आयुष्यातले सांगाती – ४८
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
डॉ . तनुजा नाफडे…
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
डॉ. तनुजा नाफडे हे नाव घेतले की भारतीय लष्करासाठी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७१ वर्षांनी सर्वप्रथम भारतीय सुरावटीची मार्शल ट्यून संगीतबद्ध करून देणाऱ्या गायिका आणि संगीतकार म्हणूनच ओळखल्या जातात. मात्र त्यांची ओळख फक्त तेवढीच नाही. भारतीय शास्त्रीय संगीताचा विविधांगी अभ्यास करणा-या अभ्यासक, एक विद्यार्थीप्रेमी प्राध्यापक, एक कुशल प्रशासक, आणि सर्वांशी सौहार्द जपून माणसं जोडणारे एक व्यक्तिमत्व म्हणूनही त्या ओळखल्या गेल्या आहेत. त्यांनी ज्यांच्याशी मैत्र जपले त्या अनेकांपैकी मी देखील एक आहे.
तनुजा नाफडे यांचा माझा परिचय जेमतेम गेल्या आठ वर्षातला, मला आठवते २०१८ च्या जुलै महिन्यात माझे धरमपेठ महाविद्यालयातील एक प्राध्यापक आणि नंतरचे कौटुंबिक स्नेही मेजर कृष्णराव खोत यांचा नाशिकहुन फोन आला. खोत सर सध्या नाशिकलाच स्थायिक झाले आहेत. अव्या तुला डॉ तनुजा नफडेंचा फोन येईल. त्या आपल्या कॉलेजमध्येच संगीताच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी केलेले काम खूप मोठे आहे, मात्र ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे तू त्यांना मदत करावीस असे मला वाटते. मी त्यांना होकार दिला. मात्र त्यावेळी नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन चालू होते. त्यामुळे अधिवेशन संपल्यावर मी त्यांना भेटेल असे मी खोत सरांना कबूल देखील केले. लगेचच दुसऱ्या दिवशी तनुजा नाफडेंचा देखील मला फोन आला. त्यांनाही मी अधिवेशन संपल्यावर भेटतो असे कबूल केले आणि त्यांचा नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवला.
तोपर्यंत तनुजा नाफडे हे नाव नागपूरच्या संगीत क्षेत्रातील एक गायिका म्हणून मी ऐकले होते. मात्र त्यांचा माझा कधी परिचय नव्हता आणि नागपुरात त्या फारशा त्यावेळी पुढे देखील आलेल्या दिसत नव्हत्या. त्यामुळे माझी त्यांची प्रत्यक्ष भेट होण्याचा प्रश्नच नव्हता.
ठरल्यानुसार अधिवेशन संपल्यावर मी फोन करून एका रविवारी दुपारी नाफडेंच्या अभ्यंकर नगर मधल्या निवासस्थानी पोहोचलो. माझ्या आठवणीनुसार तो जुलै २०१८ चा तिसरा किंवा शेवटचा रविवार होता. तीन मजले चढून गेल्यावर बेल वाजवली. तेव्हा दरवाजा उघडायला एक मध्यमवयीन महिला समोर आली. जेमतेम सव्वापाच फूट उंची, शिडशिडीत बांधा, ऑफ व्हाईट कलरचा सलवार कुर्ता आणि दोन्ही खांद्यांवर घेतलेली ओढणी, गौरवर्ण, बॉयकट केशरचना, डोळ्याला नाजुकसा चष्मा, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज आणि अर्थातच स्मितहास्य अशी ही महिला पाहून याच बहुदा तनुजा नाफडे असाव्यात असा मी अंदाज बांधला. त्यांनी या म्हणून स्वागत करताच मी अविनाश पाठक अशी मी माझी ओळख करून दिली. त्यांनी लगेचच या मीच तनुजा नाफडे म्हणून माझे स्वागत केले. त्या स्वागतातही त्यांच्या आवाजात दडलेले संगीताचे माधुर्य मला लगेचच जाणवून गेले.
मग त्यांच्या ड्रॉइंग रूम मध्ये बसूनच आमची सविस्तर चर्चा झाली. थोड्या वेळाने त्यांचे यजमान रवी नाफडे हे देखील चर्चेत सहभागी झाले. रवी हे एक उत्तम आर्किटेक्ट आणि इथल्याच एका आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यावेळी कार्यरत होते.
