हॉटेलचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र.. संजय फुले
आटपाडी ता. आटपाडी येथील आशीर्वाद हॉटेलवर गेल्या काही दिवसात हॉटेल आशिर्वादवर अन्न व औषध प्रशासनाची धाड पडल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत हॉटेल आशिर्वाद व्यवस्थापनाने अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध केले असून, संबंधित बातम्या व अफवा पूर्णपणे निराधार, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
हॉटेल मालकाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, हॉटेलवर कोणत्याही वरिष्ठ अथवा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. वास्तविक अशी कोणतीही घटना घडलेली नसताना काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जाणीवपूर्वक अफवा पसरवून हॉटेलची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा हॉटेल मालकाकडून आरोप करण्यात आला आहे.अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर उभे असलेले हॉटेल आशिर्वाद हे परिसरातील एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाते.
ग्राहकांना दिले जाणारे मटन, चिकन तसेच इतर सर्व खाद्यपदार्थ हे शुद्ध, ताजे आणि उच्च दर्जाचे असतात. गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जात नसून, स्वच्छता, दर्जा आणि ग्राहकांचे समाधान हीच संस्थेची प्रमुख कार्यसूत्रे असल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले आहे.यापूर्वीही अशाच प्रकारच्या अफवा काही वर्षांपूर्वी पसरविण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे त्या अफवा आपोआप खोट्या ठरल्या. आजही ग्राहकांचा विश्वास हीच हॉटेलची सर्वात मोठी ताकद असल्याचे व्यवस्थापनाने अधोरेखित केले आहे.
तसेच “ग्राहक हाच आमचा राजा आणि देवता आहे,” या भावनेतून आम्ही सातत्याने सेवा देत आलो आहोत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि आजवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
दरम्यान, कोणतीही माहिती खातरजमा केल्याशिवाय पुढे पाठवू नये, समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि विनाकारण बदनामी करणाऱ्या अफवांना थारा देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांना उत्तम, सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी हॉटेल आशिर्वाद कटिबद्ध असून, हॉटेलमधील सर्व व्यवहार आणि सेवा सीसीटीव्हीच्या नजरेखाली पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
अफवांच्या वावटळीतही ग्राहकांचा विश्वास अबाधित ठेवत सेवा देण्याचा निर्धार व्यक्त करत हॉटेल आशिर्वादने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


