*माझंही मत..*;*संजय राऊत यांची बाष्कळ बडबड…*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.नाशिक येथे काळाराम मंदिरात नुकताच धर्म ध्वज उभारणी सोहळा पार पडला. त्याला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सर्व मान्यवर उपस्थित होते यावेळी म्हणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांना निमंत्रण दिले नाही. त्याचा त्यांना चांगलाच राग आला असावा, आणि त्यांनी त्यांचे शागीर्द विश्व प्रवक्ते संजय राऊत यांच्या कानात काहीतरी सांगितले असावे. मग या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की भाजपनेच ठाकरे यांना का बोलावले नाही?
पुढे ते असेही म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्व शिकवले आणि तोच भाजप आज उद्धव ठाकरे यांना विसरतो, आहे हे कितपत योग्य आहे?.आता बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्व शिकवले असा दावा संजय राऊत यांनी करणे हा या शतकातील मोठा विनोदच म्हणता येईल ना. शिवसेनेची स्थापना १९६६ साली मराठी माणसाचे हित रक्षण करण्यासाठी झाली. पुढली वीस वर्ष शिवसेना ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी संघर्ष करत होती. त्यांचा संघर्षाचा मुद्दा मराठी माणसावरचा अन्याय, मराठी भाषेवरचा अन्याय असाच राहिला होता.
१९८० आणि १९८५ या निवडणुकांच्या काळात शिवसेनेची जी काही पिछेहाट झाली, ती बघून आता आपण सांधे बदलायला हवेत असे बाळासाहेबांना वाटले आणि त्यांनी आता मराठी माणसा ऐवजी आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लढू असे ठरवून त्यांनी मैदानात उतरायचे ठरवले. त्यानुसार ते मैदानात आल्यामुळे मग भाजपचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांनी त्यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय जनता पक्ष हा जरी १९८० साली स्थापन झाला असला तरी त्याची मुळे १९५१ साली स्थापन झालेल्या जुन्या जनसंघात रुजली होती. त्याचबरोबर जनसंघाची मुळे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रुजलेली आहेत. १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येयच मुळी हिंदूंचे संघटन उभारणे हे होते. बलशाली हिंदू घडवणे या निर्धाराने संघ मार्गक्रमणा करत होता. मात्र १९४८ साली त्यांच्यावर जी बंदी आली त्यावेळी आता संघाला फक्त संघ स्थानावर न राहता विविध क्षेत्रात कार्यरत व्हायला हवे असे संघ नेतृत्वाला वाटले. त्यामुळे मग राजकीय क्षेत्रात सक्रिय व्हायचे म्हणून संघ स्वयंसेवकांनीच एकत्र येत भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये केली होती.
सुरुवातीपासून जनसंघ हा हिंदुत्वाच्या तत्त्वावरच चालणारा पक्ष होता आणि त्याच मार्गावर आज भाजपा चालतो आहे. १९७५ मध्ये आणिबाणी लागली. त्यावेळी जनसंघाचे अनेक नेते तुरुंगात डांबले गेले, तर अनेक नेते भूमिगत झाले होते. आणीबाणी संपल्यावर सर्व इंदिरा गांधी विरोधी पक्षांनी आणि नेत्यांनी एकत्र यायचे ठरवले आणि त्यात जनता पक्षाची स्थापना झाली. मग भारतीय जनसंघ हा जनता पक्षात विलीन केला गेला. जनता पक्ष सत्तेत आला खरा, पण तिथे त्यांच्यातच संघर्ष सुरू झाला. विशेषतः जुने समाजवादी आणि जुने जनसंघाचे यांच्यात दुहेरी सदस्यत्वावरून वाद सुरू झाले. शेवटी १९८० साली जनता पक्ष फुटला आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी या पक्षात सर्व जुने जनसंघाचे कार्यकर्तेच सक्रिय झाले होते.
तेव्हा देखील हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊनच भारतीय जनता पक्षाने वाटचाल सुरू केली होती. हे मुद्दे लक्षात घेता भारतीय जनता पक्षाला कोणीही वेगळे हिंदुत्व शिकवायची त्यावेळी गरज नव्हती हे स्पष्ट होते. त्यावेळी देखील हिंदुत्व भारतीय जनता पक्षाच्या रक्तात अक्षरशः मुरलेले होते, आणि आजही ते तसेच मुरलेले आहे. त्यामुळे त्यांना कोणीही हिंदुत्व वेगळे शिकवण्याची कधीच गरज नव्हती, आणि आजही नाही.बाळासाहेब ठाकरे हे एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. या देशात हिंदू हा बहुसंख्येनेच आहे. मुळातच हा हिंदूंचाच देश आहे. मात्र इतर जाती धर्माचे लोक त्याच्यावर दादागिरी करत असतील तर हिंदू एक होणे आणि त्यांना योग्य ते संरक्षण देणे गरजेचे आहे हे बाळासाहेबांचे मत होते. त्यामुळेच समविचारी पक्षांशी आणि कार्यकर्त्यांची सोबत घेऊन पुढची वाटचाल करायची या हेतूने त्यांनी त्यावेळी भाजपसोबत युती केली होती. त्यावेळी शिवसेनेचे अस्तित्व फक्त महाराष्ट्र पुरतेच होते. केंद्रातही त्यांचा एखाद दुसरा खासदार निवडून यायचा. ही परिस्थिती बदलायची असेल तर समविचारी राष्ट्रीय पक्षाशी युती करणे गरजेचे आहे हे ते देखील जाणून होते.
म्हणूनच त्यांनी भारतीय जनता पक्षाशी त्यावेळी युती केली होती. कुणाला हिंदुत्व शिकवायचे म्हणून त्यांनी ही युती केली नव्हती. त्यांनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच पुढे भाजपासोबत शिवसेना सत्तेत येऊ शकली होती आणि केंद्रातही शिवसेनेचे मंत्री सत्तेत आले होते.मात्र शिवसेनेचे विश्व प्रवक्ते संजय राऊत यांना एकतर हा इतिहास माहीत नसावा किंवा माहीत असेलही तरी त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करायचे आणि तोंडाला येईल बिनबुडाची बाष्कळ करायची असेच ठरवले असावे. त्यामुळेच ते असली बिनबुडाची विधाने करत आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाला आणि केंद्रात नरेंद्र मोदी तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांना जीव तोडून विरोध करायचा कळी अगदी पातळी सोडून त्यांना शिवीगाळ करायची इतकाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. तो राबवताना त्यांचे त्यांच्या जिभेवर भान राहत नाही आणि मग अशी तोंडाला येईल ती बाष्कळ विधाने ते करत सुटतात. मात्र महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. ती अशा सकाळच्या भोंग्यांकडे कधीच लक्ष देत नाही.
त्यामुळेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी उद्धवपंतांच्या शिवसेनेला त्यांची जागा दाखवलीच ना…मात्र त्यातूनही अजून उद्धवपंत आणि त्यांचे शागीर्द संजय राऊत यांना शहाणपण आलेले नाही. रोज सकाळी उठायचे आणि माध्यमांसमोर जाऊन तोंडाला येईल ते बोलायचे त्यातलाच हा प्रकार आहे. इथे आता माध्यमांनीच ठरवायचे आहे की अशा बोलभांड नेत्यांना आपण किती महत्त्व द्यायचे? माध्यमांनी जर आपले कॅमेरे आणि लेखणी बंद केली तर या बोलभांड नेत्यांचे बाष्कळ बोलणे आपसूकच बंद होईल. तसे होईल, तो सुदिन म्हणावा लागेल.


