मराठीचे खरे सामर्थ्य तिच्या बोलींमध्ये : बाळासाहेब कांबळे
मायणी प्रतिनिधी
“मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती एक समृद्ध संस्कृती आहे. संत आणि समाजसुधारकांच्या वारशामुळे या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र, मराठीचे खरे सामर्थ्य तिच्या विविध बोलीभाषांमध्ये दडलेले असून, मौखिक परंपरेतील या बोलींचा सन्मान होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकार बाळासाहेब कांबळे यांनी केले.येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे उपस्थित होते. कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ‘युवास्पंदन’ या भित्तिपत्रकाच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन झाले.त्याचबरोबर रयत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बाळासाहेब कांबळे यांच्या ‘भीनवाडा’ या कादंबरीचा समावेश झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
कादंबरीकार कांबळे पुढे म्हणाले, “साताऱ्याच्या पूर्वेला माणदेशी, पश्चिमेला जावळी, कराडची रांगडी आणि वाई-शिरवळमधील पुणेरी वळणाची भाषा अशा विविध बोलींनी मराठी नटलेली आहे. विद्यार्थ्यांनी या भाषेच्या विविध रूपांचा अभ्यास केला पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यावर भर दिला. “भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल, तर वाचनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. डॉ. विजया कदम यांनी कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता सादर केली, तर कु. श्रेया शिंदे हिने पर्यावरण संवर्धनावर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती माळी यांनी केले आणि आभार डॉ. सुनील साठे यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. शौकतअली सय्यद, प्रा. शिवशंकर माळी, प्रा. श्रीकांत कांबळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


