मायणी जि.प.गटात भाजपा उमेदवार कोण ?
कार्यकर्त्यात संभ्रम :गोरे बंधू व येळगावकरांच्या भूमिकेकडे लक्ष
मायणी :- प्रतिनिधी ,दत्ता कोळी
राजकीय वार्तापत्र: मायणी गट.
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजले असून राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली १६ जाने. अर्ज भरणे आणि ५ जाने. मतदानाची तारीख. या कमी कालावधीच्या निवडणूक कार्यक्रमाने सर्वत्र एकच धावपळ सुरु झाली आहे.
अजितपवारांच्या राष्ट्रवादीकडून मायणी गटात सुरेंद्र गुदगे यांनी दंड थोपटले आहेत. परंतु ,त्यांच्या विरुद्ध अद्याप महायुतीचा उमेदवार अद्याप घोषित करण्यात आला नसल्याने महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याने निवडणुकीच्या कमी कालावधीत सर्वांच्या नजरा या भागाचे लोकप्रतिनिधी ,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ,माजी आमदार डॉ .दिलीप येळगावकर ,व शेखर गोरे यांच्या भूमिकेवर लागल्या आहेत .
खटाव तालुक्यातील हायहोल्टेज पारंपरिक लढत म्हणून मायणी जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहते . गटाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष अर्थात ओबीसी पुरुष असे पडताच याठिकाणी माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांचा वारसा समर्थपणे चालवणारे जि. प. चे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत सोशल मीडियावर विजय आमचाच हा विश्वास नोंदवन्यास सुरुवात केली.
याउलट गटात इतर आरक्षण पडण्याचा शक्यता असताना मायणी गटासाठी प्राप्त झालेले आरक्षण ,विधानसभेच्या निम्मिताने गोरेंशी दिलजमाई करीत मूळ भाजपा प्रवाहात पुन्हा आलेले डॉ .येळगावकर यांना पेचात टाकणारे ठरले. कारण त्यांच्या सुनबाई रेणू येळगावकर या गटाच्या भावी उमेदवार असतील असा कयास मांडला जात होता .
प्राप्त आरक्षण नुसार डॉ.येळगावकर गटातून अँड.सुरज पाटील हे नाव अनेक चाचपणी करीत पुढे आले,अँड.सूरज पाटील यांनी याअगोदर स्थानिक दोन्ही गटांशी फारकत घेऊन जयकुमार गोरेंच्या गटास काहीकाळ पाठिंबा दिला होता. याचमुळे ते भाजप कार्यकर्ते म्हणून संभाव्य उमेदवाराचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.परंतु याबाबत अंतिम निर्णय मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडूनच होईल . असे गटातील प्रत्येक कार्यक्रमातून संदेश दिला गेला . यातच शेखर गोरे यांनी माण खटाव या दोन्ही तालुक्यातील सर्व उमेदवाऱ्या आम्ही दोघे बंधू बसूनच ठरवू असे जाहीर केले . यामुळे जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे व येळगावकर यांनी गटात अनेक जाहीर कार्यक्रम घेतले. परंतु शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यानी या कार्यक्रमांपासून अंतर ठेवत आपला वैयक्तिक प्रचार गावागावात करण्यास सुरुवात केली. यावेळी शेखर गोरे यांचे समर्थक पांडुरंग झगडे यांनीही आपणही गटाच्या उमेदवारीच्या रेस मध्ये आहे असे सांगितले.
यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचेकडून विधानपरिषदेचे आमदार बनवणार असे आश्वासन मिळालेले शेखर गोरे हेच खुद्द् मायणी गटात उमेदवारी करणार अशी एक अचानक सोशल मीडियावर आलेल्या पोस्टने सर्वत्र धुमाकूळ घातला. आजमितीस शेखर गोरे गटाचे कार्यकर्ते “शेखर भाऊंच्या अंतिम आदेशाची वाट बघत आहेत.” उमेदवार निवडीच्या या सर्व प्रक्रियेत गोरे बंधू कार्यकर्ते विखुरण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी म्हसवड नगरपालिका निवडणूक पॅटर्न गोरेबंधु खटाव तालुक्यात वापरणार असे दिसू लागले आहे .
यासर्वात मुरब्बी राजकारणी असलेले सुरेंद्र गुदगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षाचे प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच आपल्या शैक्षणिक व बँकेशी संलग्नित असणाऱ्यांवरील आपली पकड घट्ट करत संपूर्ण गटातील बारा गावांच्या प्रचाराचा चौकार मारला आहे . कोणत्याही किंतु,परंतु ला जवळ न घेता , सर्वानी मायणी गटाचा स्वाभिमान टिकवण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले आहे .
तर महायुतीच्या जि. प.व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या निवडीच्या गोरेबंधूंच्या बैठकीची प्रतीक्षा एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रातील संघर्षमय वाटचाल करणाऱ्या भाजप पक्षाचे मुलुख मैदानी तोफ म्हणून नावाजलेल्या डॉ. येळगावकरांना करावी लागत आहे . हे एक कटु सत्यच म्हणावे लागेल. ऐनवेळी शरद पवार राष्ट्रवादी गटही आपली ताकद आजमावण्यासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असून अद्याप अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप पक्षांनी मायणी व कलेढोण या दोन्ही गणाचे उमेदवार जाहीर करताना प्रमुख कार्यकर्त्यांची आणि मतदारांची चाचपणी करीत सावधगिरीचा पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. तरीही कलेढोण ,पाचवड परिसरातील दोन प्रमुख कार्यकर्त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाने भाजप गण उमेदवारी साठी आयात उमेदवार उभे करणार का? ते पहावे लागेल. यानिमित्ताने खुद्द जयकुमार गोरे यांच्या हेलिकॉप्टर एंट्रीमुळे संभाव्य उमेदवाराची घोषणा होणार ! या कार्यकर्त्यांच्या आणि गटाच्या आतुरतेची पूर्तता त्यानिमितानेही अद्याप झालेलीच नाही. लगबगीच्या या रणधुमाळीत उमेदवारी घोषित करण्यात होणाऱ्या दिरंगाईचा फायदा नेमका कोणाला होणार? आणि या प्रतीक्षेतेचा फटका कोणत्या गटाला बसणार ? या सर्वांची उत्तरे येऊ घातलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अधोरेखीत करेल.


