डॉ गिरीश गांधी..* *विदर्भातील साहित्यप्रेमी तुमच्याकडून उत्तरे मागताहेत….*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.आपल्याकडे शिमग्याचा सण साधारणपणे मार्च महिन्यात येतो. यंदाच्या मार्च महिन्यात विदर्भात आणखी एक शिमगा चांगलाच रंगला. हा शिमगा मार्चमध्येच सरला, पण त्याचे कवित्व अजूनही सुरूच आहे आणि कदाचित पुढील पाच वर्षे असेच रंगणार आहे. मार्च महिन्यात विदर्भ साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या. गेली जवळजवळ ३० वर्ष विदर्भ साहित्य संघात निवडणुका होतच नव्हत्या. म्हणजे एकच व्यक्ती ठरवायची आणि सर्व पदाधिकारी अविरोध निवडले जायचे.
मात्र सगळ्यांना चुपचाप एका लाईनीत बसवण्याची क्षमता असणारी व्यक्ती आता नसल्याने कधी नव्हे ते त्या निवडणुका झाल्या, आणि त्या प्रचंड गाजल्या देखील. तिथे मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देखील चर्चेत ठेवले गेले. इतकेच काय पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे देखील नाव इथे जोडले गेले. त्यानिमित्ताने रोज वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले.
सध्याचा जो साहित्य संघाचा नवा अध्यक्ष निवडून आला आहे, तो देखील गडकरींच्याच आशीर्वादाने निवडून आल्याचे लोक छातीठोकपणे सांगतात. विशेष म्हणजे साहित्याशी काहीही संबंध असलेली अमराठी व्यक्ती गडकरींच्या आशीर्वादाने साहित्य संघाची अध्यक्ष बनलेली आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी हे नितीन गडकरींचे निकटवर्ती मानले जातात. गांधी हे विदर्भातील राजकीय आणि सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. राजकारणात बरीच वर्षे घासून झाल्यावर शरद पवारांच्या कृपेने फक्त अकरा महिन्याची आमदारकी मिळाली. नंतर काहीच मिळाले नाही, आणि आता मिळण्याची शक्यताही दिसत नाही, म्हणून ते आता साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी गिरीश गांधी हे मास्तरकी करायचे. दादासाहेब धनवटे विद्यालयात ते काही वर्षे मास्तर होते. त्यावेळी म्हणे नितीन गडकरी त्यांचे विद्यार्थी होते.
आपल्या हाताखालून गेलेल्या इतर विद्यार्थ्यांचा आणि गांधींचा कधी संबंध असतो का हा संशोधनाचा विषय ठरेल. मात्र गडकरी जसे जसे मोठे होत गेले तसे तसे गांधी “मी तुझा मास्तर” म्हणून त्यांच्या जवळ सरकत गेले आणि आज ते गडकरींचे विश्वासू बनले आहेत.विदर्भ साहित्य संघ गेल्या जवळजवळ वीस-पंचवीस वर्षांपासून वादग्रस्तचम बनलेला आहे. नवीन अध्यक्ष आल्यावर त्यांनी आपले मंत्रिमंडळ घोषित केले आणि कामाला सुरुवात केली. आता या अध्यक्षाने वैदर्भीय साहित्यप्रेमी जनतेला आवाहन करून त्यांच्याकडून पैसा उभारणे सुरू केले आहे. त्यावरून नवा वाद रंगला आहे.विदर्भ साहित्य संघाशी वर्षानुवर्षापासून जुळलेले लोक म्हणतात की आतापर्यंत साहित्य संघाला अशाप्रकारे भिकेची झोळी घेऊन फिरावे लागले नव्हते. मग याच अध्यक्षांना असे काय झाले की ते खुर्चीवर बसताच पैसा मागत आहेत. हा पैसा कशाला उभा करायचा, विद्यमान संकुल पाडून टाकत नवे संकुल बांधायचे आहे का की अजून काही करायचे आहे, हे त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सांगायला हवे. मात्र त्याबाबत अध्यक्ष काहीच बोलत नाहीत.