बोलण्याच्या ओघात त्यांनी आतापर्यंत काय काय काम केले आहे ते कळल्यावर मला देखील धक्का बसला. वस्तूतः दीर्घ काळापासून मी पत्रकारिता क्षेत्रात वावरणारा, तसेच साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील माझी बऱ्यापैकी लुडबुड असते. तरीही त्यांच्या एकूणच उपलब्धीबद्दल मला फारशी कल्पना नव्हती. संगीतात एम ए केल्यावर त्यांनी एम फिल सुद्धा केले होते. प्रभा अत्रेंसारख्या ख्यातनाम गायिकेकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले होते. नंतर रवी नाफडेंशी लग्न झाल्यावर नागपुरात येऊन त्यांनी पीएचडीसाठी संशोधन सुरू केले. १५ व्या शतकात भारतात भारतीय शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारित जी चित्रे तयार केली गेली होती त्या चित्रांचा संगीताच्या दृष्टीने अभ्यास करून भारतीय शास्त्रीय रागमालांशी ही चित्रे कशी सुसंगत आहेत हे त्यांनी आपल्या अभ्यासातून सिद्ध केले होते. याआधी काही जर्मन विद्वानांनी या चित्रांचा अभ्यास करून जरी ही रागमालांची चित्रे म्हणून ओळखली जात असली, तरी प्रत्यक्ष रागांशी यांचा काही संबंध नाही असा निष्कर्ष काढला होता. तो निष्कर्ष खोडून काढण्याचे काम तनुजा नाफडे यांनी त्यावेळी केले. चित्र महर्षी बाबुराव सडवेलकर हे या संशोधन प्रकल्पात त्यांचे मार्गदर्शक होते. त्यांचा हा संशोधन प्रकल्प चांगलाच गाजला आणि त्यांना नागपूर विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली होती. त्यांच्या या कामाबद्दल कळल्यावर संघाचे तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी यांनी त्यांना भेटीला बोलावून घेतले होते.
त्याशिवाय विख्यात शास्त्रीय गायक पंडित हरिहरन यांच्या समवेत त्यांचा एक म्युझिकल अल्बम देखील प्रकाशित झाला होता. तो अल्बम देखील बऱ्यापैकी गाजला होता. रंग दे या नावाने प्रसिद्ध झालेल्या या अल्बमची देखील बरीच चर्चा झाली होती.
याचबरोबर डॉ. तनुजा नाफडे यांनी रशियाची राजधानी मास्को येथे जाऊन भारतीय शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न म्युझिक यांच्या फ्युजनवर आधारित एक कार्यक्रम देखील सादर केला होता.
शिवाय भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महार रेजिमेंटचे रेजिमेंट गीत त्यांनी संगीतबद्ध केले होते. त्यांचे ते काम तत्कालीन लष्कर प्रमुख मेजर जनरल बिपिन रावत आणि इतर अधिकाऱ्यांना इतके पसंत पडले की त्यांनी त्या गीताची ट्युन ही महार रेजिमेंटची अरे भारतीय लष्कराची मार्शल ट्यून म्हणून वापरावी असा विचार केला. मात्र विद्यमान मार्शल ट्युन बदलून नवीन आणायची तर ती प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची होती. तरीही बिपिन रावत यांनी ते काम मनावर घेतले आणि त्या ट्युनला भारतीय लष्कराची मार्शल ट्यून म्हणून मान्यता मिळण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आली होती. लष्करातील सर्व वाद्य ही पाश्चात्य स्वरूपाची त्यामुळे त्यावर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवले जाणे हे एक आव्हान होते मात्र तनुजा नाफडे यांनी ते केलेले बेलले त्यांनी लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन तिथल्या बँड पथकाला बरेच दिवस थांबून ती ट्युन आणि ते गीत कसे वाजवावे याचे प्रशिक्षण दिले होते.
त्यादिवशी आमच्या इतर काही विषयांवर चर्चा झाल्या. चहापान झाले आणि मग आता काहीतरी काँक्रीट घडले की आपण त्याला चांगले हायलाईट करू या, असे ठरवून मी त्यांचा निरोप घेतला. मात्र त्या दिवसापासून आम्ही एकमेकांशी व्हाट्सअप वर संपर्कात राहिलो होतो.
