पत्रकार सदाशिव पुकळे यांना ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर……..
पत्रकारिता ,शेती,सहकार क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याची दखल; ८ सप्टेंबर रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण
आटपाडी | प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी ता आटपाडी येथील पत्रकार सदाशिव तुकाराम पुकळे यांना पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ), नाशिक यांच्या वतीने आयोजित शिक्षक दिन–२०२६ सन्मान सोहळ्यात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सातारा व सांगली जिल्ह्याच्या सरहदीवर तसेच आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे टोक तर खटाव व मान तालुक्याच्या सरहदीवरती वसलेले छोटेसे विभूतवाडी गाव असून सदस्य पुकळे यांचे शिक्षण विभूतवाडी येथेच झाले. पूर्वीपासून शेतीची आवड असल्याने त्यांनी बाहेर नोकरीसाठी कुठेही न जाता शेती करणे पसंत केले.
शेती करत असतानाच सन 2014 पासून पत्रकारितेचा छंद लागला पत्रकारिता करीत असताना आतापर्यंत अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील व्यथा दुष्काळ चारा प्रश्न शेतीचे प्रश्न व तसेच राजकीय घडामोडी यामध्ये त्यांनी सातत्याने लिखाण करीत आले या त्यांच्या लिखाणाचा सन्मान आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे व भविष्यातील असेच सडे तोड लिखाण सुरू राहणार आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) ही नाशिक येथे नोंदणीकृत असून, नीती आयोग, भारत सरकार मान्यताप्राप्त संस्था आहे. संस्थेच्या वतीने पत्रकारिता, सहकार, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी पत्रकार सदाशिव पुकळे यांच्या पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रातील कार्याची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या विविध प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम सदाशिव पुकळे सातत्याने करीत आहेत.
आटपाडी तालुक्यातील पाणी, शेती, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासकीय प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी प्रकाश टाकला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याबरोबरच सहकार क्षेत्रातील प्रश्न मांडण्याच्या त्यांच्या कार्याची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत सदाशिव पुकळे यांना ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण संस्थेच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे. पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने दिला जाणारा हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सदाशिव पुकळे यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे विभूतवाडीसह आटपाडी तालुका आणि सांगली जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘राष्ट्रीय दर्पणस्तंभ पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल सदाशिव पुकळे यांचे पत्रकार, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि आटपाडी तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.







