*आठवणींच्या हिंदोळ्यावर…..*;*आमदार आणि अधिकाऱ्यांसह बोट नदीत उलटते तेव्हा…*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत
!!;जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.गेल्या आठवड्यात एका नदीत बोट उलटून त्यात काही व्यक्ती ठार झाल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर बघण्यात आली. अशा घटना बरेचदा घडतात.
त्यावरून आजपासून ४७ वर्षे जुनी अशीच एक घटना आठवली. त्यात सामान्य नागरिक नाही, तर काही मान्यवर व्यक्ती देखील बोट उलटून नदीच्या पात्रात पडल्या होत्या. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत सर्वांचेच प्राण वाचले होते. इतकेच काय पण झाला प्रकार सर्वांसाठी थट्टेचा विषय बनला होता.१९७९ साली विदर्भात ठीकठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी आणि गुमगाव येथे जोरदार पूर आला होता.
त्यामुळे या दोन्ही गावातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार हे होते. पवारांनी लगेचच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी या परिसरात धाव घेतली. आधी त्यांनी बुटीबोरी गावाला भेट देऊन तिथे पूर्णतः पाहणी केली. गावातील गावकऱ्यांशी देखील संवाद साधला, आणि त्यांना दिलासा दिला. नंतर ते त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या गुमगावकडे रवाना झाले. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. दूरदर्शनने मला पवारांच्या या भेटीचे चित्रीकरण करायला सांगितले होते. त्यानुसार बुटीबोरीला जाऊन मी चित्रीकरण केले.
नंतर पवार गुमगावकडे निघाले, तसे त्याच ताफ्यात जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या गाडीत बसून मी देखील गुमगावकडे निघालो. गुमगाव वस्तीत जाण्याआधी एक नदी आडवी लागते. त्यावेळी त्या नदीवर कोणताही पूल नव्हता. होड्यांमधूनच नदी ओलांडून गावात जावे लागत असे. मुख्यमंत्री पाहणी करायला येणार म्हणून प्रशासनाने तिथे बऱ्याच होड्या सज्ज ठेवल्या होत्या. त्यानुसार पहिल्या होडीत शरद पवार, महसूल मंत्री उत्तमराव पाटील, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, भाऊ मुळक, भाऊसाहेब सुर्वे इतर काही मंत्री असे सर्व बोटीने गुमगावला पोहोचले. दुसऱ्या होडीतही अजून काही मंत्री, तर काही आमदार आणि काही अधिकारी असे रवाना झाले.
दुसरी होडी देखील सुखरूप पैलतिराला लागली होती. तिसऱ्या होडीत काही आमदार आणि काही अधिकारी असे बसले आणि तिसरी होडी पैलतिराकडे निघाली. साधारणतः प्रत्येक होडीची माणसं वाहून नेण्याची क्षमता असते. आधीच्या दोन होड्यांमध्ये मोजकीच माणसं बसवली होती. या होडीत मात्र दोघं तिघं जास्तीचे बसले, त्यामुळे होडीचे वजन वाढले होते. नावाड्याने वल्हवत होडी पैलतिराकडे न्यायला सुरुवात केली. अर्धे अंतर कापले असेल, तोच अचानक होडी उलटली आणि तिथे एकच गोंधळ सुरू झाला. नदीच्या अलीकडल्या बाजूला अनेक अधिकारी, वृत्तसंकलन करायला आलेले अनेक पत्रकार आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उभे होते. होडी उलटलेली पाहून काही सुरक्षा जवानांनी भराभर पाण्यात उड्या मारल्या. माझ्या आठवणीनुसार त्या होडीत बसून होडी उलटल्यामुळे पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्यांमध्ये नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी पुंडलिकराव गोडशेलवार, वर्धेचे आमदार प्रमोद शेंडे, नागपुरातील एक आमदार गोविंदराव वंजारी हे होते. इतरही काही आमदार आणि काही अधिकारी बसले होते. ते सर्वच पाण्यात गटांगळ्या खाताना दिसत होते. इकडे अलीकडल्या भागाला असलेल्या सर्वांनीच आता काय होते म्हणून श्वास रोखून धरला होता.अलीकडल्या बाजूला असलेल्या काही अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत अजून दोन होड्या नदीपात्रात सोडल्या आणि काही पोलीसकर्मी देखील भरभर उड्या मारून तिथवर पोहोचले.