७ ऑक्टोबर २०१८ च्या सकाळी नेहमीप्रमाणे चहा घेत घेत व्हाट्सअप बघत होतो. अचानक डॉ. तनुजा नाफडेंकडून एक पोस्ट आलेली दिसली. म्हणून मी लगेच उघडून बघितले. त्यात त्यांनी लिहिले होते की त्यांनी बनवलेली मार्शल ट्युन केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने मंजूर केली असून ८ ऑक्टोबर रोजी सकाळी दिल्लीत माणेकशा सेंटरला लष्करप्रमुखांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होत आहे. ती बातमी वाचताच मी सुखावलो आणि लगेचच पुढले नियोजन करायला सुरुवात केली. तनुजा नाफडेंना लगेचच मोबाईलवर फोन लावला आणि दिल्लीहून त्या नागपुरात येताच दुसऱ्याच दिवशी त्यांची या मुद्द्यावर पत्र परिषद आयोजित करण्याबाबत मी त्यांना सुचवले. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून मलाच ते सर्व नियोजन करण्याबाबत सुचवले. त्यानुसार मी कामाला देखील लागलो. ८ ऑक्टोबर चा लोकार्पण समारोह आटोपून त्या ९ ऑक्टोबरच्या रात्री विमानाने नागपुरात परत येणार होत्या. ८ ऑक्टोबरलाच मी माझा संपर्क वापरून लष्कराचे नागपुरातील जनसंपर्क अधिकारी बी बी पांडे यांच्याशी संपर्क केला. त्यांना हे वृत्त कळताच त्यांनी त्याच दिवशी दिल्लीहून सकाळी माणेकशॉ सेंटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाची बातमी बोलावली. त्यात डॉ. तनुजा नाफडे या नागपूरच्या आहेत हे नमूद करून ती बातमी सर्व स्थानिक माध्यमांना पाठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे वातावरण अनायासेच तयार झाले. तनुजा नाफडे ९ ऑक्टोबरला रात्री येणार असल्यामुळे मी १० ऑक्टोबरला दुपारी साडेचार वाजता त्यांची पत्रपरिषद प्रेस क्लब मध्ये ठरवली. त्यादिवशी दुपारीच मी त्यांच्या घरी जाऊन काही वेळ त्यांच्याशी चर्चा केली आणि पत्र परिषदेत काय बोलायचे, प्रेस नोट काय द्यायची, या विषयावर चर्चा करून पुढले निर्णय घेतले. प्रेस कॉन्फरन्सला लष्कराचे जनसंपर्क अधिकारी पांडेंनाही निमंत्रित केले.
दरम्यानच्या काळात माध्यम प्रतिनिधींमध्ये ही बातमी पसरलेली असल्यामुळे दुपारी पत्र परिषदेच्या आधीच काही वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी तिथेच तनुजा नाफडे यांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्या. ठरल्याप्रमाणे दुपारी साडेचारला पत्र परिषद झाली. पत्र परिषदेला काहीतरी वेगळे घडते आहे हे लक्षात घेत पात्र प्रतिनिधींची भरगच्च उपस्थिती होती. तिथेच आम्ही वाईड स्क्रीनवर मार्शल ट्यून चे चित्रीकरण दाखवण्याची देखील व्यवस्था केली होती. पूर्वी पुराण काळात लढाईच्या वेळी युद्ध सुरू करायचे असेल तर शंख वाजवून शंखनात केला जात असे आणि मग युद्धाला सुरुवात होत असे. लष्कराची संपूर्ण भारतीय सुरावटीची मार्शल ट्युन असल्यामुळे त्याचे नाव देखील शंखनाद असेच ठेवण्यात आले, ही माहिती त्यावेळी डॉ. नाफडे यांनी दिली. त्यामुळे सर्वांनाच डॉ. तनुजा नाफडे यांनी किती महत्त्वाचे काम केले आहे याची पूर्ण कल्पना आली.
