• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती – ४९,नीतिन गडकरी,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

माणगंगा by माणगंगा
March 17, 2026
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती – ४८ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!डॉ . तनुजा नाफडे…

आयुष्यातले सांगाती – ४९,*नीतिन गडकरी*,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.काल एका संपादकाचा फोन आला होता. येत्या २६ मे ला नितीन गडकरी केंद्रात मंत्री होऊन बारा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आम्ही त्यांच्या गौरवार्थ एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करणार आहोत. तुमचे आणि गडकरी साहेबांचे स्नेह संबंध आहेत. तेव्हा तुम्ही त्यांच्यावर एखादा लेख महिनाभरात आम्हाला लिहून पाठवा अशी विनंती ते संपादक मला करत होते.

नितीनजींवर लिहायचे असल्यामुळे मी त्यांना होकार दिला आणि नितीनजींबाबतच्या आठवणी जाग्या करू लागलो. आपण नितीनजींना कधीपासून ओळखतो असा विचार केला आणि मला २०१० मध्ये नितीनजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर दैनिक गावकरीसाठी लिहिलेला एक लेख आठवला. त्याचे शीर्षकच होते “नितीनजी बनाण्यापूर्वीचा नितीन.” म्हणजेच मी नितीनजींना फार पूर्वीपासून ओळखतो हे नक्की झाले होते. सुरुवातीच्या काळात बरेच दिवस आम्ही दोघेही एकमेकांना एकेरीतच बोलत होतो.

मात्र ज्या दिवशी नितीन भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला त्या दिवसापासून मी मनाशी ठरवून टाकते की आता नितीनशी एकेरी बोलायचे नाही. आणि तेव्हापासून हे पथ्य मी पाळत आलो आहे. नितीनजी मात्र अजूनही मला “अविनाश” म्हणूनच हाक मारतात.नितीनजींचा माझा परिचय अगदी कॉलेजच्या दिवसापासूनच होता. आम्ही दोघेही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी नितीनजी मला जवळजवळ दोन एक वर्षांनी तरी ज्युनियर असावेत. तरी एकमेकांचे नाव ऐकून होतो आणि कधीमधी बैठकांमध्ये ओझरती भेट देखील झाली होती. १९७५ साली देशात आणीबाणी लागली.

त्याच दरम्यान मी शिक्षण पूर्ण केले आणि व्यवसायात लागलो. नागपूरच्या धरमपेठेत एक जागा घेऊन फोटो स्टुडिओ टाकला.सोबत थोडीफार प्रेस फोटोग्राफी सुद्धा करायचो. दोन वर्षातच मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून देखील कार्यरत झालो होतो. त्या काळात नितीन देखील विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून चांगलाच पुढे येत होता. १९७७ ची विद्यापीठ विद्यार्थी संघाची निवडणूक नितीनने लढवली. तो अध्यक्षपदाचा उमेदवार होता. त्याच्याविरुद्ध त्या काळात काँग्रेसमधला दिग्गज म्हणून गाजलेला डॉ. श्रीकांत जिचकार हा होता. मात्र नितीनने श्रीकांतशी चांगलीच फाईट दिली.

त्यावेळी विद्यापीठ विद्यार्थी संघात काँग्रेसचेच वर्चस्व होते. मात्र नितीन फक्त दोन मतांनी पराभूत झाला होता. त्यामुळे हा गडी जर राजकारणात राहिला तर पुढे मोठा नेता होणार असे सर्वच म्हणू लागले होते.त्यावेळी जनता पक्ष होता. तेव्हा कॉलेजचे शिक्षण आटोपल्यावर नितीन जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष झाला होता. त्या काळात त्याने काही उद्योग देखील सुरू केला होता. बर्डीवर फर्निचर ची एक शोरूम सुरू केली होती. कधीमधी आमची कुठेतरी कार्यक्रमांमध्ये अशी भेट व्हायची. मात्र नियमित संपर्क असा त्या काळात नव्हता.

