलेल्या प्रेरणालाच जात होते. या क्लबच्या जडणघडणीत मोकद्दम सरांचा महत्त्वाचा सहभाग राहिला होता. मला आठवते सर्व सदस्य नवीन होते आणि पुढे कसे जायचे हे कुणालाच नीटसे माहीत नसल्यामुळे मग दिवाळीचे निमित्त साधून मी माझ्याच घरी सर्वांची एक स्नेहभेट आयोजित केली होती. सर्वांना दिवाळीच्या फराळासाठी म्हणून निमंत्रित केले आणि सर्व रोटरी मित्रांना मोकादम सरांनी स्वतः येऊन मार्गदर्शन देखील केले होते. सुमारे दोन तास त्यांनी सर्वांशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मग माझ्या कुटुंबीयांशी देखील त्यांनी आवर्जून ओळख करून घेतली होती. मी रोटरीचा अध्यक्ष झाल्याबद्दल सर्व रोटरी मित्रांनी मला पार्टी मागितली. मग घरीच एक कार्यक्रम माझ्या वाढदिवसालाच आयोजित करून त्या दिवशी सर्वांना पार्टी दिली होती. त्यालाही डॉ. मोकद्दमांना बोलावले असता ते सहकुटुंब आले आणि त्या स्नेहभेटीत सहभागी देखील झाले होते.नंतरचे वर्ष देखील मी त्या क्लबचा प्रेसिडेंट होतो. मग माझा कार्यकाळ संपला आणि नवे प्रेसिडेंट आले तरीही पुढली तीन-चार वर्षे मी रोटरी चळवळीत सक्रिय राहिलो होतो. नंतर विविध कारणांमुळे मी फारसा सक्रिय राहिलो नाही. तरीही डॉ. मोकद्दमांशी माझा नियमित संपर्क राहिला होता. संगीत हा डॉ. मोकद्दमांचा वीक पॉईंट आहे. रोटरीच्या कार्यक्रमात काही वेळा त्यांनी स्वयंस्फूर्तीने काही गीते देखील सादर केली आहेत.

त्यांच्या या संगीतप्रेमाचा मी देखील अनेकदा आस्वाद घेतला आहे. अजूनही ते नियमित संगीताच्या क्लासला जातात असेही मला कळले. इतरही अनेक गुण त्यांच्यात आहेत. मात्र ते नंतर हळूहळू लक्षात येत राहीले.रोटरीत जरी मी फारसा सक्रिय नसलो तरी माझी इतर कामे सुरूच होती. माझे प्रत्येक नवीन पुस्तक प्रकाशित झाले की सरांचा आवर्जून फोन घ्यायचा. विविध पुस्तकांना विविध पुरस्कार मिळाले की देखील सर आवर्जून अभिनंदन करायचे. एकदा त्यांनी मला सहज प्रश्न केला “तू इतकी पुस्तके कशी लिहितोस आणि कधी लिहितोस?” अर्थात त्यावर नेमके काहीच उत्तर न देता आल्याने मी हसण्यावारी तो विषय सोडून दिला होता. रोटरीव्यतिरिक्त माझ्या इतर उपक्रमांबाबतही ते नेहमी माहिती घेत राहायचे. रोटरीच्याच धर्तीवर असलेल्या भारत विकास परिषद नामक संघटनेच्या एका शाखेचा २०१९ मध्ये मी अध्यक्ष झालो. त्यावेळी जुलै २०१९ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमचा पदग्रहण समारंभ झाला होता. त्याला मोकद्दम सर आवर्जून आले होते. मी अखिल भारतीय साहित्य परिषदेत सक्रिय झाल्यावर तिथल्या कार्यक्रमांना देखील सर आवर्जून यायचे. एकदा मराठी भाषा दिनानिमित्त वैज्ञानिक अभ्यासक्रम मराठीतून शिकवणे शक्य आहे का या विषयावरील परिसंवादात सरांना वक्ता म्हणून निमंत्रित केले होते