त्या दिवशी संध्याकाळी नागपूर आकाशवाणीने ही बातमी दिली. मग सर्व वृत्तवाहिन्यांवर देखील बातमी येणे सुरू झाले. दुसऱ्या दिवशी नागपूरच्या बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी ही बातमी अगदी भरभरून दिली. होती. त्यामुळे एकाच दिवसात डॉ. तनुजा नाफडे या सेलिब्रिटी बनल्या होत्या.
त्या पाठोपाठ विविध नियतकालिकांनी त्यांच्या कामाची दखल घेतली. त्यावर्षी लगेचच आलेल्या दिवाळीच्या दरम्यान किमान पाच ते सहा दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या या शंखानादच्या कामावर मी लिहिलेले लेख देखील प्रकाशित झाले होते.
या सर्वच प्रकारामुळे नाफडेमंडळींचा माझ्यावरचा विश्वास बराच वाढला होता. मग अधून मधून आमच्या भेटी होत राहिल्या. त्यातून स्नेहबंध निर्माण होत गेले.
त्यावर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत महार रेजिमेंट तर्फे गेट वे ऑफ इंडिया जवळ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. तिथे मार्शल ट्यून बनवल्याबद्दल तनुजा नाफडे यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्या कार्यक्रमाला मी यावे असा तनुजाताईंचा आग्रह होता. मी देखील माझ्या कामांचे नियोजन केले आणि मुंबईला जायचे ठरवले. मात्र दुर्दैवाने कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी नागपुरात माझा स्कूटर एक्सीडेंट झाला आणि उजवा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे महिनाभर मला नागपुरात अडकून राहावे लागणार होते. परिणामी मी मुंबईच्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. मात्र ज्या दिवशी संध्याकाळी मुंबईत कार्यक्रम होता, त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता मुंबई दूरदर्शनवर त्यांची मुलाखत माझे संपर्क वापरून आयोजित केली होती. ठरल्याप्रमाणे मुंबईत सत्कार झाला आणि मग लगेच रात्री साडे नऊला मुंबई दूरदर्शनवर त्यांची लाईव्ह मुलाखत झाली.
मुंबईहून परत आल्यावर नाफडे मंडळी लगेचच मला घरी भेटायला आली. माझ्या पायाचे प्लास्टर कधी निघणार याची त्यांनी चौकमी केली आणि २६ जानेवारीला दिल्लीत गणराज्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ही मार्शल ट्युन वाजवली जाणार असून त्या कार्यक्रमासाठी आमच्याबरोबर तुम्हीही चला असा त्यांनी खूप आग्रह केला. मग डॉक्टरची परवानगी असेल तर मी नक्की येईल असे त्यांना आश्वासन दिले. दरम्यान दिल्लीतल्या माझ्या पत्रकार मित्रांना सांगून तिथेही कार्यक्रमाचे नियोजन कसे करता येईल ही व्यवस्था देखील केली.
गणराज्य दिनाच्या दहा-अकरा दिवस आधी म्हणजेच १५ जानेवारीला दिल्लीत आर्मी डे साजरा होत असतो. त्या दिवशी देखील ही मार्शल ट्युन न वाजवली जाणार होती. त्यासाठी नाफडे मंडळींना तिथे निमंत्रण होते. त्यादिवशी रात्री आर्मी डे च्या निमित्त झालेल्या स्नेहभोजन समारंभात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत त्यांचे बोलणे होऊन त्यांनी देखील तनुजा नाफडेच्या कामाची दखल घेतली. दिल्लीहून परत येताच त्या मला भेटल्या आणि दिल्लीला तुम्ही आमच्यासोबत विमानाने चालावे असा आग्रह त्यांनी केला. तोवर माझ्या पायाचे प्लास्टर निघाले होते आणि हातात काठी घेऊन हिंदू फिरू लागलो होतो. त्यामुळे मग मी देखील दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. आर्मी डे साठी तनुजा नाफडे दिल्लीत गेल्या असताना तिथे माझ्या पत्रकार मित्रांच्या मार्फत महाराष्ट्र परिचय केंद्रात यांचा सत्कार घडवून आणला होता. त्याला महाराष्ट्रभर भरपूर प्रसिद्धी मिळाली. मग मी गेल्यावर तिथे दिल्लीतील सर्व पत्रकार मित्रांची महाराष्ट्र परिचय केंद्रातच पत्र परिषद आम्ही आयोजित केली. त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला. २५ आणि २६ जानेवारीला ही बातमी देशावर पोहोचली होती.
