• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती-४७…..सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख….. ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
February 24, 2026
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो…मोहन भागवतांचे विधान आणि इम्तियाज जलील यांची टीका………ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती-४७

सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

चरितार्थासाठी रिझर्व बँकेत नोटा तपासण्याची नोकरी करता करता जुने ऐतिहासिक दस्तावेज तपासत तपासत शिवकथाकार म्हणून गाजलेले विजयराव देशमुख हे आयुष्याच्या एका वळणावर तेल्हाराच्या विष्णुदास महाराजांची दीक्षा घेत पुढे जाऊन सद्गुरुदास महाराज बनले. अध्यात्मिक गुरु म्हणून ते ओळखले जाऊ लागले. धर्मभास्कर या पदवीने ते गौरवले देखील गेले.त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रवासाचे नागपुरात अनेक साक्षीदार आहेत. त्यातलाच मी देखील एक आहे. विजयरावांचे ११ फेब्रुवारी रोजी निर्वाण झाले. आज त्यांचा १४ वा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत.

विजयरावांचा आणि माझा परिचय झाला तेव्हा मी जेमतेम १३-१४ वर्षाचा होतो. लहानपणापासून मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे खूप आकर्षण होते. जेमतेम पाच वर्षाचा असताना काही काळ बर्डीवर राहत होतो. तेव्हा टेकडी लाईनला असलेल्या संघ शाखेत मी यायचो. मात्र नंतर लक्ष्मी नगरला आल्यावर घराजवळ शाखा नसल्याने मला शाखेत जाता येत नव्हते. मात्र मी नव्या वर्गात शिकत असताना अगदी घराशेजारीच संघशाखा सुरू झाली आणि मग मी नेहमीच जायला लागलो.

महिनाभरातच आमच्या विभागाचे जवळच्याच अभ्यंकर नगर शाखेत एकत्रीकरण होते तिथे गेल्यावर सुरुवातीला काही खेळ झाले आणि मग सर्व बाल स्वयंसेवकांना एकत्र बसवलेले गेले आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट सांगितली केली गोष्ट सांगणारे होते विजयराव देशमुख त्या दिवशी शाखा सुटल्यावर मी आवर्जून त्यांना भेटलो आणि स्वतःची ओळख करून दिली होती तेव्हा विजयराव फक्त संघर्षक संघ स्वयंसेवक म्हणूनच मला माहीत होते मात्र त्याचवेळी आमचे मुख्य शिक्षक असलेले अशोक जोशी यांनी माहिती दिली की ते रिझर्व बँकेत नोकरीला आहेत आणि छत्रपती शिवाजी आणि समकालीन इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे मग मी विजयरावंच्या अक्षरशः प्रेमातच पडलो.

त्यानंतर मग अधून मधून विजयरावांची भेट होऊ लागली. काही दिवसांनी गुरुदक्षिणा उत्सव आला. सुरुवातीला आमची लक्ष्मी नगर संघवी शाखा नवीन होती. त्यामुळे आम्हाला आमचा ध्वज नव्हता. गुरुदक्षिणेच्या निमित्तानेच आम्हाला आमचा ध्वज मिळाला. आमच्या शाखेच्या गुरुदक्षिणा समारोहाला प्रमुख वक्ते म्हणून विजयराव देशमुख यांनाच बोलावले होते. त्यादिवशी त्यांनी ध्वजाचे महत्त्व या विषयावरच अतिशय सुरेख असे विवेचन केले होते. त्या वयात त्यांचे ते विवेचन मला खूपच भावले होते.

अर्थात त्यावेळी विजयराव हे संघाचे एक अधिकारी स्वयंसेवक आणि रिझर्व बँकेतले एक कर्मचारी काच त्यांचा परिचय होता. मात्र सुमारे वर्षभराने नागपूरच्याच माझ्या आठवणीनुसार ललिता कला प्रसार केंद्र या संस्थेच्या वतीने त्यांची शिवचरित्रावर तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्या व्याख्यानमालेला मी तीनही दिवस उपस्थित होतो. तेव्हापासून विजयराव शिव कथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

