*आंबेडकरी विचारांचा निःस्वार्थ प्रचार करणारे साहित्यसेवक राहुल बनसोडे यांचा सन्मान.
*मुंबई | प्रतिनिधी
आंबेडकरी चळवळ ही केवळ भाषणांनी नव्हे, तर विचारांचे साहित्य घराघरांत पोहोचविणाऱ्या असंख्य निःस्वार्थ कार्यकर्त्यांच्या योगदानावर उभी आहे. अशाच विचारसेवकांपैकी एक असलेले आंबेडकरी साहित्य विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते राहुल बनसोडे यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन सेनाच्या वतीने करण्यात आला
.महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन सेनानी पँथर डॉ. राजन माकणीकर यांच्या पुढाकाराने, रिपब्लिकन सेना अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री. शफिक शेख यांच्या हस्ते शाल अर्पण करून राहुल बनसोडे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना डॉ. राजन माकणीकर म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अनेकजण कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता करत आहेत. राहुल बनसोडे व त्यांचा परिवार अल्पदरात आंबेडकरी साहित्य, प्रेरणादायी पुस्तके आणि वैचारिक भेटवस्तू उपलब्ध करून देत समाजात प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. ही सेवा म्हणजे केवळ व्यवसाय नसून विचारांचा प्रसार करण्याचे सामाजिक ध्येय आहे.”ते पुढे म्हणाले की, के. ईश्वर फाउंडेशन व सम्यक महाराष्ट्र न्यूज यांच्या माध्यमातून राज्यभरातील अशा निस्वार्थ आंबेडकरी विचारसेवकांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान, प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.
त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळावे, नवीन पिढीला प्रेरणा मिळावी आणि समाजाने अशा कार्यकर्त्यांची दखल घ्यावी, या उद्देशाने लवकरच राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.रिपब्लिकन सेना अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शफिक शेख यांनीही राहुल बनसोडे यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, “स्वाभिमानाने, निष्ठेने आणि सातत्याने आंबेडकरी विचारांची सेवा करणाऱ्या भीमयोद्ध्यांचा सन्मान होणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच विचारांची मशाल पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहे.”या सन्मान सोहळ्यामुळे आंबेडकरी विचारांचा प्रसार करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या योगदानाला योग्य दाद मिळाली असून, समाजातील अनेक वैचारिक कार्यकर्त्यांना नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


