माणगंगा न्यूज | पोस्टल विशेष वृत्त
खरसुंडी श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचे स्पष्टीकरण; आमदार गोपीचंद पडळकरांचे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
आटपाडी | प्रतिनिधी
खरसुंडी येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्टने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्रीनाथ मंदिरातील चांदीच्या खांबांबाबत केलेले आरोप वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा दावा केला आहे. मंदिरातील दोन चांदीचे खांब ट्रस्टच्या अधिकृत मंजुरीने दुरुस्तीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होते आणि त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
ट्रस्टच्या माहितीनुसार, सुमारे २२ ते २३ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या खांबांवरील चांदीची झीज झाल्यामुळे डिसेंबर २०२५ मधील बैठकीत दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोल्हापूर येथे दुरुस्ती करून पूर्वीच्या २४ किलो चांदीऐवजी ३२ किलो चांदीचा वापर करून खांब नव्याने तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मंदिराच्या स्थावर मालमत्तेबाबत तसेच चांदीच्या साठ्याबाबत करण्यात आलेले आरोपही चुकीचे असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. सर्व कामे समितीच्या मंजुरीने पूर्ण झाली असून त्यांचे लेखापरीक्षण, ऑडिट व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदी उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ट्रस्टकडे ३२० किलो चांदीचा अधिकृत साठा असून सर्व आर्थिक व्यवहार, विमा, मूल्यांकन व नोंदी नियमानुसार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.”देवस्थान ट्रस्टविषयी कोणतेही सार्वजनिक आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थितीची खातरजमा करावी,” असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत दौलत पुजारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.