२६ जानेवारी च्या सकाळी मी देखील दिल्लीतच होतो. मात्र गणराज्य दिनाच्या कार्यक्रम स्थळी जायचे तर तिथे बरेच पायी चालावे लागणार होते. तितके पायी चालणे मला शक्य झाले नसते. त्यामुळे मी महाराष्ट्र सदनाच्या रूममध्ये बसूनच टीव्हीवर कार्यक्रम पाहिला. त्या दोन दिवसात आम्ही महाराष्ट्रातील मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुभाष भांबरे प्रभृतींना देखील भेटलो होतो.
नागपुरात आल्यावर देखील विविध संस्थांनी त्यांचे सत्कार समारंभ आयोजित केले होते. मग महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या महिला आयोगातर्फे मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावले गेले. त्या दिवशी मुंबईत मंत्रालय वार्ताहर संघात देखील त्यांचा सत्कार झाला आणि त्यांची पत्रपरिषद देखील झाली. या सर्वच बाबींचे श्रेय त्या वारंवार मला देत होत्या. मात्र त्यांनी जे काम केले त्यामुळे हे होते आहे याची मलाही जाणीव होते.
त्याच वर्षी १४ फेब्रुवारी रोजी नागपुरात भोसले परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय राजरत्न पुरस्कार समारंभात मला पत्रकारितेतील राज्य रत्न पुरस्कार देऊन माझा सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे कळतच दुसऱ्याच दिवशी नाफडेमंडळी आली होती, आणि त्यांनी माझे कौतुक देखील केले होते. मग या पुरस्कारानिमित्त आयोजित स्नेहभोजनाला देखील नाफडे मंडळी आली होती. या दरम्यान संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का तसेच पूर्व संचालिका प्रमिलाताई मेढे यांनाही आम्ही जाऊन भेटलो होतो.
या दरम्यान त्यांचे आणि माझे फक्त व्यक्तिगत संबंध न राहता आमचे कौटुंबिक संबंध देखील प्रस्थापित झाले होते. दरवेळी त्या आवर्जून घरच्या सर्व मंडळींची चौकशी करायच्या. आम्हाला त्यांनी काही निमित्ताने सहकुटुंब त्यांच्या घरी स्नेहभोजनाला बोलावले होते. आमच्या घरी देखील दरवर्षी होणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या अभिषेकाचे वेळी आम्ही त्यांना निमंत्रित केले होते. २०१९ मध्ये मी भारत विकास परिषदेचा नागपूर शाखेचा अध्यक्ष म्हणून निवडणूक गेलो. आमच्या पदग्रहण समारंभाला तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आले होते. त्याला देखील नाफडे मंडळी उपस्थित होती. दोनच दिवसांनी नागपूरच्या सायंटिफिक सभागृहात आम्ही भारत विकास परिषदेतर्फेच त्यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला. सारेगम ते शंखनाद या शीर्षकाचा हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम चांगलाच गाजला. आकाशवाणी निवेदिका प्रभा देऊस्कर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला देखील भरपूर प्रसिद्ध मिळाली होती. या काळात मी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना तसेच माझ्या बहुतेक सर्व पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांना देखील त्या आवर्जून उपस्थित राहायच्या.
याच दरम्यान कोरोना आला. त्यामुळे संपूर्ण देश ठप्प झाल्यासारखाच झाला होता. त्यामुळे महाविद्यालय काही काळ बंदच होते. मात्र त्या काळातही तनुजा नाफडे यांची संगीता साधना सुरूच होती. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन सहका-याकडून कोरोना संदर्भात एक गीत तयार करून घेतले. ते संगीतबद्ध केले आणि आपल्या काही विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी ते गायिले व
देखील. छायेत जग जरी संकटाच्या, धीर धर तू भारती.. संकटातून ज्योत सावर.. विश्व गायील आरती.. अशा या गीताचा व्हिडिओ तयार करून तो युट्युब वर टाकला गेला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. याच काळात कोरोना थोडा कमी झाल्यावर त्यांना प्रादेशिक सेनेचे गीत संगीतबद्ध करण्यासाठी देखील बोलावले गेले होते. पाठोपाठ लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींची जी संघटना आहे तिच्यासाठी देखील यांना गीत सादर करण्यासाठी बोलावले गेले. त्यावेळी जनरल विपीन रावत यांच्या पत्नींशी तनुजा नाफडे यांचे खूपच जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले होते.
