*माझंही मत*;*मोदीद्वेषाची झापडे काढून बघायला शिका*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतलेला ४३९९ दिवस पूर्ण झाले. यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे ४३९८ दिवस या पदावर होते.
त्यामुळे आता मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडला आहे. त्याबद्दल संपूर्ण देशात त्यांचे अभिनंदन होत आहे. त्याचवेळी देशातील भाजप विरोधक आणि नेहरू समर्थक हे मोदींवर टीका देखील करत आहेत. कोणी म्हणते आहे की नेहरू आणि मोदी यांची तुलनाच होऊ शकत नाही, तर कोणी म्हणते आहे की मोदींनी ज्याप्रमाणे इतरांचे पक्ष फोडून सरकारे बनवली त्याप्रमाणे नेहरूंनी बनवली नाहीत.
तर कोणी असेही विधान केले आहे की जर मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर या देशात कोणीही पंतप्रधान बनू शकतो. आज याच संदर्भात मी माझे मत मांडणार आहे. वस्तूतः नरेंद्र मोदी आणि पंडित जवाहरलाल नेहरू ही दोन भिन्न व्यक्तिमत्वे आहेत. त्यांचा कार्यकाळ देखील अगदी भिन्न होता. नेहरूंच्या काळातील देशासमोरच्या समस्या आणि मोदींच्या काळातील देशासमोरच्या समस्या या अगदी वेगळ्या आहेत. त्यामुळे मोदी आणि नेहरू यांची तुलना होऊच शकत नाही हे मान्य. मात्र म्हणून मोदींचे कर्तृत्व हे कुठेही कमी होत नाही हे इथे अधोरेखित करायलाच हवे.नेहरू पंतप्रधान बनले त्यावेळी देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान राहिले हे चित्र निर्माण करण्यात काँग्रेसजन यशस्वी झाले होते, तितकेच इतरांचे योगदान मिटवून टाकण्यातही त्यांना यश मिळाले होते. त्या काळात काँग्रेसला फारसा विरोधही नव्हता.
देशात काँग्रेस वगळता सक्षम असे विरोधी पक्ष कोणतेच नव्हते. त्यामुळे नेहरूंना राजकीय विरोधाला फारसे सामोरे जावे लागलेच नाही. परिणामी त्यांची ४३९८ दिवसांची कारकीर्द तसा विचार करता सरळ सोपी होती त्या तुलनेत मोदींसमोर राजकीय आव्हानेच प्रचंड आहेत. मोदी देशात सत्तेत आले त्यापूर्वी दीर्घकाळ देशात काँग्रेसची सत्ता होती. परिणामी सर्व क्षेत्रांवर काँग्रेस विचारांचीच छाप होती. प्रशासनात देखील त्यांनी ठरवलेले पायंडेच सुरू होते. ते बदलून पुढे जायचे हे मोदींसमोर खरे आव्हान होते. त्यात प्रत्येक टप्प्यावर राजकीय विरोध हा त्यांच्यासमोर उभाच होता.
त्यामुळे त्या विरोधाला सामोरे जात मोदींनी ही ४३९८ दिवसाची कारकीर्द पूर्ण केली आहे हे वास्तव नाकारता येत नाही. त्या काळात नेहरूंवर आरोप करणारे फारसे कोणी नव्हते, तर आरोप करणारे असलेच तरी माध्यमे तितकी सक्षम नव्हती. आज कोणीही उठते आणि “चौकीदार चोर है” चा नारा देते झाले तर क्षणात तो नारा देशभर पसरलेला असतो. या प्रगत माध्यमांच्या मदतीनेच आज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बरेच फेक नरेटिव्हज पसरवले जातात. एकच खोटे ओरडून दहादा सांगितले की लोकांना ते खरे वाटू लागते. अशा प्रचाराला तोंड देत मोदींना पुढे जावे लागले आहे हे वास्तव नाकारता येत नाही. मोदींनी विरोधकांचे पक्ष फोडून सरकारे बनवली हा आरोप शिल्लक शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी केला. अहो संजय राऊत… नेहरुंनी पक्ष फोडले नसतीलही, मात्र त्यांनी विरोधकच नामोहरम केले होते.
