*छोटे पक्ष विलीन झाल्याने काँग्रेसची ताकद वाढेल हा दावा चुकीचाच..!*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी या दिल्लीत सोनिया गांधींना भेटल्या.
त्यानंतर तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्येच विलिन करण्याबाबत चर्चा सुरू झाल्या. सोनिया गांधींनीच ममता बॅनर्जींना तसा प्रस्ताव दिल्याचेही सांगण्यात आले.या सर्व पार्श्वभूमीवर शिल्लक शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना दररोज प्रमाणेच सकाळी नऊ वाजता कंठ फुटला. आता देशात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकट होणे गरजेचे आहे.
त्यामुळे इतक्या वर्षात काँग्रेस मधून फुटून बाहेर पडून छोटे पक्ष ज्यांनी बनवले आहेत, त्या सर्व छोट्या पक्षांनी आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन होणे गरजेचे आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. भरीस भर म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातला जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनाच उपदेश देऊन टाकला की पवारांनी देखील त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करावी. संजय राऊताच्या या सूचनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस हे आता बुडते जहाज आहे, त्यात कोणी बसायचा विचार करेल का? असा टोला हाणला आहे. त्यामुळे पुन्हा वाद प्रतिवाद सुरू झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात काँग्रेस मधून बाहेर निघून अनेकांनी स्वतःचे छोटे मोठे पक्ष काढलेले आहेत.
त्यातील काही पक्ष कालांतराने पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाले, तर काही पक्ष काळाच्या ओघात लुप्त देखील झाले. काही पक्ष आचके देतच जगत आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये.काँग्रेसचा इतिहास बघितला तर १९३५ ते ४० च्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष काढला होता. हा पक्ष दीर्घकाळ राजकारणात सक्रिय होता. माझ्या आठवणी प्रमाणे विदर्भात जांबूवंतराव धोटे हे काही काळ फॉरवर्ड ब्लॉकचे कार्यकर्ते होते. फॉरवर्ड ब्लॉकचे निवडणूक चिन्ह सिंह हे होते.
त्यामुळेच जांबुवंतराव धोटे यांचे निवडणूक चिन्ह देखील सिंह हेच राहिले होते. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत “वारे शेर आ गया शेर” चा नारा अक्षरशः दुमदुमला होता. आज मात्र फॉरवर्ड ब्लॉक शोधायचा तर रात्रीच्या अंधारात टॉर्च लावूनच शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती इतर पक्षांची देखील आहे. माझ्याच आठवणीत १९६९ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे दोन तुकडे झाले. त्यातील एक इंदिरा काँग्रेस तर एक संघटन काँग्रेस म्हणून ओळखली गेली होती. पैकी संघटन काँग्रेस आज कुठेही दिसत नाही.
१९७७ मध्ये संघटन काँग्रेस जनता पक्षात विलीन झाली होती. आज जनता पक्ष ही कुठे दिसत नाही. नंतर १९७८ मध्ये पुन्हा इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे विभाजन झाले. कालांतराने रेड्डी काँग्रेस ही इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली होती. नंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस काढली होती. ती आज कुठे आहे हे पवारच सांगू जाणे. १९९९ मध्ये पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. सुरुवातीला हा राष्ट्रीय पक्ष होता. आज तो साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. याशिवाय चौधरी चरणसिंग यांचा राष्ट्रीय लोकदल हा पक्ष देखील काँग्रेस मधून फुटून बाहेर निघालेला आहे. ओरिसात बिजू जनता दल आहे, पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस आहे, आजचे समाजवादी पक्ष वाले देखील जुने काँग्रेसचे होते.
