सुभाष शिर्के यांस जीवन गौरव पुरस्कार प्रदाण या निमीत्त ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.सुभाष शिर्के हा ‘महानगर’मधील आमचा सहकारी. तसं ‘महानगर’ सुरू झाल्यानंतरच तो आमच्या टीममध्ये सामील झाला. व्हीजेटीआयमधील इंजिनिअरिंग सोडून तो आलेला. त्यामुळे आश्चर्य वाटायचं. पोलीस ट्रेनिंग करून आल्यासारखी शरीरयष्टी आणि केस. नीटनेटके कपडे घालणारा म्हणून आमच्यात उठून दिसायचा. मी मुख्यवार्ताहर तर सुभाष आणि सुयश पडते राजकीय वार्ताहर. दोघांमध्ये कायम ‘बायलाईन’ची स्पर्धा असायची. आपल्याकडे काय बातमी आहे ते एकमेकांना अजिबात कळू द्यायचे नाहीत. दोघांच्या कॉपी मात्र माझ्याकडे यायच्या. सुभाषच्या काही बातम्या महत्वाच्या होत्या. पाच कॉलम बातमी लागली की गडी खुश! १८९५ पर्यंत शरद पवार आणि कॉंग्रेस आमच्या बातम्यांचं लक्ष होतं.
त्यानंतर मग युतीचं सरकार आलं. एनरॉन प्रकरण, भूखंड घोटाळे आणि मग नंतर नारायण राणे यांचा उदय… यामुळे बातम्यांना बहर आला होता. आम्ही सारेच फिल्डवर होतो. नारायण राणेंना पत्रकार दादा म्हणायचे. सुभाष रोजच त्यांच्या संपर्कात असायचा. मी फारसा त्यांना भेटत नव्हतो. मात्र मी दणकावून बातम्या लावायचो. ते वाचून राणे सुभाषवर वैतागायचे. त्यांना वाटायचं सुभाषच ‘युवराज मोहिते’ या नावाने बातम्या लिहितो. राणेंचा रवी नावाचा एक पीए होता. गंमतीशीर होता, त्याने समजावलं की तो वेगळा आहे. राणेंच्या एका पत्रकार परिषदेत मी प्रश्न विचारायला पुढे येत असताना रवी हळूहळू माझ्या मागे आला आणि माझ्याकडे बोट दाखवून राणेंना खुणावू लागला. मी त्याला म्हटलं तू हे काय करतोय… तर सुभाषकडे पाहून हसायला लागला. त्या दिवशी बहुदा सुभाष सुटला. सुभाषला कपड्यांची भारी हौस. कसं राहिलं पाहिजे हे तो मलाही सांगत बसायचा.
ब्रॅन्डेड कुणाला परवडणार, माझा आपला झब्बा बरा मी वेळ मारून न्यायचो. ‘महानगर’च्या एका वर्धापनदिनाला सुभाषने मला गळच घातली. आपण दोघांनी टाय-कोट घालून ऑफिसला यायचं. आधीच मी ते धुडकावूनच लावलं. तुझी हौस असेल तर तू घाल… एकदा त्याने मला दादरला बोलावलं. एका टेलरकडे घेवून गेला. कपडा ठरवला, मापं दिली, दोघांनी पैसे दिले… आदल्या दिवशी वर्धापनदिनाचा अंक लावून रात्री उशीरा घरी जाताना सुभाषने माझा सूट मला दिला. अंगावर काटा आला, काय करावं कळेना. महानगरच्या खाली मामांची तंबाखूची टपरी होती. त्यांच्याकडेत तो कोट ठेवला. सकाळपासून त्याचे फोन, स्टेशनवर भेटू…
. माटुंगा स्टेशनवर पोचलो. सुभाष वाट पाहत होता… चालत पांडुरंग बिल्डिंग जवळ आलो. मामांनी हसतच कोट आणून दिला. टपरीच्या मागे अंधाऱ्या जागेत सुभाषने मला कोट घालायला लावला. टाय बांधली… त्या पेहरावात लाकडी जिन्यावरून वर जाताना काळीज धडधडत होतं…. आम्ही पाय ठेवला आणि अख्खं ऑफिस खिदळायला लागलं. निखिल वागळे बाहेर आले… त्यांना एवढं हसताना पहिल्यांदा पाहिलं.वर्धापनदिनाचा केक कोट घातलेल्या आम्हा दोघांच्या हस्ते कापला गेला. मी कोट काढला आणि माझ्या जागेवर जाऊन काम करत बसलो. अजिबात कोट काढायचा नाही…. वागळेंचं फर्मान… दोघांनीही कोट घालूनच आज काम करायचं…
झालं, दिवसभर कोट टायवर कॉपी लिही, कॉपी तपास, पानं लाव हे घामाघूम होत करत होतो… त्या सगळ्या संघर्षमय काळात सुभाषमुळे या अविस्मरणीय दिवसाचा अनुभव आला. सुभाषच्या व्यवहार ज्ञानाची कमाल वाटायची. शेअर मार्केट, बॉन्ड वगैरे तो कायकाय सांगायचा. इथं आमचा पगार पुरायचा नाही. पण तो सतत आग्रह करत रहायचा. महानगरची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई, निर्भय बनो चळवळ यात तसा सुभाष नव्हताच. तो त्याचा पिंडही नाही. पण असाच अचानक सुभाष सामाजिक कामात उतरला. तरूणांच्या गटासोबत गावात काम करायला जायचा. ‘संपर्क’ सोबत कार्यरत झाला. एकदम क्रांतिकारक. महानगरचं काम संपलं की रात्री रामपंजाबमध्ये सगळं सांगत रहायचा. मोठमोठे शब्द वापरायचा. तिथे त्याला चेतना भेटली. सुभाष रुळला. मात्र पुढे सामाजिक काम थांबलं. सुभाष कमालीचा अपडेट असायचा. तेव्हा वृत्त वाहिन्यांचा काळ सुरू झाला होता.
आम्ही प्रिंट मीडियातच धन्यता मानत असताना कॅमेऱ्याचे वेध त्याला लागले. प्रिया तेंडुलकरच्या केबल टीव्हीवरील शो साठी मी काही काळ काम केलं. मधल्या काळात दूरदर्शनवरील सारांश, मागोवासाठी रिपोर्टिंग केलं. निखिल वागळेंसोबत ‘आमनेसामने’ दीड वर्ष केलं. पण पूर्णवेळ बूम घेवून तसा उतरलो नव्हतो. आमच्या टीममधला तो पहिलाच आहे जो वृत्त वाहिनीचा वार्ताहर झाला…
अनेक चॅनेल्स करत ‘न्यूज नेशन’ पर्यंत पोहचला. वृत्त वाहिन्यांतील प्रदीर्घ अनुभव त्याला आहे.तर हे सगळं नमन लावण्याचा हेतू असा की, पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल सुभाष शिर्के या मित्राला ‘जीवनगौरव पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान केला जातोय. हा सन्मान पुरस्कार ‘टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र’ यांच्यातर्फे आज, १२ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रदान करण्यात येईल.सुभाष तुला खूप खूप शुभेच्छा !!चेतना तुझं कौतुक !!


