घ्या समजून राजेहो
“वि. सा. संघ निवडणुकीत डॉ. श्रीपाद जोशींचे हास्यास्पद प्रकार थांबायलाच हवेत
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
सध्या विदर्भाच्या साहित्य वर्तुळात विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकांचे वातावरण तापलेले दिसते आहे. या निवडणुकीत एक प्रचार वारंवार होतो आहे, तो म्हणजे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अप्रत्यक्षरीत्या उतरला असून अध्यक्षपदासाठी एका विशिष्ट उमेदवाराला आणि त्याच्या पॅनलला फक्त पाठिंबाच देतो आहे, असे नाही तर त्यांच्यासाठी मते गोळा करण्यात करिता पक्षाची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली गेलेली आहे.
या निवडणुकीत अर्ज दाखल करतेवेळी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणारे एक उमेदवार माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांनी आपण नागपूरचे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या सूचनेवरून निवडणूक लढवत असल्याचा दावा केला. त्यावरून वातावरण तापायला सुरुवात झाली. अध्यक्षपदाचेच आणखी एक उमेदवार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जी व्यक्ती साहित्यिक नाही, अशा राजकीय व्यक्तीने राजकीय नेत्याच्या पाठिंब्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणे चूक आहे, आणि या व्यक्तीला नितीन गडकरी यांनी पाठिंबा देणे ही गैरच आहे, असे लगेचच पत्रक काढले आणि गडकरींना देखील पत्र पाठवले. नितीन गडकरींनी लगेचच याबाबतीत खुलासा करत आपला कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही हे स्पष्ट केले. इथे हे प्रकरण थांबायला हवे होते. मात्र नंतर सर्व अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपली आणि साडेतीन पॅनल घोषित झाल्या. त्यावेळी गिरीश गांधींच्या पॅनलचा प्रचार भाजपचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर करत आहेत असा आरोप काहींनी केला. त्याबाबत कोठेकरांनी देखील खुलासा केला आणि आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला. तरीही कोठेकर छुपा प्रचार करतच आहेत आणि त्यांनी पूर्ण विदर्भात ठीक ठिकाणी भाजपची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा कामाला लावली आहे, असाही आरोप श्रीपाद जोशी गटाकडून वारंवार केला जातो आहे.
हा आरोप फक्त तोंडोतोंडी असता तरी चालले असते. मात्र डॉ. श्रीपाद जोशींनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप थांबवा अशी मागणी केली. नंतर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनाही पत्र लिहिले आणि आता शेवटी त्यांनी चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र लिहून आपल्या पक्षाच्या काही नेत्यांकडून केला जात असलेला हा प्रचार थांबवावा आणि साहित्य संस्थांची स्वायत्तता जपली जाण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
डॉ. श्रीपाद जोशींनी नितीन नवीन यांना जे पत्र लिहिले, त्यातील काही मजकूर काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केला आहे.
आपल्या पत्रात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपल्या पक्षाचे विदर्भातील काही नेते या निवडणुकीत विदर्भ साहित्य संघाच्या या निवडणुकीत हस्तक्षेप करत असून साहित्यिक नसलेल्या व्यावसायिक व्यक्तीला अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषित करून त्याला निवडून आणण्यासाठी आपल्या पक्षाची सर्व यंत्रणा कामाला लावत आहेत याकडे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर साहित्य संस्थांचे स्वायत्तपण जपले जावे यासाठी सत्ताधारी राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन हस्तक्षेप थांबवावा हे या पक्षाच्या प्रमुखांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
डॉ. श्रीपाद जोशींनी आपल्या पत्रात साहित्य संस्थांचे स्वायत्तपण जपण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे, तसेच त्यात राजकीय हस्तक्षेप नको असेही ते म्हणतात. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षात स्वायत्त साहित्यिक संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाला आहे, आणि विशेषतः श्रीपाद जोशी ज्या डाव्या विचारसरणीकडे झुकलेले आहेत असे जाणवते, त्या डाव्या विचारसरणीच्या अवाङ्मयीन व्यक्तींनी देखील साहित्य चळवळी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले असून त्या कायम आपल्याच ताब्यात ठेवल्या आहेत, असे दिसून येते. श्रीपाद जोशींना या बाबींची कल्पना असणारच याबाबत मला खात्री आहे.
