त-हाडी परिसरात सुर्यफुल पिक बहरले;
तीन – चार वर्षांनंतर सुर्यफुल पिकाची लागवड
त-हाडी प्रतिनिधी : शिरपुर तालुक्यातील त-हाडी परिसरात यंदा रब्बी हंगामात सूर्यफूलाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या 5 ते 7 वर्षांपासून पाण्याअभावी रब्बीच्या हंगामावर परिणाम होत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडत असून रब्बीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने तीन-चार वर्षांनंतर यावर्षी सूर्यफूलाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात सुर्यफुल पिक बहरली आहेत.
रब्बी हंगामातील वातावरण सुर्यफुल पिकासाठी अत्यंत पोषक असते. सुर्यफुल हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे. हे पिक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे. हे पीक पावसाचा ताण बर्याच प्रमाणात सहन करू शकते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित व संकरित वाणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. दुसरे असे की, ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते.
शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामात हेच मुख्य पीक घेत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील शेतकरी दुबार पीक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यात खरीप तर उन्हाळ्यात भाजीपाला लागवड शेतकरी करत असतात. परंतु, ग्रामीण भागातील अल्पसेच शेतकरी खाद्यतेलाच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत. परंतु आता त्यामध्येही बदल होऊन एकमेकांनी केलेले शेतामधील प्रयोग व त्यापासून मिळणारा नफा पाहाता आता सध्या येथील शेतकरी जरा सजग होऊ लागला आहे.