२०२० मध्येच त्यांची धरमपेठ महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली होती त्याच दरम्यान त्यांचा मोठा मुलगा निखिल याचा विवाह निश्चित झाला. हा विवाह समारंभ जानेवारी २०२१ मध्ये ठरला होता. या समारंभाला आम्ही सर्वांनी पुण्यात यावे असा त्यांनी प्रेमाचा आग्रह खूप केला. मग त्यांच्या विनंतीला मान देत मी आणि माझी पत्नी अनुरूपा उभयता याच मंडळींसोबत बसने पुण्याला गेलो होतो. दोन दिवस पुण्यात आम्ही त्यांच्यासोबत लग्न एन्जॉय केले होते. नंतर नागपुरात झालेल्या रिसेप्शनला देखील आम्ही सर्वच उपस्थित राहिलो होतो.
डिसेंबर २०२१ मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी यांचे हेलिकॉप्टर अपघातात अकाली निधन झाले होते. संपूर्ण देश त्यामुळे हादरला होता. त्यावेळी एका रोटरी क्लब मध्ये मी सक्रिय होतो. रोटरी तर्फे शंखनाद या लष्कराच्या पहिल्या भारतीय सुरावटीच्या मार्शल ट्युनच्या जडणघडणीत त्यांचे आणि बिपिन रावत यांचे खूप जवळचे संबंध आले होते. त्यावेळी रोटरी तर्फे एखादा कार्यक्रम घ्यावा असे डोक्यात आले. मग तनुजा नाफडे यांनीच माझ्या विनंतीवरून जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी यांचे अनुभव कथन केले होते. यावेळी देखील प्रभा देउसकर यांनीच त्यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.
नंतरच्या काळात आमच्या नियमित भेटीसाठी सुरूच राहिल्या. मला आठवते २०२२ मध्ये एका शासकीय पदावर नियुक्तीसाठी मी प्रयत्न करत होतो. त्यासाठी मला काही मान्यवरांची प्रशस्तीपत्रके हवी होती. मी तनुजा नाफडेंना विनंती केली. तेव्हा त्यांनी लगेच मला त्यांचे लेटरहेड दिले आणि तुम्हाला हवे तसे पत्र तयार करा, मी सही करून देते, असे सांगितले. लगेच पत्र तयार करून त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी ते तातडीने सही करून मला देऊ केले होते. त्याच कामासाठी त्यांनी माझ्याकरिता काही मान्यवरांकडे शब्द देखील टाकला होता.
तनुजा नाफडे यांनी दै्. महाराष्ट्र टाइम्समध्ये संगीतावरच एक लेखमालिका लिहिली होती. त्या स्तंभाचे कलेक्शन रागरंजन या नावाने पुस्तकरुपात प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ ऑगस्ट २०२२ मध्ये नागपूरच्या राजभवानात म्हणजेच आजच्या लोक भवनात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते पार पडला. राजभवनवर कार्यक्रम म्हणजे मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जात असतो. मात्र त्या ठिकाणी आम्हा उभयतांना त्यांनी आवर्जून बोलावले होते. त्या कार्यक्रमाला राज्यपाल प्रमुख अतिथी तर अध्यक्ष म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का होत्या. पुस्तकावर भाष्य करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित होते. अशा सर्व मान्यवरांच्या मांदियाळीत त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मी करावे असा आग्रह धरला. हे आभार प्रदर्शन एक तर प्रकाशकाने करावे किंवा मग नाफडे कुटुंबीयांपैकी कोणीतरी करावे असे मी सुचवले. तेव्हा तुम्ही देखील आमच्या कुटुंबापैकीच एक आहात, त्यामुळे तुम्हीच आभार प्रदर्शन करा असा उभयतांनी माझ्याजवळ आग्रह धरला. परिणामी आभार प्रदर्शन मलाच करावे लागले होते. त्या कार्यक्रमाला देखील भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.