मधल्या काळात चार-पाच वर्ष तरी गेली असावीत. त्या काळात नितीनच्या भेटीचा योग नव्हता. निवांत भेटीचा योग आला तो १९८४ च्या मार्च महिन्यात. त्यावेळी नितीन लग्नाचा मुलगा म्हणूनही सांगण्यात येत होता. त्यावळी एका अनुरूप मुलीसाठी मी आणि सुधीर पाठक नितीनला भेटायला महालात गडकरी वाड्यावर गेलो. तिथे कळले की मॉडेल बिल चौकात असलेल्या भाजप प्रदेश कार्यालयात नितीन आहे. तिथे पोहोचलो तर नितीन भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव मानकर यांच्यासोबत बोलत बसला होता. त्या दिवशी ज्या कामासाठी गेलो, तो विषय तर पाचच मिनिटात संपला. मात्र नंतर बराच वेळ मी सुधीर आणि नितीन अशा आमच्या गप्पा रंगल्या होत्या.

यावेळी बोलताना नितीनने मी आयुष्यात नोकरी करणार नाही आणि राजकारण करणार आहे हे स्पष्ट केले होते. नंतर मग अधून मधून आमच्या भेटी पुन्हा होऊ लागल्या. कधी नितीन लुनावर फिरताना दिसायचा .तर कधी त्याच्याजवळ असलेल्या बजाज स्कूटर वर. कार्यक्रमांमध्ये आमच्या भेटी झाल्या की समवयस्क मित्रांमध्ये व्हाव्या तशा चकल्लस करणाऱ्या गप्पा व्हायच्या. याच दरम्यान नितीनचे लग्न ठरल्याची बातमी कानावर आली. योगायोगाने माझी सख्खी मोठी चुलत बहीण सरोज तोतडे हिच्या पुतणीशी नितीनचे लग्न ठरले होते. मला दोन्हीकडून निमंत्रण होते.

मात्र त्यावेळी बाहेरगावी असल्यामुळे मी लग्नाला जाऊ शकलो नव्हतो‌. नंतर कधीतरी कार्यक्रमात भेट झाल्यावर मी नितीनचे अभिनंदन देखील केले होते१९८४ मध्ये भेटलो होतो तेव्हा आपण महापालिका निवडणूक लढवू असे नितीन बोलला होता. मात्र त्या आधीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्याला प्रमोशन दिले. मी राहत असलेल्या पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून त्याला भाजपने उमेदवारी दिली. त्याच्याविरुद्ध काँग्रेसचाच युवा नेता गेव आवारी हा उभा होता. त्यावेळी इंदिरा गांधींच्या हत्त्येला जेमतेम सहा महिने झाले होते. त्यामुळे तो इम्पॅक्ट कायम होता. परिणामी काँग्रेसचा गेव आवारी विजयी झाला आणि नितीनला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र या पराभवाने खचून न जाता नितीन कामाला लागला होता. त्याने पक्षकार्यात स्वतःला झोकून दिले होते. नितीन एक चांगला वक्ता देखील आहे

. त्यामुळे पक्षातर्फे त्याला ठीकठिकाणी विविध विषयांवर भाषणे देण्यासाठी पाठवले जात होते. त्या धावपळीत देखील कुठेतरी आमची भेट व्हायचीच.नोव्हेंबर १९८८ मध्ये नागपूर विभागाचे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे आमदार गंगाधरराव फडणवीस यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेवर भाजपमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न जेव्हा आला, तेव्हा तरुण अभ्यासू वक्ता म्हणून नितीनचे नाव पुढे आले, आणि नितीन निवडणुकीला उभा राहिला. त्यावेळी काँग्रेसने देखील तगडा उमेदवार दिला होता. मात्र येथील पहिल्या फेरीतच विजयी झाला होता.