पाण्यात गटांगळ्या खात असलेल्या सर्व आमदार कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना त्या होड्यांमध्ये बसवले आणि अलीकडल्या बाजूला आम्ही सर्व उभे होतो तिथे घेऊन आले. सर्वच ओले चिंब झाले होते. अनेकांच्या खिशातले कागदपत्रे पैसे सगळेच काही भिजले होते. जिल्हाधिकारी गोडशेलवारांच्या हातातल्या फाइल्स सुद्धा पाण्याने भिजल्या होत्या. सर्व दुर्घटनाग्रस्त नदीच्या तीरावर येऊन होडीतून उतरल्यावर उपस्थित सर्वांनीच त्यांची मस्करी करायला सुरुवात केली. त्यावेळी महसूल विभागाचे सचिव विनोद नय्यर हे तिथे उभे होते. ते गोडशेलवारांवर चांगलेच भडकलेले आम्ही लोकांनी पाहिले. सर्व पत्रकार या राजकारणी आमदारांच्या फिरक्या घेत होते.
या प्रकारामुळे बाकी मंडळी जी गुमगावला जाणार होती, ती तिथेच थांबली. थोडा वेळ गेल्यावर गुमगावात गेलेली मंडळी एकेक करत परत यायला लागली. पहिल्या बोटीत त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असलेल्या प्रभा राव आणि तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. प्रमिला टोपले या पोहोचल्या. त्यांना सर्व प्रकार कळताच त्यांनी देखील या भिजलेल्या आमदारांच्या फिरक्या घ्यायला सुरुवात केली. प्रभा राव यांनी सर्व आमदारांना आता तरी या नदीवर पूल बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही आग्रह धरा असे सुचवले, तर प्रमिला टोपले यांनी सर्वांना आता तरी पोहणे शिका म्हणजे पुन्हा असेच बोटी उलटण्याची वेळ आली तर बुडायला नको अशी मिश्किल सूचनाही केली. थोड्याच वेळात शरद पवार, उत्तमराव पाटील ही सर्व मंडळी देखील येऊन पोहोचली. तोवर त्यांच्या कानावर झालेला प्रकार पोहोचलाच होता. त्यांनी देखील आल्यावर या सर्व मंडळींची चौकशी केली. ही सर्वच आमदार मंडळी आणि अधिकारी तिथे कपडे वाळवत बसले होते. पवारांनी लगेचच सर्वांना नागपुरात जाऊन आता कपडे बदलून घ्या, मगच पुढल्या बैठकीला या असे सुचवले आणि त्या मंडळींना रवाना केले.
मग आम्ही पत्रकारांनीच पवारांना विचारले असता, आता या नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव लवकरच मला मंजूर करावाच लागेल, मी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव द्यायला सांगतो असे ठणकावून त्यांनी सांगितले. मात्र नंतर बरीच वर्षे तो पूल झाला नव्हता. या घटनेनंतर मला कधीच गुमगावला वृत्तसंकलनासाठी जाण्याचा योग आला नाही. त्यामुळे त्या नदीवर पूल झाला किंवा नाही याची कल्पनाही नाही. त्या बोटीत असलेले आणि दुर्घटनाग्रस्त झालेले बरेच जण आज जीवीतही नाहीत. मात्र अजूनही तो प्रसंग आठवला की काही काळ हसूही येते आणि काही काळ अंगावर शहारे देखील येतात.