. तेव्हा देखील ते आवर्जून आले होते. एकदा निवडणुकीच्या दरम्यान त्या निवडणुकीतील एक उमेदवार नितीन गडकरी हे विविध मान्यवरांच्या घरी जाऊन त्यांच्या परिचयातील मान्यवरांना एकत्रित भेटत होते. ते एक भेट त्यांनी डॉ. मोकद्दम यांच्या निवासस्थानी दिली होती. त्यादिवशी तिथे सुमारे १०० मान्यवर उपस्थित होते. तेव्हाही त्यांनी आम्हा उभयतांना या भेटीसाठी निमंत्रित केले होते. तिथेही आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो होतो.२०२० च्या सुरुवातीलाच कोरोनाने भारतात प्रवेश केला. मार्चच्या शेवटी शेवटी देशात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे लोकांचे बाहेर हिंडणे फिरणे बंद झाले होते मी राज्य शासनाचा अधिस्वीकृती धारक पत्रकार असल्यामुळे ते ओळखपत्र दाखवून मला बाहेर फिरणे शक्य होत हो.ते डॉ. मोकद्दमांचे वय लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना देखील त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन रुग्ण बघण्यास मनाई केली होती. त्यामुळे ते घरीच असायचे मग कधीमधी फोनवर आमच्या गप्पा व्हायच्या.त्यादरम्यान मोकदम सरांशी एकदा फोनवर बोलणे चालू असता सहजच वेळ असेल तर संध्याकाळी घरी चहा प्यायला ये म्हणून त्यांनी निमंत्रण दिले. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. ते लक्षात ठेवून सरांनी मला घरी बोलावले आणि भेटवस्तू देऊन माझे अभिष्टचिंतन देखील केले होते. त्या संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवावर लिहिलेली एक कथा दाखवली “हा माझा रिकामपणातला उद्योग आहे, तू लेखक आहेस तेव्हा हा प्रयत्न मला कितपत जमला ते सांग” असे म्हणून त्यांनी मला ती कथा वाचायला दिली. मी कथा वाचल्यावर ती मला एकदम आवडली. त्यामुळे “तुम्ही अजून अशा कथा लिहित चला आणि त्या वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये प्रकाशित करत चला” असे त्यांना सुचवले. त्यांनी देखील काही ठिकाणी त्या कथा पाठवल्या. योगायोगाने त्यावर्षी काही नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा प्रकाशित देखील झाल्या. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. मग हळूहळू त्यांच्या प्रकाशित झालेल्या कथांची संख्या वाढू लागली. जेव्हा त्या कथा वाढत वाढत १५-२० पर्यंत गेल्या, तेव्हा आता या पुस्तक रूपात प्रकाशित करू या म्हणून मी त्यांच्या मागे लागलो. तेव्हा हे पुस्तक कोण प्रकाशित करणार असा प्रश्न त्यांनी केला. मग ललित वाङ्मयाचे प्रकाशन करणारे नागपुरातील प्रकाशक चंद्रकांत लाखे यांच्याकडे मी त्यांना घेऊन गेलो. लाखे यांना देखील या पुस्तकातील कथा आवडल्या. त्यांनी सरांचा पहिला वैद्यकीय कथांचा कथासंग्रह प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन जुलै २०२३ मध्ये पंजाबचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलालजी पुरोहित यांचे हस्ते झाले होते. त्या कार्यक्रमात मोकद्दम सरांनी मला देखील व्यासपीठावर बसवून घेतले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायला मला निमंत्रित केले होते. त्यावेळी “हे आभार प्रदर्शन तुम्ही तुमच्या कुटुंबातल्याच एखाद्याला करायला सांगा” असे जेव्हा सुचवले, तेव्हा “तू देखील कुटुंबातलाच एक आहेस, आणि हे पुस्तक तयार होण्यामध्ये तुझा बराचसा वाटा राहिला आहे, म्हणून तूच आभार प्रदर्शन कर” असा आग्रह त्यांनी धरला. परिणामी माझा नाइलाज झाला होता. ते पुस्तक मग मीच त्यांना सुचवले आणि काही स्पर्धांसाठी देखील पाठवायला लावले होते. त्या पुस्तकाला काही पुरस्कार देखील मिळाले. एकूणच त्यांच्यात दडलेला साहित्यिक देखील या निमित्ताने पुढे आला होता. त्यासाठी निमित्त मात्र मी जरूर ठरलो होतो. मात्र लेखन कौशल्य हे डॉ. मोकद्दमांचेच होते. मात्र ते लोकांसमोर यायला त्यांच्या आयुष्याची सात दशके निघून गेली होती. अर्थात उशिरा का होईना पण त्याचे चीज निश्चित झाले आणि त्यासाठी थोडाफार का होईना मी निमित्तमात्र ठरलो ही बाब मला समाधान देणारी राहीली. गेल्यावर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये मी चिकनगुनियाने आजारी पडलो. ते दुखणे चांगलेच अंगावर निघाले. मी बारा दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट राहिलो होतो. नंतरही तब्बल पाच महिने घरात बेडरिडन होतो‌. याच दरम्यान डॉ. मोकदम यांनाही चिकनगुनिया झाला होता. तरीही आम्ही दोघेही त्या काळात एकमेकांच्या संपर्कात होतो. माझे दुखणे जास्त चिघळते आहे हे कळल्यावर त्यांनी फोनवरच मला योग्य ते मार्गदर्शन देखील केले होते. अर्थात त्या काळात आम्ही प्रत्यक्ष भेटू शकलो नव्हतो. याच दरम्यान त्यांचे दुसरे पुस्तक वैद्यकीय कथासंग्रह प्रकाशनासाठी तयार झाले. त्याचे प्रकाशन एप्रिल २०२४ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते ठरले. त्यावेळी त्या कार्यक्रमाला मी यायलाच हवे असा डॉक्टरांचा आग्रहाचा फोन आला. त्यावेळी मला कोणतेही वाहन चालवायला परवानगी नव्हती.

