सत्यासाठी झटणाऱ्या लेखणीचा मुंबईत होणार गौरव!आटपाडीचे सुपुत्र पत्रकार सुधीर पाटील यांना ‘निर्भीड पत्रकारिता पुरस्कार’; १२ जुलै रोजी मुंबईत मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान
आटपाडी / मुंबई : सत्याची निर्भीडपणे बाजू मांडत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे आटपाडीचे सुपुत्र, दैनिक जनमत चे पत्रकार तथा kd24news चे संपादक सुधीर पाटील यांना यंदाचा ‘निर्भीड पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
ग्रामीण पत्रकारितेत प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि निःपक्षपाती वृत्तांकनाची ओळख निर्माण करणाऱ्या पाटील यांच्या कार्याचा गौरव मुंबईत होणाऱ्या भव्य ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळ्या’त केला जाणार असल्याने आटपाडी तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या संकल्पनेतून *‘आर्यारवी एंटरटेनमेंट’**च्या वतीने रविवार, १२ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे हा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांसोबतच ग्रामीण भागातील मुक्त वार्ताहर, साप्ताहिक, पाक्षिक आणि डिजिटल न्यूज पोर्टलच्या संपादकांच्या कार्याला योग्य सन्मान देण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ‘निर्भीड पत्रकारिता पुरस्कार’ स्वीकारणारे सुधीर पाटील यांनी ग्रामीण भागातील अनेक सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड पत्रकारिता केली आहे.
त्यांच्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या गेल्याने त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोहळ्यात ‘स्वाभिमान लेखणी’, ‘शब्दवेध गौरव’, ‘अजेय लेखणी’, ‘कलम-रत्न’, ‘कलागौरव’, ‘साहित्य-संस्कृती जीवनगौरव’, ‘विवेक-दीप’, ‘जनसेवा रक्षक’ यांसह विविध क्षेत्रातील मानाचे पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत.
पुरस्कार वितरण समारंभात जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार व जादूगार श्रीधर कीर, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ फेम प्रा. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, साहित्याचार्य व ज्येष्ठ संपादक पंढरीनाथ तामोरे, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, अॅड. सुनिल शिर्के आणि समाजसेवक कृष्णा बाळू काजरोळकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. हा दिमाखदार सन्मान सोहळा रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत, सुरेंद्र गावस्कर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे संपन्न होणार असून, पत्रकार राहुल खरात आणि केतन भोज यांनी पत्रकार बांधवांसह रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आटपाडीच्या भूमीतून उभी राहिलेली निर्भीड लेखणी आता मुंबईच्या व्यासपीठावर गौरवली जाणार असल्याने तालुक्यातून सुधीर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


