अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीतून जीवघेणा प्रवासखडकी बु. येथील हिंदू-मुस्लिम समाजाची व्यथा पुलाची मागणी वर्षानुवर्षे कागदावरच
चाळीसगाव :
एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी जाणे ही अत्यंत भावनिक आणि दुःखद वेळ असते. मात्र, चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु. परिसरातील सबस्टेशन भागातील ग्रामस्थांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेतानाही जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागत असल्याचे चित्र आहे.
मुस्लिम समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यास जनाजा नदीच्या पाण्यातून कबरस्थानाकडे न्यावा लागतो, तर हिंदू समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी तितूर नदीच्या पात्रातूनच मार्गक्रमण करावे लागते.खडकी बु. परिसरातील मुस्लिम कबरस्थान आणि हिंदू समाजाची स्मशानभूमी तितूर नदीच्या पलीकडे असल्याने ग्रामस्थांसमोर वर्षानुवर्षांपासून हा गंभीर प्रश्न कायम आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी तुलनेने कमी आहे. मात्र, मागील वर्षी तसेच अनेक वर्षांपासून पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असते. अनेकदा कमरेइतक्या पाण्यातून मृतदेह व जनाजा घेऊन जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.*पुलासाठी वर्षानुवर्षांपासून मागणी*या ठिकाणी पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खडकी बु. ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडूनही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मात्र, अद्याप या मागणीला प्रत्यक्ष स्वरूप आलेले नाही.विशेष म्हणजे, माजी आमदार साहेबराव घोडे यांच्या कार्यकाळापासून या पुलाची मागणी करण्यात येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर अनेक आमदार व खासदार झाले; मात्र वर्षानुवर्षे हा प्रश्न जैसे थेच राहिला आहे.*जीविताचा धोका टळणार कधी*पावसाळ्यात तितूर नदीला पूर आल्यास परिस्थिती आणखी गंभीर बनते.
अशा वेळी अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना नदी पार करणे धोकादायक ठरू शकते. एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अंत्यविधीसाठीही अशी कसरत करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पूल केवळ दळणवळणाचा प्रश्न नसून, मानवी प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आता तरी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पूल उभारण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