तेव्हा वाहनाची व्यवस्था करून मला त्यांनी कार्यक्रम स्थळी नेले होते. त्या पुस्तकाला देखील यंदा एक पुरस्कार मिळाल्याचे वृत्त मध्यंतरी वाचण्यात आले. अजूनही त्यांचे कथालेखन सुरूच आहे. आणि लवकरच तिसरा कथासंग्रह देखील प्रकाशित व्हावा अशी त्यांची तयारी असल्याचे मध्यंतरी फोनवर बोलणे झाले तेव्हा सरांनी सांगितले होते. असे व्यवसायाने पूर्ण वेळ डॉक्टर असले तरी संगीतावर, साहित्यावर आणि सामाजिक कार्यावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करणारे आणि त्यात स्वतःला झोकून देणारे डॉ. प्रफुल्ल मोकद्दम आज १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करून वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आज या वयातही त्यांचे रुग्णालयात बसून पेशंट्स बघणे आणि त्यांच्या शस्त्रक्रिया करणे हे जसे चालू आहे, तसेच साहित्य लेखन आणि संगीताचा रियाज हे देखील चालू आहे. विशेष म्हणजे आज या वयात देखील ते स्वतः कार चालवत नागपुरात कुठेही फिरतात आणि उत्साहाने सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना ते सर्वांशी स्नेहबंध देखील तितक्याच आपुलकीने जपत असतात. तिथे वय, सामाजिक दर्जा, प्रतिष्ठा काहीही आडवी येत नाही. याचा अनुभव मी स्वतः देखील घेतोच आहे. त्यामुळेच त्यांचे माझे स्नेहबंध जुळले आणि टिकले देखील आहेत.असे उत्साही व्यक्तिमत्व असलेले डॉ. प्रफुल्ल मोकद्दम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या हातून अशीच वैद्यकीय सेवा आणि साहित्य सेवा घडत राहो, आणि त्यासाठी परमेश्वराने त्यांना दीर्घायुरारोग्य द्यावे हीच प्रभु चरणी प्रार्थना.

Views: 36
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मुंबई महानगर पालिका निवडणूक 2026 च्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत

मुंबई महानगर पालिका निवडणूक 2026 च्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)