मुंबईफाइल्स
जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
शिवसेनेकडे केवळ ३९ नगरसेवक असतानादेखील १९७३ साली बाळासाहेब ठाकरे यांनी अन्य पक्षांशी युती करत, सुधीर जोशी यांना महापौर बनवले होते. काँग्रेस ४५ जागांसह तेव्हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरीदेखील शिवसेनेने तेव्हा मुस्लिम लीग आणि इतर पक्षांच्या मदतीने प्रथम सत्ता स्थापन केली. सुधीर जोशी हे महापौर झाले.
‘काँग्रेस नावाच्या सापाला ठेचण्यासाठी आम्ही मुस्लिम लीग नावाच्या नागाला बरोबर घेत आहोत’ असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते.
त्यापूर्वी १९७१ मध्ये झालेल्या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डाॅ. हेमचंद्र गुप्ते हे यशस्वी झाले. ते महापौर बनले. शिवसेनेने खरे तर प्रजासमाजवादी पक्षाशी युती केली होती. परंतु त्याच पक्षाच्या समोर सेनेने आपला उमेदवार उभा केला होता! त्यावेळी देशात काँग्रेसमध्ये इंडिकेट काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस अशी फूट पडली होती. त्याचा फायदा बाळासाहेबांनी उचलला आणि शिवसेनेचा महापौर झाला…’यापुढे शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकसाथ लढा उभारतील. आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने किंवा देवाणघेवाणीतून झालेली नाही,’ असे मस्तान तलाव पटांगणातील सभेच्या व्यासपीठावरून बोलताना बाळासाहेब म्हणाले होते! व्यासपीठावर मुस्लिम लीगचे जी. एम. बनातवाला हे देखील हजर होते. त्याचप्रमाणे वामनराव महाडिक, मनोहर जोशी, ठाण्याचे नगराध्यक्ष सतीश प्रधान, दत्ताजी साळवी, जिलानी, झैदी, साबीर शेख, छगन भुजबळ, दत्ता नलावडे ही नेतेमंडळीही व्यासपीठावर हजर होती.
१९७७ साली काँग्रेसच्या मुरली देवरा यांना मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता.
१९६८ साली शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली, त्यावेळी शिवसेनेने मधू दंडवते यांच्या नेतृत्वाखालील प्रजासमाजवादी पक्षासोबत युती केली होती. १९७५ साली आणीबाणीला शिवसेनेने समर्थन दिले होते. १९८० साली बॅ. अ. र.अंतुलेंना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने पाठिंबा दिला होता.
१९७० च्या दशकात मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे देखील शिवसेनेचे महापौर झाले होते. आणीबाणीच्या वेळी १९७५ साली सिंडिकेट काँग्रेसचे नानालाल मेहता हे महापौर झाले, त्यामध्ये शिवसेनेची देखील एक भूमिका होती.
मुंबईच्या महापौरपदाबाबत सध्या बरेच राजकारण सुरू आणि पतंगबाजी सुरू आहे. म्हणून थोडे इतिहासात डोकावण्याची आवश्यकता आहे. तेव्हाचे संदर्भ वेगळे होते आणि आत्ताचे संदर्भ वेगळे आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या संदर्भात या बदलत्या इतिहासाकडे व घटनांकडे बघणे आवश्यक आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श म्हणून चालतो असे स्तोत्र म्हणणार्यांनी, बाळासाहेबांनी केलेले राजकारण देखील जाणून घेतले पाहिजे. आपल्या सोयीचे तेवढे बाळासाहेब घ्यायचे, हे बरोबर नाही… पण राजकारणात ‘कुछ भी हो सकता है’ हे मात्र खरे!