इतरही असे अनेक छोटे मोठे पक्ष सापडतील. त्यातले काही पक्ष हे प्रादेशिक अस्मिता घेऊन उभे झालेले पक्ष आहेत. त्यामुळे ते फक्त प्रदेशाचाच विचार करतात. राष्ट्राचा विचार त्यांच्यासाठी दुय्यम असतो. आता या सर्व छोट्या-मोठ्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे आणि काँग्रेसची ताकद वाढवावी अशी संजय राऊत यांची सूचना आहे. तसे झाले तर देशात भाजप विरुद्ध काँग्रेस अशा दोन शक्ती समोरासमोर उभे राहतील आणि भाजपच्या मनमानीला चाप बसवता येईल असेही राऊत यांचे ठाम प्रतिपादन आहे. आता मुद्दा असा येतो की काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष हे कोणाच्यातरी व्यक्तिगत स्वार्थासाठीच पक्ष फुटून बाहेर निघालेले नेते कारणीभूत ठरलेले असतात. त्यामुळे पुन्हा एकदा हे सर्व पक्ष आणि त्यांचे नेते काँग्रेसमध्ये जातील का? ठीक आहे,
आज कोणाचेच अस्तित्व राहिलेले नाही. त्यामुळे “मरता क्या न करता” या याने न्यायाने हे सर्व पक्ष एकत्र येण्याचा विचार करतीलही. मात्र तसे झाले तर फायदा कोणाचा होणार? यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा जुन्या पदावर येईल का हा देखील मुद्दा विचारात घ्यायला हवा. संजय राऊतांच्या मते हे सर्व पक्ष एकत्र आले, तर काँग्रेसची ताकद वाढेल आणि काँग्रेस भाजपला शह देऊ शकेल.जर इतिहास बघितला तर काँग्रेसमधून बाहेर निघून बनवलेल्या या छोट्या पक्षांना जनाधार मिळण्यासाठी काही विशिष्ट कारणे होती.
त्यांच्या मतदारांमध्ये एक वर्ग असा देखील होता, की ज्यांना काँग्रेस चालत नव्हती. म्हणून ते या पक्षाजवळ आले होते. उद्या हे पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाले, तर त्यांच्याजवळ आलेले हे मतदार पुन्हा एकदा काँग्रेसजवळ जातील का हा देखील खरा कळीचा मुद्दा आहे. आज ज्यांना काँग्रेस चालत नाही म्हणून या छोट्या पक्षांजवळ आलेले मतदार असतील ते सहाजिकच या पक्षांपासून दूर जातील आणि प्रसंगी सैरभैरही होतील, किंवा मग भाजपाकडे जातील. अशावेळी या सर्व पक्षांचा मिळून काँग्रेसचा जनाधार वाढेल, या दाव्यात थोडे तरी तथ्य आहे असे मानता येईल.आज काँग्रेस पक्षाची जी दुर्दशा आहे, त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षातली घराणेशाही हे आहे. आज या छोट्या पक्षांमध्ये देखील घराणेशाहीच आहे. ते बघता घराणेशाही या एकत्रित काँग्रेसला टिकू देईल का हा प्रश्न देखील निर्माण होतो, आणि या संघटित घराणेशाहीला मतदार कितपत प्रतिसाद देतील हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो.
काँग्रेस पक्षाला जुने दिवस बघायचे असतील तर त्यांना सर्वप्रथम गांधी नेहरू घराण्याच्या वर्चस्वातून मोकळे होत मोकळा श्वास घ्यावा लागेल, आणि स्वतःची नवीन नेतृत्वाची फळी उभी करावी लागेल. या पक्षात काम करणारा कार्यकर्ता हाच मोठा होऊ शकेल हा विश्वास तुम्हाला प्रत्येक कार्यकर्त्यात निर्माण करावा लागेल. त्याच सोबत जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला त्यांच्यात मिसळावे लागेल. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षाच्या काळात काँग्रेसमध्ये घराणेशाहीच होती. त्यामुळे पक्षातील प्रत्येक नेता हा हस्तीदंती मनोऱ्यातच राहत होता. तो मनोरा सोडून प्रत्येकाला जनसामान्यांमध्ये मिसळावे लागेल. त्यांचे प्रश्न आपले समजून पुढे यावे लागेल तर काँग्रेसला जुने दिवस येऊ शकतात. आज काँग्रेसमधून बाहेर पडून निघालेले छोटे छोटे पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर त्याचा फायदा काँग्रेसला होणार नाही.
झालाच तर भाजपलाच होईल, कारण काँग्रेस चालत नाही म्हणून या छोट्या पक्षांजवळ आलेला जो मतदार आहे, तो आधी सैरभैर होईल आणि मग दुसरा कोणताच विकल्प नसल्यामुळे भाजपकडे जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व पक्ष एकत्र आले तर आमची स्पेस वाढेल असे म्हटलेच आहे. त्यामुळे ही शक्यता देखील नाकारता येत नाही. हे सर्वच मुद्दे लक्षात घेत आता काँग्रेसने सर्व छोट्या पक्षांना आपल्या सोबत जोडून घ्यायचे का आणि त्यामुळे आपली ताकद वाढेल का याचा सखोल विचार करायला हवा. तेच त्यांच्या हिताचे ठरेल..अर्थात हे माझं मत झालं…. तुमचं स्पष्ट आणि परखड मत तुम्ही निश्चित मांडू शकता…