माझ्या आठवणीनुसार जुलै १९८९ मध्ये नितीन विजयी झाल्यावर त्याची विजयी निवडणूक मिरवणूक माझा स्टुडिओ असलेल्या लक्ष्मीभुवन चौकात आली, तेव्हा चौकातच जाऊन मी पुष्पहार घालून त्याचे अभिनंदन केले होते. या काळात आमदार म्हणून देखील नितीन गाजत होता. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नितीनने त्यांना विधान परिषदेत अगदी परेशान करून सोडले होते. यावेळी नितीनला जेमतेम एक वर्षाचा कालावधी मिळाला होता. मात्र त्या संधीचे देखील त्याने सोने केले आणि लगेचच नोव्हेंबर १९९० मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तो पुन्हा विजयी झाला. याच काळात मी दूरदर्शनचे काम बंद करून राजकीय पत्रकारितेत सक्रिय व्हायला सुरुवात केली होती. मग कधीमधी पत्र परिषदेत किंवा कार्यक्रमात आमच्या भेटी व्हायच्या. त्यावेळी विदर्भात सर्वमान्य असलेला अभ्यासू नेता म्हणून नितीनची प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळे विदर्भाचे नेतृत्व आपसूकच त्याच्याकडे चालत आले होते.

१९९५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी भारतीय जनता पक्ष शिवसेना यांची युती सत्तेत आली. नितीन त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक होता. त्यामुळे सहाजिकच मंत्रिमंडळात त्याचा समावेश झाला. महाराष्ट्राचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्याने शपथ घेतली. त्यावेळी त्याच्या असंख्य समवयस्क मित्रांना प्रचंड आनंद झाला होता. त्यात मी देखील एक होतो.या काळात माझे एक मित्र चैनसुख संचेती हे देखील आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांची प्रसिद्धी आणि विधानसभेचे कामकाज सांभाळून देण्याची जबाबदारी मी घेतली होती. त्यामुळे मग त्यांच्या कामासाठी माझ्या नियमित मुंबई भेटी सुरू झाल्या त्यानिमित्ताने मग नितीनच्या देखील नियमित भेटी होऊ लागल्या. राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री हा कितीही नाही म्हटले तरी मोठाच दर्जा असतो. त्यामुळे मंत्रीपद मिळाले की अनेक लोक हवेत गेलेले आपण बघतो. मात्र नितीन गडकरी हा कधीच हवेत पोहोचलेला बघायला मिळालाच नाही. तो कायम जमिनीवरच राहिला. मंत्री झाल्यावर कधी मंत्रालयाच्या लॉबीत तर कधी नागपूरला कोणत्या कार्यक्रमात अचानक भेटला तर तो आवर्जून थांबून चौकशी करत असे. मला आठवते बहुदा मार्च १९९६ मध्ये अधिवेशन चालू असताना अचानक मला मुंबईला विमानाने जावे लागले. त्या दिवशी सकाळच्या ईस्ट वेस्ट च्या फ्लाईटमध्ये मी जाऊन बसलो. माझी सीट समोरून चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर असावी. विमान सुट्टी मिळण्याची सुटण्याची वेळ झाली आणि नितीन विमानात येऊन बसला.

व्हीआयपी असल्यामुळे त्याची विमानातील पहिल्या रांगेतील पहिलीच सीट होती. मात्र उभ्या-उभ्याच त्याचे माझ्याकडे लक्ष गेले आणि त्याने आवाज दिला “अरे अविनाश तुम्ही मुंबईला निघालास का?” आणि मला समोर बोलावून घेतले. योगायोगाने पहिला रांगेत बाजूची एक सीट रिकामी होती. मग आम्ही मुंबईपर्यंत गप्पा मारतच गेलो होतो. मुंबईला सांताक्रुज विमानतळावर उतरल्यावर “तू कुठे आणि कसा जाणार आणि गाडीची सोय आहे का?” याचीही त्याने चौकशी केली होती. याच दरम्यान दैनिक गावकरी नाशिक यांचा प्रतिनिधी म्हणून मी कार्यरत झालो होतो. गावकरी जवळ मुंबईत एकच प्रतिनिधी होता. तो प्रतिनिधी म्हणजे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब देशपांडे हे विधानसभा कव्हर करायचे. अधिवेशन काळात मी मुंबईतच असल्यामुळे बाळासाहेब देशपांडे यांनीच “मी ऑफिसशी बोलतो तू विधानपरिषद कव्हर करत जा” असे सुचवले. त्यानुसार मग गावकरीसाठी माझे अधिवेशन काळातले काम सुरू झाले. सभागृहातील नितीन गडकरी अनुभवणे हा एक वेगळा थ्रिलिंग अनुभव असायचा. मंत्री म्हणून उत्तर देताना देखील प्रत्येक प्रश्नावर सखोल अभ्यास करून नितीन सभागृहात आलेला असायचा

