धर्माधर्मात भेद करत नाही तो सज्जन
ख्यातनाम कीर्तनकार,झी टॉकीज फेम अविनाश भारती यांचे प्रतिपादन*
अलीकडच्या काळात भोंदू बुवा बाबांनी देवाचा अक्षरशा बाजार मांडलाय. आपल्या कीर्तन प्रवचनातून धर्मा धर्मात भेद सुरू केलाय.एकाच धर्माचे तुणतुणे कीर्तनातून गाऊन वारकरी संप्रदायाला मोठा कलंक लावलाय असे परखड उदगार महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार झी टॉकीज फेम अविनाश भारती यांनी वाझर येथे काढले. कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे व कॉ. गिताबाई शिरतोडे स्मृतिदिनानिमित्त मारुती शिरतोडे यांच्या घरी आयोजीत किर्तन सोहळ्यात ते बोलत होते.अविनाश भारती म्हणाले कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपला भाऊ शुद्ध पाहिजे. भोळ्या भावाचा काहीच उपयोग नाही. मध्यंतरी काही बुवा बाबांनी सज्जनपणाची व्याख्याच बदलून टाकली. वारकरी संप्रदायाच वाटोळे केले.
एक तर बाबा म्हणत होता की हम स्वयम् भगवान के झेरॉक्स है,गेल्या दहा वर्षापासून तो जेलमध्ये आहे. गेल्या काही वर्षात राम रहीम नावाचा महाराज आला. त्याने तर एकाच वेळी दोन धर्माचा अपमान केला.राम म्हणून हिंदूंचा व रहीम म्हणून मुस्लिमांचा. बरं तो संत आहे, महाराज आहे हे कधी कळलं? तर त्याचं लफडं बाहेर आलं तेव्हा कळलं.
तेव्हा अशा ढोंगीपणा करणाऱ्या पासून, भगवी कपडे घालून खोटं बोलणाऱ्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे. एका धर्माचे तुन तुन वाजवणा्र्या पासून सावध राहिले पाहिजे.अहो धर्माधर्मात भेद करत नाही तो खरा सज्जन म्हणायला हवा. संत तुकोबारायांनी सांगितलेय, जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले ,तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा .संतांनी आपल्याला सांगून ठेवलंय की ऐसे कैसे झाले भोंदू ,कर्म करुनी म्हणती साधू ,अंगा लावूनिया राख, डोळे झाकून करती पाप. याचा विचार जनतेने करावा. कॉम्रेड मारुती शिरतोडे सरांसारखी व्यक्ती गेली दहा वर्षे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ अलीकडील तीन वर्षात आईच्या स्मरणार्थ समाजप्रबोधन पर उपक्रम राबवतात हीच खरी सज्जनता आणि तीच खरी समाजसेवा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
भगवे कपडे घातली की झाला महाराज अन पडा पाया ही पद्धत आपण बंद केली पाहिजे. महाराजाची क्वालिटी पाहिली पाहिजे. अभ्यास पाहिला पाहिजे. त्याची सेवा पाहिली पाहिजे. असे परखड उदगार अविनाश भारती यांनी आपल्या कीर्तन सोहळ्यात काढले.वाझर सारख्या खेड्यात शेकडोंच्या उपस्थितीत पार पडलेला हा कीर्तन सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.वाझरमधील वाझराई भजनी कला व पारायण मंडळाने किर्तनसाथ दिली.







