*राम मंदिर दान घोटाळा प्रकरणातील अपप्रचार थांबायला हवा…*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत
!!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.अयोध्येत उभारल्या गेलेल्या भव्य राम मंदिरात दररोज करोडो रामोभक्तांची गर्दी होते आहे. ते भक्त दानपेटीत यथाशक्ती दानही टाकत आहेत. मात्र त्या ध्यानातच काही शे कोटी रुपयांचा गडबड घोटाळा झाल्याच्या वृत्ताने देशात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात आठ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. या निमित्ताने आता देशभरात विरोधी पक्ष विशेषतः हिंदुत्वविरोधी शक्ती राजकारण उभे करत आहेत. अयोध्येतल्या या राम मंदिरात झालेली ही दान चोरी हे प्रकरण गंभीरच म्हणावे लागेल. त्याचे समर्थन कोणीही करणार नाही मात्र त्यावरून राजकारण का करायचे, आणि या प्रकरणात अपप्रचार का करायचा हाच खरा प्रश्न आहे. आपल्या देशात राम मंदिरच नाही तर अशी अनेक मोठी देवस्थाने आहेत आणि तीर्थक्षेत्रे देखील आहेत.
तिथे देखील यापूर्वी अनेक घोटाळे झाल्याच्या बातम्या वेळोवेळी आलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच तिरुपती येथील विश्वविख्यात बालाजी मंदिरात तिथे दररोज वाटल्या जाणाऱ्या प्रसादाच्या लाडू बनवण्यामध्येच मोठा घोटाळा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. शिर्डीच्या साई मंदिरातही घोटाळे झाल्याच्या चर्चा होत्या. इतरत्र देखील अशा घोटाळ्यांच्या चर्चा आहेत. इतकेच काय पण वक्फ बोर्डांच्या जमिनींच्या बाबत देखील अनेक प्रवाद निर्माण झाले आहेत. मात्र या कोणत्याच बाबतीत इतके राजकारण आणि अपप्रचार झाल्याचे कधी कानावर आलेले नाही. या प्रकरणात मात्र फक्त राजकारणच होते आहे असे नाही तर आपापल्या पक्षांची गढ्ढ्यात गेलेली पत पुन्हा सावरण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग करून घेतला जात आहे.
शिल्लक शिवसेनेचे उद्धव ठाकरे आज मुंबईत रामरक्षा आंदोलन करणार आहेत. त्यांचेच “हीज मास्टर्स व्हॉईस” खा. संजय राऊत यांनी या घोटाळातला पैसा हा भारतीय जनता पक्षाने दुसरे पक्ष फोडण्यासाठी वापरला असा आरोपही केला आहे. एकूणच या मुद्द्यावरून आता वातावरण तापवले जात आहे. या संदर्भात समाज माध्यमांवर काही वेगळ्या पोस्ट्स वाचण्यात आल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार जानेवारी २०२४ पूर्वी भारतात सर्वात प्रसिद्ध स्थान हे आग्र्याचा ताजमहाल हेच होते. आग्र्याचा ताजमहाल बघण्यासाठी जगभरातून पर्यटक आग्र्याला येत होते. ताजमहाल हे जगातले सातवे आश्चर्य म्हणून ओळखले जात असले तरी ती एका मोगल राजाने आपल्या दिवंगत पत्नीची आठवण म्हणून बांधलेली इमारत आहे असे बोलले जाते.
थोडक्यात ही मुमताज या राणीची कबर आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. हा ताजमहाल बघण्यासाठी जगभरातून सर्वात जास्त पर्यटक आतापर्यंत येत होते. मात्र जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झाल्यावर जगभरातून मोठ्या संख्येत पर्यटक अयोध्येत जाऊ लागले आहेत. परिणामी ताजमहालकडे जाणारी गर्दी कमी झाली आहे. एकूणच जागतिक स्तरावर ताजमहलचे महत्व कमी होत असून त्या तुलनेत अयोध्येतील राम मंदिराचे महत्त्व प्रचंड वाढते आहे.हीच जगभरातील मुस्लिम राष्ट्रांची आणि तिथल्या राजकारण्यांची पोटदुखी आहे. एका मोगल सौंदर्यवतीची कबर असलेल्या ताजमहालचे महत्त्व जागतिक नकाशावरून कमी होणे आणि हिंदूंचे दैवत असलेल्या प्रभू रामचंद्राचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्येतील मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारणरित्या वाढणे ही बाब त्यांना चांगलीच खटकलेली आहे. त्यामुळे या कथित दानचोरीचा मुद्दा देशभरात नव्हे जगभरात कसा तापवता येईल आणि त्यायोगे राम मंदिराचे महत्त्व कसे कमी करता येईल हाच त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
यासाठी या परकीय शक्तींनी देशातील विरोधी पक्षांना हाताशी धरले असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यातही जे पक्ष सर्वधर्मसमभावाचा आव आणत हिंदूंना विरोध करत इतर धर्मियांना डोक्यावर घेतात अशा हिंदू विरोधी पक्षांना या शक्तींनी हाताशी धरले असल्याचे वृत्त आहे. शिल्लक शिवसेनेला भारतीय जनता पक्ष आणि त्यातही मोदी शहा आणि फडणवीस या नावांनी चांगलाच पोटशूळ उठतो. या पक्षांच्या मदतीने राम मंदिर देशातील हिंदूंच्याच नजरेत जास्तीत जास्त बदनाम कसे करता येईल हे बघून त्या दृष्टीने पुन्हा ताजमहालचे महत्त्व कसे वाढवता येईल हाच या शक्तींचा प्रयत्न असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
शिल्लक शिवसेना २०२२ नंतर आपली गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी या प्रकरणाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल,याच प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.हे जर खरे असेल तर एकूणच प्रकरण गंभीर असेच मानावे लागेल. त्यामुळे देशातील रामभक्त हिंदू बांधवांनी त्वरित जागे होऊन नेमके वास्तव काय ते लोकांसमोर आणायला हवे. जे काही थोडेफार स्वार्थी हिंदूच रामाच्या विरोधात असे दंड थोपटून उभे राहणार असतील, त्यांना वेळीच ठेचून काढायला हवे. ही आजची गरज ठरेल. अर्थात मला काय वाटले ते मी सांगितलं… तुम्हाला पटतेय का ते बघा….