. बरेचदा लॉबीमध्ये काही प्रश्नांवर खुलासा विचारायचा असला तर मी नितीनला गाठत असे आणि प्रत्येक मुद्द्यावर नितीनने सविस्तर खुलासा केलेला असायचा. त्यामुळे विधिमंडळाबाबत मी पाठवलेली बातमी अगदी परफेक्टच जायची. त्याचे बरेचसे श्रेय नितीनलाच जायचे. नितीन खवय्या म्हणून काय मत कायमच प्रसिद्ध होता. एकदा चैनसुख संचेतींसोबत मी नितीन गडकरींच्या बंगल्यावर गेलो होतो. तिथे कामाचे बोलणे झाल्यावर इतर गप्पा सुरू झाल्या. तेव्हा अंधेरी मध्ये एक साउथ इंडियन लोकांचा फूड फेस्टिवल लागला आहे आणि तिथे शंभर प्रकारच्या वेगवेगळ्या इडल्या मिळतात अशी माहिती नितीनने दिली. शिवाय “अविनाश तू चैनसुखला एकदा तिथे लगेचच घेऊन जा आणि सगळ्या प्रकारच्या इडल्या टेस्ट करा” असा सल्लाही दिला होता. “मी स्वतः तिथे जाऊन आलो आणि सर्व इडल्या एन्जॉय केल्या” अशी माहिती त्याने आम्हाला दिली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या पुन्हा निवडणुका झाल्या.

या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युती माघारली. परिणामी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप अशी कडबोळे आघाडी सत्तेत आली. ज्या दिवशी हे निश्चित झाले त्या दिवशी रात्रीच मी आणि चैनुभाऊ संचेती नितीनजींच्या मुंबईतील निवासस्थानी गेलो होतो. आता मंत्रिपद जाणार याचे नीतिनजींच्या डोक्यावर कोणतेही टेन्शन नव्हते. आता विरोधी पक्षात बसू आणि जुनीच जबाबदारी पार पाडू असे त्यांनी त्यावेळीच जाहीर केले होते. त्यावेळी विलासराव देशमुख सरकार सत्तेत आले, तेव्हा विधान परिषदेत भाजपची सदस्य संख्या जास्त होती‌. त्यामुळे भाजपचा विरोधी पक्ष नेता कोण हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा नितीनजींचे नाव समोर आले, आणि नितीनजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले. मग त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला धारेवर धरणे सुरू केले. ते विरोधी पक्षनेता असल्यामुळे आम्हा सर्व सभागृह कव्हर करणाऱ्या पत्रकारांची त्यांची अधिक घट्ट मैत्री जमू लागली होती. ऑक्टोबर १९९९ मध्ये नितीन गडकरी विरोधी पक्षनेते झाले. नंतर लगेचच विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन आले.