१९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात मध्यावधी लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. त्यावेळी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन काँग्रेसला एकास एक अशी लढत द्यायची असा निर्णय झाला होता. त्यानुसार नागपुरातून महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे उमेदवार जांबुवंतराव धोटे यांना जनसंघाने पाठिंबा दिला होता. जनसंघ म्हटला की संघ आलाच. त्यामुळे सर्वच संघ स्वयंसेवक धोटेंच्या प्रचारात भिडले होते. आमच्या भागातल्या सर्व तरुण मित्रांनी धोटे यांच्या प्रचारार्थ सायकल रॅली काढायचे ठरवले. रॅलीच्या आघाडीवर आपली जुनी व्हिकी चालवत विजयराव रॅलीचे नेतृत्व करत होते. रॅलीत बरेच तरुण मित्र सहभागी झाले होते. मात्र रॅलीत पुरेसा जोश भरत नव्हता. त्यावेळी लक्ष्मी नगरच्या आठ रस्ता चौकात रॅली थांबवली आणि तिथे विजयरावांनी नव्या घोषणा सुचवल्या.

त्यातली पहिली घोषणा होती, “अटल बिहारी निजलिंगप्पा, आमचा धोटे आला रे बाप्पा” आणि दुसरी घोषणा होती, “अटल बिहारी बोलत है, इंदिरा शासन डोलत है” या दोन घोषणा देत सर्व तरुणांनी सायकली चौकात स्टैंड वर लावून फेर धरला आणि एकदम माहोल तयार झाला. विजयराव हे अभ्यासक आहेत, वक्ते आहेत याची कल्पना होती. मात्र ते हजरजबाबी कवी देखील आहेत हा परिचय त्यादिवशी माझ्यासह सर्वांनाच झाला होता.

त्यावेळी संघ शाखेत मी वैयक्तिक गीत देखील कधी कधी म्हणत असे. त्याचवेळी मला सकस वाचनाची आवड आहे आणि सोबतच लेखनाची देखील रुची आहे हे विजयरावांना माझ्या बोलण्यातून जाणवले होते. त्यामुळे मग आमच्या शाखेत ते आले की काही निमित्ताने एखाद्या संघ गीतावर किंवा वृत्तपत्रात आलेल्या एखाद्या लेखावर माझ्याशी आवर्जून चर्चा करायचे. त्या काळात आम्ही आमच्याच शाखेतल्या सात आठ स्वयंसेवकांनी मिळून आपापल्या घरची अवांतर वाचनाची पुस्तके एकत्र करून वाचनालय सुरू केले होते.

त्याला आम्ही डॉ. हेडगेवार वाचनालय असेच नाव दिले होते. नंतर सर्वांची शाळा महाविद्यालय सांभाळून ते वाचनालय चालवणे कठीण झाले. हे कळले तेव्हा विजयरावांनीच पुढाकार घेतला. आमच्याजवळ होती ती सर्व पुस्तके एकत्र करून अजून काही ज्येष्ठांकडून निधी जमवून अनेक ऐतिहासिक आणि ललित वाङ्मयाची पुस्तके विकत घेतली आणि ते वाचनालय पुनरुज्जीवीत केले होते. आमच्या श्रद्धानंद पेठ भागातील सर्व शाखांच्या बाल स्वयंसेवकांसाठी ते वाचनालय नंतर काही काळ सुरू देखील होते.

याच दरम्यान कॉलेजमध्ये शिकत असतानाच मी फोटोग्राफी सुद्धा सुरू केली होती. त्याच काळात विजयरावांनी अभ्यंकर नगरमधील आपले भाड्याचे घर सोडले आणि धंतोलीतील हिंदू धर्म संस्कृती मंदिर परिसरात स्थानांतरित झाले होते. हिंदू धर्म संस्कृती मंदिर ही संघ परिवाराची एक गतीविधी होती, आणि तिथे हिंदुत्वासंबंधित विविध ग्रंथसंपदा उपलब्ध करण्यात आली होती. तिथे त्या इमारतीत वर एक सभागृह आणि सुसज्ज असे ग्रंथालय होते तर तळमजल्यावर तीन निवासी गाळे होते. त्यातील एका गाळ्यात विजयराव आणि त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची सोय झाली होती. दुसऱ्या गळ्यात प्रकल्प प्रमुख निवृत्त शिक्षणाधिकारी नानासाहेब दीक्षित आणि अजून एका गळ्यात ग्रंथपाल रामदास जोशी हे देखील राहायचे. या ग्रंथालयात हिंदुत्वाच्या इतिहासासंबंधी विविध ग्रंथांचे संकलन आणि नियोजन करण्याची जबाबदारी विजयराव देशमुखांवर सोपवली होती. त्यांची रिझर्व बँकेची नोकरी सांभाळून हे काम ते करत होते.