पंतप्रधानपदाचे दावेदार असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे त्यांनी पूर्ण खच्चीकरण केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खोटे नाटे आरोप करून त्यांना राजकीयदृष्ट्या पुढे येऊ दिले नव्हते. सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या कामगिरीचा कुठेही उल्लेख त्यांनी येऊ दिला नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास त्यांनी आपल्या सोयीने लिहून घेतला आणि तोच देशभर पोहोचवला होता. विरोधी पक्ष उभारण्यासाठी आधी सक्षम विरोधक हवेत. नेहरूंनी विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीत, असे धोरण ठेवले होते आणि ते त्यांनी प्रकर्षाने राबवले देखील, हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र संजय राऊत त्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करतात.
नेहरूंनी विरोधकांचे पक्ष फोडले नाहीत हे मान्य, मात्र पंतप्रधानपद मिळावे म्हणून त्यांनी देशाचे दोन तुकडेच करायला मान्यता दिली होती हे वास्तव नाकारता येत नाही. जर बॅरिस्टर जिनांना प्रथम पंतप्रधान होऊ दिले असते तर कदाचित देशाचे दोन तुकडे झाले नसते असे इतिहास सांगतो. मात्र नेहरूंना देखील पंतप्रधान होण्याची घाई झाली होती असेही इतिहासात नोंदले गेले आहेच.मोदींनी नव्या भारताची बांधणी केली असे नेहरू समर्थक म्हणतात. मात्र ही कथित बांधणी करताना त्या काही घोडचुका करून ठेवल्या होत्या त्या दुरुस्त करण्याचे काम मोदींना करावे लागले आहे.
काश्मीरला ३७० कलमान्वये विशेष दर्जा देऊन नेहरूंनी कायमची डोकेदुखी ओढवून घेतली होती. ही डोकेदुखी बंद करण्याचे धाडस फक्त नरेंद्र मोदींनी दाखवले आहे. मुस्लिमांचे अकारण लांगुलचालन करून त्यांच्याच महिलांना त्रास देण्याचे नेहरूंचे धोरण तीन तलाक रद्द करून मोदींनाच दुरुस्त करावे लागले ना. आज नरेंद्र मोदींनी गेल्या बारा वर्षात जागतिक स्तरावर भारताची एक बलशाली देश म्हणून प्रतिमा उभी केली आहे. देशात बऱ्याच नवीन गोष्टी त्यांनी आणल्या आहेत. नेहरुंच्या काळात ज्यावेळी चीनने आक्रमण केले त्यावेळी देश निश्चित शस्त्रसज्ज नव्हता. मोदींनी आज देशाला शस्त्र सज्ज केले आहे. त्यामुळेच पाकिस्तानने पहेलगांमध्ये हल्ला करताच मोदींनी ऑपरेशन सिंदूर करून त्यांना धडाही शिकवला आहे हे वास्तव नाकारता येणार नाही.देशात जर मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर मग कोणीही पंतप्रधान होऊ शकते असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे संजय राऊत सांगतात. पण ते एक विसरतात की मोदींना देशाने पंतप्रधान केले, पण त्यापूर्वी दहा वर्षाहून अधिक काळ मोदींनी गुजरात मध्ये मुख्यमंत्री म्हणून आपली क्षमता सिद्ध केली होती. भलेही त्यावेळी जे काही घडले त्याचे खापर मोदींच्या डोक्यावर फोडत सोनिया गांधी त्यांना मौत का सौदागर म्हणाल्या असतीलही, पण जनसामान्यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही, आणि त्यांनी मोदींना निवडून आणले. म्हणून ते बारा वर्षाहून अधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. भारतातील मतदार हा सुजाण आहे. तो कोणालाही खुर्चीत बसवणार नाही,
हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यायला हवे. राजकीय कुरघोड्या करून असे कोणीही एखाद्या खुर्चीत जाऊन बसते, तेव्हा त्यांचेच लोक त्यांना खुर्चीतून खाली खेचतात, याचा अनुभव उद्धव ठाकरेंनी घेतलेलाच आहे. आता भलेही गद्दार आणि मिंधे म्हणून ते शंखनाद करत असतील, पण जनता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. मोदींच्या कामावर विश्वास ठेवल्यामुळेच जनता त्यांना निवडून देते आहे.
अजून खूप काही सांगता येईल. मात्र मोदीविरोधकांची ते ऐकून घेण्याचीही तयारी घ्यावी हवी आणि घोड्याला जशी बांधतात तशी मोदी द्वेषाची झापडे त्यांनी बांधून घेऊ नये, आणि मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडला याबाबत मोकळ्या मनाने त्यांचे स्वागत करावे इतकेच इथे सुचवावे वाटते.अर्थात हे माझे मत झाले तुमचे मतही तुम्ही व्यक्त करू शकता त्याचे स्वागतच होईल.