ते अधिवेशन नितीनजींनी चांगलेच गाजवले. त्यानंतर मार्च २००० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील नितीनजींनी अधिकाऱ्यांमध्ये आणि सत्ताधारी मंत्र्यांमध्ये आपला एक टेररच निर्माण केला होता असे म्हटले तरी वावगे ठरू नये.अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक दिवस प्रश्नोत्तराच्या तासात दरम्यान विरोधी पक्षनेता कार्यालयातून एक कर्मचारी एक निवेदन घेऊन पत्रकारांच्या गॅलरीत आला. तिथे प्रत्येकाला त्याने त्या निवेदन दिले त्यात नितीन गडकरींनी सर्व पत्रकारांना दुपारी दोन वाजता आपल्या दालनात चहापानासाठी बोलावले असल्याचे निमंत्रण होते. मग आम्ही सर्व पत्रकार दुपारी त्या विधान भवनातील पहिल्या मजल्यावरील विरोधी पक्षनेता दालनात गेलो (विधान परिषदेत साधारणतः दुपारी अर्धा ते पाऊण तासाचा ब्रेक घेण्याची पद्धत असते. तसा त्यावेळी ब्रेक होता) त्यामुळे आम्ही सर्वच पत्रकार रिलॅक्स होतो. मग नितीनजींनी एकेकाची ओळख करून घेतली. माझ्या जवळ आल्यावर मी त्यांना “म्हटले मला तर तुम्ही ओळखताच”. तर त्यावेळी नितीनजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवत “तुला चांगला ओळखतो रे, पण तू कोणत्या वर्तमानपत्राकडून आलायस ते तर सांग” असे म्हणत माझे वर्तमानपत्र विचारून मग इतरही चौकशी केली. नंतर जेव्हा जेव्हा नितीनजी भेटायचे तेव्हा ते आवर्जून चौकशी करायचे.सप्टेंबर २००१ मध्ये नितीनजींचा कार अपघात झाला होता. मात्र त्यातून ते सुदैवाने बचावले, तरीही त्यांना गंभीर दुखापत झाली होती. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते विधिमंडळ अधिवेशनापर्यंत पुन्हा उभे राहिले होते. नागपूर अधिवेशनात वॉकर च्या मदतीने सभागृहात येऊन बसायचे. विरोधी पक्ष बरेचदा बऱ्याच मुद्द्यांवर सभात्याग करत असतो.

तसे नितीनजी सभा त्यागाची घोषणा तर जरूर करायचे. मात्र ते खाली आपल्या खुर्चीत बसून राहायचे आणि तिथूनच ओरडून सभापतींना सांगायचे “सभापती महोदय मी देखील सभात्याग केलेला आहे.” त्यावर मग सत्याधारीबाकांवरून मल्लिनाथी देखील व्हायची. एकदा सभागृह संपल्यावर लॉबीत भेट झाली, त्यावेळी “नितीनजी तुम्ही सभात्यागाचा फार चांगला फॉर्म्युला शोधून काढला आहे” अशी मी टिप्पणी केली त्यावर नितीनजी छान हसले होते. २००१ मध्येच आई-वडिलांच्या वृद्धपकालीन आजारामुळे मी मुंबईला अधिवेशनात जाणे बंद केले होते. तरीही नागपुरात भेटी व्हायच्याच. मग मी रामटेकच्या गडावरून या नावाने एक नियतकालिक सुरू केले होते. त्यावेळी नितीनजींचा पुर्ती उद्योग सुरू होता. मी पुर्तीची जाहिरात मागायला त्यांच्याकडे गेलो होतो. मात्र सध्या आमचा उद्योग पुरेसा नफ्यात नाही त्यामुळे तुला जाहिरात देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी माझ्या उपक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या. नंतरही एकदा मनोहर जोशी लोकसभेचे सभापती झाल्यावर नागपुरात आले होते. तिथे मनोहर जोशींना मी रामटेकच्या गडावरून साप्ताहिकाचे अंक दाखवायला गेलो होतो. तिथे मी काही सांगण्याआधी नितीनजींनीच माझ्या कामाची तोंड भरून तारीफ केली की मला फारसे बोलावेच लागले नव्हते. नंतर दरवर्षी रामटेकच्या गडावरून दिवाळी अंक नितीनजी आवर्जून मागायचे, आणि वाचून त्यावर प्रतिक्रिया सुद्धा द्यायचे.