त्या ठिकाणी ग्रंथपाल असलेले रामदास जोशी यांचे आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे तिथे माझे नियमित जाणे असायचे. त्यामुळे मग विजयरावांची नियमित भेट व्हायची. तिथे असतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर “शककर्ते शिवराय” हा अभ्यासपूर्ण संशोधन ग्रंथ सिद्ध करण्याची संकल्पना जाहीर केली. त्यासाठी पैसा लागणार होता. मग त्यांनी शिवछत्रपती प्रतिष्ठान ची स्थापना केली आणि सर्व शिवप्रेमी सुहृदांकडून ठेव रूपात रक्कम मागितली. प्रत्येकाला पाच वर्षानंतर ग्रंथ आणि सोबत ठेव अशी परत करण्याची हमी त्यांनी दिली होती. त्यांचे व्यक्तिगत संबंध आणि छत्रपती शिवाजींचे अभ्यासक या नात्याने त्यांच्या भोवती असलेले वलय यामुळे त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला आणि अपेक्षित पैसा उभा झाला. मग विजयराव झोकून देत कामाला लागले आणि त्यांनी संशोधन सुरू केले. सुदैवाने हिंदू धर्म संस्कृती मंदिराचे ग्रंथालय त्यांच्या जवळ होतेच. त्यामुळे त्यांचे काम अधिक सुलभ झाले.

नेमकी याच दरम्यान देशात आणीबाणी लागली. विजयराव संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे त्यांच्यावर देखील सरकारचे आणि पोलिसांचे लक्ष होते. त्यामुळे सर्व काही सांभाळूनच काम करावे लागत होते. तरीही विजयरावांनी आपल्या कामात कुठेही खंड पडू दिला नव्हता. या काळात अधून मधून भेटी व्हायच्या. याच दरम्यान मी छायाचित्रणाचा पूर्ण वेळ व्यवसाय करण्यासाठी धरमपेठेत एक फोटो स्टुडिओ सुद्धा सुरू केला होता. मग कधीतरी फिरत फिरत विजयराव तिथे येऊनही जायचे. विजयराव आले मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. गप्पांच्या ओघात ते अनेकदा शिवकालीन इतिहासात घेऊन जात असत. याच दरम्यान त्यांनी जयप्रकाश नगर मध्ये रिझर्व बँक कर्मचाऱ्यांच्या सोसायटीत स्वतःचे एक घर देखील बांधले होते. तिथेच ते स्थानांतरित झाले होते.

हळूहळू त्यांचा शककर्ते शिवराय या संशोधन ग्रंथाचा प्रकल्प पूर्णत्वास गेला. १९८० मध्ये हा दोन खंडातील ग्रंथ प्रकाशानाला सिद्ध झाला. त्याचे प्रकाशन विजयरावांनी अनोख्या पद्धतीने करायचे ठरवले. त्यांनी त्यांना या प्रकल्पात आर्थिक सहाय्य करणारे सगळे मित्रमंडळी यांची बसने एक महाराष्ट्रात किल्ले दर्शन सहल काढायचे ठरवले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मग एप्रिल १९८० मध्ये ही सहल नागपुरातून निघाली आणि मजल दरमजल करत शिवजयंतीच्या दिवशी किल्ले रायगडावर पोहोचली. तिथे विजयरावांनी छत्रपतींच्या सिंहासनावर ग्रंथ ठेवून प्रकाशन झाल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या संपूर्ण प्रवासाचे वर्णन त्यांच्या “महाराजांच्या मुलुखात” या ग्रंथात दिलेले आहे.

विजयरावांची ही किल्ले दर्शन यात्रा चांगलीच गाजली. वृत्तपत्रांनी रकाने भरून त्याच्यावर लिहिले. त्यानंतर माझी विजयरावांची भेट झाली. तेव्हा ते आयुष्यात काहीतरी सत्कृत्य आपल्या हातून घडते आहे या समाधानात तृप्त दिसत होते.

अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना काही जिल्ह्यांचे दुसऱ्या महसुली विभागात स्थानांतरण करण्याचे प्रस्ताव पुढे आले होते. त्यावेळी विदर्भातील बुलढाणा हा जिल्हा मराठवाड्याला जोडावा अशी चर्चा सुरू झाली होती. बुलढाणा जिल्हा जर मराठवाड्याला जोडला असता तर या जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे देखील मराठवाड्यात गेले असते. सिंदखेडराजा ही जिजाऊंचे माहेर, ते विदर्भातच राहावे यासाठी विजयराव आग्रही होते. एकदा इंदिरा गांधी नागपूरला विमानतळावरून पुढे एका कार्यक्रमाला जाणार असताना काही काळ नागपूर विमानतळावर थांबल्या. त्यावेळी अंतुले देखील इथे आले होते. इंदिराजी पुढे गेल्यावर अंतुले विमानतळावरच थांबणार होते. विजयराव विमानतळावर आले आणि अंतुलेंना भेटण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काही ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांची अंतुल्यांची गाठ घालून दिली आणि विजयरावांनी अंतुलेंना त्याबाबत निवेदन दिले. अंतुलेंनी तसे काहीही होणार नाही हा शब्द विजयारांना दिला होता. नंतर अंतुले पत्रकारांशी बोलले तेव्हा मीच अंतुलेंना याबाबत विचारले. त्यांनी सिंदखेडराजा विदर्भातच राहील असे सर्व पत्रकारांसमक्ष जाहीर केले होते. ही बातमी विजयारावांना खूपच समाधान देऊन गेली होती. नंतर मग त्यांनीच जिजाऊंच्या जन्मदिनी सिंदखेड राजाला मोठा कार्यक्रम देखील घडवून आणला होता‌. त्याला देखील मुख्यमंत्री अंतुले स्वतः आले होते. मी देखील त्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी तिथे गेलो होतो.

१९८२ मध्ये नागपुरात दूरदर्शन केंद्र सुरू झाले. त्या आधीपासूनच मी दूरदर्शनचा नागपूर आतील वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. नागपुरात दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर काही महत्त्वाचे कार्यक्रम नियोजित करण्याची जबाबदारी साहजिकच माझ्यावर येत असे. १९८३ च्या एप्रिल महिन्यात मुंबई दूरदर्शनचे निर्माते मनोहर पिंगळे नागपुरात आले आणि त्यांनी विदर्भातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती मुलूखावेगळी माणसं आणि वऱ्हाडी माणसं या शीर्षकाखाली घ्यायचे ठरवले असल्याचे मला सांगितले. त्यासाठी मी नावे सुचवावी असेही त्यांनी मला निर्देशित केले. त्या विविध नावांमध्ये मला एकदम विजयरावांचे नाव आठवले. पिंगळे सरांना देखील हे नाव एकदमच पटले. त्या दिवशी विजयरावांना बँकेत फोन केला. ते बँकेतून जाताना माझ्या स्टुडिओत आले. त्यांची आणि मनोहर पिंगळे यांची सविस्तर चर्चा झाली आणि कार्यक्रमाचे निश्चित झाले. विजयरावांची मुलाखत घेण्यासाठी नागपुरातील हडस हायस्कूल मध्ये मराठीच्या शिक्षिका असलेल्या सुहासिनी लाडकर यांची निवड केली‌ सुहासिनीताई या सुद्धा माझ्या शिक्षिकाच होत्या. मग विजयराव आणि सुहासिनीताई यांना एकत्र आणून पूर्ण मुलाखतीचे नियोजन करण्याचे काम पिंगळे सरांनी माझ्यावरच सोपवले. त्या दोघांच्या नियमित बैठकी झाल्या, सराव देखील झाला, आणि दोघांनाही मुंबईला रवाना केले. तिथे मुलाखतीचे ध्वनी चित्रण झाले आणि ठरल्याप्रमाणे मुलाखत नागपूर आणि मुंबई दूरदर्शन केंद्रावर प्रसारितही झाली. त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांनीच विजयराव माझ्या स्टुडिओत आले आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे स्मृतीचिन्ह मला आठवण म्हणून देऊन गेले होते. तसेच शककर्ते शिवरायाची प्रत देखील त्यांनी मला भेट म्हणून दिली होती. या निमित्ताने मग एक आठवडाभराने लाडकारांकडे मला स्नेहभोजनासाठी बोलावले होते. योगायोगाने त्यादिवशी लाडकर दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस होता. नंतर त्या दुपारी मी विजयराव देशमुख यांना फोनवर आज लाडकारांकडे गेलो होतो आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे हे सहज सांगितले. त्या दिवशी लगेचच विजयराव सपत्नीक लाडकारांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. सुहासिनीताईंनी देखील त्यादिवशी छत्रपती सेवा प्रतिष्ठानला काही देणगी देखील दिली. दुसऱ्या दिवशी विजयरावंनी त्याबाबत वृत्तपत्रात देखील बातमी दिली होती.

