मुंबईफाइल्स….ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे एका विशिष्ट संदर्भात म्हणाले होते. त्या काळात शिवसेना काँग्रेसच्या विरोधातच स्वतःची राजकीय जागा शोधत होती. परंतु बाळासाहेबांनी नेहमीच राजकीय लवचिकता दाखवली होती. त्यामुळे बाळासाहेबांचे हे वाक्य पकडून उद्धव ठाकरे यांना खिंडीत पकडण्याचा उद्योग भाजप आणि शिंदेसेनेकडून सुरू असतो. या लबाड मंडळींसाठी काही गोष्टी पुन्हा ठासून सांगणे आवश्यक आहे.
‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी ‘बाळासाहेब, तुम्ही टोपी फिरवली का?’ असे पत्र ‘मार्मिक’मध्ये एका वाचकाने लिहिले होते. तेव्हा ‘व्यंगचित्रकारास टोपी नसते, तुम्ही उगाचच डोकं फिरवलं!’ असा जमालगोटा बाळासाहेबांनी दिला होता. ‘मार्मिक’ मधून काँग्रेस नेत्यांचे कौतुक होत असल्याचे आरोपही बाळासाहेबांवर झाले होते! तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बाळासाहेब यांची मैत्री प्रसिद्ध आहे. सुधाकरराव नाईक व बाळासाहेब यांचेही संबंध चांगले होते.
१९६७ साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी काॅ. कृष्ण मेनन यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार स. गो. बर्वे यांना बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर संरक्षणमंत्री असलेले मेनन टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेसने मेनन यांच्या ऐवजी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. बर्वे हे एक अत्यंत अनुभवी आयसीएस अधिकारी आणि मंत्री होते. बर्वेंनी मेनन यांचा पराभव केला, जो त्याकाळी काँग्रेससाठी एक प्रतिष्ठेचा विषय होता. काँग्रेस उमेदवार बर्वे यांच्या यशात शिवसेनेचा देखील वाटा होता.
वास्तविक त्यावेळी मेनन दोन टर्म मुंबईचे खासदार म्हणून उत्तर मुंबईतून निवडून येत होते. मुंबईतील कामगार संघटनांमध्ये ते लोकप्रिय होते. इंदिरा गांधींनी त्यावेळी मेननना तिकीटही दिले होते. परंतु काँग्रेसमधील उजव्या विचारसरणीचे भांडवलदारांचे मित्र स. का. पाटील यांनी दिल्लीला जाऊन, मुंबईतले वातावरण मेनन यांच्या विरोधात आहे, असे त्यांना पटवून दिले. मग इंदिराजींनी यशवंतराव यांच्या जवळचे माजी सनदी अधिकारी बर्वे यांना काँग्रेसचे तिकीट देऊ केले. संतप्त झालेल्या मेनन यांनी काँग्रेस सोडली आणि डाव्या पक्षांच्या मदतीने मुंबईत उमेदवारी दाखल केली. त्यावेळी बर्वे यांच्याकडे फारसे अर्थबळ नव्हते. त्यांच्याकडे तितकासा राजकीय अनुभव देखील नव्हता. पण स. का. पाटील यांनी त्यांच्या मागे आपली ताकद उभी केली.
बाळासाहेब हे स.कां.चे प्रखर विरोधक असून, ते ‘मार्मिक’ मधून त्यांच्यावर टीकादेखील करत असत. परंतु बाळासाहेबांनी स.कां.ना मदत करण्याचे ठरवले. कारण मेनन हे दाक्षिणात्य होते व त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे बर्वे हे मराठी होते. शिवाय मेनन हे कम्युनिस्ट होते आणि कम्युनिस्टांच्या विरोधात मुंबईत शिवसेना होती. त्यावेळी शिवसैनिकांनी ‘बर्वे मंडळ’ स्थापन करून, प्रचाराची जबाबदारी घेतली. मेनन यांचा दारुण पराभव झाला.
१९७३ मध्ये मुंबई मध्य या मतदारसंघातून रोझा देशपांडे या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उभ्या होत्या, तेव्हा त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रामराव आदिक यांना पोटनिवडणुकीत शिवसेनेने समर्थन दिले होते.
आणीबाणीत बाळासाहेबांनी पाठिंबा देऊन इंदिरा गांधींची भेटही घेतली होती. १९७७ साली मुरली देवरा यांना महापौरपदासाठी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र आले होते. शिवसेनेने निवडणुकीत उमेदवारच उभा केला नाही. अंतुले यांच्याशी बाळासाहेबांची दोस्ती होती. सेनेने ही निवडणूक लढवली नाही. त्या बदल्यात विधानपरिषदेत वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर यांना काँग्रेसने निवडून आणले. त्यावेळी श्रीवर्धन मतदारसंघातून अंतुले यांचा प्रचार शिवसैनिकांनी केला होता. अंतुलेंच्या प्रचाराच्या सांगता सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केले होते. याचा अर्थ बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला, परंतु राजकीय डावपेचात काँग्रेसची साथच केली होती.
हे सर्व लक्षात घेऊन यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची साथ केली असती, तर सर्वांच्या अधिक जागा निवडून आल्या असत्या, असे मला वाटते. ही निवडणूक होण्यापूर्वीच काँग्रेसने चुकीचा निर्णय घेतला आहे, असे मत मी मांडलेले होतेच!
आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर शिवसेना आणि मनसे म्हणजे एमआयएम नाही, हे काँग्रेसने जाणले पाहिजे! आणि काँग्रेसशी आघाडी करणे म्हणजे मुस्लिम लीगशी अथवा पाकिस्तानशी आघाडी करणे नव्हे, हे हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घेतले पाहिजे… काँग्रेसने देशाचा विचार करतानाच, महाराष्ट्रात मुंबई व महाराष्ट्रहिताचा विचार केल्यास पक्षाचा जनाधार वाढेल. उद्धव ठाकरेंबरोबर काँग्रेस महाविकासमध्ये होतीच.
मनसेला बरोबर घेण्यात आपण काहीतरी पाप करत आहोत, ही भावना काँग्रेसने सोडून द्यावी. भाजप विरोधात राजकारण करताना मनसेनेही आपली भूमिका मराठीवादी ठेवावीच. परंतु आम्ही महाराष्ट्रप्रेमी असलेल्या परप्रांतीयांच्या विरोधात नाही, असेही ठासून सांगावे. थोडी लवचिकता धारण करावी व काँग्रेसनेही प्रादेशिक अस्मिता आणि सर्वसमावेशकता यामधील सुवर्णमध्ये साधणारी भूमिका घ्यावी. महाशक्तीला तोंड देण्यासाठी अशी लवचिकता धारण करणे आवश्यकच आहे!