एकदा बाळासाहेब ठाकरे विशेषांकात नितीनजींचा लेख हवा होता. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की संध्याकाळी तू माझ्याबरोबर कारमध्ये चल आणि मी तुला मुद्दे सांगतो त्यावरून तू लेख तयार कर आणि प्रकाशित कर. मग संध्याकाळी त्यांच्यासोबत कारमध्ये तीन-चार कार्यक्रमांसाठी मी एकत्र फिरलो आणि ते बोलत गेले तसा मी नोंदी घेत गेलो आणि छानसा लेख तयार झाला होता. दरवर्षी दिवाळी अंकासाठी मी नितीनजींना न चुकता जाहिरात मागायला जात असे. सुरूवातीला चार-पाच वर्ष त्यांनी पुर्ती नफ्यात आल्यावर तुला जाहिरात देईल असे सांगितले होते. एकावर्षी मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा लगेच माझ्या हातातील पत्र घेऊन त्यांनी त्यावर रिमार्क लिहिला आणि सुधीर दिवेकडून जाहिरात घे असे सांगितले. तेव्हापासून ते दरवर्षी जाहिरात देत होते. मात्र तुम्ही इतरांना माझ्यासाठी सांगाल का असे विचारले तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात नाही सांगितले होते. त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले होते. माझे इतर अनेक उपक्रम चालू असतात. त्यात त्यासाठी मी अनेकांना पैसा मागत असतो. आता तुझ्यासाठी पुन्हा मागायचा म्हणजे ते मला काय म्हणतील हा खुलासा त्यांनी केला होता.२००४ मध्ये नितीनजी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर भाऊसाहेब फुंडकर यांची निवड झाली. तरीही नितीनजी विधान परिषद गाजवत होतेच. प्रदेशाध्यक्ष म्हणून मग त्यांच्या अधून मधून पत्रपरिषदांमध्ये भेटी होऊ लागल्या.

२००५ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. तर २००६ मध्ये माझ्या आईचे निधन झाले. दोन्ही वेळी नितीनजींना कळताच त्यांचे आवर्जून शोकसंवेदना व्यक्त करणारे फोन आले होते. मी घरी भेटायला येईल असेही त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या व्यस्त देत ते शक्य होणार नव्हते, याची मलाही कल्पना होती. मात्र इतक्याही व्यस्ततेत माझी त्यांनी आठवण ठेवावी हेच खूप होते. २००८ मध्ये माझे पहिले पुस्तक दाहक वास्तव चा प्रकाशन समारंभ ठरला होता. त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथजी मुंडे यायचे होते. याशिवाय प्राचार्य राम शेवाळकर, ख्यातनाम मराठी साहित्यिक गिरीजा कीर, पत्रकार सुधीर पाठक अशी सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमात राहणार होती. मात्र ऐनवेळी गोपीनाथजींचा दौरा रद्द झाला. वेळेवर काय करायचे हा प्रश्न होता. त्यावेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारींनी मला फोनवर कळवले की नितीनजी नागपुरात आहेत. मी अक्षरशः कार्यक्रमाला २४ तास राहिले असताना मुंबईत नितीनजींना फोन केला आणि त्यांना परिस्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी मला लगेच सांगितले, “मला माधवने सर्व कल्पना दिली आहे, मी नक्की येतो, तू फक्त एक काम कर, नागपूरला सुधीरला फोन करून हा कार्यक्रम नोंदवून घ्यायला सांग” त्यानुसार मी सुधीर देऊळगावकरांना फोन करून कल्पना दिली. मग ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला नितीनजी आले आणि त्यांनी कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित राहून माझ्या लेखनाचे कौतुकही केले होते.२००९ मध्ये माझे नवीन घर तयार झाले. जून २००९ मध्ये त्याचे वास्तुपूजन झाले. त्यानिमित्त निमंत्रण द्यायला मी नितीनजीं कडे गेलो होतो

