विभूतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तब्बल १२८ घरकुले मंजूर…. लोकनियुक्त सरपंच सुरज पाटील यांच्या प्रयत्नांना यश; गरजू कुटुंबांच्या पक्क्या घराचे स्वप्न होणार साकार…..
आटपाडी | प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून गावासाठी तब्बल १२८ घरकुले मंजूर झाली आहेत. गावातील गरीब, गरजू आणि घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. लोकनियुक्त सरपंच सुरज पाटील यांनी घरकुल मंजुरीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून ग्रामस्थ व लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गावातील घरकुलापासून वंचित असलेल्या पात्र कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, लाभार्थ्यांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा तसेच संबंधित शासकीय कार्यालयांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. या प्रयत्नांनंतर एकाच टप्प्यात १२८ घरकुलांना मंजुरी मिळाल्याने विभूतवाडी गावासाठी हा महत्त्वाचा विकासात्मक टप्पा मानला जात आहे.सरपंच सुरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यशलोकनियुक्त सरपंच सुरज पाटील यांनी गावातील प्रत्येक पात्र आणि गरजू कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे आणि प्रस्ताव शासन स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.या प्रयत्नांना आता यश आले असून १२८ कुटुंबांच्या स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामसेवक प्रशांत देवडकर यांचेही योगदान….घरकुल प्रस्तावांसाठी आवश्यक मार्गदर्शन व पाठपुरावा केला. तसेच ग्रामसेवक प्रशांत देवडकर यांनी प्रशासकीय प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता आणि प्रस्तावांच्या कामकाजासाठी योगदान दिले.
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे घरकुल मंजुरीच्या कामाला गती मिळाली. त्यामुळे हे यश ग्रामपंचायतीच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना गावातून व्यक्त होत आहे.१२८ कुटुंबांच्या आयुष्यात नवी आशा…..ग्रामीण भागात स्वतःचे पक्के घर नसलेल्या अनेक कुटुंबांसाठी घरकुल योजना मोठा आधार ठरत आहे. विभूतवाडीतील अनेक गरजू कुटुंबे गेल्या काही काळापासून घरकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत होती.
आता १२८ घरकुले मंजूर झाल्यामुळे या कुटुंबांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण झाली आहे.“आपल्या हक्काचे पक्के घर उभे राहणार” या भावनेने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष घरकुल बांधकामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.ग्रामस्थांकडून मनःपूर्वक आभार…..
तब्बल १२८ घरकुले मंजूर झाल्यानंतर ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच सुरज पाटील, , ग्रामसेवक प्रशांत देवडकर तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.ग्रामविकासाच्या कामात अशाच प्रकारे एकजुटीने प्रयत्न सुरू ठेवून गावातील उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.विभूतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा…तब्बल १२८ घरकुले मंजूर; सरपंच सुरज पाटील यांच्या प्रयत्नांना यश!






