*माझंही मत…**लोकप्रतिनिधींनी सभागृहात उपस्थित राहून जनसामान्यांचे प्रश्न सोडवायलाच हवेत..!*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.सध्या मुंबईत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सभागृहात ५० टक्केही आमदारांची उपस्थिती नसल्याचे वास्तव आज एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. अनेक आमदार सभागृहात शिरण्यापूर्वी बाहेर ठेवलेल्या उपस्थिती पुस्तिकेवर स्वाक्षरी करतात. मात्र सभागृहात बसतच नाहीत, असेही दिसून आले आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
हे वृत्त जर खरे असेल तर हे प्रकरण गंभीरच म्हणावे लागेल. वस्तुतः विधिमंडळ सभागृह हे लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी एक उत्तम असे व्यासपीठ असते. सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करून अनेक प्रश्न उपस्थित करता येतात आणि सोडवून देखील घेता येतात. मात्र त्यासाठी विधिमंडळ सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहणे गरजेचे असते. दुर्दैवाने अनेक सदस्य सभागृहात उपस्थितच नसतात. ते फक्त सही करून हजेरी लावतात. म्हणजे त्या दिवसाचा भत्ता वसूल होतो. मात्र सभागृहाच्या कामकाजात ते सहभागीच होत नाहीत. मी स्वतः तीस वर्षाहून अधिक काळ विधिमंडळात वृत्त संकलन केले आहे. एका काळात विधानसभेत गोपीनाथजी मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विरोधी बाकावर असताना नाना पटोले, जयंत पाटील हे सदस्य सभागृहात पूर्ण वेळ थांबून सरकारला अक्षरशः धारेवर धरत असत. तोच प्रकार विधान परिषदेत देखील होता. अपक्ष म्हणून तीस वर्षे विधान परिषदेचे सदस्य असलेले स्वर्गीय बी टी देशमुख हे सरकारला अगदी सळो की पळो करून सोडत असत.
याच सभागृहात नितीन गडकरी, व्यंकप्पा पत्की, छगन भुजबळ, अरुण गुजराती, प्रकाश जावडेकर, डॉ. अशोक मोडक या सदस्यांना सत्ताधारी मंत्र्यांचे अक्षरशः वस्त्रहरण करताना आम्ही बघितलेले आहे. मात्र विधानसभेत काय किंवा विधान परिषदेत काय हे सर्व सदस्य सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहायचे. त्यावेळी सदस्य अभ्यास करून आपापल्या क्षेत्रातील प्रश्न वेळेपूर्वी सभागृहात दाखल करून ठेवत असत. त्याशिवाय वेळेवर लक्षवेधी सूचना, औचित्त्याचे मुद्दे, अल्पसूचना प्रश्न अशा विविध माध्यमातून सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायचे. सदस्य विरोधी पक्षाचेच नाही,
पण सत्ताधारी पक्षाचे असले तरी ते प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सभागृहाचा आणि विविध सांसदीय आयुधांचा उपयोग करत असत. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. आता सभागृहात जनसामान्यांचे प्रश्न येण्याऐवजी राजकारण चालते, आणि चालू तात्पुरत्या विषयांवरच कामकाजाचा वेळ जातो असा दावा जाणकार करतात. मग लोकप्रतिनिधींना निवडूनच का द्यायचे हा देखील प्रश्न उपस्थित होतो. मिळालेल्या माहितीनुसार अधिवेशनाच्या निमित्ताने बहुतेक सर्व मंत्री विधान भवनात भेटतात. त्यामुळे जे मंत्री सभागृहात नसतील त्यांना भेटून आमदारांना आपल्या मतदारसंघातील कामे करून घ्यायची असतात. त्यासाठी ते मग या मंत्राकडून त्या मंत्र्याकडे फिरत असतात. अधिवेशन काळात आमदारांच्या मतदारसंघांमधून ज्यांची काही कामे आडली आहेत असे लोकही मुंबईत येऊन थांबतात. मग ते देखील विधिमंडळ परिसरात गर्दी करतात.
त्यांना घेऊन आमदार वेगवेगळ्या मंत्र्यांकडे किंवा प्रसंगी विधान भवन ऐवजी मंत्रालयात जाऊन कामाचा पाठपुरावा करण्यात वेळ घालवतात. इथे प्रश्न असा येतो की सभागृहाचे कामकाज सोडून या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्र्यांकडे किंवा अधिकाऱ्यांकडे जाण्याची वेळ का यावी? विधान परिषद सदस्य बी टी देशमुख म्हणायचे की आमदाराने सभागृहातच आपल्या कामगिरीने इतका धाक निर्माण करायला हवा, की आमदाराने प्रश्न उपस्थित केल्यावर संबंधित काम मार्गी लागायलाच हवे. आपण कधीही मंत्रालयात सचिव किंवा कक्ष अधिकाऱ्यांकडे कामासाठी जात नाही असेही देशमुख सर आवर्जून सांगायचे. प्रत्येक आमदाराने सभागृहात आपली कामगिरी दाखवून आपला धाक निर्माण केला, तर त्याची कामे सहज सुलभ होऊ शकतात. मात्र त्यासाठी आमदाराला अभ्यास करून यावे लागते. जर प्रत्येक प्रश्नाच्या खोलात जाऊन आमदार अभ्यास करून आला असला तर मंत्र्यांनाही आमदाराची मागणी मान्य करावी लागते. आज नेमके तेच दिसत नाही. कारण आमदार सभागृहातच नसतात. लोकप्रतिनिधींना प्रतिनिधींना जनसामान्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी विधिमंडळाचे सभागृह आणि त्याचे होणारे अधिवेशन हे एक सर्वोत्तम व्यासपीठ असते. त्याचा योग्य उपयोग व्हायलाच हवा पूर्वी आपला आमदार सभागृहात काय करतो हे फक्त वर्तमानपत्रातून कळायचे. आता मात्र सर्व काही टीव्हीवर लाईव्ह दाखवले जाते. त्यामुळे जर आपल्या आमदाराचे सभागृहात काहीच अस्तित्व दिसले नाही तर पुढच्या वेळी मतदान करताना मतदार देखील विचार करू शकतात, याचे भान सर्वच आमदारांनी ठेवायला हवे…अर्थात हे माझं मत झालं…..आपणही आपली परखड मते व्यक्त करू शकता…