२०२२ च्या सप्टेंबर महिन्यात माझी मुलगी दिव्येशा एम टेक करण्यासाठी पुण्यात गेली. तिथे ती पुढे विद्यापीठाच्या वसतिगृहातच राहणार होती. तनुजाताईंना हे कळताच त्यांनी लगेचच पुण्यात मुक्कामी असलेला त्यांचा मुलगा निखिल आणि सून निहारिका यांना कळवले आणि दिव्येशाला काही गरज लागल्यास तुम्ही मदत करा असेही सांगितले होते. दिव्येशा पुण्यात शिक्षणासाठी दोन वर्ष होती. मार्च २०२४ मध्ये तनुजा नाफडे प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. त्यानंतर पुण्यात त्यांच्या नातेवाईक आणि स्नेही मंडळींनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी दिव्येशाला आवर्जून बोलावून घेतले होते.
जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत उभारलेल्या राम मंदिराचे लोकार्पण झाले. त्यावेळी मी अखिल भारतीय साहित्य परिषदेचा विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष होतो. राम मंदिर लोकार्पणानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जात होते. मी सहज सुचवले आणि तनुजा नाफडे यांनी “पधारो राम, बिराजो राम” हे गीत संगीतबद्ध केले. त्याच्या व्हिडिओचे लोकार्पण आम्ही नागपुरात रामनगरच्या राम मंदिरात डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर आणि डॉ. नंदा पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत केले होते.
२०२४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांची संगीतसाधना अविरत सुरूच आहे. इतक्यातच त्यांचा एक जाहीर कार्यक्रम रायपूर येथे, एक कार्यक्रम नागपुरात चिटणीस सेंटर येथे, एक कार्यक्रम दिल्लीत इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे,दोन कार्यक्रम नाशिक येथे झाले सर्वच कार्यक्रमांना उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता. त्यातील दोन कार्यक्रम जपानी वादकांबरोबर फ्युजनचे कार्यक्रम होते. ते देखील चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. अजूनही ठिकठिकाणी त्यांना कार्यक्रमांची निमंत्रणे येतच आहेत. विविध मान्यवरांच्या कविता संगीताबद्ध करून त्या गाण्याचा देखील त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
याशिवाय त्यांनी ही जी मार्शल ट्युन शंखनाद संगीतबद्ध केली, त्याच्या जडणघडणीच्या प्रवासावर त्यांनी हिंदी पुस्तक लिहिले आहे. ते लवकरच प्रकाशित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कालच त्या संदर्भात नागपुरातीलच एका प्रकाशकासोबत त्यांची बैठक होती. त्यावेळी देखील त्यांनी मला आवर्जून बोलावून घेतले होते. शिवाय त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधावर आधारित जे पुस्तक प्रकाशित झाले होते, त्याची दुसरी आवृत्ती देखील लवकरच प्रकाशित होते आहे. असे एकूणच त्यांचे अविरत संगीत साधनेचे कार्य सुरूच आहे आणि ते निरंतर सुरू राहणारच आहे.
त्यांच्या या संगीत साधनेत महत्त्वाचा टप्पा हा आहे की जगात लष्करासाठी मार्शल ट्यून बनवण्याचे काम कोणीही गैरलष्करी व्यक्तीने केले नव्हते. तसेच कोणीही महिलेने केलेले नव्हते. डॉ. तनुजा नाफडे या जगातील पहिल्याच गैरलष्करी व्यक्ती आहेत, तर पहिल्याच महिला संगीतकार देखील आहेत.
काही निमित्ताने माझे आणि नाफडे परिवाराचे संबंध आले आणि नंतर ते स्नेहबंधात रूपांतरित झाले. कोणतेही संबंध टिकवायचे तर ते एकतर्फी टिकत नाहीत. त्यासाठी दोन्ही हाताने टाळी वाजवावी लागते. येथे तनुजा नाफडे यांनी कायम माझ्यासमोर टाळीसाठी हात पुढे केला आहे. तसा विचार करता आज त्या सेलिब्रेटी आहेत आणि मी एक सामान्य पत्रकार, तरीही त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला आणि त्यातून निर्माण झालेले स्नेहबंध जपले, हे एक विशेष आहे.


