पूरग्रस्त भागातील वाचनालयांना ३००० पुस्तकांची मदत
-युवकमित्र परिवाराचा उपक्रम-
-नुकत्याच आलेल्या महापूरामुळे कोल्हापूर,सांगली,रायगड,रत्नागिरी जिल्ह्यात मोठया प्रमाणावर नुकसान झाले.यात काही वाचनालयांमध्ये पुराचे पाणी शिरले आणि हजारो पुस्तकं वाहून गेली.फर्निचर व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.अशा वाचनालयांना पुण्यातील ‘युवकमित्र परिवार’ या वाचन चळवळ राबविणाऱ्या संस्थेमार्फत तब्बल ३००० पुस्तके मोफत भेट देण्यात आली.पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ शिवकालीन इतिहास संशोधक,लेखक डॉ. अजित आपटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बुक क्लब चे संस्थापक अविनाश निमसे,स्नेहल निमसे,सद्गुरू सेवा प्रातिष्ठानचे अध्यक्ष सचिन म्हसे,सदविचार वाचनालय आसनपोई,रायगड चें अध्यक्ष उत्तम देशमुख,युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन हे होते.
वाचनालयांना भेट देण्यात आलेली सर्व पुस्तके ही पुणे,मुंबई शहरातील वाचून झालेली,सुस्थितीत पुस्तके असून युवकमित्र परिवाराने ती पुस्तक संकलन मोहीम राबवून संकलित केल्याचे युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी सांगितले.उदघाटक अजित आपटे यांनीसुद्धा यावेळी मनोगत व्यक्त केले.अविनाश निमसे यांनी वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले.आभार सचिन म्हसे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीत्यासाठी रविराज निमसे यांनी सहकार्य केले.