प्रतिकूलतेवर मात करत धोंडेवाडीचा सुपुत्र झाला ‘खाकी’चा मानकरी; नानासो घाडगे यांची PSI पदी निवड!
मायणी प्रतिनिधी,दत्ता कोळी
“जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे होते,” हे धोंडेवाडी (ता.खटाव) येथील सुपुत्र नानासो आशाताई भीमराव घाडगे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत नानासो यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, एका सामान्य कुटुंबातील तरुणाने घेतलेल्या या भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वनानासो यांचा हा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, गरिबीच्या झळा सोसत ते शिक्षणासाठी पुण्याला गेले. "आपल्या बापाची ओळख एका मोठ्या साहेबाचा बाप म्हणून व्हावी," हे एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी २०१९ पासून अभ्यासाला सुरुवात केली.
गेल्या ६ वर्षांपासून नानासो रात्रंदिवस अभ्यास करत होते. या काळात अनेक मित्र अधिकारी झाले, काही वेळा अपयश आले, तर काही जवळच्या व्यक्तींनी "आता बस झाले, नोकरी-धंद्याचे बघ" असा सल्लाही दिला. मात्र, मनाशी पक्के ठरवलेले 'खाकी'चे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर, सततचा सराव आणि अफाट कष्टाच्या जोरावर त्यांनी हे शिखर गाठले आणि आपल्या नावापुढे 'साहेब' ही पदवी लावून दाखवली.
नानासो यांची निवड झाल्याचे समजताच समस्त घाडगे परिवार आणि धोंडेवाडी ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. एका जिद्दी तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
चौकट –
“रात्रीचा दिवस करून फक्त एकच विचार असायचा की व्हायचं तर साहेबच… आज त्या कष्टाचे फळ मिळाले असून माझ्या गावाची मान अभिमानाने उंचावली आहे, याचा आनंद मोठा आहे.” – नानासो घाडगे