वस्तुतः ज्या डॉ. गिरीश गांधींना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विदर्भातील आपली यंत्रणा कामाला लावली आहे असा आरोप डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी करतात त्या गिरीश गांधींच्या नावाला व्यक्तिशः माझा देखील विरोधच आहे, कारण गिरीश गांधी हे राजकीय व्यक्ती आहेत, आणि राजकारणात आपले बुड स्थिरावू न शकल्यामुळे त्यांनी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनांमध्ये लुडबुड करणे सुरू केले आणि त्याच्याच माध्यमातून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होऊ बघत आहेत. विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष हा एखादा चांगला साहित्यिक असावा असे अपेक्षित आहे. मधल्या काळात २००५ नंतर मनोहर म्हैसाळकर आणि आताचे प्रदीप दाते ही दोन नावे वगळता यापूर्वी अनेक थोर साहित्यिकांनी या साहित्य संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यात कवी अनिल, डॉ. मधुकर आष्टीकर, सुरेश द्वादशीवार, डॉ. वि.भि. कोलते, भवानी शंकर पंडित, प्राचार्य राम शेवाळकर.डॉ. मा.गो. देशमुख अशा विख्यात साहित्यिकांचा समावेश आहे. त्यामुळे तीच परंपरा आता पुढे चालू राहावी असे सर्वच साहित्यप्रेमी नागरिकांना वाटते. स्वतः गिरीश गांधी हे काही साहित्यिक नाहीत. एक चांगले संघटक जरूर असतील, मात्र साहित्य चळवळीचे नेतृत्व त्यांनी करावे असे एक साहित्यप्रेमी म्हणून मला तरी वाटत नाही. त्यामुळेच त्यांच्या नावाला माझा सुरुवातीपासून विरोधच राहिला आहे आणि भारतीय जनता पक्ष विदर्भ प्रांत, तसेच जोशी दावा करतात त्याप्रमाणे संघ परिवाराने गांधींना पाठिंबा दिला असेल तर ते चुकीचेच आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण गांधी हे देखील डावीकडेच झुकलेले आहेत. याबाबतचे त्यांचे विचार एक पत्रकार या नात्याने मला सुद्धा ज्ञात आहेत. त्यांच्या संदर्भात मध्यंतरी समाज माध्यमांवर एक पोस्ट देखील व्हायरल होत होती. त्यात सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये असलेले गिरीश गांधी यांचे सर्वच राजकीय गॉडफादर यांनी संघ विचारांना कसा विरोध केला आहे, त्याचे दाखले दिले होते. ते लक्षात घेता जर भाजप आणि संघ परिवाराने असं पाठिंबा दिला असेल तर तो कुठेतरी चुकीचाच ठरतो.
मात्र त्यासाठी श्रीपाद जोशींनी सरळ भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना ई-मेलने पत्र पाठवणे हे देखील अनाठायी आणि निरार्थक असेच वाटते. आजवर गेल्या ७५ वर्षात आपल्या देशात सर्व साहित्य चळवळींचा ताबा हा डाव्या विचारसरणीच्याच लोकांनी घेतलेला असल्याचे दिसून येते. त्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा देखील त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे इतिहास सांगतो. त्यामुळेच देशासमोर चुकीचा इतिहास मांडला जाणे, नको त्या व्यक्तींना उगाचच डोक्यावर घेतले जाणे असे प्रकार देखील घडलेले आहेत. एक साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास साहित्य अकादमी या शासकीय अनुदानावर चालणाऱ्या स्वायत्त संस्थेत सुरुवातीपासून डाव्यांचे वर्चस्व राहिले आणि त्यांनी तिथे नियमच असे काही केले की त्यात इतर कोणत्याही विचारसरणीच्या व्यक्तींना प्रवेशच करता येऊ नये. वस्तुतः साहित्य क्षेत्र हे राजकारण आणि त्यातील हेव्यादाव्यापासून दूर असावे अशी अपेक्षा असते. मात्र इथे फक्त राजकारणच होत असते. परिणामी तटस्थ किंवा उजव्या विचारसरणीच्या साहित्यिकांना तिथे लायक असताना देखील कधीच स्थान दिले जात नाही. जो प्रकार साहित्य अकादमीत आहे, तो अनेक केंद्रशासित शिक्षण संस्थांमध्ये देखील आजही सुरूच आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील.