नंतर काही ना काही निमित्ताने अधून मधून विजयरावांची माझी भेट होत. असे कधी ते धरमपेठेत आले तर माझ्या स्टुडिओत डोकावून जायचे. तर कधी साहित्य प्रसार केंद्रात आमची भेट व्हायची‌. साहित्य प्रसार केंद्र हे विजयरावांच्या साहित्याचे नियमित प्रकाशक होते. त्यामुळे विजयरावंची तिथे चक्कर असायचीच.

याच दरम्यान नागपुरात शिवकथाकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपुरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. विजयरावच त्याचे आयोजक होते. मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण होतेच. त्यावेळी मी दूरदर्शन साठी देखील त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले होते. त्या दिवशी तिथे शिवचरित्र आणि बाबासाहेब पुरंदरे या विषयावर अप्रतिम व्याख्यान झाले होते. कार्यक्रमानंतर मी विजयरावांना भेटलो. तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे हसून मला दाद दिली होती.

१९८५ नंतर मी दूरदर्शन साठी कार्यक्रम निर्मिती करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यावेळी महाराजांच्या मुलुखात या विषयावर एक दूरदर्शन मालिका तयार करावी अशी कल्पना होती. ही कल्पना विजयरावांना दिली तेव्हा त्यांना ही कल्पना फारच आवडली. मग आमच्या नियमित भेटू होऊ लागल्या. मात्र पुढे तो प्रकल्प मार्गी लागू शकला नव्हता.

१९९० मध्ये माझा विवाह झाला. त्यावेळी मी विजयरावांना निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. विजयराव देखील आवर्जून लग्नाला आले होते. नंतर एक दोन महिन्यातच त्यांच्या मुलीचा विवाह झाला. तेव्हाही त्यांचे आग्रहाचे निमंत्रण होते. आम्ही उभयता त्या सोहळ्याला उपस्थित राहिलो होतो.

त्याच वर्षी दूरदर्शनने राष्ट्रीय स्तरावर दूरदर्शन मालिका निर्मितीसाठी काही प्रस्ताव मागितले होते. त्यावेळी विजयराव देशमुख यांनी लिहिलेल्या सिंहासनाधीश्वर या तीन अंकी नाटकावर मी एक मालिका तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यावेळी विजयराव देशमुख यांच्याशी माझी बरीच चर्चा झाली. त्या मालिकेचे दिग्दर्शन ख्यातनाम मराठी दिग्दर्शक राजदत्त यांनी करण्याचे मान्य केले होते. मात्र दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारासाठी ही मालिका मान्य होऊ शकली नव्हती.

याच काळात त विजयराव देशमुख यांनी छत्रपती सेवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी जिजामाता विद्वत पुरस्कार देऊन एका विद्वानाचा गौरव करायचा अशी परंपरा सुरू केली होती. १९९४ मध्ये संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचे ठरले होते. हा पुरस्कार सोहळा दूरदर्शनवर प्रसारित व्हावा ही विजयारावांची इच्छा होती. एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि” तुला हक्काने सांगू शकतो, तू काहीतरी सोय कर” म्हणून त्यांनी गळ घातली. त्यानुसार मग मी चित्रीकरण्याची व्यवस्था केली आणि त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण दूरदर्शनवर प्रसारित देखील झाले होते. त्यामुळे विजयराव चांगलेच सुखावले होते.