. मात्र त्यादिवशी विधिमंडळाचे अधिवेशन असल्यामुळे नितीनजी येऊ शकले नव्हते. मी नंतर कधीतरी तुझ्या घरी येतो असे त्यांनी सांगितले होते. नंतरच्या काळात लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्याच काळात माझ्या घरी हिंदुस्थान समाचार चे विभागीय कार्यालय सुरू झाले होते, आणि कार्यालय प्रमुख म्हणून मी काम सुरू केले होते. निवडणुकीच्या दरम्यान मी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्या मुलाखतींवर बातम्या देणे सुरू केले होते. तसे नितीनजींना देखील मी निमंत्रण दिले. त्यांनी येतो म्हणून कबूल केले मात्र त्यांचे जमले नाही. निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या रात्री त्यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, “निवडणुकीची धावपळ संपली की मी तुझ्याकडे येतो, तासभर बसेल आणि तू एकही ओळीची बातमी छापली नाही तरी चालेल” अर्थात तेही त्यांना जमले नाही. याच दरम्यान नितीनजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्या दिवाळीत दरवर्षीप्रमाणे नितीनजींनी सर्व पत्रकारांना वाड्यावर स्नेहभोजनाला बोलावले होते. तिथे ते मला म्हणाले “अविनाश तुझ्याकडे यायचं राहिलं, आता बहुतेक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच मी तुझ्या घरी येईल” मी म्हटलं “फारच आनंदाची गोष्ट राहील, अर्थात तरीही आधी जमलं तर आधीच या”. असे मी त्यांना आग्रहाने म्हटले. तेही प्रयत्न करतो म्हणाले. मात्र त्यावेळी तो योग नव्हता. नंतरचा काळ धावपळीतच गेला, आणि एक दिवस भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नितीनजी रवाना झाले. तिथून ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून येणार हे नक्की होते. त्याप्रमाणे ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले देखील. दुसऱ्याच दिवशी ते नागपूरला आले. त्यांचे भव्य स्वागत देखील झाले. सुमारे आठवडाभराने नितीनजींनी नागपूरच्या पत्रकार भवनात पत्रकारांसाठी वार्तालाप कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांसाठी स्नेहभोजन देखील आयोजित केले होते. स्नेहभोजनाच्या वेळी मी समोर दिसल्यावर नितीनजी म्हणाले “अविनाश आता तुझ्या घरी मी नक्की येतो” लगेचच त्यांनी सुधीर देऊळगावकर या त्यांच्या स्वीय सहाय्यकाला बोलावले आणि त्याला सूचना दिली की पुढच्या दौऱ्यात अविनाश च्या घरी आणि ऑफिसला आपल्याला जायचे आहे, तू कार्यक्रमाचे नियोजन कर. मला देखील त्यांनी सांगितले की तू सुधीरशी कोऑर्डीनेट कर.त्यानुसार नियोजन करून नितीनजी माझ्या नवीन घरी भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा नितीनजी नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष झाले असल्यामुळे त्यांची जबरदस्त क्रेझ होती. त्यामुळे ते माझ्या घरी येत आहेत हे कळल्यावर पूर्ण लक्ष्मी नगरात चहलपहल सुरू झाली होती आणि त्यामुळे वस्तीत माझा देखील भाव वाढला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास नितीनजी आले. सुमारे तासभर गप्पा मारत बसले. माझे कुटुंबीय शेजारी राहणाऱ्या माझ्या दोन्ही बहिणी मेहुणे सर्वांशी ओळख करून घेत त्यांनी सर्वांची चौकशी देखील केली होती. सकाळी साडेदहाची वेळ होती. त्यामुळे काही नाश्ता करतील असे वाटले होते. मात्र आल्या आल्याच त्यांनी “वहिनी मी फक्त चहा घेणार” असे सांगून टाकले आणि चहा बरोबरच त्यांनी गप्पांचा फड रंगवला होता. सत्तेचा दावेदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष घरी यावा हा एक आगळावेगळा योग होता.