मायणी-मोराळे रस्त्यावरील खचलेल्या पुलाची अखेर दुरुस्ती
गेल्या दीड वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मायणी-मोराळे रस्त्यावरील सिटी सर्वे ऑफिसनजीकच्या पुलावरील रस्त्याची अखेर दुरुस्ती झाली आहे. डॉ. सुशांत कोळी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले.
सुमारे दीड वर्षांपूर्वी आलेल्या पुराच्या तडाख्यामुळे या ओढ्यावरील पुलाचा भाग खचला होता. पुलावर वारंवार पाणी साचत असल्याने रस्ता पूर्णपणे उखडला होता. परिणामी, या ठिकाणी दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक वेळा तक्रार करूनही PWD विभागाने खड्डे भरण्याच्या कामात या पुलाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. सुशांत कोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करून कामाचा खुलासा मागितला. अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या पुलाच्या खराब भागावर डांबर आणि खडी टाकून त्याचे नूतनीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, याच वेळी पुलासोबतच श्री स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खराब भागाचीही डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील प्रवाशांना होणारा त्रास आता कमी झाला आहे.
पुलावरील मुख्य रस्त्याचे काम झाले असले तरी, पुलाच्या खचलेल्या साइड पट्ट्या भरणे अद्याप बाकी आहे. हे काम उद्या शुक्रवारी पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. साइड पट्ट्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित होणार आहे.मायणी यात्रेच्या पार्श्वभूमीवर समाधान येत्या काही दिवसांत मायणीची ग्रामदैवत श्री यशवंतबाबांची मोठी यात्रा भरत आहे. या यात्रेसाठी भाविक आणि वाहने येत असतात. यात्रेपूर्वीच हा धोकादायक रस्ता दुरुस्त झाल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रशासकीय दिरंगाईला चाप लावून हे काम मार्गी लावल्याबद्दल डॉ. सुशांत कोळी व संबंधित विभाग अधिकाऱ्यांचे आभार मानले जात आहेत.