महाराष्ट्रातील साहित्य संस्थांमध्ये देखील नेमके तेच होते आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही महाराष्ट्रातील साहित्य संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेवर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच राजकीय नेत्यांचे वर्चस्व कायम असल्याचे बोलले जाते. ते वर्चस्व इतके आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा हे साहित्याशी काहीही देणे घेणे नसलेला हा नेता ठरवतो, आणि अध्यक्षाने संमेलनातून बीजभाषण काय द्यावे त्याचे मुद्दे देखील हा नेताच सांगत असतो. आपल्याला अध्यक्ष केल्याबद्दल एका संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या नेत्याचे जाहीर आभारही मानले होते असे म्हणतात. त्यामुळे साहित्य संमेलन कोणत्याही गावात असो, गेल्या अनेक साहित्य संमेलनांमध्ये हा नेता कायम स्वागताध्यक्ष ला दिसून येतो.
तोच प्रकार मुंबई मराठी साहित्य संघ किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठवाडा साहित्य परिषदेत देखील असलेला दिसून येतो. तिथेही अध्यक्ष कोण असावा आणि त्यांनी कोणत्या विषयावर कार्यक्रम घ्यावे हे कोणीतरी राजकीय नेताच ठरवत असतो. आता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या देखील निवडणुका होऊ घातल्या आहेत. तिथे उजव्या विचाराच्या साहित्यप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन आपले पॅनल उभे केले आहे. मात्र तिथेही मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असून निवडणुका कितपत पारदर्शी वातावरणात होतील याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. या राजकीय हस्तक्षेपातून या संस्थांवर वर्षानुवर्षे सत्ता गाजवणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात पुण्यात धर्मादाय आयुक्तांकडे नंतर उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल झालेल्या आहेत. तरीही हा राजकीय हस्तक्षेप सुरूच आहे.
मात्र या राजकीय हस्तक्षेबाबत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी कधीही आवाज उठवल्याचे कानावर आलेले नाही. त्यामुळे यावेळी कदाचित त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे ते या हस्तक्षेपाला विरोध करत असावेत असे सकृतदर्शनी वाटते. वस्तूतः त्यांनी यापूर्वीच या हस्तक्षेपाला विरोध करायला हवा होता. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे काही कार्याध्यक्ष देखील होते. त्यावेळी देखील राजकीय हस्तक्षेप होतच होता. मात्र त्यावेळी त्यांनी तो चालवून घेतला होता. फक्त नयनतारा सहगल प्रकरण अंगलट आले तेव्हा त्यांना नाईलाजाने राजीनामा द्यावा लागला होता. अन्यथा या डाव्या हस्तक्षेपाकडे त्यांनी कानाडोळाच केला होता.
मग आताच या हस्तक्षेपाबाबत इतकी ओरड का असा प्रश्न निर्माण होतो. त्यातही इथे राजकीय हस्तक्षेप होतो आहे हा मुद्दा प्रचारादरम्यान ते सहज लावून धरू शकतात, आणि मतदारांना ही बाब पटवून देखील देऊ शकतात. मात्र त्यासाठी ज्यांचा या निवडणुकीशी अर्थाअर्थी संबंध नाही असे राज्यपाल, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना यात ओढण्याचा प्रयत्न कशासाठी हा देखील प्रश्न निर्माण होतो. आजच एका जोशी विरोधकाने व्हाट्सअप वर आता यानंतर जर काही झाले नाही तर जोशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही तक्रार करणार असल्याची खिल्ली उडवली आहे. तिथेही काही साधले नाही तर मग जोशी कदाचित संयुक्त राष्ट्र संघातही याचिका दाखल करू शकतात, किंवा हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात देखील जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे.
डॉ. श्रीपाद जोशी यांचे आणि माझे वैचारिक मतभेद असले तरी ते माझे अतिशय जुने आणि चांगले मित्र आहेत. एक साहित्यिक आणि एक माध्यमतज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम तसेच मराठी भाषेच्या सर्वांकष विकासासाठी दिलेले त्यांनी दिलेले योगदान याबद्दल मला पूर्ण आदरही आहे. आज साहित्य वर्तुळात त्यांचे एक वेगळे स्थान आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात त्यांनी असे फालतू प्रकार करू नये. अशाप्रकारे त्यांनी नको त्या व्यक्तींना या राजकारणात ओढणे हे हास्यास्पदच ठरणार आहे इतकेच इथे सुचवावेसे वाटते.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे…….? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो……


