माणगंगा न्युज | विशेष वृत्त
मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
आटपाडी | प्रतिनिधी
घरातील वीज मीटरवर प्रत्यक्ष वापराचे रीडिंग केवळ ४ युनिट असताना वीज बिलावर तब्बल १४० युनिटची नोंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्ष मीटर रीडिंग आणि वीज बिलावरील युनिटमध्ये मोठी तफावत असल्याने ग्राहकांना विनाकारण वाढीव बिलांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर बसवल्यापासून असे प्रकार होऊ लागले असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
घरोघरी जाऊन वीज मीटरचे अचूक रीडिंग घेण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी न करता अंदाजे युनिट नोंदवत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून पुढे येत आहेत. काही ग्राहकांचा प्रत्यक्ष वीजवापर अत्यल्प असतानाही त्यांच्या बिलावर ७० ते ८० युनिट, तर काही ठिकाणी थेट १४० युनिटपर्यंत वीजवापर दाखविला जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.मीटरवर अवघे ४ युनिटचे रीडिंग दिसत असताना बिलावर १४० युनिट कसे नोंदविले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्ष मीटरचे छायाचित्र न घेणे, रीडिंगची खातरजमा न करणे आणि मागील वापराच्या आधारे अंदाजपंचे बिल तयार करणे, यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक घरे कामानिमित्त किंवा इतर कारणांमुळे दीर्घकाळ बंद असतात. अशा बंद घरांमध्ये प्रत्यक्ष वीजवापर झालेला नसतानाही सरासरी अथवा अंदाजे युनिट लावून बिले दिली जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वीजवापर नसतानाही ज्यादा रकमेचे बिल आल्यानंतर ते दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहकांना महावितरण कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागतात.वीज बिलातील चुकीचे रीडिंग दुरुस्त होईपर्यंत पुढील बिलामध्ये थकबाकी आणि इतर आकारांची भर पडण्याची भीती असते. वेळेत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित होण्याची भीतीही ग्राहकांना सतावत असते. त्यामुळे चूक नसतानाही ग्राहकांना वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागत आहेत.महावितरणचे अधिकारी किंवा नियमित कर्मचारी जाणीवपूर्वक वाढीव बिले देत नसून, प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरी जाऊन मीटरचे अचूक रीडिंग घेणे अपेक्षित असताना आळशीपणा करून अंदाजे रीडिंग नोंदविले जात असल्याचा आरोप होत आहे.महावितरणने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मीटर रीडिंग घेण्यासाठी नियुक्त कर्मचारी अथवा संबंधित एजन्सीच्या कामाची चौकशी करावी. प्रत्येक मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग आणि छायाचित्र घेऊनच वीज बिल तयार करण्याची सक्ती करावी. चुकीची व वाढीव बिले तातडीने दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.“मीटरवर केवळ ४ युनिट आणि बिलावर थेट १४० युनिट; एवढी मोठी तफावत कशी निर्माण झाली आणि याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल वीज ग्राहकांनी उपस्थित केला आहे. महावितरणने मीटर रीडिंगच्या कामावर प्रभावी नियंत्रण ठेवून सर्वसामान्य ग्राहकांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास तातडीने थांबवावा, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे.────────────────────
चौकट
स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढले!
स्मार्ट मीटर बसवल्यापासून असे प्रकार होऊ लागले आहेत, असा ग्राहकांचा आरोप आहे. वाढीव वीज बिलांसाठी महावितरणचे अधिकारी किंवा नियमित कर्मचारी दोषी नसून, प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा आळशीपणा आणि अंदाजे नोंदी कारणीभूत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष मीटरची पाहणी न करता अंदाजपंचे युनिट नोंदविल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. महावितरणने याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधितांच्या कामाची चौकशी करावी आणि ग्राहकांचा त्रास थांबवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.