नंतरही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नितीनजींची भेट होत होती. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर राजकारणात बऱ्याच उलथापालथी देखील झाल्या. तरीही नितीनजी डगमगले नाहीत. त्यांचे काम पुढे सुरूच राहिले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीनजी पहिल्यांदाच लोकसभेसाठी उभे राहिले. तोवर नितीनजी कायम पदवीधर मतदार संघातून निवडून येत होते. त्यामुळे त्यांच्यावर मागील दाराने आमदार झाले म्हणून टीकाही केली जायची. तेव्हा यावेळी निवडणूक लढवणार आणि खासदार होणार असे त्यांनी जाहीर केले होते. ते शब्द खरे करून दाखवत प्रचंड बहुमताने विजयी झाले आणि लगेच केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री देखील झाले होते. त्यांनी त्याआधी नागपूर लोकसभा मतदारसंघातून चार वेळा विजयी झालेल्या काँग्रेसचा उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. मंत्री होऊन नागपूरला आले, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मी त्यांना भेटलो होतो. त्यावेळी मी एका रोटरी क्लबचा अध्यक्ष झालो होतो. ते सांगताच त्यांनी लगेचच माझे अभिनंदन केले आणि काही चांगले प्रकल्प तू राबव असेही सुचवले. तेव्हा आम्ही अपघात मुक्त नागपूर कसे करता येईल हा प्रकल्प राबवतो आहोत असे सांगितले आणि त्यांना उद्घाटनाला तुम्हीच राहा अशी विनंती देखील केली. मात्र उद्घाटनाला जमणार नाही तुला आजच शुभेच्छा देतो असेही त्यांनी सांगितले होते. २०१७ मध्ये मी ज्या शाळेत शिकलो त्या हडस हायस्कूलचा अमृत महोत्सव समारोह होता. त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून यावे म्हणून नितीनजींना विनंती करायला आम्ही शाळेतील काही माजी विद्यार्थी गेलो होतो. नितीनजींनी ते निमंत्रण आनंदाने स्वीकारले आणि ते कार्यक्रमाला देखील आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी थोडा वेळ थांबून आम्हा सर्वांशी गप्पा देखील मारल्या होत्या. २०१८ डिसेंबर मध्ये माझा स्कूटर अपघात झाला होता. त्यावेळी महिनाभर पाय प्लास्टर मध्येच होता. प्लास्टर निघाल्यावर लगेचच मी २६ जानेवारी च्या दरम्यान डॉ. तनुजा नाफडे यांच्यासोबत दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला आम्ही नितीनजींना भेटायला लागेल गेलो. भेटल्यावर माझ्या हातात स्टिक पाहून नितीनजींनी लगेचच “तू कुठे धडपडलास?” म्हणून मला प्रश्नही विचारला. ज्यावेळी स्कुटर अपघात झाला होता याची सविस्तर माहिती कळली, तेव्हा आता गाडी जपून चालव आणि काळजी घेत जा असेही त्यांनी ठणकावले होते.

खासदार झाल्यावर नितीनजींनी नागपुरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले होते. त्यांचा खासदार सांस्कृतिक महोत्सव चांगलाच गाजत असतो. २०२० मध्ये नाशिकच्या एका पत्रकाराने वंदे मातरमच्या सर्व कडव्यांवर आधारित एक सांगितिक कार्यक्रम तयार केला होता, आणि त्याचे आयोजन नागपुरात व्हावे असे मला सुचवले होते. मी एका पत्र परिषदेनंतर नितीनजींना त्याबाबत दाखवले. तेव्हा त्यांनाही ती कल्पना आवडली

Views: 24
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
श्री उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकायांनी जपली सामाजिक बांधिलकी.

श्री उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकायांनी जपली सामाजिक बांधिलकी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)