*गव्हर्नमेंट हाऊस – राजभवन – लोकभवन प्रवासातील गालिचे, फर्निचर*
उमेश काशिकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.’गव्हर्नमेंट हाऊस’ ते ‘राजभवन’ ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ या दीर्घ प्रवासातील काही मूर्त रूपातील दुवे काळावर मात करुन आजही आपले अस्तित्व कायम ठेवून आहेत. राजकीय स्थित्यंतरे होत असताना देखील ‘जमिनीवर’ घट्ट रोवून राजप्रासादाची शोभा वाढवणारे येथील कार्पेट्स, देशोदेशींचे विसावले असे येथील सोफे तसेच भिंतीवरील चित्रे गतकाळाचे स्मरण देतात.
महाराष्ट्राला लाभलेल्या राज्यपालांपैकी काहींनी लोक भवनातील आपल्या वास्तव्यात इतिहासाचे जे काही दुवे हाती लागले ते जतन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. विशेष म्हणजे, प्रकाशझोतापासून दूर असलेल्या काही राज्यपालांच्या पत्नी या देखील इतिहास संरक्षण – संवर्धनाच्या कार्यात शांतपणे योगदान देऊन गेल्या. अश्या राज्यपालांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे डॉ पी सी अलेक्झांडर ! आपल्या साडेनऊ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांच्या मदतीने राज्यातील चारही राजभवनांच्या इतिहासावर संशोधन करवले व ते पुस्तक रूपाने प्रकाशित केले.
या संशोधनाच्या माध्यमातून गोरक्षकर यांनी अनेकविध गोष्टी प्रकाशात आणल्या. डॉ अलेक्झांडर हे स्वतः देखील इतिहास विषयात संशोधनातून पीएच डी प्राप्त केलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने ‘फ्लोरा अँड फॉना ऑफ राजभवन’ म्हणजे येथील जीवसृष्टी व वनसंपदा याचे देखील कॅटलॉग रूपाने दस्तावेजीकरण करून ठेवले. ज्या समुद्राने लोकभवनाला तीन बाजूंनी वेढले आहे त्या समुद्रातील जैवविविधतेचे देखील त्यांनी संशोधन करवून तेथील जीवसृष्टीचा त्यांनी कॅटलॉग मध्ये समावेश करवला. राज्यपाल अलेक्झांडर यांच्या पत्नी अकम्मा अलेक्झांडर या डॉ अलेक्झांडर यांच्या उत्कृष्ट मदतनीस होत्या.
अलेक्झांडर यांच्या बैठकींची, ते उपस्थित असलेल्या कार्यक्रमांची एक – एक छायाचित्रे त्या स्वतः निवडून घेत व त्यावर योग्य ते कॅप्शन करून जतन करुन ठेवीत. इतकेच नाही !डॉ अलेक्झांडर भाषण देताना एखाद्या चिठ्ठीवर दोन चार मुद्दे लिहून ठेवत. त्या चिटोऱ्यांच्या आधारे ते एक तास अभ्यासपूर्ण भाषण करत ! अकम्मा या छोट्या कागदांचे चिटोरे देखील जपून ठेवत !! आपले आत्मचरित्रात्मक पुस्तक – ‘थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर – अॅन इनसाइडर्स स्टोरी’ – यात डॉ अलेक्झांडर यांनी मलबार हिल येथील कार्पेट्स, फर्निचर आदी मूर्त ठेव्यासंदर्भात एक परिच्छेद लिहिला आहे; तो असा :
“मुंबईच्या राजभवनात सुंदर गालिचे, अप्रतिम चित्रे, नक्षीदार कोरीव दरवाजे तसेच अतिशय देखण्या फ्रेंच शैलीतील खुर्च्या आणि सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे. या फर्निचरवर अत्यंत सूक्ष्म आणि नाजूक कोरीव काम केलेले आहे. यांपैकी काही मौल्यवान वस्तू कधीकाळी वापरण्यास अयोग्य किंवा खराब झालेल्या म्हणून राजभवनाच्या गोदामात नेऊन ठेवण्यात आल्या होत्या. माझ्या पत्नीने (अकम्मा ) त्या वस्तू गो-डाऊन मधून बाहेर काढून, त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय) संचालकांच्या मदतीने पुनरुज्जीवन केले.अठराव्या शतकातील पेहेरावात असलेल्या विविध मराठा सरदारांच्या मोठ्या आकाराच्या तसबिरी, दुर्लक्षामुळे फिकट झालेल्या अवस्थेत होत्या.
त्यांचेही पुनरुज्जीवन करून त्या मुख्य अतिथिगृहात आणून ठेवण्यात आल्या.” (उद्धरण समाप्त)सुदैवाने आज देखील डॉ अलेक्झांडर यांनी नमूद केलेल्या व अकम्मा यांनी नवजीवन दिलेल्या बऱ्याच गोष्टी सुरक्षित आहेत.हे ऐतिहासिक ठेवे आठवण देतात त्यांनी पाहिलेल्या स्थित्यंतरांची व त्यांचे जतन करणाऱ्या त्यांच्या सारख्या द्रष्ट्या महाजनांची !!