मधल्या काळात विजय रावांनी तेल्हाऱ्याच्या विष्णुदास महाराजांचा अनुग्रह घेतला होता. त्यामुळे शिवचरित्राच्या प्रसारासोबत ते अध्यात्मिक मार्गाकडे देखील वळले होते. विष्णुदास महाराजांच्या निर्वाणानंतर त्या गादीवर विजयरावांचेच निवड करण्यात आली, आणि सद्गुरुदास महाराज असे त्यांचे नामकरण करण्यात आले. इथून विजयरावांचा अध्यात्मिक प्रवास सुरू झाला होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एखाद्या संन्याशासारखे ते संन्यास्त वृत्तीनेच राहू लागले होते. त्यांनी पूर्ण दाढी वाढवली होती आणि पांढरे शुभ्र धोतर आणि त्यावर पांढरा शुभ्र झब्बा अशा वेशात राहू लागले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे विद्वत्तेचे तेज अधिकच वाढले होते. त्यांची अधून मधून भेट व्हायची. दरम्यान मी देखील दूरदर्शनचा साथ सोडून पत्रकारितेत आलो होतो. मला आठवते २००२ मध्ये त्यांची मी नाशिक गावकरीसाठी स्वतंत्र मुलाखत देखील घेतली होती. त्यावेळी आमच्या छान गप्पा रंगल्या होत्या. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म तिथीचा देखील वाद होता. कुणी म्हणायचे तारखेनुसार जयंती साजरी करा, तर कोणी म्हणायचे हिंदू पंचांगानुसार करा. विजयराव मात्र इंग्रजी तारखेनुसारच करावी कारण जनसामान्यांना ती तारीख लक्षात ठेवणे सोयीचे आहे असा आग्रह धरत होते. त्यांनी सुचवल्यानुसार मी यासंदर्भात वृत्तपत्रात काही बातम्या देखील चालवल्या होत्या. एक दिवस राज्य शासनाने त्याबाबत तारखेनुसार शिवजयंती साजरी करावी हा निर्णय जाहीर केला. तो कळल्यावर मी विजयराव देशमुखांना प्रतिक्रिये साठी फोन केला. मी फोनवर सांगताच अविनाश ही बातमी तूच मला पहिले दिली आहे, फार चांगली बातमी आहे असे म्हणत त्यांनी आनंद देखील व्यक्त केला होता.

संबंधातील व्यक्तींबद्दल काही चांगले कळले तर त्याचे आवर्जून कौतुक करायचे हे विजयरावांचे एक वैशिष्ट्य होते. २०१२-१३ मध्ये मी एका रोटरी क्लबचा सेक्रेटरी झालो. त्यावर्षी आमच्याच क्लबच्या एका सहकारी मित्राने आपलासा येथे विजयरावांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. मला त्यासाठी निमंत्रण होते. मी दुपारी आदासा येथे पोहोचलो. तेव्हा विजयराव तिथे भक्तांच्या घोळक्यात बसलेले होते. माझे मित्र मला तिथे घेऊन गेले. तेव्हा “अरे वा अविनाश तू आलास का, आणि वहिनीही सोबत आल्या” म्हणून त्यांनी स्वागत केले. ज्यावेळी माझ्या मित्राने अविनाश यंदा आमच्या रोटरी क्लबचा सेक्रेटरी आहे असे सांगितले तेव्हा विजयराव चांगलेच खुश झाले आणि त्यांनी माझं कौतुक काही केले.

विजयराव अध्यात्मिक मार्गाकडे वळले आणि सद्गुरुदास महाराज झाले, ते धर्मभास्कर या सन्मानाने गौरविले गेले, तरी शिवचरित्रावरील त्यांचे प्रेम तसेच कायम होते. शिवचरित्रावर व्याख्याने देखील ते देत होते. विशेष म्हणजे जुने संपर्क देखील ते विसरले नव्हते. एक सहा सात वर्षांपूर्वी छत्रपती सेवा प्रतिष्ठान तर्फे दिद्वत्तरत्न पुरस्कार लता मंगेशकर यांना द्यायचे ठरले. त्यासाठी नागपुरात विष्णूजी की रसोई मध्ये त्यांनी पत्र परिषद आयोजित केली होती. पत्र परिषदेला अर्धा तास असतानाच त्यांनी पत्र परिषदेचे संयोजन करणारा नितीन कुलकर्णी याला अविनाश पाठकला बोलावले आहे की नाही अशी विचारणा केली. नितीनचा मला तातडीने फोन आला. “अविनाशजी कसेही करा आणि तुम्ही या, महाराजांनी तुमची आठवण केली आहे” मग मी देखील लगेचच हातचे काम बाजूला ठेवत विष्णूजी की रसोई ला पोहोचलो. पत्र परिषद नुकतीच सुरू झाली होती. मला पाहताच विजय रावांनी ओळखीचे स्मित केले आणि कार्यक्रम संपल्यावर आवर्जून समोर बोलावून घेतले. “तू आलास म्हणजे विदर्भाबाहेरच्या चार-पाच वृत्तपत्रांमध्ये बातमी येते, त्यामुळे तुझी आठवण होतेच” असे सांगत त्यांनी बाकी सर्व कौटुंबिक बाबींची देखील आवर्जून चौकशी केली होती.

