बरोबर बर वर्ष झालं…! Time flies..१०१ ताप, फायब्रॉईड सर्जरी आणि कमिटमेंट…..वसुंधरा काशीकर,
मुक्त पत्रकार, लेखक व निवेदिका – पुणे यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.तर झालं असं की, गेली अनेक वर्षांपासून पोटात फायब्रॉईड होता. फायब्रॉईड म्हणजे पोटात गर्भाशयाच्या आत किंवा बाहेर असणारी गाठ, जी ९९.९९ टक्के वेळी धोकादायक नसते. ती अचानक वाढली..वाढली म्हणजे वाढता वाढता वाढे… करत अर्धा किलोची झाली… आता ती काढणे क्रमप्राप्त होते.
कारण त्याचा त्रास होऊ लागला होता. मग यथावकाश तीन तासांची रुबी हॉलला सर्जरी झाली. ऑपरेशन छान झालं. यशस्वी झालं.सर्जरीच्या आधीच्या सर्व टेस्ट, अँटिबायोटिक्स, सर्जरी झाल्यानंतरचे अँटिबायोटिक्स.. अँटिबायोटिक्सचा मारा.. भयंकर नॉशिया..अन्नाचं नाव काढलं तरी उलटया…मग घरी आल्यावर हळूहळू सेटल झाले. ८ दिवसानंतर अँटिबायोटिक्सचा कोर्स संपल्यावर डॉक्टरांकडे जाऊन टाके काढले. एक कार्यक्रम खूप आधी घेतला होता. तो करता येईल का डॉक्टरांना विचारले. डॉक्टर म्हणाले करा. कार्यक्रमाला अजून ४ दिवस होते. मी आनंदात…पण परत दुसऱ्या दिवशी पासून ताप यायला सुरूवात झाली. दोन दिवस गेल्यावरही ताप कमी होईना तेव्हा परत डॉक्टरांकडे गेले.
शरीरात इन्फेक्शन आहे हे स्पष्ट होते. पुन्हा अँटिबायोटिक्सचा कोर्स सुरू झाला. एक मन म्हणत होतं की आयोजकांना सांगावं, मी येऊ शकत नाही. पण एकच दिवस होता. ते कुठून निवेदक आणि मुलाखतकार आणतील हा विषय होता. आणि त्यापेक्षा जास्त माझ्या विश्वासार्हतेचा प्रश्न होता.डॉक्टरांशी बोलले. सांगितलं की हा कार्यक्रम पार पडायला हवा. त्यांनी मला दोन गोळ्या दिल्या. म्हणाले याने किमान पाच-सहा तास ताप येणार नाही. त्यात पेनकिलरही होते. रात्री १०१ ताप. मग गोळ्या घेतल्या..ताप उतरला. सकाळी गरम पाण्याने अंघोळ केली. बरोबर कार्यक्रमाच्या एक तास आधी हजर होते.
कार्यक्रमात साडी नेसू नये असे सुरू होते. कारण पोटावर चार ठिकाणी टाके पडलेले. पण वहिनीने हिंमत दिली. म्हणाली, आज साडी नेसा छान तुम्ही..साडी नेसले…आणि कार्यक्रमाला गेले.या कार्यक्रमात मुलाखत आणि निवेदन दोन्ही होतं. सुप्रसिद्ध डायटिशियन ऋजुता दिवेकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि मुलाखत होती. The common sense diet..या नव्या पुस्तकाचं प्रकाशन… पी.एम.शहा सोशल फाऊंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता. अॅड. चेतन गांधी हे या फाऊंडेशनचे संचालक. ऋजुताला मुलाखत आणि निवेदन प्रचंड आवडलं…मला म्हणाली, Amazing anchoring & interview…!!तीच्या बायोडाटाचा मी खूप अभ्यास करुन गेले होते.
तीनेही हसत-खेळत प्रश्नांची उत्तरं दिलीत…नॅशनल फिल्म अर्काईव्हचा हॉल खचाखच भरलेला….कार्यक्रम करुन घरी आले तर येताना अतीव समाधान होतं….देवाची कृपा आणि आशीर्वाद..वडील कायम सांगायचे, ‘’बेटा आयुष्यात विश्वासार्हता खूप महत्वाची आहे. ती जप. शब्द देताना विचारपूर्वक दे पण एकदा शब्द दिला तर कसोशीने पाळ’’….आजवर तरी दिलेला प्रत्येक शब्द मी पाळला आहे हे अभिमानानं सांगू शकते…