ऑगस्ट २०२५ मध्ये विदर्भ साहित्य संघाला महाराष्ट्र शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार हा निधी ठेव म्हणून वापरायचा आणि त्याच्या व्याजात कारभार सांभाळायचा असे प्रस्तावित होते. या ठेवीवर दरमहा पाच लाख रुपयाचे व्याज येते. त्याशिवाय नव्या सांस्कृतिक संकुलात जी विविध सभागृहे बनली आहेत, त्याचे भाडे देखील येते. तरीही साहित्य संघाला बाहेर भिक्षेची झोळी घेऊन का फिरावे लागते याचेच उत्तर विदर्भातील साहित्यप्रेमी मागत आहेत. यासंदर्भात एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नेमकी माहिती काढून चक्क वृत्तपत्रांनाच दिली. त्यामुळे ही चर्चा जोरात रंगलेली आहे. साहित्य संघाचे विद्यमान अध्यक्ष आधीपासून विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रियभ राहिलेले आहेत.
मागे एकदा एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ते बोलले होते की “नागपुरात सामाजिक कामासाठी भीक मागणारा सर्वात मोठा भिकारी मीच आहे”. त्यामुळे आपली भीक मागण्याची सवय त्यांनी अशीच कायम ठेवली की काय ही शंका घ्यायला निश्चित वाव आहे. इथे बाकी काहीही असो पण “तुम्ही पैसा का उभा करता?” ते कारण सर्वांनाच स्पष्ट व्हायला हवे.साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाचे कामकाज बांधकाम ३१ वर्षांपासून सुरू आहे. ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. या बांधकामात मंजूर आराखड्यापेक्षा जास्तीचे बांधकाम केले. ते नियमित करण्यासाठी महापालिकेने जवळजवळ एक कोटीचा दंड मागितला होता. नंतर ती रक्कम ५५ लाखावर आली. मात्र गेली काही वर्षे ती रक्कम भरलीच नाही. त्यामुळे व्याजासकट ती रक्कमही एक कोटीही पर्यंत गेली असल्याची माहिती आहे. याबाबतही स्थानिक वृत्तपत्रात वाचण्यात आले देखील. हा नेमका काय प्रकार आहे हे नव्या अध्यक्षांनी साहित्य प्रेमींना सांगायला हवे.विदर्भ साहित्य संघ ही साहित्य प्रेमींची संघटना आहे. तिथे जाती धर्म या वादांना थारा नसायला हवा. इतकेच काय पण साहित्य संघाचे पदाधिकारी देखील त्यापासून दूर राहायला हवेत. मात्र गिरीश गांधींच्या मंत्रिमंडळातील त्यांची सर्वात विश्वासू म्हणून ओळखली जाणारी एक व्यक्ती याच प्रकारात वादात सापडली आहे. त्या व्यक्तीने समाज माध्यमावर एका व्यक्तीशी झालेल्या त्यांच्या कथित भांडणामुळे त्या व्यक्तीच्या समस्त जातीला माजोर्डे म्हणून हिणवले आणि सभ्य शब्दात शिव्यांची लाखोळी सुद्धा वाहिली. त्यामुळे गेले पंधरा दिवस समाज माध्यमावर हाच वाद रंगला आहे. आता डॉ गिरीश गांधी म्हणतील की हा मुद्दा साहित्य संघाबाहेरचा आहे. पण ज्या महात्मा गांधींनी जातपातविरहित समाज घडवण्याचे स्वप्न बघितले होते, त्या “गांधी” या नावाशी तरी डॉ गिरीश गांधी इमान राखून या प्रकारात काही कारवाई करतील का हा प्रश्न देखील विचारला जात आहे. डॉ. गिरीश गांधींच्या कार्यकारिणीत सुमारे आठ ते दहा व्यक्ती या सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणाऱ्या आहेत.
या व्यक्ती तरी गिरीश गांधींना अशाप्रकारे जातीपातीवरून सामाजिक वाद निर्माण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना योग्य तो समज देण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी आग्रह धरणार आहेत का? हा देखील प्रश्न साहित्य वर्तुळाच विचारला जातो आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या २६ जून रोजी साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. या बैठकीत हे सर्व मुद्दे चर्चिले जातील का आणि या मुद्द्यांवर साहित्यप्रेमींना उत्तरे मिळतील का हा प्रश्न सध्या साहित्य वर्तुळात विचारला जातो आहे. डॉ गिरीश गांधींना माध्यमांनी विचारले असता योग्य वेळी मी,, उत्तर देईन असे ते सांगतात. ती योग्य वेळ त्यांनी लवकरच आणावी अशी सर्वांचेच अपेक्षा आहे. अर्थात हे माझं मत झालं…. तुमची स्पष्ट आणि परखड मते तुम्हीही, व्यक्त करू शकता.