२०२४ मध्ये जळगावचे माझे एक मित्र आणि शिवप्रेमी रवींद्र पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील साहित्याचे आणि साहित्यिकांचे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्यासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना विजयरावच हवे होते. विजयारावांना फोन केला, विजयराव तत्काळ तयार झाले. मग रवींद्र पाटील यांनी देखील त्यांना फोन केला आणि रीतसर निमंत्रण देण्यासाठी रविंद्र पाटील नागपुरात जातीने आले होते. त्या दिवशी मी, रवींद्र पाटील त्यांच्या सहकारी भारती साठे असे सर्वच जण विजयरावांच्या घरी जयप्रकाश नगर मध्ये गेलो होतो. त्यांच्या घरी आता दत्त मंदिराची देखील स्थापना झाली होती. तिथेच वरच्या मजल्यावर त्यांनी उपासना केंद्र देखील स्थापन केले होते. संध्याकाळच्या वेळी आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे भक्तांची बरीच गर्दी झाली होती. तिथे गेल्यावर विजयरावांनी आमचे तिघांचेही व्यवस्थित स्वागत केले होते. सर्व उपस्थितांना रवींद्र पाटील आणि भारती साठे यांचा परिचय करून दिला आणि मग माझ्याबद्दल बोलताना म्हणाले “अविनाश आपला नागपूरचाच आहे, आपल्या सर्वांचाच जुना स्नेही आहे, माझे त्याचे खूप वर्षापासून स्नेहसंबंध आहेत”. त्या दिवशी विजयरावांनी मंदिरातर्फे आमचा सगळ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला होता. मग त्या उपासना सभागृहातून खाली विजयरावांच्या घरी आम्ही बसलो. तिथे चहा सोबत जुन्या गप्पा देखील रंगल्या होत्या.

दुर्दैवाने माझी आणि विजयरावांची ही शेवटचीच भेट ठरली. काही कौटुंबिक अडचणींमुळे मी साहित्य संमेलनाला जाऊ शकलो नाही. नंतर एक महिन्याभरातच मी चिकनगुनियाचे निमित्त होऊन चांगलाच आजारी पडलो. तर जवळजवळ सहा सात महिने अंथरुणावर आडवाच होतो. परिणामी वाहन चालवणे आणि कोणाला भेटणे यावर खूप बंधने आली होती. बाहेर कार्यक्रमांमध्ये वगैरे मी फारसा जात नसे.

विजयराव देखील आता थकले आहेत असे इतर सुहृदांकडून कळत होते. अनेकदा त्यांना भेटायला जायचे ठरवत होतो, पण योग येत नव्हता.

आणि ११ फेब्रुवारीला रात्री अचानक समाज माध्यमावर विजयराव गेल्याचीच बातमी आली. मी कन्फर्म करण्यासाठी टीव्ही लावला तर एबीपी माझावर देखील ती बातमी त्यांनी जाहीर केली होती. दुसऱ्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी त्यांची भक्त आणि सुहृद यांची प्रचंड गर्दी झाली होती. ती बघता या शिवप्रेमी संन्यास्याने आयुष्यात काय कमावले याची प्रचिती येत होती.

विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरुदास महाराज हे माझ्या तुलनेत वयाने तर ज्येष्ठ होतेच, त्याचबरोबर ज्ञानाने व्यासंगाने आणि कर्तृत्वाने देखील मोठेच होते. तरीही त्यांचा माझा संबंध आला आणि त्याचे रूपांतर स्नेहबंधात झाले. हा स्नेहबंध त्यांनी अखेरपर्यंत जपला होता. रिझर्व बँकेतले एक कर्मचारी, शिवचरित्राचे एक अभ्यासक, एक प्रभावी वक्ते, एक कुशल संघटक आणि एक अध्यात्मिक संन्यस्त व्यक्तिमत्व अशा विविध रूपांमध्ये मी त्यांना जवळून अनुभवू शकलो हे मी माझे भाग्यच समजतो.

Views: 34
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मानवाधिकारांच्या रक्षणासाठी सज्ज व्हा _ अमरदीप आपगेवलखड येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची कार्यशाळा संपन्नमायणी

मानवाधिकारांच्या रक्षणासाठी सज्ज व्हा _ अमरदीप आपगेवलखड येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची कार्यशाळा संपन्नमायणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)