महात्मा ज्याेतिराव फुले यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींची सुसज्ज निवासी शाळा उभारण्यात येणार – खासदार सुप्रियाताई सुळे
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: महात्मा जोतिराव फुले यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींची सुसज्ज निवासी शाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तीन एकर गायरान संपादीत करून त्यावर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) इमारत उभारण्यात येणार आहे. ही शाळा उभारून पूर्ण झाल्यानंतर ती केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयांसारख्या नामांकित संस्थेकडे चालविण्यास देण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे,’’ असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
खानवडीत उभारण्यात येणाऱ्या शाळेसाठी लागणारी जमीन, इमारत यांसह विविध शैक्षणिक मुद्यांवर पुणे जिल्हा परिषदेने बोलाविलेल्या ऑनलाईन बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, खानवडीत मुलींच्या शाळेची इमारत उभारण्यासाठी सामजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातही लवकरच यश मिळेल. या शाळेची इमारत ही नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशी असेल. महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मगावी दर्जेदार अशी मुलींची निवासी शाळा सुरु व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण युद्धपातळीवर पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात आली की त्यावर इमारत उभारण्याचे कामदेखील लवकरच सुरू होईल.
या बैठकीला शिक्षण खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ‘डायट’चे अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ शांतीलाल मुथा, विकास गरुड, फरिदा लांबे आदी नामांकीत तज्ज्ञ व अधिकारी सहभागी झाले होते.







